Sunday, 18 February 2018

माझे वडील सुद्धा.. मदिरेचे फार मोठे शौकीन होते...!
त्यांच्या बैठकीत, आमच्या कराड भागातील त्यांचे काही जुने मित्र होते. ते सगळे मित्र सुद्धा, पुण्यामध्ये अगदी चांगल्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करणारे होते. त्यातील एक मित्र तर, चक्क एका कॉलेजमध्ये प्राचार्य होते. बाकी इतर मित्र, पिंपरी भागातील नामांकित कंपन्यांमध्ये कामाला होते. यांच्यातील एक तरुण मित्र, नव्यानेच उद्योग धंद्यात उतरला होता. तो एमआयडीसीत छोटी मोठी कामं घेऊ लागला होता. तर.. माझे वडील, वीट कारखानदार होते.
हि सगळी मंडळी.. बक्कळ पैसा कमवणारी होती. पण मदिरा पिण्याच्या बाबतीत या सर्वांची आवड म्हणजे.. हे सगळे मित्र, हातभट्टीच्या दारूला प्रथम पसंती द्यायचे. त्यांची हातभट्टीच्या दारूला पसंती का होती..? ते मला माहित नाही..
( त्यावेळी आमच्या गावात, देशी, विदेशी दारूचं दुकान नव्हतं. कदाचित हे एकमेव कारण असावं.) पण जेंव्हा, मी स्वतः हौशी मद्यपान करू लागलो. तेंव्हा, ते गणित मला समजलं.
आपण जसजशी महागडी दारू प्यायला जाऊ. त्यावेळी, आपल्याला त्या दारूचा स्वाद अगदी हातभट्टीच्या दारूसारखा मिळतो. हे सगळं, मी माझ्या अनुभवांती सांगतोय.
कारण.. एक गंमत म्हणून, हलक्या, महाग देशी, विदेशी सगळ्या प्रकारच्या मदिरा मी प्राशन केल्या आहेत. आता मात्र, हातभट्टीच्या दारूमध्ये फार मोठ्या प्रमाणत भेसळ होत असते. असं मी ऐकून आहे.
त्यावेळी.. आमच्या गावामध्ये, एका व्यक्तीचा हातभट्टीचा दारूचा फार मोठा धंदा होता. पिळदार मिशा, आणि भारदस्त शरीरयष्टी असणारा तो शेठ, अधिकृत सरकारी दुकान असल्या सारखं, तिथे हातभट्टीची दारू विक्री करायचा.
ते ठिकाण म्हणजे, दहा पंधरा गुंठ्याचा फार मोठा परिसर होता. त्यात, त्या शेठचा घोड्यांचा तबेला सुद्धा होता. तो व्यक्ती रेसचा सुद्धा फार मोठा शौकीन होता. खास दारू विकण्यासाठी, सिमेंटच्या बांधकामात तयार केलेली एक विशिष्ट प्रकारची रूम त्याने बांधून घेतली होती.
तिथे मस्तपैकी शटर आणि काउंटर करून, त्याचे कामगार लोकं तिथे दारू विक्री करायचे.
जर्मलच्या तवली मध्ये किंवा प्लास्टिकच्या मग मध्ये तिथे दारू दिली जायची. आणि मग, दोन चार लोकं मोकळ्या जागेत घोळका करून तिथे मदिरेचा यथेच्छ आस्वाद घ्यायचे. तर कोणी, पार्सल घेऊन जायचे.
त्यावेळी दारू पिताना मिळणारा चखना काय असायचा..?
तर, तव्यावर भाजून खारवलेले कडक हरभरे मिळायचे. यापलीकडे आणखीन एक दुसरा चखना म्हणजे. काही घाईघाईने दारू पिणाऱ्या लोकांसाठी.. तिथे बाजूलाच, जाड्या मिठाचं एक भलं मोठं पोतंच ठेवलेलं असायचं. ती घाईमध्ये असणारी कष्टकरी लोकं, दारूचा एक ग्लास मारायचे. आणि, कडवट झालेल्या तोंडाची चव बदलन्यासाठी. तिथे असणाऱ्या पोत्यातून, मिठाचा एक खडा जिभेला चाटवायचे. तर काही लोकं, घरून येताना कागदाच्या पुडीत थोडी मिरची पावडर घेऊन यायचे. याव्यतिरिक्त.. तिथे मी कधीच, कोणाला चांगला चुंगला चखना घेऊन दारू पिताना पाहिलं नाही.
त्यावेळी आमच्या परिसरात.. काही तिबेटी महिला सुद्धा राहायला होत्या. मुंबई पुणे रोडवर त्यांची स्वेटर विक्रीची दुकानं असायची. त्या सुद्धा कधीकधी मदिरा प्राशन करायच्या. पण दारू आणायला बाईने कसं जावं..? त्यामुळे, कधी कधी मला किंवा माझ्या भावाला चार, आठाण्याची लाच देऊ करून. त्या आम्हाला दारू आणून द्यायला सांगत असत.
त्यावेळी.. मी काहीतरी दहा वर्षांचा असेल. तेंव्हा, हातभट्टीच्या दारूची एक मोठी बाटली पाच रुपयाला मिळायची.
या नेपाळी बाया सुद्धा हि दारू पीत आहेत. शिवाय माझे वडील आणि त्यांचे उच्चपदस्थ मित्र सुद्धा हीच दारू पीत आहेत. म्हणजे, या दारूमध्ये नक्कीच काहीतरी विशेषता असणार आहे. हे मी त्या कोवळ्या वयातच ताडलं होतं. पण त्या नेपाळ्या बायांना दारू आणून देताना, मी कधीही त्या दारूला चाखून पाहण्याचा चोरटा प्रयत्न केला नव्हता. हे मी इथे प्रामाणिकपणे सांगू इच्छितो.
एकदा आमच्या घरी कोणीच नव्हतं. आई आणि मोठे भाऊ कुठेतरी बाहेर गेले होते. त्यामुळे त्यादिवशी, माझ्या वडिलांनी त्यांच्या मित्रांना घेऊन आमच्या घरातच बैठक मांडली होती. मी खूप लहान असल्याने, माझ्या तिथे असण्याचा त्यांना काहीच अडसर नव्हता. त्यावेळी, यांच्यामध्ये छोटी मोठी कामं घेणारा हा एक मित्र एकटाच काय ते अविवाहित होता. आणि तसा तो या सगळ्यांपेक्षा वयाने लहान सुद्धा होता. हा बिचारा स्वतः घरी जाऊन, हाताने स्वयपाक बनवून खायचा. हा त्याचा रोजचा नित्यक्रम होता.
तर, त्यादिवशी.. घरी गेल्यावर काहीतरी ओमलेट पाव वगैरे खाण्याचा त्याचा मानस असावा. त्यामुळे, आमच्या घरी येतानाच तो त्याच्या सोबत ब्रेडचा पुडा घेऊन आला होता. या सर्वांची मेहेफील रंगात आली होती. ग्लासावर ग्लास रिचवले जात होते. आणि अचानक मी पाहतो तर काय,
तो सिंगल्या काका, चक्क हातभट्टीच्या ग्लासात ब्रेड बुडवून खात होता. बहुतेक त्याला भूक सहन झाली नसावी. त्यामुळे त्याने हे कृत्य केलं असावं. बापरे, हा सगळा प्रकार पाहून मी तर भलताच परेशान झालो. कारण, हा प्रकार मी अगदी नव्यानेच पाहत होतो.
आज माझे वडील हयात नाहीत, आणि त्यांचे सगळे मित्र सुद्धा देवलोकी निघून गेले आहेत. पण तो सिंग्ल्या काका अजून हयात आहे.
त्यावेळचे सिंगले, पैश्याला पैसा लावण्यासाठी खूप काही सहन करायचे. पैसा जपून ठेवायचे. वेळप्रसंगी वरील प्रकार सुद्धा करायचे.
पण आजच्याला.. नवीन पिढीमधील सिंगले, बेचलर म्हणून.. आई बापाच्या आशीर्वादाने, त्यांच्या पैशावर जबरी मजा उपभोगत असतात..!

No comments:

Post a Comment