Wednesday, 28 February 2018

मन्या.. नेहमीप्रमाणे आज सकाळीच मजबूत 'टाकून' आला होता. आरोग्य विभागात, या गोष्टी काही नवीन नाहीत. घाणीचं काम करावं लागतं, त्यामुळे या विषयात त्यांना एकप्रकारची अलिखित मुभा दिलेली असते.
काम संपवून, साफ सुतरा होऊन, दहाच्या हजेरीला तो आला होता. आजचा, त्याचा जरा वेगळाच मूड दिसत होता. नेहमीप्रमाणे, नमस्कार करण्याकरिता त्याने मला आवाज दिला.
नमस्कार साहेब..! 
मी सुद्धा त्याला नमस्कार केला.
साहेब चखना खाणार का..?
कधी कधी मूडमध्ये असल्यावर तो मला हा प्रश्न विचारायचं धाडस करायचा.
मी, माझ्या लिखापडीच्या कामात होतो. त्यामुळे मी त्याच्याकडे लक्ष नसल्या सारखं केलं.
थोड्यावेळाने पाहिलं.. तर, तो अजूनही माझ्या समोरच उभा होता.
शेवटी मी त्याला म्हंटल, काय खातोयेस रे चखना..?
आ sss साहेब, मी काय बी सटर फटर खात नसतोय..!
मी मनात विचार केला. आता चखना म्हणून हा नेमक काय खात असेल...?
दहा वीस रुपयाची 'हातभट्टी' मारणारा माणूस, चखना असा काय खात असणार आहे...?
शेंगदाणे, फुटाणे, वाटाणे.. नेमकं काय खात असेल तो ?
आता बाकी माझ्या मनातील कुतूहल जागृत झाल. मी म्हणालो, मन्या बघू काय खातोयेस...!
माझं वाक्य संपतं न संपतं तोच, त्याने.. खिशातून पावशेर भर खरावलेले काजू असलेली प्लास्टिकची पिशवी बाहेर काढली. हे पाहून मी तर, अवाकच झालो.
पाचशे रुपये किलोची वस्तू, हा गडी चाखण्याला खातोय...?
माझ्या घरातील किराणा माल भरताना, महिन्याला मी जेमतेम हजार बाराशे रुपयाचा सुखा मेवा खरेदी करत असतो.
आणि, याला रोजच्या रोज काजू खायला कसे परवडत असतील...?
माझ्या डोक्यात, विचारांची गर्दी झाली होती.
मी, त्या विचारांकडे दुर्लक्ष केल. आणि, त्याने समोर धरलेल्या पिशवीमधील काही काजू उचलले. आणि, तोंडात टाकले. मन्याला हि बरं वाटलं.
शेवटी, मी त्याला विचारलच...!
तुला रोजच्या रोज काजू खायला कसं परवडतं..?
त्यावर तो म्हणाला, साहेब.. माझ्या घरात डबेच्या डबे भरून.. काजू, बदाम, मनुके असत्यात. कशाची म्हणून कमतरता नसती. माझी बायकू..
" मंगल कार्यालयात "
सयपाक्याच्या हाताखाली कामाला आसती. ती तिथून रग्गड माल आणत असती. कशाचीच कमतरता नसती बघा. हे सगळं ऐकून, मी कपाळावर हात मारून घ्यायचाच बाकी राहिलो होतो.
लग्न कार्यालय.. यजमानांनी केलेली धावपळ, पै पै जमा करून लग्नासाठी जमवलेला पैसा, लग्न कार्यात स्वयंपाक चांगला आणि रुचकर व्हावा म्हणून किराणा मालात भरपूर आणलेला सुखा मेवा, सगळं काही क्षणार्धात माझ्या डोळ्यासमोरून तरळून गेलं. शेवटी जाऊदेत म्हंटल, जास्ती विचार करण्यात काहीच अर्थ नव्हता.
काही गोष्टींना खरोखर पर्याय नसतो,
दारू प्यायल्याने एकसारखी त्याच्या तोंडाची टकळी चालूच होती. शेवटी नाईलाजाने त्याची बोलबच्चन ऐकत-ऐकत,
फुकटात मिळालेले खमंग असे ते खरावलेले काजू, एक-एक करत मी सुद्धा माझ्या घशाखाली उतरवत होतो..!


No comments:

Post a Comment