Wednesday, 28 February 2018

दोनेक वर्षांपूर्वी मी राजस्थान फिरायला गेलो होतो..!
वेळेअभावी आमेरचा किल्ला मला अगदी दुरूनच पहावा लागला. पण तो किल्ला अजूनही सुस्थितीत आहे. तिथे अजुही राजे लोक वास्तव्यास आहेत. त्यानंतर, जयपूर मधील आणखीन एक अंबरचा किल्ला तो सुद्धा आम्ही दुरूनच पाहिला. त्या किल्ल्यात अजूनही, राज घराण्यातील लोकं वास्तव्यास आहेत. तो किल्ला वर्षातून एकदा फक्त महाशिवरात्रीच्या दिवशी आम जनतेसाठी खुला केला जातो. कारण त्या किल्ल्यात, महादेवाचं फार पुरातन मंदिर आहे. असं माझ्या ऐकण्यात आलं होतं.
इतिहास व ऐतिहासिक स्थळे, नैसर्गिक सौंदर्य व विविधरंगी संस्कृती यामुळे राजस्थान पर्यटकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करतं. जयपूर, उदयपूर, जोधपूर, जेसलमेर, अजमेर, बिकानेर ही ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहे. जयपूर हे पर्यटकांचे सर्वाधिक आवडते शहर आहे. जयपूर शहराला येथील इमारतींच्या रंगांमुळे गुलाबी शहर असे म्हणतात. जयपूर शहरातील पर्यटन स्थळांमध्ये जंतर-मंतर, हवा महल, शहराजवळील चित्तोडगडचा किल्ला पहाण्याजोगा आहे. हा किल्ला क्षेत्रफळाने अशियातील सर्वात मोठा किल्ला मानला जातो. पण वेळेअभावी तो किल्ला मला पाहता आला नाही जोधपूर शहरातील मेहरानगड किल्ला, उम्मेद भवन पॅलेस ही पहाण्याजोगी स्थळे आहेत. हि सगळी ऐतिहासिक स्थळं पाहत असताना. तिथे असणाऱ्या गाईडने मला प्रश्न विचारला. तुम्ही कोठून आला आहात..?
आम्ही महाराष्ट्रातील आहोत, असं मी त्याला सांगितलं..!
त्यावेळी तो गाईड मला म्हणाला, तुमच्या इथे सुद्धा फार सुंदर सुंदर किल्ले आहेत. पण मी असं ऐकून आहे, कि हल्ली त्या किल्ल्यांची फार मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.
मी सुद्धा त्याला माझा होकार कळवला, आणि त्याला विचारता झालो. राजस्थान आणि महाराष्ट्रातील किल्ले साधारण एकाच कालखंडातील आहेत. तर मग आमच्या येथील किल्ल्यांची पडझड झाली, आणि राजस्थानातील किल्ले अजूनही सुस्थितीत आहेत. यामागे नेमकं काय कारण असावं..?
तर तो गाईड मला म्हणाला.. राजस्थानात त्याकाळी, राजपुत राजे आणि मुस्लीम राजे एकमेकांशी रोटीबेटी व्यवहार करायचे. म्हणजे, आपल्या मुली एकमेकांच्या घरी विवाह करून पाठवायचे. त्यामुळे, नातेसंबंधांचा खूप फायदा व्हायचा. आणि पर्यायाने एकमेकांवरील आक्रमणं होत नसायची. युध्द होत नसल्याने किल्ल्यांची नासधूस होत नसायची. त्यामुळेच, आजच्या घडीला राजस्थानातील किल्ले अगदी सुस्थितीत आहेत. त्यामानाने, महाराष्ट्रात मुस्लीम आणि मराठा जमातीत रोटीबेटी व्यवहार न झाल्याने.. युद्ध, मानवी शिरच्छेद आणि त्याचबरोबर बहुतांशी किल्ल्याचं सुद्धा अपरिमित असं नुकसान झालं आहे.
खरोखर.. त्या गाईडचं म्हणणं मला पटत होतं. पण शेवटी फिरून माझं मन पुन्हा मेवाड प्रांतात आलं. मुस्लीम आणि राजपुत लोकांत, त्याकाळी रोटीबेटी व्यवहार होत होते. तर मग, अल्लाउद्दीन खिलजी बरोबर युद्ध हरल्यावर काहीतरी तह नक्कीच झाला असता.
कि.. राणी पद्मावतीला या गोष्टीची अगोदर पासूनच कुणकुण लागली असावी. कि न जाणो, युद्ध हरल्यावर आपल्या सोबत सुद्धा काहीतरी आक्रीत घडू शकतं. कदाचित, भविष्यातील या गोष्टीचा अंदाज आल्यामुळेच, राणी पद्मावतीने तिच्या तमाम दासीसोबत जोहरचा मार्ग पत्करला असेल का..?


No comments:

Post a Comment