Wednesday, 28 February 2018

नवरा-बायको.. हे नातं म्हणजे, अगदी जीवनभराची गाठ असते..!
काही व्यक्ती.. हि साथ, आणि मैत्रीची वात सदैव तेवत ठेवतात. तर काही अभागी लोकांच्या जीवनात, हा तेवता दिवा अकालीच मावळला जातो..
तर.. काही नवरा बायको ( स्त्री-पुरुष ) हे लग्न झाल्यावर, काही कारणास्तव एकमेकांच्या बंधनात राहू इच्छित नाहीत. त्यात चुकून जर ती स्त्री कमावती नसेल. तर तिला आयुष्यभर, हालापेष्टा सहन करत. अगदी रडत कुढत, त्याच जीवन साथीबरोबर नाईलाजाने तिला जीवन व्यतीत करावं लागतं.
तर याउलट.. काही कमावत्या महिला.
हि सगळी बंधनं झुगारून, त्या विषयापासून विभक्त होत, आपलं स्वतःचं अस्तिव निर्माण करत असतात. जीवनाचा सगळा आनंद त्या हवा तसा लुटत असतात. कारण, त्यांनी शिक्षणाच्या जोरावर एक यशस्वी जीवन जगण्याचा आणि तितक्याच धेय्याने अफाट द्रव्य कमावण्याचा निश्चय केलेला असतो. आणि काही प्रमाणात, ते त्यात यशस्वी सुद्धा झालेले असतात.
आणि.. या छोट्या-छोट्या चुका, नंतर फार मोठं रूप धारण करतात. आणि.. वेळ, अगदी फारकत घेण्यापर्यंत येते.
टाळी एका हाताने वाजत नसते.. या उक्तीप्रमाणे, वरील विषयातील पुरुष सुद्धा अगदी हाच मार्ग हाताळत असतो. तेच मनमौजी आणि स्वच्छंदी जीवन तो हि जगत असतो.
आणि चुकून.. या दोघांना अपत्य असेल, तर ते अपत्य कायद्याने त्या महिलेकडेच असतं. त्यामुळे ती सुद्धा त्याच्या सुद्धा सगळ्या जबाबदाऱ्या झेलत आणि स्वीकारत असते.
त्याचवेळी.. वेळोवेळी, तो वडील नामक व्यक्ती सुद्धा त्या मुला संबंधित, त्याला जमेल तितक्या जबाबदाऱ्या पार पडण्याचा कसोशीने प्रयत्न करत असतो.
या.. होरपळलेल्या प्रकरणानंतर, या दोघांनी.. अखंडपणे, अविवाहित राहण्याचा विडा उचललेला असतो. कारण, " विवाहसंस्था " या विषयावरील त्यांचा पूर्णपणे विश्वास उडालेला असतो.
पण हळूहळू, वय वाढत गेल्यावर. नकळतपणे त्यांना सुद्धा एका जोडीदाराची आवश्यकता भासत असते. पण ते हि गोष्ट जाहीरपणे कोणापाशी व्यक्त करू शकत नसतात. त्यांनी कमावलेल्या पैशामुळे.. किंवा त्यांच्या अंगी असलेल्या पिळदार सौंदर्यामुळे, त्यांना हवं तेवढं शरीरिकी सुख विकत अथवा फुकट मिळत असतं. पण त्या क्षणभंगुर असणाऱ्या द्रव्याने किंवा सौंदर्याने त्यांना " मानसिक " सुख कदापि मिळत नाही. हे सगळं करून, काही वेळाकरिता त्यांची वासना तृप्त होते. पण त्यांचं मन मात्र नेहेमी अतृप्तच राहत असतं.
हि काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. पण या सगळ्या घडून गेलेल्या गोष्टी असतात. त्यावर काथ्याकूट करण्यात आता काहीच हाशील नसतं.
कालांतराने.. त्यांचं मुल सुद्धा मोठं होऊ लागतं. आई वडिलांचे तणावपूर्ण जीवनातील संघर्ष पाहून, त्यांचं अपत्य सुद्धा काहीएक कारण नसताना, एका वेगळ्याच विश्वात निघून गेलेलं असतं.
त्याला सुद्धा एकांत आवडत असतो. आई वडिलांविषयी त्याच्या मनामध्ये किंचितही आस्था उरत नाही. त्यांच्या सुख दुख्खाशी त्याला कवडीची सुद्धा किंमत उरत नसते. या सगळ्या गोष्टी घडत असताना,
मला.. एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते..!
आपला मूळ स्वभाव, हा आपल्याला सुरवातीपासूनच माहिती असतो. तर मग, भविष्यात आपल्या जीवनात येणारी वादळं, आपल्याला ज्ञात नसतील का..? हे विषय, आपण वेळीच का थोपवत नसू..?
का म्हणून, आपण.. विषाची परीक्षा घ्यायला जात असू..?

No comments:

Post a Comment