Wednesday, 28 February 2018


माझ्या मोठ्या बंधूंच्या लग्नाला पंचवीस वर्ष पूर्ण झाली होती.
म्हणून, माझ्या पुतण्याने पुण्यात एक पार्टी अरेंज केली होती. एक छानसं हॉटेल, त्याने बुक केलं होतं. कार्यक्रमाला आमच्या घरातील तीस एक लोकं होती. म्हणजे, संपूर्ण पॉटर फॅमिली तिथे जमा झाली होती.
पुरुष मंडळींनी, आपआपली चूल एका वेगळ्या टेबलावर मांडली होती.
तिथे, त्यांचा "रंगीत" कार्यक्रम सुरु होणार होता. 
माझ्या, पिण्याचं प्रमाण खूप वाढलय. अशी सबब पुढे करून. ओल्या पार्टीत जाण्यासाठी माझ्या बायकोने मला मज्जाव केला होता.
पण काय आहे.. पार्टी आहे, आणि पॉटर पिणार नाही..!! हे समीकरण, काही जुळून येत नव्हतं. पण शेवटी माझा नाईलाज होता.
घरातील सर्व महिला मंडळाच्या टेबलावर मी एकटाच. " वेगळा-वेगळा "
टेबल वर.. खाण्याचे सगळे जिन्नस आले होते.
माझ्या वहिन्यांना. बहिणीला व माझ्या बायडीला मी विचारलं,
तुम्ही काही जूस वगैरे घेणार आहात का ?
पण त्या सगळ्या नाही म्हणत होत्या, माझ्या बायडीला सुद्धा मी तीन वेळा विचारलं..! ती सुद्धा नाहीच म्हणत होती.
हॉटेलिंगच्या बाबतीत आमच्या घरच्या स्त्रिया अगदी जेमतेम आहेत, हे मी जाणून होतो. त्यामुळे मी त्यांच्यासाठी चिकन सूप मागवून घेतलं. आणि मी माझ्या पुढच्या कामाला लागलो. याठिकाणी सर्वांसमक्ष दारू तर काही पिता येणार नव्हती. मग मी माझा ठेवणीतला डाव बाहेर काढला.
मी वेटरला माझ्या जवळ बोलावलं.. आणि त्याला एक "जीम्लेट" आणायला सांगितलं.
( पट्टीतील मदिरा पिनारांना जीम्लेट काय आहे, हे सांगणे नसावे.  )
काही वेळातच.. ते जीम्लेटचं ग्लास माझ्या पुढ्यात आलं.
सुंदर आकार असलेला, व्होडका आणि लिमकाच्या मिश्रणाने काठोकाठ भरलेला तो ग्लास. ग्लासच्या किनारीवर एक गोलसर पात्तळ लिंबाची चकती अडकवलेली होती. त्याच्या कडेलाच सजावट म्हणून एक छोटीशी खेळण्यातील छत्री सुद्धा लावली होती. आणि हे पेय पिण्यासाठी, एक वाकड्या आकाराचं स्ट्रॉ देखील त्यात होतं.
या सगळ्या सजावटीमुळे, तो ग्लास खूप आकर्षक दिसत होता. समोर आलेला हा साग्रसंगीत प्रकार पाहून माझ्या बायडीच्या जिभेला पाणी सुटलं. आणि हे मला ताबडतोब समजलं होतं.
त्या मधुर पेयाचा एक घोट मी घेतो न घेतो. तोच, हिने मला विचारलं, हे ज्यूस चवीला कसं लागतं ओ..? आणि घाईघाईत, मी चुकून बोलून गेलो.
हे जूसच आहे.. गोडच लागतं ते..!
झालं.. हे ऐकताच, आमच्या बाईसाहेबांनी तो ग्लास ओढला ना तिच्याकडे.
आता.. ग्लासात ज्यूस आहे म्हणाल्यावर, मला पुढे काही बोलताच येइना. मी, ग्लासकडे आणि तिच्या तोंडाकडे आशाळभूत नजरेने आणि तितकाच चिंताक्रांत होऊन पाहत होतो. आता..हिला सांगू तरी कसं..? पण कुठलं काय.
ज्यूस गोड लागतंय म्हणून, बघता बघता ग्लासातील त्या स्ट्रॉ च्या सहाय्याने या बयेने अख्खा ग्लास रिचवला.
काही वेळातच, जीम्लेटने तिची कमाल दाखवायला सुरवात केली.
आणि माझ्या काणापाशी येत ती मला म्हंटली, अहो.. मला कसं तरीच होतंय हो..!
खरं तर, मला मनातून राग तर खूप आला होता. पण तो राग माझ्या मनामध्ये दडवत हसतच मी तिला म्हंटलो.
तुला कोणी सांगितलं होतं हा जूस प्यायला...??
तिच्याकडून नेमकी काय चूक घडली आहे. ते ती लगेच समजून गेली होती. नशीब, त्याठिकाणी तिने जास्तीची बडबड केली नाही. नाहीतर, घरातल्या लोकांसमोर माझीच वाजली असती. तेंव्हापासून, तिने एक फार मोठा धसका घेतला आहे. मी घेतलेल्या कोणत्याच ड्रिंकला, ती चुकुनही स्पर्श करत नाही.
अगदी.. खऱ्याखुऱ्या जुसला सुद्धा..!


No comments:

Post a Comment