Saturday, 3 February 2018

भारतवर्षात सर्वात जास्ती विवाहसोहळे कुठे पार पडत असतील.
तर.. ते ठिकाण म्हणजे, देवाची " आळंदी "
पुण्यातील देवाच्या आळंदीत, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिराच्या परिसरात फार मोठ्या प्रमाणात. म्हणजे.. दिवसाला, शेकडो तरुण-तरुणी विवाह बंधनात अडकत असतात.
स्पेशल, लग्न किंवा विवाहसोहळा.
या विषयासाठी, आळंदी सारखं दुसरं योग्य ठिकाण अगदी खचितच असावं.
आळंदी मध्ये लग्न करणं म्हणजे, ती एकप्रकारची दैवी पर्वणीच असते. असं म्हंटल तर ते वावगं ठरणार नाही. फक्त पुणे किंवा महाराष्ट्रातूनच नव्हे, तर संपूर्ण भारत आणि देश विदेशातून काही हौशी मंडळी, स्पेशल लग्न करण्यासाठी देवाची आळंदी येथे येत असतात.
ठरवून केलेल्या विवाहासोबतच. आई वडिलांच्या अपरोक्ष, त्यांच्या विरोधाला न जुमानता
" प्रेमविवाह " करणाऱ्या मुलामुलींचा सुद्धा इथे लग्न करण्यासाठी फार मोठा भरणा असतो.
खूपच घाईचं.. म्हणजे, अगदी तासाभरात आणि अत्यंत माफक दारात, इथे विवाहसोहळा पार पाडून दिला जातो. या विषयाचा, मी सुद्धा एक प्रत्यक्ष " लाभार्थी " आहे..!
तर, आळंदी मध्ये.. अशी शेकडो विवाह कार्यालयं, आणि त्याच बरोबर काही धर्मशाळा सुद्धा आहेत. ज्याठिकाणी, हे पवित्र कार्य पार पाडलं जातं. गरिबातला गरीब दोन पैसे वाचावेत म्हणून, आणि श्रीमंताला श्रीमंत देवाच्या दारात लग्न करूयात. असा विचार करून येथे विवाहसोहळा पार पाडण्यासाठी येत असतात.
आजच्याला.. अगदी तीस हजार रुपयात.. इथे एक नंबरचं लग्न करून मिळतं..!
या तीस हजार रुपयांमध्ये.. श्रीवंदन, साखरपुडा, हळदी समारंभ, विवाहसोहळा आणि शंभर लोकांच्या वऱ्हाडाच्या चहा, नाश्ता आणि जेवनासहितची सुविधा येथे पुरवली जाते.
जेवणामध्ये अस्सल ब्राम्हणी पद्धतीचा पाहुणचार असतो.. वरण आणि पांढरा भात, मसाले भात, बटाटा वाटण्याची रस्सा भाजी, पुरी, जिलेबी, मठ्ठा, पापड आणि लोणचं असा साग्रसंगीत भोजणाचा थाट असतो. समारंभात अचानकपणे, शंभर लोकांच्या वर काही पाहुणे मंडळीचा आकडा वाढल्यास. प्रत्येकी दीडशे रुपये ताट, याप्रमाणे वेगळा दर आकारला जातो. नाश्त्याला, उपीट आणि सोबत चहा सुद्धा असतो. जेवणामध्ये वेगळा आणि आवडीचा गोड पदार्थ ठेवायचा असेल. तर त्याचा जादा दर आकाराला जातो.
जेवणासाठी.. भारतीय बैठक ( पंगत ) व्यवस्था असते. स्वयपाक बनवण्यासाठी फक्त महिला आणि महिलाच असतात. शिवाय, वाढपी सुद्धा महिलाच असतात. जेवण अत्यंत आग्रह करून आणि पोटभर दिलं जातं. जेवण सुद्धा अगदी एक नंबर असतं.
आपण लग्नाला येताना..
फक्त नवरा, नवरी ( हे दोघे महत्वाचे आहेत.  ) त्यांचा कपडा लत्ता, मनी मंगळसूत्र, मुलाला लिंबू धरण्यासाठी एक कट्यार आणि जास्तीची आवड असल्यास एखादा उंची फेटा आणावा लागतो. खास आवड नसल्यास, तिथे फेटा सुद्धा अगदी मोफत उपलब्ध होतो.
इतर काही दागदागिने, दोन उपरणे, बाळकृष्णाची आणि अन्नपूर्णेची पितळेची मूर्ती. इतकच काय ते सामान, आपल्याला सोबत घेऊन यावं लागतं. बाकी, सुरवातीपासून लग्न संपेपर्यंत सर्व सेवा सुविधा याच खर्चात पुरवल्या जातात. अगदी भटजी आणि त्यांची दक्षिणा सुद्धा.
सुरवातीला.. वधुवर अशा दोन्ही पक्षांना, जानवस घर दिलं जातं. त्यानंतर.. यजमान स्वागत सोहळा पार पाडला जातो. आणि त्यानंतर, नवरा नवरीला माऊलींच्या पाया पडायला व त्यांना लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी समाधी मंदिरात पाठवलं जातं.
तसेच.. परत येताना, मंदिराच्या प्रांगणात असणार्या मंदिरातील, मारुतीच्या पाया पडून वधूवरांना कार्यालयात आणलं जातं. त्यानंतर साखरपुडा आणि हळदी समारंभ उरकला जातो. हळदी झाल्यावर वधूवरांना अंघोळीसाठी पाठवलं जातं. नंतर मुलाची तयारी व मुलीचा मेकअप उरकल्यावर, मंगलाष्टकांच्या मधुर घोषात लग्नसोहळा पार पाडला जातो.
नवरा नवरीला बसण्यासाठी राजाराणी खुर्ची असते. त्यासमोर, सतरंजी अंथरलेली असते. त्यावर भारतीय बैठक असते. ज्यावर, पन्नास एक लोकं आरामशीर बसू शकतात. त्याच्या मागील बाजूस, पन्नास खुर्च्या ठेवलेल्या असतात. त्यावर पन्नास लोकं बसली जातात. आणि त्यामागील मोकळ्या भागात, एकावेळी पन्नास लोकं जेवायला बसतील अशी व्यवस्था केलेली असते.
खरच.. ज्या लोकांची लाखो रुपये खर्च करून लग्न करण्याची ऐपत नसते. अशा कुटुंबांसाठी हि खूप सुंदर सुविधा आहे. यजमानांची जास्तीची धावपळ होत नाही. आणि अगदी आयत्या वेळी,
( कार्यालय उपलब्ध असल्यास ) म्हणजे अगदी दोन दिवसात सुद्धा तुम्ही येथील लग्नाचं नियोजन करू शकता.
" गरजूंनी " या सेवेचा नक्की लाभ घ्यावा..!

पांडूरंग हरी, वासुदेव हरी.. लग्न असतात घरोघरी.
माऊलीच्या गावी यावे, शुभकार्य पार पाडावे सत्वरी..!

No comments:

Post a Comment