Sunday, 23 April 2017

पुणे महापालिकेत.. आज, ज्या गाडीवर मी काम करत आहे..
पूर्वी त्या गाडीवर, मेहेर आडनावाचा एक व्यक्ती ड्रायव्हर म्हणून कामाला होता.
सरकारी खाकी पोशाख आणि डोक्यावर पांढरी शुभ्र गांधी टोपी परिधान करणारा मेहेर. चांगला उंचापुरा आणि जाडजूड अंगाचा होता. खरं तर हा मारवाडी बच्चा पण रंगाने बराच सावळा होता. गाडीवर असताना, तो सतत बिडी ओढत धुराच्या रेषा हवेत सोडायचा.
बरोबर दहा वर्षांपूर्वी तो ड्रायव्हर रिटायर्ड झाला, आणि त्याच्या जागी या गाडीवर मी नव्याने रुजू झालो.
पुणे महापालिकेतील ड्रायव्हर लोकांना, गाडीतील इतर कोणतीच कामं करावी लागत नाहीत.
रोज सकाळी आठवणीने, गाडीतील.. हवा, पाणी, ऑइल आणि डीझेल तेवढं चेक करून घ्यायचं. बाकी गाडीमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड आला, तर आमच्या डेपोतील ब्रेक डाऊनची गाडी आणि फिटर लोकं येऊन ती गाडी दुरुस्त करून जातात. त्यामुळे, किमान मलातरी गाडीमधील इंजन दुरुस्तीची किंवा इतर कामांची फारच जुजबी माहिती आहे.
तर एकदा काय झालं.
या मेहेर नामक ड्रायव्हरच्या गाडीमध्ये काहीतरी बिघाड झाला होता. म्हणून, त्याने व्हेईकल डेपोला तसा फोन केला. आणि सांगितलं.
" हॅल्लो, मी मेहेर बोलतोय.. पुणेस्टेशनला माझी गाडी बंद पडली आहे..! "
झालं.. डेपोमध्ये, एकच धावाधाव सुरु झाली. ब्रेक डाऊनची गाडी फिटर लोकांना घेऊन अवघ्या अर्ध्या तासात त्या संभाव्य ठिकाणी येऊन पोहोचली. पण त्या ठिकाणी त्यांना आजूबाजूला पालिकेची कोणतीच बंद गाडी दिसेना. शेवटी, हा मेहेरच त्यांच्यापाशी गेला आणि म्हणाला.
कोणाला शोधताय..?
तर.. ती फिटर लोकं म्हणाली.. अरे बाबा, मेयरची ( महापौरांची ) गाडी बंद पडली आहे. असा त्यांचा डेपोला फोन आला होता. आम्ही तीच महापौरांची गाडी शोधत आहोत.
त्यावर.. हा ड्रायव्हर त्यांना म्हणाला.
अरे, तो फोन मीच केला होता. माझीच गाडी बंद पडली आहे. मी इकडून " मेहेर " बोलतोय असं म्हणालो. आणि तुम्हाला चुकून " मेयर " ऐकू आलं असावं..!
मेहेर ड्रायव्हरचं हे वक्तव्य ऐकून ती फिटर लोकं सुद्धा या मेहेरवर जाम भडकले, त्यांचा पक्का डिसमुड झाला होता.
कारण.. फार मोठी धावपळ करत ते या कामासाठी आले होते. पण आता मात्र त्यांना, पुण्याच्या मेयरच्या गाडीचं नाही. तर.. मेहेर नामक ड्रायव्हरच्या गाडीचं काम करावं लागणार होतं.

No comments:

Post a Comment