Monday, 24 April 2017

अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर.
आधी हाताला चटके, तवा मिळते भाकर.

कवियत्री बहिणाबाई चौधरी यांनी लिहिलेली हि सुरेख रचना. आजवर प्रत्येक सुगरणीच्या मनाचा ठाव घेत आली आहे. वीतभर पोटासाठी फक्त दोनच गोष्टीची गरज असते.

" भाजी आणि भाकरी..! "

स्वयपाक करायला येत नाही, अशी महिला शोधून सुद्धा सापडणार नाही. ( काही अपवाद वगळता )
भाजी कोणालाही सहजासहजी बनवता येऊ शकते. परंतु, भाकरी बनवणं खरोखर फारच दिव्य काम आहे. आणि त्यातल्या त्यात त्या भाकरी चुलीवर बनवणे म्हणजे फारच कठीण काम. काही महिला तर या भाकरी चक्क हातावर सुद्धा थापत असतात. ते त्यांचं कसबच म्हणावं लागेल.

परवा माझ्या गावी.. माझ्या नातवाचा जावळाचा कार्यक्रम होता.
कराड भागात, या देवकार्यांसाठी जावळ बकरं आणि पाट, कोंबडं द्यावं लागतं. एकंदरीत, हा तिखट नैवेद्याचा कार्यक्रम असतो. 

पूर्वी.. घरातील सगळ्या महिला मिळून हा कार्यक्रम मार्गी लावायच्या. 
पण हल्ली, ग्रामीण भागात सुद्धा आचारी लोकं हि कामं करू लागल्याने. घरातील महिलांना थोडा आराम मिळू लागला आहे. या कार्यक्रमात जेवणासाठी अंदाजे दीड दोनशे व्यक्ती तरी हमखास येत असतात. मग इतक्या लोकांसाठी भल्या थोरल्या भाकरी कोण थापणार..? हा फार मोठा प्रश्न असतो.

कराड पासून अवघ्या अकरा किमी अंतरावर डोंगराच्या कुशीत दडलेलं निळेश्वर वडोली नामक आमचं एक छोटसं गाव आहे. तर, त्या गावात आमचा हा जावळ बकऱ्याचा कार्यक्रम होता. आणि त्या कार्यक्रमात, भाकरी थापण्यासाठी आमच्या गावाच्या शेजारी नव्याने निर्माण झालेल्या " सुंदर नगर " नामक लोकवस्ती मध्ये राहणाऱ्या कर्नाटक भागातील दोन महिला तिथे या कामासाठी आल्या होत्या. सहा विटांच्या चुलीवर लोखंडी तवा ठेऊन परातीमध्ये ज्वारीचं पीठ मळून त्याच्या पातळशा भाकरी बनवण्याचं कसब मला त्यांच्याकडून पाहायला मिळालं.

या महिलांनी आम्हाला सुरवातीलाच सांगितलं होतं.. आम्हाला गेस शेगडीवर भाकरी बनवता येत नाही. आम्हाला फक्त चुलीवरच भाकरी बनवता येतात..! 
खरं तर गेस शेगडीवर हे काम अधिक सोपं झालं असतं. पण चुलीवर बनवलेल्या भाकरीची चव काही लाजवाबच असते. हे त्यापाठीमागील मुख्य कारण आहे. आणि या चुलीवरील कामात त्या महिलांना चांगला उरक सुद्धा आहे.

सहा विटांची चूल पेटवल्यावर, त्या चुलीवर तवा ठेऊन दुसरीकडे परतीमध्ये त्या पिट मळायला घ्यायच्या. एका वेळेला, किमान आठ दहा भाकरी बनतील इतकं पिट त्या माळून ठेवत होत्या. ज्वारीचं पिट मळायला सुद्धा कमालीची ताकत लागते बरं का. त्यानंतर, मळलेल्या पिठाचा ठराविक आकाराचा उंडा घेऊन कडप्प्याच्या काळ्या फरशीच्या तुकड्यावर त्या महिला भाकरी थापायला घेत होत्या. विशिष्ट प्रकारचा लयबद्ध हालचाल आणि आवाज करत त्या इतक्या सुरेख आणि पापडा सारख्या पातळ भाकरी थापायच्या. कि पाहणाऱ्याने फक्त पहातच राहावं. ईतकी अजब कला त्या महिलांच्या हातामध्ये होती. भाकरी थापून झाली, कि त्या भाकरीला तव्यावर टाकून त्यावर पाण्याचा हात फिरवून तिला शेकण्यासाठी सोडून लगेच दुसरी भाकरी थापायला घेत होत्या. तोवर त्या चुलीतील लाकडं कमी जास्ती करून विस्तव त्यांना हवा तसा काम जास्ती करत होत्या. आणि बघता बघता, ती पातळशी भाकरी टम्मकण फुगून टमाटम गोल व्हायची.

त्या महिलांच्या कामाचा उरक इतका भयंकर होता. कि अवघ्या तीन चार तासामध्ये, त्या दोघींनी मिळून पाच पायलीच्या भाकरी थापल्या होत्या. ते सुद्धा एकही ब्रेक न घेता. आणि, त्या कामाचा त्यांचा मोबदला सुद्धा अगदी अल्प होता. त्या पाच पायलीच्या भाकरी थापण्यासाठी, त्या दोघींनी फक्त सातशे रुपये घेतले होते. पण त्या भाकरी चवीला अगदी सात हजार रुपये किमतीच्या होत्या. आणि अगदी गोड सुद्धा होत्या. 

परमेश्वराने प्रत्येकाला काहीनाकाही कला देऊन ठेवली आहे. भले त्या महिला जास्ती शिकल्या नसतील. पण त्यामुळे त्यांचं काहीएक नडत नाहीये. परमेश्वराने त्यांना सुगरण हे नामांकित कला बहाल केली आहे. कमावती नको, पण असं साजूक आणि शेलकं खाऊ घालणारी धर्मपत्नी सर्वांना मिळो. शेवटी काय आहे.. 

" खाशील तर होशील, आणि होशील तर जगशील. "

Sunday, 23 April 2017

पुणे महापालिकेत.. आज, ज्या गाडीवर मी काम करत आहे..
पूर्वी त्या गाडीवर, मेहेर आडनावाचा एक व्यक्ती ड्रायव्हर म्हणून कामाला होता.
सरकारी खाकी पोशाख आणि डोक्यावर पांढरी शुभ्र गांधी टोपी परिधान करणारा मेहेर. चांगला उंचापुरा आणि जाडजूड अंगाचा होता. खरं तर हा मारवाडी बच्चा पण रंगाने बराच सावळा होता. गाडीवर असताना, तो सतत बिडी ओढत धुराच्या रेषा हवेत सोडायचा.
बरोबर दहा वर्षांपूर्वी तो ड्रायव्हर रिटायर्ड झाला, आणि त्याच्या जागी या गाडीवर मी नव्याने रुजू झालो.
पुणे महापालिकेतील ड्रायव्हर लोकांना, गाडीतील इतर कोणतीच कामं करावी लागत नाहीत.
रोज सकाळी आठवणीने, गाडीतील.. हवा, पाणी, ऑइल आणि डीझेल तेवढं चेक करून घ्यायचं. बाकी गाडीमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड आला, तर आमच्या डेपोतील ब्रेक डाऊनची गाडी आणि फिटर लोकं येऊन ती गाडी दुरुस्त करून जातात. त्यामुळे, किमान मलातरी गाडीमधील इंजन दुरुस्तीची किंवा इतर कामांची फारच जुजबी माहिती आहे.
तर एकदा काय झालं.
या मेहेर नामक ड्रायव्हरच्या गाडीमध्ये काहीतरी बिघाड झाला होता. म्हणून, त्याने व्हेईकल डेपोला तसा फोन केला. आणि सांगितलं.
" हॅल्लो, मी मेहेर बोलतोय.. पुणेस्टेशनला माझी गाडी बंद पडली आहे..! "
झालं.. डेपोमध्ये, एकच धावाधाव सुरु झाली. ब्रेक डाऊनची गाडी फिटर लोकांना घेऊन अवघ्या अर्ध्या तासात त्या संभाव्य ठिकाणी येऊन पोहोचली. पण त्या ठिकाणी त्यांना आजूबाजूला पालिकेची कोणतीच बंद गाडी दिसेना. शेवटी, हा मेहेरच त्यांच्यापाशी गेला आणि म्हणाला.
कोणाला शोधताय..?
तर.. ती फिटर लोकं म्हणाली.. अरे बाबा, मेयरची ( महापौरांची ) गाडी बंद पडली आहे. असा त्यांचा डेपोला फोन आला होता. आम्ही तीच महापौरांची गाडी शोधत आहोत.
त्यावर.. हा ड्रायव्हर त्यांना म्हणाला.
अरे, तो फोन मीच केला होता. माझीच गाडी बंद पडली आहे. मी इकडून " मेहेर " बोलतोय असं म्हणालो. आणि तुम्हाला चुकून " मेयर " ऐकू आलं असावं..!
मेहेर ड्रायव्हरचं हे वक्तव्य ऐकून ती फिटर लोकं सुद्धा या मेहेरवर जाम भडकले, त्यांचा पक्का डिसमुड झाला होता.
कारण.. फार मोठी धावपळ करत ते या कामासाठी आले होते. पण आता मात्र त्यांना, पुण्याच्या मेयरच्या गाडीचं नाही. तर.. मेहेर नामक ड्रायव्हरच्या गाडीचं काम करावं लागणार होतं.

काही प्राणी मरतात, तर काही हकनाक मारले जातात. अगदी.. मनुष्य प्राणी सुद्धा मारला किंवा मेला जात असतो.
तर मग.. जंगलात शिकार करत असताना मोठ्या मांसाहारी प्राण्यांकडून छोट्या प्राण्यांना एक भक्ष म्हणून मारलं जात असतं. पण, ते फक्त त्या संभाव्य प्राण्याच्या पोटाची आग विझवण्यासाठी. असं विनाकारण कोणी कोणाला मारणार नाही. तसं पाहायला गेलं तर.. हे एक जीवनचक्र आहे.
परंतु,
मनुष्य.. हा, शाकाहारी प्राणी असताना सुद्धा. निव्वळ आपल्या जिव्हेचे चोचले पुरवण्यासाठी किंवा अगदी अपघाताने तो मांसाहारी झाला आहे. याबाबत कोणाचंही दुमत नसावं.
शेवटी काय आहे,
मारलं किंवा मेलं, कि.. त्याची विल्हेवाट हि लागणारच असते..!
तर मग.. शिकारी प्राणी शिकार करून खातो. किंवा, मनुष्य प्राणी जिव्हेचे चोचले किंवा पोटाची खळगी भरण्यासाठी जनावर मारून खात असतो.
परंतु, आपण विचार करायला गेलो तर. या न त्या कारणाने, हे जीवित प्राणी अप्रत्यक्षपणे का होईना. कोणाच्या तरी कामाला येतच असतात.
यातील, प्रत्येक मुक्या जनावराच्या.. मासाचा, चामडीचा, दाताचा, शिंगांचा किंवा आणखीनही अशा बऱ्याच काही गोष्टी असतील. आपण, मनुष्य प्राणी त्याचा पुरेपूर आणि हवा तसा वापर करून घेत असतो. का तर, आपल्याकडे काहीतरी जास्तीची अक्कल आहे म्हणून. आणि, कोणत्याही परिस्थितीत आपल्याला ते " जीवधन " वाया घालवायचं नसतं. हा विचार, म्हणजे अगदी काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे.
परंतु, याला सुद्धा अपवादात्मक अशी आणखीन एक गोष्ट आहे.
मनुष्यप्राणी.. जीवित असताना सुद्धा कोणाच्या कामाला येत नाही. आणि, मेल्यावर सुद्धा तो कोणाच्याच कामाला येत नाही. निरनिराळे जातिवंत पगडे धारण करून, जो तो जीवित व्यक्ती, त्या मयत व्यक्तीचा आपापल्यापरीने धार्मिक अंत्यविधी पार पाडत असतो.
पण खरं पाहायला गेलं तर, आपल्या मानवी शरीराला जाळून किंवा गाडून कोणता हेतू साध्य होणार असतो..? पूर्वापार चालत आलेल्या या परंपरांना आपण कोठेतरी थांबवलं पाहिजे. हे आपलं कर्तव्य नाहीये का..?
जन्मजात डोळे नसल्याने, कितीतरी अंध बांधव त्यांचं संपूर्ण आयुष्य गडद काळोखात घालवत असतात. अपघातात चामडी जळलेल्या व्यक्ती, कितीतरी मोठ्या नर्कमय यातना भोगत असतात. परंतु काही केल्या त्यांना त्वचा किंवा डोळे मिळत नाही.
मूत्रपिंड, हृदय, स्वादुपिंड..
अशा कितीतरी मानवी अवयवांची गरज असलेले व्यक्ती, रोजच्या रोज हकनाक मरत असतात.
का तर..
" भारतात, अवयव दान करण्याची परंपरा किंवा दानत नाहीये.! "
मित्रहो..
" मरावे तरी कीर्तीरूपी, नाही.. तर " अवयव " रुपी तरी उरावे..! "
हा.. नवीन मूलमंत्र आपण सर्वांनी अमलांत आणणं आजची खरी आणि काळाची गरज आहे.
व्यक्ती गेल्यानंतर.. त्याला जाळून किंवा गाडून तुम्हाला त्याच्या स्मृती जपता येणार नाहीयेत. परंतु, त्याच्या मृत्यू पश्चात..
खोटं बोलून म्हणा किंवा त्या मृत व्यक्तीच्या मर्जीविना म्हणा. तुम्ही जर अवयव दानाचं हे महान सत्कार्य कराल. तर, तुमचे मृत आप्तेष्ट कोणत्याही रुपात तुम्हाला सदैव भेटत राहतील.
आणि, ते सुद्धा खऱ्या अर्थाने स्वर्गलोक प्राप्त करतील.
मित्रांनो.. मरणोत्तर अवयव दान, हि आजच्या काळाची गरज आहे. मृत शरीरातील महत्वाचे अवयव दान करून, आपण आपल्या मनाप्रमाणे मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार करू शकतोच कि.
 तर मग, विनाकारण..
" टिकाऊ अवयवांना टाकाऊ किंवा जळाऊ करण्यात कोणतं शहाणपण आहे..? "
बघा, विचार करा.. अवयव दान हि काळाची खरी गरज आहे..!