Friday, 29 November 2019

फिरायला चाललो आहे, कोणाबरोबर.? मित्रांसोबत..
आपण कायमच मित्रांबरोबर फिरायला जात असतो, त्यावेळी.. बायको, आपल्या सामानाची बॅग अगदी आनंदाने भरून देते. आपण फिरायला निघालो आहे, म्हणजे जसं काही ती स्वतःच फिरायला निघाली आहे, असा तिला आनंद होत असतो.
परंतु एक पुरुष म्हणून.. आपण त्या महिलेच्या ठिकाणी जाऊन पाहूयात. जमेल का हे आपल्याला.? मी तर म्हणतो, मुळीच जमणार नाही..
आपण तिच्यासमोर लगेच सतरा प्रश्न उपस्थित करू. मित्रांसोबत फिरायला नक्कीच जावं. परंतु, आपण नेहेमी नेहेमी मित्रांसोबत फिरायला गेल्यावर, आपल्या बायकोला हि जग दुनिया फिरून कोण दाखवणार.?
कारण.. पर्यटनाच्या एका ठिकाणी आपण जाऊन आल्यावर, परत त्याचठिकाणी आपण कधीही जात नाही. कारण, त्यानंतर आपल्याला नवनवीन ठिकाणं पाहायची असतात.
पण चुकून.. आपली बायको म्हणालीच, कि.. तुम्ही गेला होता तिकडेच मला फिरायला जायचं आहे. तर आपण काय म्हणणार..
अगं मी तिकडे जाऊन आलो आहे, ते एवढं खास ठिकाण नाहीये. नकार देण्यासाठी, आपण बेमालूमपणे तिच्याशी खोटं बोलून जातो. आणि, ती बिचारी आपल्यावर विश्वास ठेऊन गप्प बसते.
बाईच्या मनाचा आजवर कोणालाच थांग लागला नाहीये. फक्त मनात विचार करा, आपलं राहतं घर सोडून आपल्याला एका अनोळखी घरात कायमचं वास्तव्य करायला जायचं आहे. जमेल का तुम्हाला.? नुसती कल्पना केली तरी अंगावर काटा आला असेल.
मग.. लग्न करून एक मुलगी.. आपले आईवडील, भाऊबहिण आणि इतर आप्तांना सोडून दुसरीकडे कायमचं जायला कशी तयार होत असेल.? तिला वाटत नसेल का, आपण सुद्धा आपण सुद्धा अजन्म आपल्या आईवडिलांसोबतच राहुयात.
पण नाही.. जनमानसात आजवर हि रीतच पडून गेली आहे. मुलीचं लग्न करायचं आणि तिला सासरी धाडायचं. मग येवढ मोठं धाडस करून आपल्या घरी राहायला आलेल्या मुलीला आपण कसं ठेवलं पाहिजे.?
ती माहेरी असताना.. तिच्या आई वडिलांनी तिचं खूप कोडकौतुक केलेलं असतं. तिची सगळी हौसमौज केलेली असते. पण मला सांगा.. त्या लहान वयात ती खरोखर या सगळ्याचा उपभोग घेऊ शकेल इतकी सज्ञान असते का.? कारण एकतर.. बहुतांश मुलींची लग्नं शक्यतो वयाच्या एकवीस वर्षांच्या आतच होत असतात. म्हणजे त्या अजाणत्या वयात नकळत ती एक जबाबदार नागरिक बनत असते. आणि त्याच वयात.. मुलांची सेटलमेंट सुद्धा झालेली नसते. काहींचं तर शिक्षण देखील पूर्ण झालेलं नसतं.
मग एकसारख्या वयाच्या मुलामुलीमध्ये एवढी तफावत कशी काय असू शकते.? कारण.. काही मुली तर, वयाच्या विसाव्या वर्षी माता सुद्धा झालेल्या असतात. कि, ज्या वयात.. मुलं वयात सुद्धा आलेली नसतात. मित्रहो हि अगदी सत्य परिस्थिती आहे.
त्यामुळे.. स्त्री मग ती, आपली आई असेल, बायको असेल, बहिण असेल, मावशी असेल, आत्या असेल.. किंवा आपल्या नात्यातील अन्य कोणी स्त्री असेल. यांच्यासाठी तुम्ही कराल तितकं कमी आहे. कारण.. फार कमी वयात त्यांनी नको ती दुखः भोगलेली असतात. त्यामुळे, तुम्हाला जमेल तितकं यांना सुखी ठेवण्याचा प्रयत्न करा. आई गेल्यावर आईची किंमत कळते. त्यामुळे, ती आहे तोवरच तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करा. आपल्याला जसं फिरावास वाटतं. तसच आपल्या बायकोला सुद्धा फिरावंसं वाटत असतं. पण ती गृहिणी पूर्णपणे आपल्यावर अवलंबून किंवा विसंबून असल्याने, बिचारी हु कि चू करत नाही. अगदी तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करत असते. त्यामुळे.. काही नाहीतर.. बायकोची सगळी हौसमौज पूर्ण करा.
कारण तिला आपल्याशिवाय दुसरं कोणीच नसतं. तिला आयुष्यात कधीच अंतर देऊ नका. मग बघा, ती तुम्हाला अगदी तळहातावरील फोडा सारखं जपतेय कि नाही.
त्यामुळे.. या माध्यमातील माझ्या सर्व मित्रांना माझी विनंती असेल. माता भगिनींची कदर करत चला. त्यांचा आदर करत चला. त्यामुळे मी.. राम तेरी गंगा मैली.. या सिनेमातील कै. रवींद्र जैन यांचं हे वाक्य पुन्हा पुन्हा लिहित असतो..
कोही हसीना कदम, पहेले बढाती नही. मजबूर दिलसे ना हो, तो पास आती नही.
काहीतरी मजबुरी असल्या शिवाय बाई कधीही वाकडं पाऊल टाकणार नाही. त्याकरिता, उभ्या आयुष्यात कोणत्याच कारणाने तिचं पाऊल वाकडं पडू नये ( या वाक्याचा अर्थ, प्रत्येकाने आपआपल्या परीने घ्यावा. ) याकरिता. आपण तिचं नेहेमीच यथोचित स्वागत करायला शिकलं पाहिजे.
पूर्वी .. एका खासगी ठिकाणी, महिंद्रा ट्रॅक्स या जीपवर ड्रायव्हर म्हणून मी कामाला होतो, त्यावेळचा माझा मासिक पगार ऐकताल तर तुम्हाला सुद्धा हसू येईल. त्याकाळी मला महिन्याला फक्त २२०० रुपये पगार होता.
नाईलाजाने.. पोटापाण्यासाठी निवडलेल्या हा पेशा, येणाऱ्या काळात मला सोन्याचे दिवस दाखवेल,असं मला त्यावेळी कदापी वाटत नव्हतं. कारण.. मला ड्रायव्हिंगचे धडे देणाऱ्या माझ्या काही मित्रांची अजून देखील सेटलमेंट झाली नाहीये. आयुष्यभर फरफट चालू आहे, त्यामानाने मी स्वतःला फार भाग्यवान समजतो. शेवटी नशीब म्हणतात ते हेच.
तर त्यावेळी.. ज्या कंपनीत आमच्या मालकाने ट्रॅक्स भाड्याने लावली होती. त्या आयटी कंपनीतील एका व्यक्तीने, एक जंगी पार्टी आयोजित केली होती.
त्या व्यक्तीने.. पुण्यातील एका हायफाय एरियात असणाऱ्या रहेजा पार्क नामक सोसायटीमध्ये, त्याकाळी फक्त साडेआठशे रुपये चौरस फुटाणे हजार स्क्वेअर फुटाचा एक फ्लॅट खरेदी केला होता. ( त्याकाळी ही फार मोठी रक्कम होती, आमच्या पिंपरी चिंचवड भागात त्यावेळी चौरस फुटाचा काहीतरी चार पाचशे रुपये रेट असावा. ) आणि त्यानिमित्ताने ही पार्टी त्या साहेबांनी आयोजित केली होती.
तर, यांची पार्टी ज्यादिवशी ठरली होती, तो दिवस नेमका माझ्या सुट्टीचा होता. पण खासगी क्षेत्रात ड्रायव्हर हा असा विषय असतो, त्याला सुट्टी नावाचा प्रकार नसतो. चल म्हंटलं की उठायचं आणि कामावर निघायचं. फालतू नखरे करत बसायचं नाही.
नाय होय करता..सायंकाळी पाच वाजता माझा पिकअप सुरू झाला.. आणि सात वाजता पुण्यातील एका थ्री स्टार हॉटेलमध्ये मी येऊन पोहोचलो. माझ्यासोबत प्रवास करणाऱ्या व्यक्तींबरोबरच.. त्या साहेबांचे इतर काही मित्र सुद्धा या पार्टीला आले होते. हॉटेलच्या लॉबीमध्ये मी ट्रॅक्स पार्क केली, आणि टाइमपास करण्यासाठी मी बाहेर निघून गेलो.
रात्रीचे साडेआठ वाजले..माझ्या पोटात कावळे ओरडू लागले. पार्टीत जेवणासाठी मला सुद्धा आमंत्रण असल्याने, ते जेवायला कधी बोलवतील याची मला वाट पहावी लागणार होती. वाट पाहून.. शेवटी ड्रायव्हर सीटवर बसल्या बसल्या कधी एकदा माझा डोळा लागला, ते मला सुद्धा समजलं नाही.
त्या काळोख्या रात्री.. आवाज देत मला हलवून कोणीतरी जागं करत होतं. आम्हाला पार्टी देणारे साहेबच मला बोलवायला आले होते. मला म्हणाले, खूप उशीर झाला आहे, चल तू जेऊन घे. डोळे चोळत.. मी एकवार हातातील घड्याळात पाहिलं, रात्रीचे अकरा वाजले होते.
खरं तर.. या मोठ्या साहेब लोकात, आणि त्यात या हायफाय हॉटेलमध्ये जेवायला जायचं, खरं तर माझ्या फार जीवावर आलं होतं. खरं सांगायला गेलं तर, मनात एक लज्जा मिश्रित भीती निर्माण झाली होती. धाडसच होत नव्हतं. शेवटी थोडा घाबरतच कसाबसा मी आतमध्ये गेलो..
आतमध्ये फारच प्रसन्न वातावरण होतं.. अगदी हळुवारपणे व्हायोलिनचं संगीत वाजत होतं. कुठेही गडबड गोंधळ नव्हता. काही व्यक्ती गप्पा मारत उभं राहून जेवण करत होते, तर त्यातील काही साहेब लोकं अजूनही वारुणीचा आस्वाद घेण्यात मग्न होते. माझ्या ओळखीत नसणारे त्यातील दोन साहेब लोकं तर, दारू पिऊन अगदी आउट झाले होते. आणि मनाला वाटेल तसं काहीबाही बरळत होते. नाही म्हणता..त्यांचाच आवाज तेथील शांतात भंग करत होता.
मी अंग चोरून तिथे सहभागी होत.. कशीबशी जेवणाची थाळी हातामध्ये घेतली.. आणि बुफेच्या रांगेमध्ये गेलो, तिथे बऱ्याच पदार्थांची रेलचेल होती. कुलचा, पनीरची मिक्स भाजी, दाल तडका, फ्राईड राईस, गुलाब जामून, सलाड आणि सोबतच.. तळलेले पापलेट, चिकन कबाब, मटन रोस्ट, मटन चिकन करी, चिकन बिर्याणी.. सगळं काही होतं.
जेवण घेताना मला संकोचलेलं पाहून, त्या साहेबांनी स्वतः येऊन माझ्या ताटात त्यांना हवं आहे ते, ( म्हणजे मला जे आवडेल ते ग्रहीत धरून ) सगळं काही वाढलं. आणि निवांत बसून जेव म्हणाले. जेवणाचं ताट घेऊन मी एकाबाजूला गेलो.
त्या नामांकित आयटी कंपनीमध्ये, अगदी बुद्धीजीवी म्हणून ओळखले जाणारे साहेब लोकं सुद्धा दारू पिल्यावर किती धूम करतात, त्या मजेदार गमतीजमती पाहत मी निवांत जेवत होतो.
जेवण आटोपल्यावर पुन्हा एकदा मी माझ्या ट्रॅक्समध्ये येऊन बसलो, आता हे साहेब लोकं कधी येतील त्याची वाट पाहत बसायचं होतं. पोट गच्च झाल्याने, पुन्हा एकदा मला गुंगी आली, आणि माझा डोळा लागला. शेवटी.. रात्री एकच्या ठोक्याला सगळी मंडळी बाहेर आली. माझ्या गाडीतून जाणारे सगळे साहेब लोकं आणि एक मॅडम गाडीत येऊन बसले.
मी तोंडावर थोडं पाणी शिंपडलं.. आणि जीपला स्टार्टर मारला.. रात्रीची वेळ, थंडीचे दिवस, हवेत भलताच गारवा होता. सगळा रस्ता मोकळा असल्याने, अगदी सुसाट वेगात जीप चालवत मी सर्वांना घरी पोहोचवलं.
सगळ्यात शेवटचा ड्रॉप.. पार्टी देणाऱ्या साहेबांचा होता. त्यांचं घर आल्यावर ते गाडीतून उतरले. त्यांच्या हातात कसलीशी एक पिशवी होती.. ती माझ्या हातात देत ते म्हणाले. यामध्ये अर्धवट राहिलेल्या दोन दारूच्या बाटल्या आहेत, त्या तुला ठेव. खरं तर.. या गोष्टीला मला मनापासून नकार द्यावासा वाटत होता. पण हा सुद्धा फार मोठा साहेब.. त्या अर्धवट उरलेल्या उष्ट्या दारूच्या बाटल्या घ्यायला त्यावेळी मी नकार दिला असता. तर, कदाचित माझी नोकरी सुद्धा गेली असती. त्यामुळे नाईलाजाने अगदी हसतमुखाने गपगुमान मी त्या बाटल्या घेतल्या, आणि बाजूच्या सीटवर ठेवल्या. मला बाय करून साहेब घरी निघून गेले, उद्या सकाळी पुन्हा सहा वाजता उठून मला कामाला लागावं लागणार असल्याने, मी सुद्धा तिथून निघायची घाई केली.
जीप चालवत असताना मी मनात विचार केला.. कि त्या साहेबांनी काय म्हणून मला या दारूच्या अर्धवट उरलेल्या बाटल्या दिल्या असतील.? मी काही रोजच्या रोज दारू पिणारा दारुडा वगैरे सुद्धा नाहीये, मग त्यांनी कोणती शक्यता पडताळून हे कृत्य केलं असेल.?
त्यावेळी.. मीच माझ्या मनाची समजूत घातली, " मित्रा.. ड्रायव्हर व्यक्तीला प्रत्येकजण फक्त गृहीत धरत असतात. त्याला स्वतःची अशी कोणतीच निर्णय क्षमता नसते. "
" आणि खऱ्या अर्थाने, ड्रायव्हर व्यक्तीच्या जीवनाची हीच फरफट असते. "
शेवटी नशिबाला दोष देत.. मी तसाच पुढे निघालो, आणि दूरवर निघून आल्यावर एका मोकळ्या ठिकाणी, रोडच्या कडेला असणाऱ्या फुटपाथवर, अर्धवट भरलेल्या त्या दोन्ही दारूच्या बाटल्या ठेऊन दिल्या. शून्यात नजर रोखत, टेपवर लागलेलं.. सो गया ये जहाँ, सो गया आसमा.. हे गीत ऐकत, अगदी सावकाशपणे घरी निघालो.
हे सगळं घडल्यावर, नकळत माझे डोळे वाहू लागले. हे लाचार जिनं जगण्याचा कुठेतरी त्रागा वाटू लागला, परंतु नियतीला हे सगळं मान्य नसावं. कालांतराने.. या खासगी नोकरीतील त्रासाच्या दुखद अश्रुंचं, सरकारी नोकरीच्या रूपाने पुन्हा एकदा गोड आनंदाश्रू मध्ये रुपांतर होणार होतं, याची मला त्यावेळी यत्किंचितही कल्पना नव्हती.

Wednesday, 20 November 2019

सोशल मिडीयाचा योग्य वापर..

व्यवसायासाठी सोशल मिडीयाचा वापर करायला काही लोकं अजूनही शिकली नाहीयेत.. काही मुलं तर व्हाट्सएपवर इकडचे मेसेज तिकडे आणि तिकडचे इकडे करण्यातच फालतू वेळ घालवत असतात.
माझा एक बिनकामाचा मित्र.. पाचशे रुपये रोज मिळतोय म्हणून, एका फ्रुट वाल्याकडे कामाला आहे. दिवसभर हातामध्ये फळं घेऊन रस्त्यावर उभं राहायचं, एवढंच त्याचं काम असतं. एकदा मी त्याला म्हणालो देखील.. तुला या व्यवसायातील माहिती झाली आहे, तर तू स्वतः हा व्यावसाय का सुरू करत नाहीस.? तर म्हणाला.. जाऊदे राव, फुकटची झंझट कोण करणार.? म्हणजे.. हि आळशी लोकं आयुष्यात कधीच यशस्वीपणे जीवन जगणार नाहीत.
मध्यंतरी.. आमच्या भागामध्ये एक मुलगा टेम्पो मधून समुद्री मासे विक्रीसाठी घेऊन आला होता. आजवर मी पाहिल्याप्रमाणे.. फळं, भाजीपाला, कांदा, बटाटा, लसून.. इथपर्यंत ठीक होतं. पण आता तर यांनी चक्क मासे विक्रीसाठी आणले होते. मी त्याचे दर चेक केले, तर बाजारभावाप्रमाणे याचे रेट्स बरेच कमी होते. माझ्या आवडी प्रमाणे मी त्याच्याकडे मासे खरेदी केले. त्याने विक्रीसाठी आणलेले मासे सुद्धा अगदी ताजे होते.
तर.. त्या मासे तोलून देणाऱ्या मुलासोबत अजून एक मुलगा होता. माझे मासे पिशवीत भरून दिल्यावर तो मला म्हणाला.. साहेब तुमचा मोबाईल नंबर द्या. मासे आले कि तुम्हाला व्हाट्सएपवर कोणते मासे आहेत, कसे आहेत, आणि कोणत्या ठिकाणी मिळतील, ते कळवतो.
आयती सुविधा मिळत आहे.. म्हणून, मी सुद्धा त्याला लगेच माझा नंबर देऊन टाकला. आणि तेंव्हापासून.. त्याचा मला, आठवड्यातून किमान तीन वेळा तरी मेसेज येतोच. अमुक तमुक मासा आला आहे. आणि अमुक वेळेला मी अमुक ठिकाणी हजर असेल.
दोनेक वेळा मी ओब्झर्व केलं.. त्याचा मेसेज आल्यानंतर, त्याने सांगितलेल्या वेळेनुसार, तिथून पुढे अवघ्या तासा दोन तासात मासे संपले आहेत, असा मला मेसेज यायचा. म्हणजे, उशिरा येणाऱ्या ग्राहकाला हेलपाटा पडू नये हा त्याचा त्यामागचा मूळ उद्देश.
मी विचारात पडलो.. याचं भांडवल काय, तर.. एक जुना तीनचाकी टेम्पो. पाच सहा क्रेट भरून समुद्री मासे.. ओले बोंबील, पापलेट, कोळंबी, हलवा, बांगडा, कुप्पा, सुरमई.. इत्यादी.
शेवटी.. एकदा मासे घेतल्यावर मी त्याला विचारणा केलीच.. तर म्हणाला,
व्हाट्सएपवर आपल्या परिसरातील ज्या त्या भागातील वेगवेगळ्या प्रकारचे मी ग्रुप बनवले आहेत. आठवड्यातून पाच दिवस निरनिराळ्या ठिकाणी मी मासे विकतो. अस्सल खवय्यांचे नंबर माझ्याकडे असल्याने, अवघ्या तास दोन तासात माझा सगळा माल विक्री होतो. माल अगदी ताजा, आणि रास्त किंमत असल्याने. बाकी कसलाच विषय राहत नाही. न दुकानाचं भाडं, ना मासे उरलेत म्हणून त्यांना बर्फात ठेवायचा त्रास..
आणि अगदी आनंदाने म्हणाला.. तुम्हाला काय खोटं बोलायचं.. सगळं जाऊन, रोजच्याला मला सात आठ हजार रुपये सुटतात. फक्त पहाटे मासे आळीत जाऊन मासे खरेदी करायचा तेवढा त्रास असतो, बाकी दुसरा काहीच त्रास नाही. आता या व्यवसायात मी चांगला स्थिरस्थावर झालो आहे.
माझ्या पाहण्यातलं हे एक प्राथमिक उदाहरण आहे. अशी कित्तेक उदाहरणं तुम्हाला आढळून येतील. फक्त ते डोळसपणे पाहायला शिका.
त्याकरिता.. माझ्या सगळ्या मित्रांना माझं सांगणं राहील. मी माझं काम करून फावल्या वेळात इथे मौजमजा करत असतो. पण चुकून तुमच्याकडे काही काम नसेल, तर या माध्यमाचा तुम्हाला कसा उपयोग करून घेता येईल. याच्या नवनवीन क्लुप्त्या तुम्ही शोधायला सुरवात करा. इथे दगड आणि माती सुद्धा विक्री करता येते. फक्त ते विकायची तुमच्या अंगी सचोटी असणं महत्त्वाचे आहे.
कारण कसं आहे.. वेळ कोणासाठी थांबत नसते, ती निघून गेल्यावर काहीच उपयोग होत नसतो. आज कोणताही खर्च न करता, हि माध्यमं तुमच्यासमोर अगदी हात जोडून उभी आहेत. याचा वेळीच सदुपयोग करून घ्या. पुन्हा एकदा सांगतो.. कोणतंच काम हलकं नसतं. हलके असतात ते आपल्या मनातील विचार. तर असे नको असणारे विचार मनातून दूर सारा, आणि कामाला लागा. लक्ष्मी तुमची आतुरतेने वाट पाहात आहे.!
पुण्यातील ट्राफिक

ट्राफिक ध्वनिप्रदूषण, आणि वायुप्रदूषण काही अंशी आटोक्यात येऊ शकतं..
मला ज्या काही कल्पना सुचल्या आहेत. त्या मी इथे देण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही सुद्धा त्यात भर घालू शकता. हे उपाय म्हणजे सगळं काही आहे असं नाही, पण यातून नक्कीच काहीतरी सकारात्मक मार्ग निघू शकतील असं मला वाटतय.
१) पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, आणि.. पुण्यात जेवढे सरकारी ऑफिसेस आहेत. मग ते राज्य सरकारी असो अथवा केंद्राची असोत. याठिकाणी काम करत असणाऱ्या प्रत्येक तरुण ( म्हणजे पन्नाशीच्या आतील ) कर्मचाऱ्याला सायकलवरून कामाला येणं बंधनकारक केलं पाहिजे. यापासून बरेच फायदे आहेत.. फुकटचा व्यायाम होतो, इंधन बचत होते, पर्यायने नकळत पैसे सुद्धा वाचतात, ध्वनी आणि वायुप्रदूषण कमी होण्यास मदत होईल.
आणि मुख्य म्हणजे.. अपघाताचं प्रमाण देखील कमी होईल.
फारच थकलेल्या, वृद्ध, दिव्यांग आणि आजारी कर्मचाऱ्यांना सरकारी वाहनाने ऑफिसमध्ये येण्याचा अध्यादेश काढला पाहिजे. यामुळे वाहतूक कोंडी, वायू आणि ध्वनीप्रदूषण नक्कीच कमी होण्यास मदत मिळेल.
( परंतु याकरिता, सरकारने स्पेशल सायकल ट्रॅक निर्माण करून देणं फार गरजेचं आहे. नाही म्हणता, पुण्यातील काही भागात हि सोय उपलब्ध आहे. )
२) कारमध्ये किमान तीन व्यक्ती ( ड्रायव्हर धरून ) असायलाच हव्यात. यापेक्षा कमी प्रवाशी असणाऱ्या कार रसत्यावर येता कामा नये. आल्याच तर त्यांच्यावर फार मोठी दंडात्मक कारवाई करण्यात यावी. हायर कॅबला सुद्धा अशाच प्रकारचे नियम लावले गेले पाहिजेत. ( तुम्ही #कार घेतली म्हणजे, ट्राफिक जाम करून लोकांच्या डोक्याला #कार केलाच पाहिजे. असा काही नियम नाहीये. )
३ ) ट्राफिक सिंग्नल, आणि नियमांचं वारंवार उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांचा वाहन परवाना ( गुन्हा असेल तशी शिक्षा.. तीन महिने, सहा महिने, वर्षभर, किंवा कायमस्वरूपी.. ) रद्द करण्यासाखे कठोर नियम निर्माण केले गेले पाहिजे. अशा कारवाई झालेल्या व्यक्ती पुन्हा वाहन चालवताना आढळून आल्या, तर त्यांना किमान दहा दिवसांची जेल वारी आणि फार मोठा दंड आकारला गेला पाहिजे. त्याशिवाय जनमानसात याची जरब बसणार नाही.
४ ) बिल्डिंगमध्ये किंवा राहत्या घरी पार्किंगची सोय असणाऱ्या व्यक्तींनाच दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली पाहिजे. त्यामुळे रस्त्यावर होणारं पार्किंग, आणि पर्यायाने होणारी रस्ता कोंडी कमी होण्यास मदत होईल. आणि अर्थातच.. त्यामुळे रस्त्यावर सुद्धा जास्ती वाहनं येणार नाहीत.
५ ) प्रत्येक शहरामध्ये.. तेथील स्थानिक चारचाकी वाहनांना ( पुणे एम.एच. १२ आणि १४ ) व्यवसाय करण्यास परवानगी दिली पाहिजे. बाहेर गावातील वाहनांना फक्त बाहेरून ट्रीप घेऊन येण्यासाठीच ठराविक दिवसांची परवानगी द्यावी. त्यांना कायमस्वरूपी वास्तव्यास किंवा व्यवसाय करण्यास मज्जाव करण्यात यावा.
६ ) हॉर्न पद्धत पूर्णपणे बंद केली गेली पाहिजे, कारण हा फारच कर्कश्य विषय आहे. यापासून कोणत्याच प्रकारचा फायदा होत नाही. वाहतूक कोंडी झाल्यावर देखील काही व्यक्ती मुर्खासारखे हॉर्न वाजवत असतात. त्यामुळे हा विषय पूर्णपणे बंद केला गेला पाहिजे.
बुलेट सारख्या दुचाकींना, फटाका फुटल्या सारखा आवाज काढला जातो. हा प्रकार आढळून आल्यास, गाडी जागेवर जप्त करण्यात आली पाहिजे. बाईकवर ट्रिपल सीट असणाऱ्या मुलांना, कठोरतील कठोर शासन करण्यात आलं पाहिजे.
७ ) प्रत्येक कॅब चालकांचा.. बॅच आणि लायसन्स तपासणी केली पाहिजे. कारण माझ्या माहितीप्रमाणे.. सर्रास कॅब चालकांकडे प्रवासी वाहतुकीचे बॅच नाहीयेत. याची कसून तपासणी आणि दंडात्मक कारवाई केली गेली पाहिजे. यामुळे सुद्धा रस्त्यावर गाड्यांची गर्दी कमी होऊ शकते. कारण बॅच काढणं काही सोपं काम नाही. त्याकरिता सगळे पेपर्स क्लियर असावे लागतात. व्हेईकल ट्रायल व्यवस्थितपणे द्यावी लागते, प्रवासी वाहतूक करण्यासाठी हा विषय फार महत्वाचा आहे. पण हा विषय कोणीही गांभीर्याने घेत नाही. असं आढळून येत आहे.
८ ) महारष्ट्रातील किंवा देशातील प्रत्येक भागात आयटी सेक्टर निर्माण केले गेले पाहिजेत. म्हणजे स्थानिक तरुणांचा शहराकडे होणारा वाढता प्रवाह काही अंशी तरी कमी होण्यास मदत मिळेल. आणि इतर छोटीमोठी गावं सुद्धा दृष्टीक्षेपात येण्यास मदत होईल. पर्यायाने बाहेरून कोणी आलं नाही, तर.. शहरातील वाहतूक आणि गर्दी वाढणार नाही. सगळ्या सुविधा किंवा नोकऱ्या आपल्याच गावात मिळाल्या, तर कोणता मायचा लाल दुसऱ्या गावात नोकरीसाठी जाईल.?
९ ) कोणत्याही प्रवाशाने रिक्षामध्ये, तीन सीट्सच्या वर बसूच नये. भले थोडा उशीर होऊद्यात, थोडी कळ सहन करा, पण रिक्षामध्ये दाटीवाटीने बिलकुल जाऊ नका. लागल्यास दोन पैसे जास्ती घे म्हणावं, पण आपल्या निर्णयावर ठाम राहा. कारण.. अतिरिक्त भार झाल्याने सुद्धा, रिक्षा किंवा तत्सम वाहनं धूर ओकू लागतात. तसेच.. पीएमपीएमएल, एसटी, सारख्या सरकारी वाहनात सुद्धा क्षमतेपेक्षा जास्ती लोकांनी प्रवास करू नये.
१० ) पंधरा वर्ष पूर्ण झालेल्या वाहनांना.. अगदी शोधून जप्त करा. तडजोड करून वाहनं सोडू नका, अशी सक्त ताकीद प्रत्येक पोलीस ऑफिसरला दिली गेली पाहिजे, त्यामुळे सुद्धा रस्त्यावरील भरपूर वाहनं कमी होतील. धूर ओकणाऱ्या प्रत्येक वाहनाला.. मग ते जुनं असो अथवा नवं. जप्ती किंवा फार मोठ्या आकाराचे दंड ठोठावले गेले पाहिजे. म्हणजे.. तशी वाहने रस्त्यावर येण्यासाठी धजावणार नाहीत.
हे काही पर्याय मला सुचले आहेत, नाही म्हणता.. खरं तर मी फारच कठोर भूमिका घेतली आहे. पण आजच्याला याशिवाय पर्याय नाहीये. कारण, आजवरच्या सौम्य कारवायांना पब्लिकने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. आम्ही रोज मरतोय, पण या नियमांचं उल्लंघन करणारे मनसोक्त आनंद उपभोगत आहेत.
कोणीतरी याची दखल घेतली पाहिजे. नाहीतर पुण्यात किंवा इतर मोठ्या शहरात लोकांचं जिनं अगदी मुश्कील होऊन जाईल. असंही आज ते होतच आहे म्हणा, पण त्यात आणखीन भर पडेल हे नक्की..

Wednesday, 13 November 2019

#कॉपी..

मुलांनो.. कॉपीचं स्पेलिंग सांगा.? KOPY मुलांच्या या चुकीच्या उत्तरावर, मास्तराने हातावर छडी मारल्याचा जोरदार आवाज ऐकवलाय. कॉपी सिनेमाच्या अगदी सुरवातीचा हा न दिसणारा, म्हणजे फक्त ऐकू येणारा सीन आहे. यातून त्यांना हेच सांगायचं असावं.. कि,
छडी लागे छमछम.. आणि, विद्या येई घमघम..!
आज मी हा सिनेमा पाहायला गेलो.. आणि पाहतो तर काय, हा सिनेमा पाहायला सिनेमागृहात, आम्ही फक्त तीनच जन होतो. मराठी सिनेमांना थियेटर उपलब्ध करून द्या म्हणून चळवळ उभारणारी लोकं आपल्या इथे भरपूर आहेत. पण हि चळवळ उभी राहिल्या नंतर.. ते मराठी सिनेमे पाहायला प्रेक्षकवर्ग हवा कि नको.?
वादाला तोंड फुटू नये म्हणून.. काही सिनेमागृहात मराठी सिनेमे दाखवले देखील जातात. पण प्रेक्षकांनी अशा सिनेमांकडे जाणीवपूर्वक पाठ फिरवल्यावर, त्या थियेटर मालकाने, किंवा निर्मात्याने तरी काय करावं.? म्हणजे.. सामाजिकदृष्ट्या सक्षम असणारे चित्रपट कोणी बनवूच नये, किंवा त्या फंदात कोणी पडूच नये. असाच त्याचा सरळसरळ अर्थ होतोय.
कॉपी.. या सिनेमाचा विषय तसा खूप विचार करायला लावणारा आहे. पण चित्रपटाची बांधणी थोडी चुकल्यामुळे, हा सिनेमा मध्यंतरानंतर काहीसा रटाळवाणा झाला आहे.
कॉपी करून विध्यार्थी कसे पास होतात, किंवा.. स्वतः शिक्षक मंडळीच आपल्या शाळेचा निकाल शंभर टक्के कसा लागेल. म्हणून, परीक्षेदरम्यान मुलांना कॉपी करण्याची सरळसरळ सूट कसे देतात. किंवा.. शाळेतील काही शिक्षक, आपल्या खासगी शिकवण्यांची खळगी भरण्यासाठी, शाळेतील मुलांना ठीकसं शिकवण्यात कशी असमर्थता दाखवतात. काही शिक्षणसम्राट मंडळी, शिक्षणसंस्था उघडून त्याचा मलिदा कसा लाटतात, आणि पर्यायाने शिक्षक वृदांना कसं वेठीस धरतात. अशा सर्व विषयांवर भाष्य करणारा ग्रामीण ढंगातील हा सिनेमा आहे.
नेहेमीप्रमाणे.. गरीब घरातील गरजू विध्यार्थी. आणि, आणि श्रीमंत घरातील मुजोर विध्यार्थी, तसेच.. निव्वळ ग्रामीण भागातील शाळेतून परीक्षा दिल्याने ( अर्थात कॉपी करण्याची सूट दिली जातेय म्हणून. ) दहावीत मोठ्या टक्क्याने पास होऊ अशी अशा बाळगून, पुण्यातून ग्रामीण भागात शिकायला गेलेली मुलगी. आणि त्याच बरोबर.. ग्रामीण भागातील तीन विध्यार्थी, ज्यांना शिक्षणाची आवड असून सुद्धा, त्यांना शिक्षण घेण्यात कशा अडचणी येतात. त्यावर मेहनत करून मात करणारे विध्यार्थी, आणि.. त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी धडपडणाऱ्या दोन शिक्षकांनी, त्या तीन गरजू मुलांना सोबत घेऊन दिलेला अयशस्वी लढा. असा काहीसा सिनेमाचा मूळ गाभा आहे.
प्रत्येक सिनेमात शेवटी नायकाचा विजय होत असतो.. पण या सिनेमात, नायक असणारी तीन मुलं, पैकी एक मुलगा या शिक्षणपद्धतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा मार्ग स्वीकारतो. तर उर्वरित दोन विध्यार्थी आणि दोन शिक्षक या विषयाला वाचा फोडण्यासाठी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारतात. पण त्याचा काहीएक उपयोग होत नाही. आणि या लढ्याचं बक्षीस म्हणून.. त्या दोन्ही शिक्षकांवर निलंबनाची कारवाई होते. तर शेवटला..सैराट सिनेमा टाईप, लढा देणाऱ्यांपैकी एक विध्यार्थिनी.. त्या शिक्षण सम्राटाच्या तोंडावर ( कॅमेऱ्यावर ) थुंकते. असा काहीसा सिनेमाचा शेवट दाखवण्यात आला आहे.
मराठी सिनेमात येणारा तोच तोचपणा.. आपल्या मराठी सिनेसृष्टीला कुठेतरी घातक ठरतोय. असं मला तरी हा सिनेमा पाहून जाणवलं. परंतु काही अंशी.. सिनेमाचा शेवट सोडला तर, एका चांगल्या विषयाची सुरवात किंवा मुहूर्तमेढ म्हणून अगदी डोळसपणे या सिनेमाकडे प्रत्येक सिने रसिकाने पाहायला हवंय, असं सुद्धा मला वाटून जातं.
पण सत्य परिस्थिती काहीशी गंभीर आणि वेगळी आहे. टकाटक सारखे मादक सिनेमे पाहायला चटावलेल्या मराठी प्रेक्षकांना, अशा प्रकारच्या सामाजिक विषयाकडे आपण कसं वळवू शकू.?
किंवा याचं योग्यप्रकारे मार्केटिंग करण्यात आपण कसे यशस्वी होऊ.? हा आजच्या मराठी सिनेनिर्मात्यांसाठी फार मोठा पैजेचा विडा आहे.!
या सिनेमाचे दिग्दर्शक.. दयासागर वानखेडे आणि हेमंत धबडे आहेत. तर.. सिनेमातील शिक्षकाच्या भूमिकेत असलेल्या मिलिंद शिंदे, अंशुमन विचारे, जगन्नाथ निवंगुणे आणि शिक्षण अधिकारी असलेल्या कमलेश सावंत यांनी आपल्या भूमिका उत्तमरित्या साकारल्या आहेत. सिनेमाची दिग्दर्शकीय मांडणी काहीशी ढिसाळ झाली असली तरी सिनेमाचा मूळ विषय आणि त्याची दाहकता प्रेक्षकांपर्यंत अचूक पोहोचते. शिवा (प्रतीक लाड), प्रकाश (अज्ञेश मदूशिंगरकर), प्रिया (श्रद्धा सावंत) या बालकलाकारांनी सुद्धा या सिनेमात उत्तम भूमिका साकारल्या आहेत. सिनेमातील दोन्ही गीतं खूपच सुंदर आणि श्रवणीय आहेत.

Thursday, 17 January 2019


काल बऱ्याच वर्षांनी.. सिनेमागृहात टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्यांचा पाऊस पडताना मला पाहायला आणि ऐकायला मिळत होता. हे सगळं काही, नेहमीप्रमाणे सिनेमातील कोण्या मादक लावण्यवतीला पाहून घडत नव्हतं. तर प्रेक्षकांकडून हे एवढं भरभरून प्रेम दिलं जात होतं, ते आपल्या भारतीय जवानांना, आणि इंडियन आर्मीला..
१८ सप्टेंबर २०१६ रोजी, जम्मू आणि काश्मीर येथील उरी सेक्टरमध्ये, एल.ओ.सी. शेजारी असणाऱ्या भारतीय सेनेच्या मुख्यालयावर भ्याड आतंकवादी हल्ला झाला होता. ज्यामध्ये आपले अठरा जवान शहीद झाले होते. या कारवाईत प्रत्युत्तरा दाखल भारतीय सेनेकडून चार आतंकवादी मारले गेले होते. असं सांगितलं जातं, कि..गेल्या वीस वर्षात भारतीय सेनेवर झालेला हा सर्वात मोठा आतंकवादी हमला होता.
आपल्या तंबूमध्ये आराम करत असणाऱ्या जवानांवर हा हल्ला झाला होता. यातील जवळपास सगळेच जवान हे गाढ झोपेत होते, अशा अवस्थेत निशस्त्र असताना आपल्या जवानांवर हा क्रूर हल्ला झाला होता. ज्यामध्ये भारतीय जवानांचा हकनाक बळी गेला होता.
या हल्ल्याला प्रतिउत्तर म्हणून..अवघ्या दहाच दिवसात, २९ सप्टेंबर २०१६ रोजी इंडियन आर्मी, आणि भारतीय गुप्तचर विभागाणे मिळून संयुक्तरित्या हि सर्जिकल स्ट्राईक नामक कारवाई पार पाडली होती. यामध्ये पाकिस्तान अधिकृत काश्मीर भागातील आतंकवादी गट असणाऱ्या ठिकाणांवर घातक कारवाई करण्यात आली होती. सर्जिकल स्ट्राईक हा शब्द उच्चारायला जरी सोपा वाटत असला, तरी प्रत्यक्षात ते कार्य खूपच कठीण होतं. हे सिनेमा पाहताना आपल्या ध्यानात येतं. अनधिकृतपणे परकीय मुलखात जाऊन, अंधाऱ्या रात्री तेथील सात आतंकवादी अड्डे उध्वस्त करून, जवळपास अडोतीस आतंकवाद्यांचा खातमा करून, आपले सगळे भारतीय जवान सुखरूपपणे मायदेशी परत आले होते. सिनेमात हा सगळा थरार पाहत असताना, आपण अगदी सुन्न होऊन जातो, अंगावर रोमांच उभे राहतात. तर मग त्यावेळी घटनास्थळी काय परिस्थिती असेल.? याची कल्पनाच केलेली बरी.
भारतीय जवान आणि अधिकारी काय आहेत, आणि कसे आहेत.?
हे समजून घेण्याकरिता प्रत्येक भारतीय नागरिकाने हा सिनेमा पाहणं अत्यंत गरजेचं आहे. भारतीय जवानावर तोंडसुख घेणाऱ्या नालायक व्यक्तींनी तर हा सिनेमा आवर्जून पहावा. त्यावेळी भारतीय जवानांविषयी घृणास्पद वक्तव्य करताना, त्या महाभागांची जीभ कशी झडली नसेल.? किंवा राजकीय खेळ्या खेळू पाहणाऱ्यांनी, सर्जिकल स्ट्राईक हा एक बनाव होता. असं वक्तव्य करताना, त्यांना काहीच वाटलं नसेल का.? असं वक्तव्य करणं म्हणजे, आपल्या सेनेचा आणि जवानांचा आपण अपमान करत आहोत असं सुद्धा त्यांना वाटलं नसेल का.?
थंडी गारठ्यात, आपण आपल्या घरात बायका पोरांच्या कुशीत आरामात झोप घेत असताना, सीमेवर भारतीय जवान डोळ्यात तेल घालून जागता पहारा देत असतात. याची थोडी तरी जान आपल्याला असायला हवी. भारतीय सेना आणि जवान यांच्या सन्माना प्रीत्यर्थ हा सिनेमा प्रत्येकाने नक्कीच पाहायला हवा. सरकार नेमकं काय करतंय, किंवा आपली सेना काय करतेय. हे येवढ्या मोठ्या पडद्यावर आजवर आपल्याला कधीही दाखवलं गेलं नव्हतं. ते सगळं काही, आपल्याला या सिनेमाच्या माध्यमातून पाहायला मिळेल.
विकी कौशलने खरोखर त्याचं सगळं कौशल्य या सिनेमात पणाला लावलं आहे. हा सिनेमा पाहताना, आपली छाती अभिमानाने फुलून येते. आपल्या जवानांचा पराक्रम पाहून उर भरून येतो, तर काही गंभीर प्रसंग पाहताना, नकळत आपल्या डोळ्याच्या कडा सुद्धा ओलावून जातात. सिनेमातील सर्वच कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. विकी कौशल, परेश रावल, यामी गौतम, मोहित रैना, रजत कपूर.. यांच्या प्रमुख भूमिका आहेत. योगेश सोमण डिट्टो पर्रीकर यांच्या सारखे दिसत आहेत. लेखक निर्देशक आदित्य धर, निर्माता रोनी स्क्रीववाला आणि शाश्वत सचदेव यांच्या संगीताने या सिनेमाला अगदी चारचांद लावले आहेत.
हा सिनेमा चुकुनही चुकवू नका मित्रांनो. काल पाहून आलोय, तरी सुद्धा आज सगळी फॅमिली घेऊन पुन्हा निघालोय..!!


Monday, 7 January 2019


माझी छोटी चारधाम यात्रा तर पूर्ण झाली..
आता.. मला मोठा चारधाम पूर्ण करायचा आहे. मोठा चारधाम म्हणजे.. बद्रीनाथ, द्वारकानाथ, जगन्नाथ आणि रामनाथ म्हणजेच रामेश्वरम.
मोठ्या चारधामांपैकी माझं पूर्वी बद्रीनाथ धाम झालं होतं. आणि हल्लीच.. ओडिशा भूमीतील, जगन्नाथ पुरी येथील जगन्नाथ धाम येथे मी माथा टेकून आलो. माझी अजून.. दोन धामांची यात्रा करणं राहून गेलं आहे. लवकरच तेथे जाण्याचा मला योग यावा, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना..
पुण्याहून सायंकाळी सात वाजताच्या कोणार्क एक्सप्रेसने आम्ही भुवनेश्वर येथे निघालो. दुसरा दिवस आणि रात्रभर प्रवास केल्यावर, पहाटे पाच वाजता आम्ही भुवनेश्वर येथे पोहोचलो. रेल्वेने हा चौतीस तासांचा असा बराच मोठा प्रवास आहे. तुम्ही विमानाने सुद्धा येथे जाऊ शकता. पुणे-कलकत्ता व्हाया भुवनेश्वर अशा विमानाची सुद्धा सोय आहे.
भुवनेश्वर ते ( जगन्नाथ ) पुरी हे साधारण साठ किलोमीटरचं अंतर आहे. सकाळच्या वेळी, बसने हे अंतर अगदी दीड तासात पूर्ण केलं जातं.
आमचं पूर्वनियोजित बुकिंग असल्याने, आम्ही पुरी येथील आमच्या रूमवर गेलो. रेल्वेत झोप पूर्ण झाली असल्याने, लगोलग आम्ही अंघोळी उरकल्या आणि सकाळी नऊ वाजता मंदिराच्या दिशेने चालते झालो. आमच्या लॉज पासून अगदी दहा मिनिटाच्या अंतरावर जगन्नाथाचं अतिशय देखणं असं मंदिर होतं.
मंदिरात जाण्यापूर्वी तुम्ही एखाद्या गाईडला नक्की घेऊन जा. म्हणजे तो गाईड आपल्याला सगळी माहिती तर पुरवतोच, आणि सोबतच छोट्या खाणाखुणा सहित मंदिर सुद्धा फिरवतो.
मंदिरात पारंपारिक वेश घालून जाण्याचं बंधन नाहीये. फक्त मंदिरात जाताना आपल्याला मोबाईल घेऊन जाता येत नाही. आणि इथे फक्त भारतीय व्यक्तींनाच प्रवेश दिला जातो. विदेशी नागरिकांना मंदिरात सोडलं जात नाही. इस्कॉन पंथाची स्थापना पुरी येथे झाली असल्याने, येथे हजारो विदेशी भक्त येत असतात. पण त्यांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही.
पुरी मध्ये इस्कॉनचं एक मोठं मंदिर सुद्धा आहे, इस्कॉनचे जवळपास सगळे अनुयायी त्या मंदिरातच उतरत असतात. तिथे त्यांची सगळी सोय केली जाते.
जगन्नाथाचं मंदिर फार पुरातन आणि भव्य असल्याने, या मंदिराच्या भेटीकरिता एक दिवस तुम्ही राखूनच ठेवा. सगळं मंदिर शांत आणि निवांतपणे पाहायला तीनेक तास तरी नक्कीच लागतात. सुरवातीला आपल्याला मंदिराच्या भटारखान्याच्या परिसारत नेलं जातं. असं म्हणतात, कि जगभरातील हा सर्वात मोठा आणि जुना भटारखाना आहे. आजही इथे चुलीवर बनवलेल्या प्रसादालाच महत्व दिलं जातं. भटारखाना बंधिस्त असल्याने आपल्याला तो बाहेरुनच पहावा लागतो. भटारखाना मोठा जरी असला, तरी येथील स्वच्छता मात्र माझ्या मनाला फार खटकली. मंदिरात स्वयपाक बनवणारे जवळपास सगळेच आचारी तोंडात पानाचा तोबरा भरून काम करत होते. तिथे आसपासच्या भागात असणाऱ्या नाल्यामध्ये ते पानाची पिंक थूकत होते. हे दृश्य माझ्या मनाला काही पटलं नाही.
मंदिरात सगळा प्रसाद हा मातीच्या भांड्यात बनवला जातो. त्याकरिता देवस्थानाने मातीचे भांडे बनवण्यासाठी हजारो कुंभार कामाला ठेवले आहेत. सोबतच आठशे ते हजार आचारी प्रसाद बनवण्यासाठी येथे चोवीस तास झटत असताना आपल्याला पाहायला मिळतात. मातीच्या हंडीमध्ये बनणारा प्रत्येक प्रसाद ( इथे रोजच्याला छप्पन भोग बनवले जातात. ) कावडीच्या सहाय्याने मंदिरात नेला जातो. आणि त्याचा जगन्नाथाला नैवेद्य दाखवूनच तो बाहेर आणला जातो. प्रसाद घेऊन नैवद्य दाखवायला जाणाऱ्या व्यक्तीच्या नाकाला आणि तोंडाला विशिष्ट प्रकारच्या मुसक्या बांधलेल्या असतात. जेणेकरून त्या व्यक्तीला सुद्धा त्या प्रसादाचा गंध येऊ नये, आणि त्यामुळे तो भोग उष्टा होऊ नये. हा त्यामागचा उद्देश आहे. आणि हि रीत अगदी पूर्वापार चालत आली आहे. त्यानंतर हा भोग, प्रसाद म्हणून विक्रीसाठी उपलब्ध केला जातो.
मंदिरामध्ये दैनंदिन नियमानुसार जगन्नाथाला वेगवेगळ्या प्रकारचा प्रसाद अर्पण केला जातो. हे प्रसाद दोन प्रकारचे असतात, देवाला अर्पण केलेल्या नैवेद्याला प्रसाद म्हंटलं जातं. महाप्रसाद हा एक तांत्रिक शब्द आहे. त्यास.. निर्माल्य, कैवल्य वगैरे म्हंटल जातं.
जगन्नाथास अर्पित वस्तूला, विसर्जना अगोदर नैवेद्य आणि विसर्जना नंतर निर्माल्य म्हंटल जातं. पण ज्यास मनोभावे खाल्लं जातं, त्यास कैवल्य म्हंटल जातं. कैवल्य आणि महाप्रसादात एकच फरक आहे. कैवल्य हा थोडाच खाल्ला जाणारा प्रसाद असतो. तर महाप्रसाद हा पोटभर खाल्ला जातो.
जगन्नाथ मंदिर फारच भव्य आणि आकर्षक आहे. पण मंदिराचा गाभारा म्हणावा इतका मोठा नाहीये. त्यामुळे मंदिरात दर्शनाला जाताना फारच दाटी होते. किंवा भावीकांना झुंडीने सोडल्याने आतमध्ये फार गर्दी होत असते. मंदिरामध्ये श्री बळभद्र, ( बलराम ) श्री जगन्नाथ, आणि श्री. सुभद्रा या बहिण भावाच्या तीन मुर्त्या स्थानापन्न आहेत.
त्या अवाढव्य मंदिरात गर्दीचा लोंढा पुढे सारत मी त्या महा मुर्त्यांपाशी पोहोचलो. मनोभावे जगन्नाथाला बलरामाला आणि माता सुभद्रेला प्रणाम केला. आणि गर्दीच्या महापुरात, पुढे लोटला जाऊन, मी आपोआप मंदिराच्या बाहेर येऊन पोहोचलो.
माझ्याकडे बराच वेळ असल्याने, एका तासात मी अगदी मनोभावे आणि मनभरून अशी तीन दर्शनं करून घेतली. आणि मनापासून तृप्त झालो.
मंदिराच्या गाभाऱ्यात सुद्धा सगळे पुजारी तोंडात पानाचा तोबरा भरूनच उभे होते. दान, दक्षिणेसाठी हातामध्ये आरतीची थाळी घेऊन प्रत्येकाची अगदी चढाओढ चालू होती. तर काही पुजारी, नारळाच्या पानापासून बनवलेल्या खोक्यातून खाजा नामक गोड प्रसाद विक्रीसाठी एकच गलका करत होते. तर काही पुजारी.. छोट्या-छोट्या माठामध्ये मंदिरात उपलब्ध झालेला मलई आणि लोण्याचा प्रसाद सुद्धा विकताना आढळत होते. अवीट गोडीचे हे दोन्ही प्रसाद मी खरेदी केले, आणि आप्तेष्टांसोबत त्याचा लाभ घेतला.
तेथून बाहेर पडत, आमच्या गाईडच्या मार्गदर्शनाखाली सगळं मंदिर माहितीसहित आम्ही फिरून घेतलं. आणि मंदिराच्या बाहेर पडलो..!
युट्युब सारख्या माध्यमातून, या मंदिराबाबत बर्याच अनाठायी अफवा पसरवल्या जात आहेत. अशाने बरीच धार्मिक मंडळी याठिकाणी जाण्यासाठी आकर्षित नक्की होतील. पण त्यामुळे त्यांचा परमेश्वरावरील विश्वास उडून जायला वेळ लागणार नाही. त्यामुळे, अशा अफवा वेळीच थांबवल्या गेल्या पाहिजेत. आणि मंदिराचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे.
१ ) मंदिरात पक्षी येत नाहीत, किंवा त्या आसपासच्या भागात ते भटकत नाही.
पण असं काहीएक नाहीये, त्या मंदिरात मी बरेच पारवे उडताना किंवा बसलेले पाहिले आहेत.

२ ) मंदिरावर असणारा ध्वज हवेच्या विरुद्ध दिशेने फडकत असतो..
हे सुद्धा अत्यंत चुकीचं विधान आहे. मंदिरावरील ध्वज हवेच्या दिशेनेच फिरत असतो. हे मी माझ्या डोळ्याने पाहून आलो आहे.

३ ) मंदिरावरील ध्वज लावणारा व्यक्ती मंदिराच्या कळसा पर्यंत उलटा चढत जातो.
हे विधान सुद्धा तद्दन खोटं आहे, युट्युबवर तुम्ही हा विडीयो पाहू शकता. ज्यात व्यक्ती सरळ चढताना दिसत आहे.

४ ) मंदिराच्या सिंह द्वारात उभे असताना समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येतो. आणि आतमध्ये गेल्यावर लाटांचा आवाज ऐकू येत नाही.
दिवसभर मंदिर परिसारत बराच गोंगाट चालू असतो, शिवाय मंदिरापासून समुद्र एक किलोमीटरभर दूर अंतरावर आहे. त्यामुळे किमान मला तरी दिवसा याची अनुभूती घेता आली नाही. त्याकरिता रात्री सगळी सामसूम झाल्यावर, वरील विषयाची अनुभूती घ्यावी लागेल, आणि कदाचित यात तथ्य सुद्धा असू शकेल.

( टीप :- इथे जाऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी, मंदिर परिसारत असणाऱ्या मिश्रा नामक पुजारी यांना गाईड म्हणून घेऊन जावा. ते सगळी माहिती अगदी योग्यप्रकारे सांगतात. )

बोलो जगन्नाथ भगवान कि जय..!!