#बधाई_हो..
बधाई हो या सिनेमाचं कथानक एका वेगळ्याच विषयावर आधारित आहे. हा एक असा विषय आहे, कि जो सर्वसामन्यांना कधीही पचनी पडणार नाही.
तरुण वयात लग्न झाल्यावर आपल्या संसार वेलीवर कधी एकदा फुलं उमलतायेत असं होतं. काही व्यक्तींना लवकर अपत्य प्राप्ती होते. तर काहींचा पाळणा लांब असतो. तर दुर्दैवाने काहींना विनाआपत्य जीवन कंठावं लागतं. शेवटी हा ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग आहे.
तर.. लग्न झाल्यावर, अगदी तरुणपणी मुलींना दिवस गेल्यावर.. त्यांच्यावर शुभेच्छांचा अगदी वर्षाव होतो. कारण हि बातमीच फार आनंदाची असते.
पण चुकून, उतार वयात.. म्हणजे, वयाची पन्नाशी गाठल्यावर एखाद्या महिलेला दिवस गेले. तर त्यावेळी आनंदोत्सव साजरा केला जाऊ शकेल का.?
उत्तर अर्थातच नाही असं येईल. कारण प्रत्येक गोष्टीला वेळ, काळ, मर्यादा या ठरल्या गेल्या आहेत. उतार वयात या गोष्टी कोणालाच शोभा देणार नाहीत. नाही म्हणता, ज्यांना अपत्यच झालं नाहीये. अशा व्यक्तीकरिता ती नक्कीच खुशखबर म्हणता येईल. पण ज्या दाम्पत्याचा तरुण मुलगा, लग्नाच्या वयाचा झाला असेल. आणि चुकून, त्या घरात असा प्रकार घडला तर.?
बधाई हो सिनेमात, नेमकं हेच कथानक दाखवलं गेलं आहे. एक मध्यमवर्गीय सुखवस्तू चौकोनी कुटुंब असतं. घरात वडीलधारी व्यक्ती म्हणून, एक आजीबाई ( दादी ) असते. कुटुंबप्रमुख ( नकुल कौशिक ) रेल्वे मध्ये टीसी म्हणून नोकरीला असतो. तर त्याची धर्मपत्नी ( प्रियंवधा ) हि घरगुती महिला दाखवली आहे. यांचा मोठा मुलगा ( जितु ) एका आयटी कंपनीत कामाला असतो, तर लहान मुलाचं ( गुल्लर ) माध्यमिक शिक्षण चालू असतं. असं एकंदरीत हे सुखवस्तू कुटुंब असतं.
आणि गमती जमतीत.. उतार वयात, प्रियंवधा यांना दिवस जातात. आता घडला प्रकार कोणाला सांगण्यासारखा नसतो. त्यामुळे ते कौशिक दांपत्य अगदी हवालदिल होतं. आणि हि बातमी जेंव्हा त्यांच्या घरात समजते. तेंव्हा त्यांचं सगळं कुटुंब शोकसागरात बुडून जातं.
हे मुल मी पाडणार नाही.. मी याला जन्म देणारच..! या विषयावर नायिका अगदी ठाम असते. तर दुसरीकडे, म्हातारपणी हे कसले चाळे म्हणून.. त्या दांपत्याला आपल्या सासूआई ( सुरेखा सिक्री ) आणि मुलांच्या रोषाला सामोरं जावं लागतं. खरं तर हि गोष्ट म्हणावी इतकी सोपी नाहीये. हा प्रसंग ज्याच्यावर गुदरला आहे. त्यालाच त्याचं गांभीर्य समजू शकतं. अशा विषयात महिलांची तर फारच कुचंबणा होऊन जाते. एकीकडे समाजाचा रोष, आणि.. दुसरीकडे म्हातारपण. घडल्या विषयात, पुरुष मात्र अगदी नामानिराळा होऊन जातो.
हा प्रकार घडल्या नंतर.. सगळ्या समाजात हा फार मोठा चर्चेचा आणि चेष्टेचा विषय होऊन जातो. सुरवातीला झाल्या विषयाला सासूचा खूप त्रागा असतो. पण ज्यावेळी, त्यांच्या परिवारातील काही महिला या विषयाला धरून, तिला टोचून बोलू लागतात. तेंव्हा तिच्या सासूने तिची खंबीर बाजू घेतलेली दाखवली आहे. इतकंच काय, मोठ्या मुलाची गर्लफ्रेंड ( रेनी ) आणि तिची आई ( संगीता ) सुद्धा या विषयामुळे नाराज असते. कि.. उद्या तुझं लग्न झाल्यावर, त्यांचं होणारं अपत्य तुला सांभाळावं लागेल. या भीतीने त्या मुलीची आई सुद्धा खूप चिंताग्रस्त असते. लहान मुलाच्या शाळेतील मित्र त्याला चिडवत असतात. मोठ्या मुलाचे मित्र देखील त्याला चिडवत असतात. शेजाऱ्यांसाठी तर हा अगदी करमणुकीचा विषय झालेला असतो.
पण सिनेमात थोडेसे चढ उतार आणि काही भावनिक प्रसंग घडत, शेवटी.. या सिनेमाला एक वेगळंच वळण लागतं. घरातील सगळी मंडळी या विषयाला राजी होतात. त्यांच्या हातून नकळत घडलेल्या चुकांचा त्यांना पश्चाताप होतो. आणि म्हातारपणातील हे बाळंतपण सक्सेस होऊन जातं.
हा विषय कठीण जरी वाटत असला, तरी.. सिनेमा पाहताना आपल्याला सुद्धा नकळत वाटून जातं. कि उतारवयात आपल्या सोबत असं काही घडल्यावर किती मजा येईल. पूर्वीच्या काळात असे बरेच किस्से घडले आहेत. परंतु, आजच्या काळात हे विषय कोणाच्याही पचनी पडणार नाहीत. सिनेमात काही ठिकाणी फारच भावनिक प्रसंग दाखवले गेले आहेत. तर काही ठिकाणी विनोदांनी अगदी कोटी केली आहे. काही कौटुंबिक विषय थोडे रटाळवाणे वाटतात. पण सिनेमातील कथानकासाठी ते सीन आवश्यक आहेत.
एक आगळीवेगळी कलाकृती म्हणून हा सिनेमा सर्वांनी नक्कीच पाहायला हवा. अमित शर्मा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तर, प्रमुख भूमिकेत.. अंशुमन खुराना, नीना गुप्ता, सुरेखा सिक्री, शिबा चड्डा, राहुल तिवारी, गजराज राव आणि सान्या मलहोत्रा यांनी अप्रतिम भूमिका साकारल्या आहेत.
No comments:
Post a Comment