अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर.
आधी हाताला चटके, तवा मिळते भाकर.
कवियत्री बहिणाबाई चौधरी यांनी लिहिलेली हि सुरेख रचना. आजवर प्रत्येक सुगरणीच्या मनाचा ठाव घेत आली आहे. वीतभर पोटासाठी फक्त दोनच गोष्टीची गरज असते.
" भाजी आणि भाकरी..! "
स्वयपाक करायला येत नाही, अशी महिला शोधून सुद्धा सापडणार नाही. ( काही अपवाद वगळता )
भाजी कोणालाही सहजासहजी बनवता येऊ शकते. परंतु, भाकरी बनवणं खरोखर फारच दिव्य काम आहे. आणि त्यातल्या त्यात त्या भाकरी चुलीवर बनवणे म्हणजे फारच कठीण काम. काही महिला तर या भाकरी चक्क हातावर सुद्धा थापत असतात. ते त्यांचं कसबच म्हणावं लागेल.
परवा माझ्या गावी.. माझ्या नातवाचा जावळाचा कार्यक्रम होता.
कराड भागात, या देवकार्यांसाठी जावळ बकरं आणि पाट, कोंबडं द्यावं लागतं. एकंदरीत, हा तिखट नैवेद्याचा कार्यक्रम असतो.
पूर्वी.. घरातील सगळ्या महिला मिळून हा कार्यक्रम मार्गी लावायच्या.
पण हल्ली, ग्रामीण भागात सुद्धा आचारी लोकं हि कामं करू लागल्याने. घरातील महिलांना थोडा आराम मिळू लागला आहे. या कार्यक्रमात जेवणासाठी अंदाजे दीड दोनशे व्यक्ती तरी हमखास येत असतात. मग इतक्या लोकांसाठी भल्या थोरल्या भाकरी कोण थापणार..? हा फार मोठा प्रश्न असतो.
कराड पासून अवघ्या अकरा किमी अंतरावर डोंगराच्या कुशीत दडलेलं निळेश्वर वडोली नामक आमचं एक छोटसं गाव आहे. तर, त्या गावात आमचा हा जावळ बकऱ्याचा कार्यक्रम होता. आणि त्या कार्यक्रमात, भाकरी थापण्यासाठी आमच्या गावाच्या शेजारी नव्याने निर्माण झालेल्या " सुंदर नगर " नामक लोकवस्ती मध्ये राहणाऱ्या कर्नाटक भागातील दोन महिला तिथे या कामासाठी आल्या होत्या. सहा विटांच्या चुलीवर लोखंडी तवा ठेऊन परातीमध्ये ज्वारीचं पीठ मळून त्याच्या पातळशा भाकरी बनवण्याचं कसब मला त्यांच्याकडून पाहायला मिळालं.
या महिलांनी आम्हाला सुरवातीलाच सांगितलं होतं.. आम्हाला गेस शेगडीवर भाकरी बनवता येत नाही. आम्हाला फक्त चुलीवरच भाकरी बनवता येतात..!
खरं तर गेस शेगडीवर हे काम अधिक सोपं झालं असतं. पण चुलीवर बनवलेल्या भाकरीची चव काही लाजवाबच असते. हे त्यापाठीमागील मुख्य कारण आहे. आणि या चुलीवरील कामात त्या महिलांना चांगला उरक सुद्धा आहे.
सहा विटांची चूल पेटवल्यावर, त्या चुलीवर तवा ठेऊन दुसरीकडे परतीमध्ये त्या पिट मळायला घ्यायच्या. एका वेळेला, किमान आठ दहा भाकरी बनतील इतकं पिट त्या माळून ठेवत होत्या. ज्वारीचं पिट मळायला सुद्धा कमालीची ताकत लागते बरं का. त्यानंतर, मळलेल्या पिठाचा ठराविक आकाराचा उंडा घेऊन कडप्प्याच्या काळ्या फरशीच्या तुकड्यावर त्या महिला भाकरी थापायला घेत होत्या. विशिष्ट प्रकारचा लयबद्ध हालचाल आणि आवाज करत त्या इतक्या सुरेख आणि पापडा सारख्या पातळ भाकरी थापायच्या. कि पाहणाऱ्याने फक्त पहातच राहावं. ईतकी अजब कला त्या महिलांच्या हातामध्ये होती. भाकरी थापून झाली, कि त्या भाकरीला तव्यावर टाकून त्यावर पाण्याचा हात फिरवून तिला शेकण्यासाठी सोडून लगेच दुसरी भाकरी थापायला घेत होत्या. तोवर त्या चुलीतील लाकडं कमी जास्ती करून विस्तव त्यांना हवा तसा काम जास्ती करत होत्या. आणि बघता बघता, ती पातळशी भाकरी टम्मकण फुगून टमाटम गोल व्हायची.
त्या महिलांच्या कामाचा उरक इतका भयंकर होता. कि अवघ्या तीन चार तासामध्ये, त्या दोघींनी मिळून पाच पायलीच्या भाकरी थापल्या होत्या. ते सुद्धा एकही ब्रेक न घेता. आणि, त्या कामाचा त्यांचा मोबदला सुद्धा अगदी अल्प होता. त्या पाच पायलीच्या भाकरी थापण्यासाठी, त्या दोघींनी फक्त सातशे रुपये घेतले होते. पण त्या भाकरी चवीला अगदी सात हजार रुपये किमतीच्या होत्या. आणि अगदी गोड सुद्धा होत्या.
परमेश्वराने प्रत्येकाला काहीनाकाही कला देऊन ठेवली आहे. भले त्या महिला जास्ती शिकल्या नसतील. पण त्यामुळे त्यांचं काहीएक नडत नाहीये. परमेश्वराने त्यांना सुगरण हे नामांकित कला बहाल केली आहे. कमावती नको, पण असं साजूक आणि शेलकं खाऊ घालणारी धर्मपत्नी सर्वांना मिळो. शेवटी काय आहे..
" खाशील तर होशील, आणि होशील तर जगशील. "
No comments:
Post a Comment