Wednesday, 24 October 2018

 

सकाळच्या शोला सिनेमा पाहायला, खरं तर नाही गेलं पाहिजे..
पण काय करता, सकाळचे शो खिशाला जरा परवडतात. नव्वद रुपयात काम होऊन जातं. नाहीतर, ऐन दुपारी.. सिनेमा तोच असतो, पण सिनेमा पाहायला दोन अडीचशे रुपये खर्च होतो.

आज सोमवार.. आठवड्याचा आणि कॉलेजचा पहिलाच दिवस,

आजच्या शोला, सिनेमा पाहायला खूपच वात्रट मुलं मुली आली होती. मी बसलो होतो, त्याच्या मागील लाईन मध्ये, आठ दहा तरुण मुलं मुली सिनेमा पाहायला बसली होती.
सिनेमा सुरु झाला, तशी त्यांच्या तोंडाची टकळी सुरु झाली. ते सिनेमा संपेपर्यंत, ती काही बंद झाली नाही. त्या मुलांच्या तोंडाला अजिबात दम नव्हता.. सारखं काहीतरी बोलतच होते. तिथे बसलेली एक मुलगी, तिच्या बॉय फ्रेंडला विचारात होती.

तेरे दोस्त को गर्लफ्रेंड नहीये क्या.?

तर मुलगा म्हणत होता.. मिलेगी रे, तू कैसे मेरेको मिली. वैसे उसको भी कोही तो मिल जायेगी..!

फक्त बोलबच्चन मुलं होती..

मध्यंतरात, त्यातील एकानेही आपल्या गर्लफ्रेंडला साधं पॉपकॉर्न सुद्धा खाऊ घातलं नव्हतं.
या मूर्ख मुली अशा नकली मजनू लोकांना फसतात, आणि नंतर..
मी टू च्या भानगडी सुरु होतात.

काय वयं होती त्या पोरांची..सगळे विशीच्या आतील होते. कॉलेज बंक करून सिनेमा पाहायला जायचं. आई वडिलांच्या डोळ्यात धूळ फेकून मौज मज्जा करायची.

सिनेमा सुरु असताना, त्या मुलांची इतकी बडबड चालू होती, कि सांगता सोय नाही. आणि त्यांना कोणी दापत सुद्धा नव्हतं हो. त्यामुळे मी सुद्धा जास्ती इंटरेस्ट घेतला नाही, विनाकारण मी काहीतरी समजवायला जायचो. आणि चुकून त्यांनी चारचौघांत आपला पाणऊतारा केला तर.? आता काही.. आपलं भांडणं करायचं वय राहिलं नाही. नाही म्हणता.. तरी, अजूनही एखाद अर्ध्याला जमिनीवर लोळवायची ताकत आहे आपल्यात. पण नको तिथे श्रम वाया घालवण्यात काहीच अर्थ नव्हता. आणि, अशा वातावरणात इच्छा नसताना सुद्धा, तशा गोंधळात.. मी आजचा तो सिनेमा पाहिला.

तुम्हाला खरं सांगतो.. वरील व्यत्यय वगळला तर..

निखळ मनोरंजन करणारा एक अप्रतिम सिनेमा आज मला पाहायला मिळाला. सिनेमात एक फार छान विनोदी अशी मर्डर मिस्ट्री दाखवली आहे. या सिनेमाचं कथानक सांगण्यात काहीच मजा नाहीये. नाहीतर तुमचा सगळा मूड जाईल. पण सिनेमा अगदी झकास आहे. त्यामुळे तुम्ही हा सिनेमा एकदा नक्की पहाच.

सिनेमातील सगळं चित्रीकरण हे पुण्यात झालं आहे. त्यात.. प्रभात रोड, मगरपट्टा, खडकी, रेंजहिल्स, होळकर ब्रिज, आणि इतर बर्याच ठिकाणचा समावेश आहे.

सिनेमाचं कथानक एका अंध पियानो वादक व्यक्तीवर साकारलं गेलं आहे. पण मुळात, तो मुलगा अंध नसतो. अंध असण्याचं नाटक करत असतो.
त्याचं असं म्हणणं असतं, कि.. अंध होऊन वावरत असताना आपलं मन शंभर टक्के एकाग्र होतं. आयुष्यमान ( आकाश ) याने अंध तरुणाची भूमिका अगदी हुबेहूब साकारली आहे. तर.. तब्बू आणि राधिका यांनी आपल्या अदाकारीने सगळ्यांचा कलिजा खलास केला आहे.
पण हि अंधाची नकली भूमिका साकारत असताना. आकाशच्या जीवनात एक असा भयानक प्रसंग घडतो. आणि मग, सिनेमाला खऱ्या अर्थाने सुरवात होते. आणि झक्कास अशी कलाटणी सुद्धा मिळते. पुढे काय घडतं, ते तुम्ही सिनेमातच पाहा.

खरं तर हा सिनेमा.. दोन हजार दहा साली आलेल्या एका फ्रेंच शोर्ट फिल्मवर आधारित आहे. पण तरीही, सर्व कलावंतांनी या शोर्ट स्टोरीला अगदी बिग स्वरूप मिळवून दिलं आहे. सर्व कलाकारांनी मिळून या सिनेमाला फारच सुंदर न्याय दिला आहे.

सिनेमाची सुरवात आणि शेवट मुळीच चुकवू नका. नाहीतर सिनेमाचा तुम्हाला म्हणावा असा आनंद लुटता येणार नाही.
श्रीराम राघवन दिग्दर्शित हा सिनेमा आहे. सिनेमामध्ये.. तब्बू, आयुष्यमान खुराना आणि राधिका आपटे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. असे सिनेमे नेहेमी नेहेमी येत नसतात. त्यामुळे हा सिनेमा तुमची मुळीच चुकवू नका. अगदी पैसा वसूल असा हा सिनेमा आहे.


No comments:

Post a Comment