Wednesday, 28 February 2018

अद्भुतरम्य शिवमंदिर..
यावर्षी महाशिवरात्रीला.. शंभोचं दर्शन घेण्यासाठी मी कर्नाटकात गेलो होतो.
बेळगाव पासून सुमारे एकशे दहा किलोमीटर अंतरावर, आणि.. कारवारच्या अलीकडे साधारण पन्नास किलोमीटर अंतरावर.. उत्तर कणारा, तालुका आणि जिल्हा जोयडा. अणशी अभयारण्यात, अणशी गावापासून सुमारे पाचशे मीटर अंतरावर, रस्त्याच्या डाव्या बाजूला, डोंगराच्या वरील बाजूस, सुमारे पाचशे मीटर अंतरावर, डोंगर भागात एका गुफेमध्ये हे स्वयंभू शिवलिंग आहे.
त्याठिकाणी मला अशी आख्यायिका ऐकायला मिळाली. कि.. त्याभागात राहत असणाऱ्या, एका पुजाऱ्याला देवाने स्वप्नात येऊन साक्षात्कार दिला. आणि त्याला सांगितलं, या गुफेमध्ये माझं एक स्वयंभू शिवलिंग आहे. तू तिथे जाऊन त्याची पूजा अर्चना कर.
दुसऱ्या दिवशी त्या पुजाऱ्याने, ती गुफा शोधून काढली. कारण ती गुफा बरीच घनदाट जंगलात आहे. हि साधारण दहाएक वर्षांपूर्वीची घटना आहे. तेंव्हापासून आजपर्यंत, हे मंदिर फक्त महाशिवरात्र या दिवशीच दर्शनासाठी उघडं असतं. किंवा त्याठिकाणी दर्शन करण्यासाठी भाविक जात असतात. परवाच्या दिवशी फारफारतर दोनेक हजार भाविक त्याठिकाणी येऊन गेले असावेत. नाहीतर इतर वेळी, त्या गुफेत.. अस्वलं आणि इतर जंगली श्वापदं बसलेली असतात.
महाशिवरात्रीच्या अगोदर दोनचार दिवस, त्या गावातील काही लोकं त्या परिसराची पाहणी करतात. आणि त्या भागात मोठमोठे फटाके व ढोल वाजवून त्या गुफेत राहत असणाऱ्या जंगली श्वापदांना त्या ठराविक दिवसासाठी तेथून पिटाळून लावतात. हे प्राणी सुद्धा कोणाला कसलाही त्रास न देता तेथून निघून जातात. त्यानंतर.. तिथे साफसफाई आणि शिवलिंगावर दुग्धअभिषेक केला जातो. आणि हा एक दिवसीय उत्सव संपल्यावर. ती जंगली श्वापदं, पुन्हा आहे त्या ठिकाणी वास्तव्य करण्यासाठी येतात.
या गुफेत, एका वेळेला एकच व्यक्ती जाऊ शकतो. ते हि अगदी खाली बसून बुडाने सरपटत पुढे जावं लागतं, त्या गुफेचं खूपच छोटंसं द्वार आहे. पण आतमध्ये, साधारणपणे तीसेक फुट पुढे चालत गेल्यावर. समोरच गुफेचा मोठा आणि विस्तीर्ण परिसर आहे. कि ज्याठिकाणी एका वेळी, साधारण पन्नासएक व्यक्ती उभ्या राहू शकतात. खरोखर हि खूपच सुंदर अशी नैसर्गिक गुफा आहे. आणि त्यात असणारं शिवलिंग सुद्धा तितकच मनोवेधक आहे. पण या गुफेत आतमध्ये गेल्यावर, आतमध्ये पूर्ण काळोख आहे. त्यामुळे आत जाताना, सोबत विजेरी असणं अत्यावश्यक आहे. आणि त्याठिकाणी ऑक्सिजन सुद्धा फारच विरळ आहे. त्यामुळे, दर्शनाला गेल्यावर काही भाविकांना श्वसनाचा खूप त्रास होतो. अर्थातच कधी नाही ते, याठिकाणी मला सुद्धा श्वसनाचा भयंकर त्रास जाणवला.
आणि त्यामुळे घाबरून जाऊन, मी दुरूनच त्या शिवलिंगाचं दर्शन घेऊन माघारी फिरलो. पण आतमध्ये गेल्यावर, त्या शिवलिंगाच्या शेजारी भरपूर ऑक्सिजन आहे. आणि त्या भागात भयंकर एनर्जी सुद्धा आहे. कारण, त्याभागात.. अगदी सकाळपासून दुपारी दोन वाजेपर्यंत, दोन चार भाविक तिथे अगदी ठाण मांडून बसले होते.
पावसाळ्यात या गुफेत भरपूर पाणी सुद्धा साठतं, पण पुढे कसलाही होल किंवा मार्ग नसताना. म्हणजे.. ती गुफा त्या शिवलिंगाच्या मागील बाजूस बंद होते. मग ते पावसाचं पाणी नेमकं कुठे जात असेल..? किंवा झिरपत असेल..? ते मात्र समजत नाही.
त्या गुफेची मी चित्रित केलेली, खालील चित्रफित पाहताना.. तुम्हाला माझ्या श्वासाचा जोरजोरात आवाज ऐकायला मिळेल. त्यावरून तुम्ही या विषयाचा नक्कीच अंदाज बांधू शकता. कि हे ठिकाण किती अवघड ठिकाणी आहे. कारवार किंवा बेळगाव भागात राहत असणाऱ्या व्यक्तींनी, किंवा शिवभक्तांनी याठिकाणी एकदा नक्की जाऊन या. खूपच सुंदर असं हे ठिकाण आहे.

No comments:

Post a Comment