Friday, 9 March 2018

परवा रात्री ( पहाटे ) दोन वाजता..
आमच्या कामाचा एक भाग म्हणून, पुण्यातील एका आयटी परिसरात आमचा फेरफटका चालू होता. आजची सगळी रात्र, आम्हाला त्याच भागात थांबावं लागणार होतं. कारण तिथे आमचं काही काम चालू होतं. रस्त्यावरून जात असताना, माझं सहजच फुटपाथवर लक्ष गेलं.
ऐन विशीतली.. तरुण मुलगा आणि मुलगी, एवढ्या सुमसाम रात्री त्या फुटपाथवर बसून कसली तरी गंभीर चर्चा करत होते. त्या मुलीच्या पाठीवर, भलीमोठी सॅग बॅग होती. त्यात बरच काही सामान असावं, असं लगेच समजून येत होतं.
तो मुलगा.. बहुतेक, त्या मुलीला काहीतरी समजावून सांगायचा प्रयत्न करत होता. पण ती मुलगी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. तो मुलगा अक्षरशः तिला हात जोडत होता. पण ती मुलगी मख्खपणे समोरील बाजूस शून्यात पाहत होती. मुलगा आणि मुलगी.. दोघेही दिसायला खूपच सुंदर होते. बहुतेक, प्रेमप्रकरणाचा विषय असावा.. असं म्हणून मी तेथून, जवळच असणाऱ्या ज्या ठिकाणी आमचं काम चालू होतं तिथे गेलो. आमचं काम रात्रभर चालू राहणार होतं.
काही वेळातच.. मगाशी पाहिलेला तो प्रसंग, मी विसरून सुद्धा गेलो. मला काहीच काम नव्हतं, त्यामुळे.. मी माझ्या गाडीमध्ये निवांत पहुडलो.
पहाटे पाच वाजता.. कोणीतरी मोठमोठ्याने रडत असल्याच्या आवाजाने मला जाग आली.
आणि मी उठून पाहतो तर काय..
रात्री एकटीच, त्या मुलासोबत बसलेली तीच मुलगी तिथे उभी होती.
तिथे बाजूलाच.. मुंबई भागातील एक उंची कार उभी होती. आणि त्या मुलीच्या आईच्या वयाची एक महिला त्या मुलीला मिठ्या मारून-मारून धाय मोकलून रडत होती. तिला काहीतरी समजावून सांगत होती, तिचे पापे घेत होती.
ती महिला आणि तिच्या सोबत असणारी सगळी मंडळी, मला फारच उच्चभ्रू वाटत होती. पण ती मुलगी मात्र, अगदी मक्खपणे हे सगळं पाहत होती. त्यावर तिचा काहीएक परिणाम होत नव्हता.
त्यांच्या आजूबाजूला, त्या परिसरातील.. काही, कचरा आणि भंगार गोळा करणाऱ्या महिला सुद्धा तिथे उभ्या होत्या. त्या महिला.. त्या उच्चभ्रू बाईला हातवारे करून काहीतरी सांगत होत्या. पण त्या नेमक्या काय सांगत आहेत.? ते मात्र, मला समजत नव्हतं. त्यामुळे, या प्रकरणातील गूढ आणखीन वाढत चाललं होतं.
सकाळचे सहा वाजले.. घडत असणाऱ्या या विषयाला, एक तास उलटून गेला होता.
एक-एक करून, त्या कारमध्ये असणारा प्रत्येक व्यक्ती त्या मुलीला समजावून सांगत होता. पण ती मुलगी फक्त शांतपणे सगळं काही ऐकून घेत होती, कोणालाही कसलाही प्रतिकार करत नव्हती. तिच्या चेहऱ्यावर, मला कमालीची गंभीरता दिसत होती.
तितक्यात, आमच्या कामावर ठेकेदारीत काम करत असणारा अठरा वर्षाचा मुलगा माझ्यापाशी आला. काम करत रात्रभर जागा असल्याने, आणि भयंकर मेहेनतीचं काम करून त्याच्या चेहेऱ्यावर थोडा थकवा आला होता. ते मला स्पष्ट जाणवत होतं. तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला,
साहेब.. हा काय प्रकार चालू आहे हो..?
मी म्हणालो.. काही माहित नाही रे, पण काहीतरी गडबड आहे..!
तर, तो मुलगा मला म्हणाला.. रात्री नऊ वाजल्यापासून, हि मुलगी एका मुलासोबत तिथे फुटपाथवर बसली होती.
मी सुद्धा, त्याला मानेने मला हे सगळं माहित आहे असं सांगितलं. मला हा प्रकार माहित आहे, हे समजताच.. तो मुलगा पुन्हा त्याच्या कामावर निघून गेला.
थोड्याच वेळात.. तिथे आणखीन एक उंची कार आली.
त्यात सुद्धा, चार पाच उच्चभ्रू व्यक्ती होत्या. ती सगळी लोकं सुद्धा, आली तशी त्या मुलीला मिठ्या मारून रडू लागली. पण, त्या पोरीच्या डोळ्यातून एक थेंब सुद्धा पाणी येत नव्हतं.
बहुतेक पहिलीच फोनाफोनी झाली असावी,
म्हणून हा योग जुळून आला असावा, असा मला अंदाज आला. त्यामुळे.. त्या मुलीचा बाप असणारा तो अगदी हायफाय व्यक्ती. त्या कचरा गोळा करणाऱ्या महिलांपाशी गेला. त्यांच्याशी काहीतरी बोलला, त्याने खिशातून पाकीट काढलं, आणि त्यातील काही रक्कम त्याने तिथे असणाऱ्या एका महिलेच्या हातात दिली. आणि तो, बिचारा लाचार बाप..
चक्क.. त्या कचरा गोळा करणाऱ्या महिलेच्या खाली वाकून पाया पडला.!
त्यावेळी.. ती कचरा गोळा करणारी बाई सुद्धा विजेच्या चपळाईने मागे सरकली. पण त्या व्यक्तीने, त्याचा विषय पूर्ण केलाच.
हे सगळं पाहून, आता बाकी मला फारच टेन्शन आलं.
हा नेमका काय विषय आहे, तो हळुहळू माझ्या ध्यानात आला होता. पण यामागे नेमकं काय गुपित असावं..? ते बाकी मला समजत नव्हतं.
काही वेळातच, त्या मुलीला कारमध्ये बसवून त्या दोन्ही गाड्या मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या.
आता बाकी.. सगळीकडे सामसूम होती. मी जराही वेळ न दवडता.. ताबडतोब, त्या कचरा जमा करणाऱ्या महिलेपाशी गेलो. आणि.. हा नेमका काय प्रकार होता, ते तिला विचारलं.
त्यावर.. मला समजलेला प्रकार, अगदी मझ्या विचारा पलीकडला होता. आणि, ती महिला मला सांगू लागली..
रोजच्याला, रात्री बारा वाजता.. आम्ही कचऱ्यातील भंगार जमा करायला जात असतो. आम्हाला काय, रस्त्यावर रोजच्यालाच असली लफडी दिसत असत्यात. त्यामुळं आम्ही तिकडं काही लक्ष देत नाही. पण नेहेमी, ह्याच भागात कचरा गोळा करत असल्यानं, हितल्या लोकांची सुद्धा आम्हाला वळख झाली आहे. ह्या पोरीला तिथं बसल्याली बघून म्या पुढं निघून गेले..
आणि लगोलग, माझ्या मागून एक गाडी माझ्यापशी आली. बघते तर, गाडीत बसलेले ते साहेब माझ्या वळखितले होते. ते मला म्हणाले..
आजच्या दिवस तू कचरा गोळा करायला जाऊ नकोस. फक्त.. मागे त्या मुलासोबत बसलेली ती मुलगी आहे ना, तिच्यावर पाळत ठेव. आज माझं एवढं एक काम कर.
व्हय म्हणत.. त्या व्यक्तीच्या सांगण्यावरून, मी रात्रभर फक्त त्या मुलीवर लक्ष ठेऊन होती.
मोबाईल मुळे आता सगळं जग जवळ आलं आहे. त्यामुळे त्या साहेबांच्या फोनला उत्तरं देत, त्या मुलीचा ठावठिकाणा ती त्यांना अगदी अर्ध्या अर्ध्या तासाला पुरवत होती. आणि विशेष म्हणजे, ती मुलगी त्या ठिकाणावरून दुसरीकडे कुठेही गेली नव्हती. हि फार मोठी जमेची बाजू होती.
विषय संपला होता, अती लाडात वाढलेली मुलगी. आई बापाचा विचार न करता, अंधळ्या प्रेमापायी घरदार सोडून मुंबईहून पुण्यात निघून आली होती. तिच्या सोबत असणारा तिचा संभाव्य प्रेमी, पुढील घटना लक्षात आल्याने. घाबरून, खोटं बोलून, किंवा.. तिला फसवून पोबारा करून त्या ठिकाणाहून निघून गेला होता.
निव्वळ.. एका भंगार गोळा करून आपली उपजीविका भागवणार्या महिलेमुळे, आणि.. तिच्या चांगुलपणामुळे, त्या कुटुंबाला त्यांची मुलगी वेळेवर आणि अगदी सहीसलामत परत मिळाली होती.
नाहीतर, त्या मुलीचा बाप.. त्या कचरा जमा करणाऱ्या बाईच्या पाया पडायला काही वेडा नाहीये. आणि.. खरं सांगायला गेलं तर, असे श्रीमंत व्यक्ती तर कधीच खाली झुकत नाहीत.
आणि त्यामुळे.. त्यांना खाली झुकवायचं काम करतात, ती त्यांची बेभान झालेली हि मुलं.
बापाच्या जीवावर, आणि त्यांच्या कडूनच खर्चाला मिळत असणाऱ्या वारेमाप पैशावर ऐश करून, त्यालाच वेठीस धरणाऱ्या मुलांना पोटचं मुल म्हणावं का..?
इथे नेमकी कोणाची चूक असावी..?
काही व्यक्तींना मुलं होत नाहीत, म्हणून ते अगदी नवस सायास करून परमेश्वराकडे मुलाची मागणी करत असतात. आणि चुकून, त्यांच्या पोटी अशा मुला, मुलीने जन्म घेतला तर..?
त्यांना किती पश्चाताप होईल.?
त्यामुळे.. काही लोकं, मुलच नको म्हणतात. हो, हि सत्य परिस्थिती आहे. आणि काही केल्या ती नाकारता येत नाही.
हा सगळा विचार बाजूला ठेऊन, मी पुन्हा एकदा आजूबाजूला पाहू लागलो. तर मगाशी, त्या व्यक्तींना मदत केलेल्या महिला.. त्यांना, त्या साहेबाकडून मिळालेल्या पैशाची वाटणी करून, पुन्हा एकदा कचरा गोळा करायला निघून गेल्या होत्या.
माझ्या सोबत कामाला असणारा तो अठरा वर्षाचा मुलगा, पुन्हा एकदा नव्या जोमाने खड्डा खोदायचं काम अगदी मन लाऊन करत होता. कारण, काम संपवून घरी गेल्यावर त्याला सुखाची झोप घ्यायची होती. बाकी दुसरं काय स्वप्न बघणार आहे हो तो..?
काम केलं नाहीतर, घरात बसून त्याला कोणीही खायला घालणार नव्हतं. ऐषआराम हा विषय त्याच्या जीवनात लिहिलाच नव्हता.
आणि.. आई बापच्या जीवाला घोर लाऊन, इतकी मोठी चूक करून सुद्धा, ती मुलगी त्या उंची एसी कारमध्ये बसून, अगदी गोंजारून घेत, काहीच न घडल्याच्या अविर्भावात. आपल्या घरी निघाली होती.
परवाच्या रात्री.. एकाच वेळी, मला तीन वेगवेगळ्या व्यक्ती आणि त्यांच्या जीवनात घडणाऱ्या भयंकर घटना मला पाहायला मिळाल्या.
पहिली.. ती ऐशोआरामात वाढलेली मुलगी, दुसरी कचरा गोळा करणारी ती महिला, आणि.. कोवळ्या वयात, जबाबदारीची जाणीव झालेला तो आमचा कामगार मुलगा.
रात्र हि झोपण्यासाठी निर्माण झाली आहे,
पण पापी पोटाची खळगी भरण्यासाठी काही लोकं रात्रीचा दिवस करत असतात.
तर काही लोकं,
दिवस काय, आणि रात्र काय..फक्त, आपल्याच धुंदीत जगत असतात..!!

No comments:

Post a Comment