Saturday, 12 November 2016

बऱ्याच वर्षांपूर्वीची घटना आहे..
जगद्विख्यात पहिलवान, मल्ल, वस्ताद मारुती माने आमच्या गावात कुस्तीच्या फडाच्या उदघाटन समारंभासाठी आले होते. त्यावेळी कुस्त्या पाहण्यासाठी मी स्टेजच्या जवळपासच्या जागेत बसलो होतो. एक मोठी आणि नामचीन कुस्ती लावण्यासाठी वस्ताद मैदानात आले. त्यावेळी, दिल्लीचा पहिलवान चांदीची गदा घेऊन गेला होता. मैदानातील त्या दोन तगड्या पहिलवानां पेक्षा. मारुती माने मला अगदी उजवे आणि भरदार वाटत होते.
बहुतेक त्यावेळी, त्यांचं साठीच्या पुढे वय असावं. पण, त्यांचा लालबुंद गोरापान चेहेरा, अर्धवट टक्कल, कानांच्या गाठी, कपाळावर छोटासा टिळा, ओठांच्यावर लहानशा मिशा, चौकोनी आणि बलदंड शरीरयष्टी आणि आणि पांढऱ्या पोशाखात गावारणी धोतराचा पेहेराव करून ते मैदानात आले होते.
कुस्ती, कबड्डी, खोखो या मैदानी खेळांचा मी सुरवातीपासून फार मोठा चाहता आहे. त्यामुळे, त्यावेळी अशा महान व्यक्तीला मला भेटायला मिळालं तर किती मस्त होईल. असा विचार, माझ्या मनात घोळत होता. पण.. ते कदापि शक्य नव्हतं. येवढ्या मोठ्या चाहत्यांच्या गराड्यात, मला त्यांच्या पर्यंत कोणी जाऊ देणार नव्हतं. काही नाही, तर त्यांना याची डोळा पाहून तरी मी खूप खुश झालो होतो. त्या दिवशीचा कुस्त्यांचा फड संपला. आणि मी सुद्धा माझ्या घरी निघून आलो.
त्यांनतर.. संध्याकाळी नऊच्या सुमारास, काही औषधं आणण्यासाठी मी मेडिकल स्टोअरमध्ये गेलो होतो. माझी औषधं मी घेतली. आणि दुकानाच्या पायऱ्या उतरून मी खाली येणार.
तोच.. तितक्यात एक स्कॉर्पियो गाडी तिथे येऊन थांबली. आणि, त्या गाडीतून ते बलदंड शरीर बाहेर पडलं. हो.. खुद्द मारुती मानेच होते ते. त्यांना इतक्या जवळून पाहून, मी तर खूप खुश झालो.
मी तसाच त्यांच्यापाशी गेलो, सर्वात पाहिलं मी काय काम केलं असेल, तर ते म्हणजे मी त्यांच्या पाया पडलो. त्यांना नमस्कार म्हणालो. आणि.. त्यांना विचारलं तुम्हाला काय हवं आहे..?
तर म्हणाले..
कार्यक्रमाचा फार शिन झाला आहे. माझं डोकं दुखतंय, म्हणून..
तर, त्यांना डोके दुखीवरची गोळी हवी होती. मी त्यांना विचारलं, तुम्हाला कोणती गोळी हवी आहे. तर म्हणाले, त्या मेडिकल वाल्यांना सांग ते देतील कोणती तरी..
मी तसाच माघारी फिरलो आणि त्या दुकानात गेलो, आणि विक्स एक्शन ५०० च्या डोकेदुखीवरील चार गोळ्या घेतल्या. आणि, त्यांना नेऊन दिल्या.
ते मला.. त्या गोळ्यांचे पैसे देऊ इच्छित होते. पण मी त्यांना हात जोडत, राहुद्या हो..
असं म्हणालो, तर ते मला म्हणाले..
काय करतोस. कुस्ती बिस्ती करायचास कि काय..!
मी.. मानेनेच त्यांना होकार दिला. आणि म्हणालो.. आवड म्हणून करायचो, पण नाही जमलं आपल्याला ते.
तर ते खळखळून हसले, आणि.. माझ्या पाटीवरती हात टाकत मला म्हणाले,
होतंय कि, सगळ्यासनी कुठं जमतंय ते..!
बस राव, मला अजून काय हवं होतं.. एवढी महान विभूती माझ्याशी दोन पाच मिनिटं मोकळेपणाने बोलली. प्रेमाने माझ्या पाठीवर हात टाकला, गाडीत बसून जाताना आनंदाने मला त्यांनी, येतो म्हणून हात केला. त्याक्षणी, मला तर अगदी मी स्वतः हिंदकेसरी झाल्याचाच भास झाला होता.
आपल्या जीवनात, हेच फार मोठे सोनेरी क्षण असतात. आणि, हीच आपली खरी मिळकत असते..!


#एक_पहाट_रायगडावर
""""""""""""""""""""""""""""""""""
सर्व शिवप्रेमींनी आणि दुर्ग भ्रमंती करणाऱ्या हौशी आणि शिवभक्त मंडळींनी, हा लेख अवश्य वाचा. जमल्यास शेअर करा. आणि, हा शिवसंदेश शक्य तितका दूरवर पोहोचवा.
काही दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमी मित्रांनी, गेल्या चार वर्षांपासून दिवाळीतील लक्ष्मी पूजनाची पहिली पहाट आणि दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाचा पहिला दिवा छत्रपती शिवरायांची राजधानी आणि अखंड भारत वर्षाची शुरभूमी रायगडावर उजळविण्याचा. आणि त्याच ठिकाणी दिवाळी साजरी करण्याची नवीन संकल्पना जोपासली. हे महान कार्य करण्याचं त्याचं हे सलग पाचवं वर्ष होतं.
त्या सोहळ्याचा, प्रत्यक्ष साक्षीदार होण्यासाठी त्याठिकाणी आम्हाला यावर्षी आमंत्रित केलं गेलं होतं. या महान सोहळ्यासाठी, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले बरेच शिभक्त याठिकाणी एकदिलाने आणि एकोप्याने जमा झाले होते. आणि शिव कार्यासाठी झटत देखील होते. अशा सर्व शिव भक्तांना नमन करून, माझं पुढील लेखनकार्य मी तुमच्यासमोर प्रस्तुत करतो..
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, याच रायगडावर दिवाळीची किती मोठी आरास आणि धूमधाम असेल. त्या गोष्टीची आपण कल्पना देखील करू शकत नाही.
नगारखान्यात चौघडे आणि नगारे गरजत असतील. तोफांच्या शेकडो सलामीने दिवाळीचा रंगीत बार उडत असेल. गडावरील बाजारपेठेत एक नवीनच नवचैतन्य भारलं गेलं असेल. महिला, सुवासिनी दिवाळ सणाच्या लगबगीने अगदी मोहरून जात असाव्यात. पहिल्या अंघोळीच्या उटणे मिश्रित स्नानाचा सुगंध गडावरील घरोघरी दरवळत असावा. गडावरील प्रत्येक घरात मिठाया आणि मिष्टान्न भोजनाच्या पंगती झडत असाव्यात.
हो.. हे सर्व ठीक आहे..!
पण काळाच्या ओघात, गडावरील या सर्व गोष्टी पडद्याआड गेल्या. कालमानुसार, महाराजांच्या राजधानीवर दिवाळसण साजरा होणं बंद झालं. छत्रपतींच्या पुण्याईमुळे, आणि.. या गड किल्ल्यांच्या आशीर्वादाने. आज, प्रत्येक भारतीयाच्या घरामध्ये दिवाळीचा प्रखर दिवा तेवत आहे. बंगला, वाडा, वस्त्यावर मोठमोठे आकाश कंदील झुलत आहेत. त्या थोर आठवणी, आपण सगळे जन एकाएकी कशा काय विसरलो..?
ज्या गडावर.. महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली, ज्याठिकाणी स्वराज्याची खलबतं आखली गेली. त्या गड दुर्गांना आपण कसे काय विसरलो..?
याची देहा पाहिलेले शेकडो आनंद सोहळे आपल्या मनात दाबून, हा उभा रायगड गेली शेकोड वर्ष या सोनेरी दिवसाच्या प्रतीक्षेत उभा होता.
" कोणीतरी यावं, आणि माझं गतवैभव मला परत मिळवून द्यावं..! "
आणि.. त्या गड किल्ल्याची हि प्रेमभरी आर्तहाक काही शिवप्रेमींना ऐकू गेली. आणि, पुन्हा एकदा त्याच दिमाखात गडावर जळजळीत मशाली पेटू लागल्या. लक्ष्मी पूजनाचे दीप तेऊ लागले.
जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा आसमंतात घुमू लागल्या. आणि दिवाळीचा पहिला दिवा सुद्धा रायगडावर अगदी त्याच गतवैभवाची आठवण देऊन तेऊ लागला.
Rahul Naik भाई, आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब योगेश राजुल रसिकलाल शहा भाई आणि आणि त्यांचा शिवप्रेमी मुलगा आणि मी स्वतः. या सोहळ्यासाठी, लक्ष्मी पूजनाच्या आदल्या दिवशी पुण्याहून रायगडाकडे कूच केली.
दुपारी तीन वाजता, आम्ही पुण्याहून या पुण्यकर्माकरिता प्रस्थान ठेवलं. ते रात्री सव्वा आठच्या सुमारास आम्ही रायगडाच्या पायथ्याला येऊन पोहोचलो.
रायगडावर बऱ्याच वर्षांनी गेलो असल्याने, आम्ही ज्या ठिकाणी पायरी किंवा पायी रस्ता आहे, त्याठिकाणी पोहोचलो. सगळीकडे सामसूम होती, आजूबाजूला पाच सहा लहान मोठ्या गाड्या पार्क केल्या होत्या. अमावस्येची किर्र काळोखी रात्र, आणि.. समोरच, आम्हाला दोन शिवभक्त दिसले.
आम्ही त्यांना विचारलं. रोपवेचा मार्ग कोणत्या दिशेने आहे..?
तर ते दोघे मित्र आम्हाला म्हणाले. भाऊ, रोपवे सात वाजताच बंद झाला आहे. त्यामुळे, पर्याय नसल्याने आम्ही पायी जाण्यासाठी या मार्गाकडे आलो आहोत.
आम्हाला तर अशी खबर मिळाली होती. कि, उद्या गडावर लक्ष्मीपूजनाचा भव्यदिव्य कार्यक्रम असल्यामुळे. आजच्या दिवशी, रात्री बारा वाजेपर्यंत रोपवे चालू असणार आहे. पण ती माहिती काही खरी नव्हती. फार मोठा पेच आमच्यासमोर, आ वासून बसला होता..
इतक्या लांबून हा सोहळा पाहायला यायचं.. आणि नाऊमेद होऊन परत जायचं..?
पण.. आमचा राहुल भाई हार मानणारा व्यक्ती नाही. आम्ही पुन्हा एकदा आमच्या गाडीला स्टार्टर मारला. आणि ज्याठिकाणी गडावर जाण्याचा रोपवे आहे. आम्ही तिथवर जाऊन पोहोचलो. तिथे चौकशी केली असता, रोपवे आजच्या दिवशी डागडुजीसाठी बंद केली गेली होती. आम्ही तेथील व्यवस्थापकांना भेटलो. त्यांना जादा पैशाचे आमिष सुद्धा दाखवले. पण ती लोकं सुद्धा तेवढीच प्रामाणिक निघाली. म्हणाली.. आम्ही जे भाडं आहे ते घेतो, आम्हाला अतिरिक्त पैसे नको. आणि हो.. तुम्ही लाख रुपये दिले तरी, हा रोपवे काही सुरु होणार नाही. रात्रीची वेळ आहे, नव्व्यानव टक्के काही बिघाड होणार नाही. पण शेवटी, एक टक्का राखीव ठेवावा लागतो हो. काय करता..
पैसा मोठा नाही, पण..आम्ही कोणाच्याही जीवाशी खेळ करत नाही..!
त्यांच्या बोलण्याला मी मनोमन सलाम केला, पण आम्हाला गडावर जायचं होतं ना..!
तर.. शेवटी ते म्हणाले..
दुरुस्तीचं काम चालू आहे, ऑपरेटर लोकांनी सुद्धा सुट्टी केली आहे. त्यामुळे, रोपवे उद्या सकाळी आठ वाजता सुरु होईल..!
आमचा.. दुर्ग पूजनाचा सोहळा पहाटे तीन वाजता सुरु होणार होता. त्यामुळे, सकाळीं आठ वाजता गडावर जाण्यात काहीच हाशील नव्हतं. फारफारतर गड पाहता आला असता. पण हा सोहळा कदापि पाहता आला नसता.
तितक्यात, तिथे आणखीन एक गृहस्थ आले, त्यांच्या सोबत त्यांची पत्नी आणि सहा महिन्याचा एक गोडुला चिरंजीव सुद्धा होता. त्यांनी मला विचारलं, तुम्ही गडावर जाणार आहात का..?
मी त्यांना हो म्हणालो..
पण.. रोपवे काही सुरु होणार नाहीये, त्यामुळे काय करावं ते आम्हाला समजत नाहीये.
तर.. मला ते म्हणाले,
आम्ही सुद्धा, याच गोष्टीला वैतागून आत्ता गडावर चालत निघालो होतो. पण थोडं अंतर गेल्यावर समजलं ते काही शक्य नाही. सोबत आमचा लहान मुलगा आहे. मी एकटा असतो तर, हा गड मी कसाही सर केला असता.
त्यामुळे.. आम्ही पुन्हा इथे निघून आलो आहोत.
मी सहजच त्यांना विचारलं, तुम्ही कोण आहात..? तर ते म्हणाले..
मी, उद्याच्या कार्यक्रमाचा प्रमुख अतिथी आहे..!
तसे तर..आम्ही सुद्धा, उद्याच्या कार्यक्रमाचे गेस्ट होतो. पण, हे अतिथी नेमके कोण असावेत..?
त्याचा, आम्हाला काही अंदाज बांधता आला नाही. आणि, त्यांनी सुद्धा त्याचं काही खास विश्लेषण आमच्यापाशी केलं नाही.
शेवटी, राहुल भाईंनी जबरदस्त फोनाफोनी केली. डायरेक्ट रायगडच्या आमदारांच्या पीएंना फोन करून विनंती केली. आणि, लाडिक दबावतंत्राचा वापर करत. त्या व्यक्तीला रोपवे सुरु करायला त्यांनी भाग पाडायचा प्रयत्न केला. पण, तो व्यक्ती.. काही केल्या रोपवे सुरु करायला तयारच होईना. आम्ही मात्र, त्याच्याशी अगदी सौजन्याने वागत होतो.
दबावतंत्र म्हणजे, हाय लेवलने त्यांना काही फोन येत होते. शेवटी वैतागून ते म्हणाले..
एक काम करा.. तुम्ही जेवण करून घ्या. माझं काम उरकलं तर मी तुम्हाला गडावर सोडायचा प्रयत्न करेन. त्यानंतर, आम्हाला भेटलेल्या त्या प्रमुख पाहुण्यांना आमच्या सोबत घेऊन. आम्ही एका घरगुती खानावळीत जेवायला गेलो.
अर्ध्या तासात, मस्तपैकी.. पिठलं, तांदळाची गरमागरम भाकरी, बटाट्याची रस्सा भाजी, इंद्रायणी तांदळाचा सुगंधित भात, पापड, कांदा, लिंबू..
अहाहा.. क्या कहेने, आम्ही सगळ्यांनी त्या साग्रसंगीत भोजनावर आडवा हात मारला. आमचं जेवण होतं न होतंच, तोवर आम्हाला.. रोपवेच्या व्यवस्थापकाचा फोन आला.
साहेब लवकर या, तुम्हाला गडावर सोडायची व्यवस्था केली आहे. राहुल भाईंच्या फोनाफोनीने भलताच पराक्रम केला होता. आम्ही ताबडतोब हातावर पाणी टाकलं. आणि, त्या रोपवेच्या ठिकाणी पोहोचलो. त्यांनी सुद्धा ताबडतोब आमचं रीतसर तिकीट बनवलं.
आणि, घरघर आवाज करत झटके देत तो रोपवे सुरु झाला. भयाण काळोख्या रात्री, ह्या दोन हवाई डोल्या झुलत झुलत गडावर निघाल्या होत्या. रात्री अपरात्री या प्रवासात आम्हाला अपघाताची कोणतीच भीती नव्हती. कारण छत्रपतींचे आशीर्वाद आमच्या पाठीशी होते. परंतु किर्रर्र अंधारात, कोणते तरी रातकिडे मोठ्या संखेने विजेच्या प्रकाशझोतात आमच्या चेहऱ्यावर येऊन धडकत होते. त्यांना कसबसं चुकवण्यात आम्ही यशस्वी झालो. आणि गडावर पोहोचायला अगदी काही अंतर उरलं असताना. तो रोपवे अचानकपणे बंद झाला. नाही म्हणता, त्यावेळी माझ्या सुद्धा काळजाचा ठोका चुकला होता. पण क्षणार्धातच तो रोपवे पुन्हा सुरु झाला. आणि.. अवघ्या चारच मिनिटात, आम्ही रायगडावर सुखरूपपणे दाखल झालो. हि चारच मिनिटाची सफर, फारच थरारक अशी होती.
रायगडावर पोहोचल्यावर, आमच्या दिमतीला बरेच शिवभक्त तेथे हजर होते. त्या ट्रोली मधून आम्ही उतरल्या बरोबर, काही शिवभक्त आमच्याकडे आले, आणि आम्हाला म्हणाले..
तुमच्या ब्यागा आमच्याकडे द्या, आम्ही त्या वरपर्यंत नेऊ.
हा नेमका काय प्रकार आहे.?
ते आम्हाला समजायला मार्ग नव्हता. त्यामुळे, आम्ही आमचा बोजा त्या मुलांकडे दिला नाही. आणि, त्या ताफ्यात फक्त मुलंच नव्हती. तर दोनेक मुली सुद्धा होत्या. येवढ्या भयाण अंधाऱ्या रात्री आम्हाला घेण्यासाठी आलेल्या निधड्या छातीच्या त्या शिवप्रेमींच्या चरणी मी तर अगदी नतमस्तक झालो. गडावर आमची एवढी सरबराई का चालू आहे..? हा नेमका काय प्रकार आहे..? ते आम्हाला समजत नव्हतं.
त्या शिवप्रेमींना आम्ही सांगत होतो. आमचं रायगडावर एम.टी.डी.सी. हॉटेलमध्ये मुक्कामाचं बुकिंग आहे. तुम्ही आम्हाला तिथवर पोहोचविण्यासाठी मदत करा.
तर, ते शिवभक्त म्हणाले..हो, आम्ही तुम्हाला तीकडेच घेऊन निघालो आहोत..!
अमावास्येच्या काळ्याभोर रात्रीत, गडद चांदण्याच्या सहवासात रायगडाच्या पावन भूमीवर हळुवार पावलाने आम्ही पुढे मार्गक्रमण करत होतो.
विजेरीच्या प्रखर प्रकाशात, त्या अमावास्येच्या अंधाऱ्या रात्री ते शिवभक्त आम्हाला.. गडाची इत्यंभूत माहिती देत होते. इथे बाजारपेठ आहे, इथे सदर आहे..
जसा काही, त्यांचा याठिकाणीच कायमचा मुक्कामच असावा. इतका तोंडपाठ रस्ता, आणि काय ते अद्भुत असं शिवबाचं वारं त्यांच्या अंगी खेळत होतं. ते त्यांच्या जिवालाच माहिती.
छत्रपतींच्या राजदरबारात, चहूकडे रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या गेल्या होत्या. झेंडूच्या फुलांनी सगळा परिसर पिवळा धम्मक असा सजवला गेला होता. सजावट काम करून थकलेले काही शिवभक्त गडाच्या पावन भूमीवर अगदी निवांत पहुडले होते. त्यांना विंचू काट्याची भय ना चिंता. हवाला फक्त, महाराजांवर असणारं निर्मळ आणि निर्व्याज्य प्रेम.
मजल दरमजल करत.. एकदाचे आम्ही, त्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. जिथे, बरेच शिवभक्त गडावरील सजावटीची कामं आटोपून पोटपूजा करायला बसले होते.
त्याठिकाणी.. जवळपास शे दीडशे शिवप्रेमी जातीने हजर होते. त्या भल्यामोठ्या गर्दीमध्ये, मुलांबरोबरच शिवभक्त मुलींचा सुद्धा बराच मोठा भरणा होता.
हे सर्व कशासाठी.? तर.. फक्त माझ्या शिवबासाठी. या हिंदुस्थानाच्या धर्म रक्षकासाठी.
आणि, गडकोट किल्ल्यांसाठी.
प्रत्यक्ष त्या ठिकाणी पोहोचल्यावर, आमचे मित्र अमोल तावरे भाऊ आम्हाला तिथे भेटले. त्यांनी त्याठिकाणी आमचं यथोचित स्वागत केलं. तिथे असणाऱ्या एका मोठ्या खोलीमध्ये काही राजबिंडे व्यक्ती बसले होते. आम्ही सुद्धा त्या खोलीमध्ये प्रवेशित झालो. पण तेथील डामडौल पाहता, आम्ही नक्कीच कुठेतरी अन्य ठिकाणी भरकटलो आहोत याची आम्हाला खात्री झाली.
त्या जिल्हा परिषद नामक खोलीमध्ये..
चेहेऱ्यावर प्रचंड तेज असलेले काही महान विभूती बसले होते. आणि प्रत्यक्षात, आमच्यासोबत रोपवे मधून जे कोणी उभयंता आले होते. ते सुद्धा एक महान विभूती होते. इतकावेळ आमच्या सहवासात जे कोणी होते, ते चक्क Karansinh Naik-Baandal Itbar Rao सरकार होते.
हे आम्हाला, तिथे पोहोचल्यावर समजलं.
पण आता हे सगळं विचारायला आमच्याकडे वेळ नव्हता. अमोल भाऊला आम्ही सांगितलं. आम्ही जेवण करून आलो आहोत. आणि आम्हाला एम.टी.डी.सी. मध्ये मुक्कामाला जायचं आहे. त्यावेळी ते म्हणाले.. अहो रोपवे मधून उतरल्यावर लगेचच ते हॉटेल लागतं..!
आता मात्र आमची फार मोठी पंचाईत झाली होती,
रात्रीचे बारा वाजले होते. सगळे शिवप्रेमी मावळे थकले होते. आणि आम्हाला, त्यांना अतिरिक्त त्रास सुद्धा द्यायचा नव्हता. शेवटी, त्या किर्रर्र अंधाऱ्या रात्री आम्ही आमच्या आधुनिक मोबाईलच्या मशाली पेटवल्या. आणि त्या प्रसन्न अंधाऱ्या रात्री, शिव चरणाने पावन झालेल्या त्या पवित्र भूमीवरून कोणाचीही साथसंगत न घेता, जाणत्या राजाचा मनाला हवाला देत रायगडावरून पुन्हा एकदा आमच्या हॉटेलच्या दिशेने परतीच्या प्रवासाला सुरवात केली.
वाटेमध्ये, बरेच शिवप्रेमी अगदी उघड्यावर पहुडले होते. आश्चर्य म्हणजे, त्यात काही तरुणी सुद्धा होत्या. जे महाराजांना पूजतात, त्यांना महाराज रक्षण पुरवत असतात. हे मला त्याठिकाणी मनोमन आणि तंतोतंत पटलं. मजल दरमजल करत कसेतरी आम्ही आमच्या मुक्काम स्थळी पोहोचलो. थोडसं फ्रेश होऊन आम्ही अंथरुणात अंग टाकलं.
आणि.. आमचा डोळा लागतो न लागतो तोच, पहाटे अडीच चा ठोका पडला. तसे, आम्ही पुन्हा एकदा सगळी आवराआवर आणि आंघोळ करून गडावर दाखल झालो. तोवर, काही मावळे आणि त्याच्यासोबत असणाऱ्या महान विभूती गडावरील जगदीश्वर मंदिराच्या दिशेने निघून गेले होते. भल्या पहाटे, छत्रपतींच्या शुभहस्ते अभिषेक झालेल्या जगदीश्वराच्या पिंडीवर. आज, शिवरायांच्या सरदार मंडळीचे वंशज अभिषेक करत होते. हा दुग्ध शर्करा योग याची डोळा आम्हाला पाहता आला.
त्या शूर सरदारांच्या वंशजांमध्ये..
सरदार रघूजीराजे आंग्रे, सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज. सरदार सत्यशीलराजे दाभाडे, सरसेनापती खंडेराव दाभाडे यांचे वंशज. सरदार संग्रामराजे जेधे देशमुख, सरदार कान्होजी नाईक जेधे देशमुख यांचे वंशज. सरदार तुषारराजे डोहर धुमाळ देशमुख, सरदार बाबाजी आढळराव डोहर धुमाळ देशमुख यांचे वंशज. आणि..सरदार करणराजे नाईक बांदल देशमुख, सरदार कृष्णाजीराजे नाईक बांदल देशमुख यांचे वंशज. त्याठिकाणी उपस्थित होते.
महाराजांनी त्यावेळी सरदार, सरसेनापती अशा जहागिऱ्या यांच्या पूर्वजांना बहाल केल्या होत्या. आणि, या महाराष्ट्राची रयत आजही त्यांच्या वंशजांना तितकाच मान सन्मान देत आहेत. हे पाहून माझा उर अभिमानाने अगदी भरून आला. धन्य तो राजा आणि धन्य त्याची प्रजा.
शिवअभिषेक उरकला.. आणि, सर्व जनता महाराजांच्या समाधीपाशी जमा झाली. महाराजांच्या समाधीपाशी, लक्ष्मीपूजनाचे दिवे लावले गेले. आणि, शेकडो मशाली सुद्धा पेटवण्यात आल्या.
अहाहा.. काय तो नयनरम्य सोहळा, छत्रपतींच्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला होता. मशालीच्या ज्वालेने सर्व आसमंत उजळून निघाला होता. त्या पवित्र ठिकाणी जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ, आणि छत्रपती संभाजी महाराज कि जय च्या घोषणा आसमंतात घुमू लागल्या. त्यांनतर, शिवस्तूथीपर एक महान रचना गाऊन हा सगळा लवाजमा गडावरील शिरकाई देवी मंदिराच्या दिशेने चालता झाला. शेकडो मशाली घेऊन निघालेला शिवप्रेमींचा ताफा. सोबतच, नाकात नथनी आणि नऊवारी साड्या नेसलेल्या सुंदर सुंदर युवती. एकुणात हा फारच मनमोहक असा नजारा होता. अगदी महराजांचा सहवास आणि त्यांच्या त्याच जमान्यात असल्याचा साक्षात्कार मला त्याठिकाणी घेता येत होता.
याचं सगळं श्रेय.. अर्थातच, महाराष्ट्राची दुर्ग संपत्तीचे प्रमुख मार्गदर्शक
श्री. Milind Madhusudan Kshirsagar अध्यक्ष दुर्गसंवर्धक महासंघ, आणि शिवाजी ट्रेल, महाराष्ट्र. आणि, मित्र परिवार यांना द्यावा लागेल. आणि खऱ्या अर्थाने हिच मित्रमंडळी त्याचे खऱ्या अर्थाने हकदार आहेत.
शिरकाई देवीच्या मंदिरात देवीची आरती घेण्यात आली. त्याठिकाणी दिवे प्रज्वलित करण्यात आले. आणि त्यानंतर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. त्याठिकाणी एका शिवप्रेमी मुलीने, शिवरायांचा प्रेरणामंत्र अशा काही स्वरात म्हंटला. कि ते ऐकताच माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. माझं रक्त सळसळू लागलं. सलाम आहे अशा निधड्या छातीच्या कणखर मुलींना.
त्यानंतर सगळा लवाजमा नगारखान्याच्या कमानीतून महाराजांच्या राजदरबारात दाखल झाला. ज्याठिकाणी, महाराजांचा मेघडंबरी असलेला पुतळा दिमाखदार पद्धतीने बसवण्यात आला आहे. त्याठिकाणी, सन्माननीय वंशजांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. आणि सोबतच.. दीप प्रज्वलन सुद्धा करण्यात आलं.
त्याठिकाणी.. या मोहिमेचे प्रमुख विश्वस्थ, आणि सहकार्यांची श्रद्धां सुमनं आम्हाला ऐकायला मिळाली. त्याचबरोबर, सरदारांच्या सगळ्या वंशजांची मधुरवाणी आम्हाला त्याठिकाणी ऐकायला मिळाली. त्यांनी केलेलं मार्गदर्शन अगदी भरगोस आणि अनमोल असं होतं.
रयतेला संबोधित करताना.. खास करून, आंग्रे सरदार आणि बांदल सरदारांनी अगदी छान आणि इत्यंभूत इतिहास आणि त्याचं वर्णन त्याठिकाणी कथन केलं.
त्याठिकाणी.. पुन्हा एकवार शिवगर्जना मर्दाना तालीम, ठाणे. येथील दोन शिव भक्तांनी दिलेल्या घोषणा आणि प्रेरणामंत्र माझ्या कानात अजूनही गुंजारव करत आहेत. त्यानंतर, शिव भजनी मंडळ शिवरायांची अखंड अशी पराक्रम गीतं दिवस उजडे पर्यंत गात होती.
आणि त्यानंतर.. काही वेळातच सूर्याची कोवळी उन्हं राजधानी रायगडावर पसरू लागली. आणि, त्याठिकाणी.. या नयनरम्य सोहळ्याची सांगता करण्यात आली.
मित्रहो.. हा लेखप्रपंच करण्यामागचा माझा एकच उद्देश आहे. कि असे विविध प्रकारचे उपक्रम राबवून गडदुर्ग संपती जतन करता यावी. आणि त्याचा दिमाख पूर्वी जसा होता तसाच राखता आणि जोपासता यावा. आज, पाच व्यक्तींनी सुरु केलेल्या या उपक्रमाला भविष्यात शेकडो नाही तर हजारो शिवभक्तांनी एकत्र येऊन धुमधडाक्यात हा सोहळा दरवर्षी पार पाडवा. एवढी एकंच इच्छा इथे व्यक्त करतो. असा हा नयनरम्य सोहळा, मला याची देहा याची डोळा पहायचं भाग्य लाभलं. त्याबद्धल, मी राहुल भाईंचे याठिकाणी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आणि, बांदल सरदारांची आम्हाला रायगडावरून पुण्यात येईपर्यंत मिळालेली साथसंगत या हयातीत तरी मी कदापि विसरू शकत नाही.
धन्यवाद मित्रहो, आणि..माझ्या साध्या भोळ्या लेखणीला मी इथे पूर्णविराम देतो..
जय जिजाऊ, जय शिवराय.. जय भवानी, जय शंभूराय..!
सगळ्याच गोष्टी,
आपल्याला आई बाप शिकवत नसतात. काही चांगल्या किंवा वाईट गोष्टी, या प्रत्येक जन स्वतः आत्मसात करत असतो किंवा शिकत असतो. आणि, त्या सगळ्याला तो स्वतःच जबाबदार असतो.
त्यामुळे.. कोणालाही दोष देत असताना.
कृपा करून,
त्यांच्या आई वडिलांचा मुळीच उद्धार करू नका. 
कि.. हे सगळं काही, त्याच्या किंवा तिच्या आई बापाने त्याला किंवा तिला शिकवलं असेल.
मनुष्य स्वतःच, काही " गुण " उपजत आणि " अंगी " घेऊन आलेला असतो.
जन्मदात्याचा किंवा जन्मदात्रीचा, त्यात काहीएक दोष नसतो..!

काल सकाळी, कामावर जात असताना..
वाटेमध्ये एका ठिकाणी, पोलिसांचा फार मोठा ताफा, एका सिग्नलवर..
थांबलेल्या बाईक स्वारांची कसून तपासणी करत होता, बरेच.. दुख्खी कष्टी बाईकस्वार, छोट्या मोठ्या चुकांसाठी त्यांच्याकडे आर्जव विनंत्या करत होते. पण, त्यांच्या पाषाण हृदयी काळजाला काही पाझर फुटत नव्हता.
सकाळची वेळ, प्रत्येकाला कामावर जायची घाई. त्यात आपला देश भला मागास, कोणती सुखसुविधा नाही. आणि, त्यात हा मानसिक त्रास..!
त्यावेळी..मला वाटलं,
आता मला सुद्धा ते पोलीस पकडतील कि काय.? पण मी सगळ्या बाजूने अपडेट असल्याने अशा भित्यांना मी बिलकुल भिक घालत नसतो.
आणि तितक्यात, भिरभिरत्या नजरेच्या कोवळ्या वयाच्या त्या पोलिसाने माझ्या शेजारी उभ्या असलेल्या एका वयोवृद्ध व्यक्तीला पकडलं. आणि, तो त्याची कसून चौकशी करू लागणार.
तितक्यात.. त्या वृद्ध गृहस्थाने रागारागाने त्यांची कायनेटिक होंडा स्टेन्डवर लावली.
आता... हा नवा सीन पाहायला मी फारच उत्सुक झालो होतो. त्यामुळे, माझी गाडी त्याच जागेवर थोडी मागील बाजूस उभी करून मी पुढील गंमत पाहू लागलो.
बेगाने शादिमे अब्दुल्ला दिवाना.. हाहाहाहा,
त्या अपराधी ( त्या कोवळ्या पोलिसाने ठरवलेल्या ) बाबांनी, डीकीमधून एक-एक महत्वाची कागदपत्रे बाहेर काढत त्या पोऱ्याशा पोलिसाच्या हातात दिले..
हे घ्या..
हे माझं लायसन, हे आरसी, हे टीसी, हि पीयूसी, हे गाडीचं पंधरा वर्षानंतर करावं लागतं ते न्यू रजिस्ट्रेशन.
आणखी काही हवं आहे का तुम्हाला..?
आणि हो.. माझ्या गाडीची हेड लाईट चालू आहे, इंडिकेटर चालू आहे, हॉर्न चालू आहे. आणि, मी हेल्मेट सुद्धा घातलं आहे..!
गाडीचा नंबर मराठी मध्ये लिहिला आहे. त्याची काही तक्रार असेल तर सांगा..!
एका दमातच, त्या म्हाताऱ्याने त्या पोलिसाला अगदी जाम करून टाकला होता.
शेवटी रागे भरून तो म्हातारा त्या पोलिसाला म्हणाला..
अहो.. कोणाला पकडावं, याची तरी तुम्हाला समज आहे का..? तुमच्या ओठावर अजून मिसरूड सुद्धा फुटलं नाहीये, कोणत्याच गोष्टीची तुम्हाला जाण नाहीये, काही नाही तर किमान जरा माणसांचं वय तरी पाहत जा. विनाकारण लोकांना किती मनस्ताप देताल..?
शरमेने, तो तगडा तरुण पोलीस त्या व्यक्तीला म्हणाला.
काका.. राग माणू नका, तुम्हाला ओळखण्यात माझी चुक झाली आहे.. मला माफ करा, आणि या आता तुम्ही.
त्या पोलिसाच्या या वक्तव्यावर तो म्हातारा अजून भडकला. आणि, म्हणाला..
या.. काय..!
हां, तुम्ही कोणाशी बोलताय हे..?
असं म्हणून, त्या म्हाताऱ्याने त्याच्या जुनाट कायनेटिक होंडाला किक मारून तिला स्टार्ट केली.
आणि त्या पोलिसाला तो म्हणाला..
फार जुनी गाडी आहे माझी, बघा.. ती कसा भकाभका धूर मारत आहे. पण, या गंभीर कारणामुळे तुम्ही माझं काहीएक वाकडं करू शकणार नाही. कारण, माझ्याकडे " पीयूसी " सर्टिफिकेट आहे ना.
चला..माझ्यासोबत तुम्ही येताय का, त्या पीयूसी सेंटरमध्ये छापा मारायला..? ज्याने कोणतीही तपासणी न करता, धूर तापासनीचं हे नकली सर्टिफिकेट मला दिलं आहे..!
अहो, मी तुम्हाला एक मोफतचा सल्ला देतो, इथे उभं राहून लोकांच्या वेळेची आणि कामाची खोटी
करण्यापेक्षा, अशी काही विशिष्ट प्रकारची विधायक कामं करा. ज्यामुळे, लोकं सलाम ठोकतील तुम्हाला.
त्या म्हातार बाबांनी सगळा सदाशिव पेठी दणका त्या पोलिसाला दाखवला होता.
वाह.. त्या बाबांवर मी तर जाम खुश झालो होतो.
त्यामुळे, बाईकवर बसूनच मी मनसोक्त अशा दोनचार टाळ्या वाजवल्या. आणि, माझ्या जुन्यापुराण्या बाईक वरून खाली उतरून. त्या बाबांना मी प्रेमपूर्वक नमस्कार केला.
आणि.. छद्मी हास्याने त्या पोलिसाकडे एक विचित्र कटाक्ष टाकत..
मी, माझ्या गाडीचा पहिला गियर टाकला, आणि पुढे निघून गेलो..!

२५ वर्षांपूर्वीची..
एक, दिवाळखोर दिवाळी. आणि, दैवी चमत्कार..!
बरीच लोकं म्हणतात.. या जगात देव वगैरे काही नाहीये. या सगळ्या दैवी संकल्पना म्हणजे निव्वळ थोतांड आहे. पण मित्रांनो, या भारत वर्षातील म्हणा, किंवा.. जगद्विख्यात म्हणा. एक असे महान व्यक्ती या पृथ्वी तलावर होऊन गेले आहेत. जे कि, सुरवातीला नास्तिक होते. आणि, काही काळानंतर ते पुन्हा आस्तिक झाले होते. आणि, त्यांच्या हयातीत त्यांनी, त्यांच्या आस्तिक होण्याची बरीच कारणं सुद्धा लिहून ठेवली आहेत. ती आजवर, आपल्या सर्वांना मार्गदर्शक ठरत आहेत. आणि, ठरत राहतील..!
अशा, श्री. स्वामी विवेकानंद.. यांना सविनय दंडवत घालून, मी माझं लिखाण पुढे चालू ठेवतो.
तर मित्रहो..
हि, एकोणीसशे नव्वद सालातील मी स्वतः अनुभवलेली एक सत्यघटना आहे..!
मी काहीतरी रोजगार करावा, म्हणून..माझ्या वडिलांनी आमच्या गावामध्ये एका नवीन इमारतीच्या खाली असणारं एक दुकान खरेदी केलं. त्यांचा विषय हाच, कि पुढे चालून आपला एखादा मुलगा या निमित्ताने नक्क्कीच एक चांगला व्यवसायिक होईल.
पण, माझ्या वडिलांनी घेतलेलं ते दुकान, मुख्य बाजारपेठेपासून बरंच आतील बाजूस होतं.
( आणि, आजही ते दुकान माझ्या मालकीचं आहे. ) पण त्याला पर्याय नव्हता. दुकानाचा ताबा मिळाल्यावर, त्या ठिकाणी आम्ही सर्व कुटुंबीयांनी मिळून, त्या नवीन वास्तूमध्ये एक कटलरी दुकान सुरु केलं.
आणि, त्याची संपूर्ण धुरा माझ्या हाती दिली गेली. मुख्य चौकात असणाऱ्या दुकानात फार मोठमोठे व्यवसाय होत होते. पण माझं दुकान थोडं आतील बाजूस असल्याने,तिथे म्हणावा असा व्यवसाय होत नव्हता. किंवा होणार सुद्धा नव्हता, हे मी पुरतं जाणून होतो. पण त्याला नाईलाज होता.
त्याकाळी.. थोडे थोडके नाही, तर माझ्या बापाने, तब्बल एक लाख रुपये त्या व्यवसायात गुंतवले होते. जे कि, त्यावेळी सोनं अगदी साडेतीन ते चार हजार रुपये तोळा होतं. ( त्या रकमेचा, त्यावेळी योग्य विनियोग केला गेला असता. तर, त्या लाखाचे आज एक करोड रुपये तरी नक्कीच झाले असते. पण शेवटी काय आहे, नशिबात लिहिलेल्या गोष्टी कधी टळत नसतात. )
झालं, एकदाचं माझं कटलरी दुकान सुरु झालं..
दुकानच्या उद्घाटनाच्या दिवशी, मोजून आठशे रुपये धंदा झाला होता. त्यावेळी, आठशे रुपये.. हि फार मोठी रक्कम होती बरं का. माझ्या दुकानातील, तो सर्वात मोठा आणि शेवटचा रोख रकमेचा धंदा ठरला.
सुरवातीला.. नवीन-नवीन, रोजच्याला शे-दोनशे रुपये धंदा व्हायचा. गिर्हाईक लोकं रोज एकएक नवीन वस्तूची मला मागणी करायचे. आणि, गिर्हाईकांना हव्या असणार्या त्या वस्तुंची मी यादी बनवायचो. आणि, त्या वस्तू मी पुण्याहून खरेदी करून घेऊन यायचो. मला मागणी झालेली ती वस्तू, फक्त पन्नास रुपयांची असायची. आणि त्यात, मिळणारा नफा सुद्धा अवघा दोन पाच रुपयाचा असायचा. पण त्याकरिता, पुण्याला जाण्यात गाडी भाड्यात माझे वीसेक रुपये खर्च व्हायचे. आणि असं करता-करता..
मी, आणि माझा व्यवसाय कधी डबघाईला आला. ते माझं मला सुद्धा समजलं नाही.
पण तेवढ्यातहि काटकसर करून, मी एक चांगली गोष्ट केली होती. वीस लोकांच्या ग्रुपमध्ये मी दरमहा दोनशे रुपयांची एक भिशी लाऊन ठेवली होती.
सकाळी आठ ते दुपारी दोन, आणि दुपारी चार ते संध्याकाळी नऊ. हि माझ्या दुकानाची वेळी होती. पण माझा धंदा चौपट झाला असल्याने, मला संध्याकाळी लवकर घरी जाऊ वाटायचं नाही. माझे वडील मला काहीतरी विचारतील. याचं, फार मोठं भय मला वाटत होतं. पण हा ससेमिरा मी कुठवर चुकवणार होतो.? एके दिवशी तर, माझ्या दुकानात दिवसभरात फक्त दोन रुपये धंदा झाला होता. इतके भयंकर दिवस मी त्यावेळी अनुभवले आहेत.
घरच्यांना वाटायचं, येवढ्या मोठ्या दुकानातून काहीतरी आमदनी नक्कीच झाली असेल. तर, मी ती आपल्या घरात द्यावी. पण माझं दुखः मला माहित होतं. या नको त्या व्यवसायाने, मी अगदी डिप्रेशनमध्ये गेलो होतो.
शेवटी.. एकेदिवशी माझे वडील मला म्हणाले..
अरे.. तुझा व्यवसाय कसा काय चालू आहे..? तू आम्हाला त्यातील काहीच का सांगत नाहीस..?
एकतर, माझे वडील खूप तापट स्वभावाचे होते. माझा धंदा चौपट झाला आहे. हे त्यांना सांगावं तरी कसं..? ते मला समजत नव्हतं. मी, एक-एक दिवस पुढे रेटत होतो.
महिन्या भराने दिवाळसन होता.
दिवाळीसाठी, मी कोणतच अत्यावश्यक सामान माझ्या दुकानात भरलं नव्हतं. का तर, माझ्याकडे त्यावेळी पुरेसा पैसा नव्हता. काय करावं..? मला तर काहीच सुचत नव्हतं.
माझ्यासमोर आता एकमेव आसरा होता. तो म्हणजे..
माझी, चार हजाराची भिशी. हि भिशी मला मिळाली, तर त्यावेळी माझं सगळं काही ठीक होणार होतं. किमान, हि भयंकर वेळ तरी निघून जाणार होती.
त्यामुळे, त्या भिशी मालकाला मी माझी कैफियत सादर केली. पण तो म्हणाला..
तुझं सगळं खरं आहे. पण, दिवाळी आपला वर्षाचा सन आहे. प्रत्येकाला पैश्याची निकड असते. हि भिशी, तुला कोणीच देऊ करणार नाही. हवं तर, ज्याची चिट्ठी निघेल त्याला विचार. त्याने हि भिशी तुला दिली तर दिली..!
पैसा खूप वाईट गोष्ट हो, स्वतःला लागेलेली भिशी दुसऱ्याला कोण देणार आहे..?
दिवसेंदिवस माझी चिंता वाढत चालली होती.
आणि, प्रत्यक्ष तो दिवस उजाडला.. आज संध्याकाळी भिशी फुटणार होती. मी सकाळपासूनच देवाला साकडं घालून ठेवलं होतं.
देवा.. आज कोणत्याही परिस्थितीत माझाच नंबर लागू दे..!
पण, या बदल्यात मी देवाला..
नारळ फोडेल, पेढे वाटेल अशी कोणतीच प्रलोभने दाखवली नव्हती.
संध्याकाळ झाली, तशी माझी धाकधुक फार वाढू लागली. आठ वाजता भिशी फुटणार होती. वीस मेंबर पैकी, दहा बारा जन तिथे हजर होते.
त्यावेळी, आमच्यात एक नियम होता. भिशीमध्ये असणाऱ्या मेंबरने चिट्ठी उचलायची नाही. त्याकरिता, कोण्यातरी लहान मुलाला आम्ही चिठ्ठी उचलायला बोलवायचो.
पण त्यादिवशी, त्या भागात एक सुद्धा लहान मुलगा किंवा मुलगी तिथे आम्हाला दिसत नव्हती. जे कि, त्या ठिकाणी रोज संध्याकाळी बरीच लहान मुलं लपाछपी किंवा अन्य खेळ खेळत असायचे.
आम्ही बराच वेळ वाट पाहिली. पण, एकही मुल आम्हाला त्याठिकाणी दिसलं नाही.
शेवटी.. कोणाच्यातरी घरून एखाद्या लहान मुलाला घेऊन यायचं ठरलं.
आणि तितक्यात..
त्या काळ्या कुट्ट मोकळ्या डांबरी रस्त्यावरून.. उत्तरेच्या दिशेने, एक सात आठ वर्षाचा मुलगा चालत येताना मला दिसला. मी म्हणालो,
ए.. नका पाठवू कोणाला.. ते बघा, तिकडून एक लहान मुलगा येताना दिसतोय..!
त्या लहान मुलाला पाहून, सगळ्यांना हायसं वाटलं होतं. त्या लहान मुलाने, शाळेचा गणवेश.. खाकी हाफ पँट आणि पांढरा शर्ट परिधान केला होता. मी त्या काळ्या सावळ्या मुलाला जवळ बोलावलं. तो मुलगा म्हणाला..
काय ओ काका, काय काम आहे..?
मी त्याला म्हणालो, एक काम कर बेटा.. या भिशीच्या चिट्ठी मधून एक नंबर काढ..!
माझ्या वक्तव्यावर, त्या मुलाने सुद्धा होकारार्थी अशी किंचित मान हलवली..
भिशीच्या चिठ्ठया ज्यात ठेवल्या होत्या, त्या पत्र्याच्या लहानशा डब्यामध्ये, एकूण पंधरा एक कागदी चिठ्ठ्या होत्या, खडखड- खडखड आवाज करत तो डब्बा एकदा जोरात हलवला गेला.
आणि, डब्याचं झाकण खोलताच सगळ्या चिठ्ठ्या ज्या ठिकाणी आमची भिशी फुटणार होती. त्या दुकानाच्या कौंटरवर विखुरल्या गेल्या.
त्या दहा बारा चिठ्ठ्या मधून.. त्या लहानग्या मुलाने, त्यातील एक चिठ्ठी उचलून आमच्या बॉसच्या हातामध्ये दिली. सगळ्यांचं लक्ष, त्या चीठ्ठीकडे लागून राहिलं होतं.
हळुवारपणे त्या पांढऱ्या शुभ्र चिठ्ठीची एक-एक घडी उघडली जाऊ लागली. तसा, सगळ्यांच्या छातीचा भाता जोरजोरात खालीवर होऊ लागला होता. प्रत्येकाला पैश्याची निकड होती. आता कोणाचा नंबर लागणार.? याची सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली होती. आणि,
थोड्याच अवधीत चिठ्ठीची शेवटची घडी उघडली गेली. आणि, त्या चिठ्ठी मध्ये लिहिलेल नाव होतं.
" पंडित कुंभार. "
तुम्हाला काय सांगू मित्रांनो, त्यादिवशी.. आनंदाने मला अगदी रडू आलं होतं. पण मी, चारचौघात स्वतःला खूप सावरलं. त्या ठिकाणी परमेश्वराचे मी लाख लाख आभार मानले. त्या लहान मुलाच्या रूपाने साक्षात परमेश्वरच माझ्या भेटीला आला होता. मी लगेच मनात विचार केला, माझ्या भाग्य विधात्या त्या चिठ्ठी काढणाऱ्या मुलाला, काही नाही तर, किमान एखादा बिस्किटचा पुडा तरी घेऊन देऊयात.
म्हणून.. मी त्या लहान मुलाला माझ्या आजूबाजूला पाहू लागलो. दुकानाच्या दोन्ही बाजूला पन्नास मीटरचा भला मोठा रोड होता. पण अवघ्या पंधरा विस सेकंदात, तो मुलगा त्या ठिकाणावरून चक्क गायब झाला होता.
या अनपेक्षित घटनेने मी तर फारच अचंबित झालो होतो.
अचानक तो मुलगा कुठे गेला असेल..?
आम्ही बरीच शोधाशोध केली, पण त्या परिसरात तो मुलगा मला कुठेच आढळून आला नाही.
मला जे समजायचं होतं, ते मी समजून गेलो होतो. शेवटी, माझ्या मदतीला " तो " स्वतः धावून आला होता. त्याचं काम त्याने चोख बजावलं होतं. परमेश्वरा तुझे लाख उपकार आहेत रे माझ्यावर..!
त्या आनंदाच्या भरात.. दुसऱ्या दिवशी मार्केट मधून मी दिवाळीचं बरंच अत्यावश्यक सामान दुकानामध्ये घेऊन आलो. आता कुठे माझं दुकान एक मस्त आणि भरगच्च दुकान वाटत होतं.
त्यादिवशी, रात्रीच्या वेळी माझ्या वडिलांनी दुरूनच माझं दुकान पाहिलं. दुकानाबाहेर चकाकणारे आकाश कंदील आणि विद्युत रोषणाई पाहून माझ्या वडिलांचा रोष बराच कमी झाला होतां. माझ्या मुलाचा व्यवसाय अगदी मस्त चालू आहे. अशी त्यांची समजूत झाली होती.
त्यावर्षी, दुकानात तर मी मुबलक सामान भरलं होतं. पण दिवाळीचा सण आहे म्हणून माझ्या अंगावर मी नवीन कपडा काही घेतला नव्हता. पण, एक फार मोठं काम मी केलं होतं.
धंद्यातून मिळालेल्या पैशातून, दिवाळीसाठी माझ्या आईला एक नवी कोरी सहावारी साडी आणि वडिलांना पायजमा शर्टचं कापड मी विकत आणलं होतं.
त्यामुळे, ते दोघेही माझ्यावर खूप खुश झाले होते.
ती दिवाळी, माझ्या आयुष्यातील अगदी अनमोल अशी दिवाळी होती. आज, आई बापाच्या पुण्याईने मी अगदी सुखी आणि समाधानी जीवन जगत आहे.
सगळी सुखं, अगदी हात जोडून माझ्यासमोर उभी आहेत. पण मागे वळून पाहताना,
पुन्हा ते दिवस आठवले.
कि माझा जीव अगदी रडकुंडीला येतो.
आणि, माझे डोळे अपोआप पाणावतात.
पण त्यावेळी, माझ्या डोळ्यातील ते अश्रू खारट मुळीच नसतात. दिवाळ सणाचा सगळा गोडवा, माझ्या त्या अश्रूंमध्ये सामावलेला असतो.

मला वाटतंय, मनुष्याला व्यसनं लागण्याचा एक ठराविक कालावधी असावा....
कॉलेजमध्ये टुकार मित्रांच्या संगतीने, किंवा.. त्याअगोदर सुद्धा त्याची सुरवात होते. ते, कधीही न थांबण्यासाठीच. पण काहीवेळा, वयाच्या ऐन मध्यानीत सुद्धा काही लोकं छंदिष्ट व्यसनी बनू शकतात. आणि, त्याला कारणं सुद्धा बरीच असतात..!
एक तर, सगळ्या कर्मातून मुक्त असल्याने. किंवा पैशाने, व्यवसायाने स्थिरस्थावर असल्याने.
आता फावला वेळ मिळालाच आहे. तर, यापूर्वी काही न केलेल्या गोष्टी करून पाहायला काय हरकत आहे..? असा, मनाचा हिय्या करून. काही लोकं, व्यसनाच्या नादाला लागतात. पण हि व्यसनं, त्यांचं काही सुद्धा वाकडं करू शकणार नाहीत. असं मी खात्रीने सांगू शकणार नाही. कारण कोणतंही व्यसन हे वाईटच असतं. ....
आजवर.. मी हजारो माणसं वाचली असतील. म्हणून काही मजेशीर अनुभव खास तुमच्याकरिता पेश करतो..!
आम्ही तर, जन्मजात शौकीन लोकं. त्यामुळे, आम्हाला त्या गोष्टीचं काहीच सोयर सुतक नसतं. तर एकदा..
माझ्या काही मोजक्या मित्रांसोबत.. मी एका बारमध्ये मदिरा प्राशन करण्याकरिता एका टेबलवर विराजमान झालो होतो. वेटर त्याच्या लयबद्ध हालचाली करत, सर्वांचे पेग भरत होता. साठ मिली मदिरेमध्ये, बर्फाचे दोन तुकडे आणि फेसाळलेल्या सोड्या सोबत ग्लासमध्ये पाण्याचा मारा केला गेला. आम्ही सर्वांनी, एक-एक पेगचं चांगभलं उरकलं. आणि, माझी नजर माणसं वाचायला निघाली.
माझ्या समोरील टेबलवर, एक पन्नाशी पार केलेला नवशिक्या वारुणी शौकीन बसला होता. गोल गोबरा चेहेरा, डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा, अंगात साधा शर्ट आणि लेहेंगा परिधान केलेला तो गृहस्थ तोंडातल्या तोंडात काहीतरी गाणं गुणगुणत होता. वेटर आल्यावर.. त्याने, कुठलीशी होडका त्याला मागवली. त्यात मिश्रणा करिता, गोड मिरिंडा सुद्धा हजर होती. व्होडका आणि मिरिंडाचा गोडसा पेग भरला गेला. तो, चिंतातूर गृहस्थ आशाळभूत नजरेने त्या पेगकडे पाहात होता. त्यावेळी, त्याच्या मनात दोन प्रश्न निर्माण झाले असावेत. आता हा पेग एका झटक्यात संपवू, कि.. त्याची हळूहळू चव घेत पिऊ..?
कारण.. नवशिक्या लोकांना, दारूची चव अजिबात आवडत नसते. पण काही लोकं सरावासाठी हे सर्व काही करत असतात. तर.. त्या व्यक्तीने, तो मदिरेचा ग्लास त्याच्या ओठांना लावला. आणि त्यातील एक मधाळ घोट त्याने आपल्या मुखात घेतला.
त्यावेळी.. त्याचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झाला होता. कडू लिंबाच्या पाल्याचा रस पिल्यावर लोकं कसं तोंड करतात. अगदी तशाप्रकारचे हावभाव मला त्याच्या चेहेऱ्यावर आढळले. अगदी जीवाच्या आकांताने त्याने तो घोट त्याच्या नरड्यात ओतला. मी त्याच्याकडे, अगदी चोरून पहात होतो. त्यामुळे, आपल्याला कोणीतरी पाहातंय याची त्याला बिलकुल कल्पनाच नव्हती.
पण.. जसजसे त्याने घोटावर घोट घ्यायला सुरवात केली. तशी, माझी नजर सुद्धा त्याच्यावर खिळली. आता त्याला कळून चुकलं होतं.
कि, हा व्यक्ती दारू पिताना आपलं निरीक्षण करत आहे. पण, तो मला काही बोलू शकत नव्हता. कारण, पुरुषांना रोखून पाहायला सेकंदांचा नियम अजून अस्तित्वात आला नाहीये.
पण मी त्याला पहातोय असं समजल्यावर, मादिरेचा घोट पिण्या अगोदर त्याचं माझ्याकडे हमखास लक्ष जायचं. आणि, मी पाहतोय असं आढळून आल्यावर. तो मनुष्य, वैतागून त्याच्या ओठापर्यंत नेलेला ग्लास पुन्हा खाली ठेवायचा. असं बरेच वेळा झालं.
आता तर तो व्यक्ती, दारूचा घोट घेण्याअगोदर माझ्याकडे पाहून फारच टेन्शनमध्ये यायचा. मी त्याच्या रंगाचा पक्का बेरंग करून टाकला होता. शेवटी, आमची मेहेफील आम्ही आटोपती घेतली. आणि आम्ही बारच्या बाहेर पडलो. त्यानंतर तरी, तो व्यक्ती सुखासमाधानाने दारू पिला असेल कि नाही. ते त्याचं त्यालाच माहिती.
असाच अजून एक प्रकार, सिगारेट पिणार्या लोकांच्या बाबतीत मला पाहायला मिळाला. एकदा नागपूरला गेलो असता, तिथे पन्नाशी पार केलेला एक ग्रहस्थ सिगारेट ओढण्याचा किंवा नको ते व्यसन बाळगण्याचा मुद्दाम प्रयत्न करत होता. त्या नवशिक्या व्यक्तीने सिगारेट शिलगावली, तिच्या धुराचा एक मोठासा झुरका त्याने तोंडात ओढला. त्याच बरोबर, त्याने त्याच्या गालाचा मोठा फुगा केला. आणि, त्या धुराला तो तोंडातल्या तोंडात खेळवायला लागला. पण, त्या धुराला तो काही त्याच्या गळ्याखाली उतरवत नव्हता. शेवटी, त्याने ओठाची शिटी करून त्यातून तो धूर लीलया बाहेर सोडला. आणि पुन्हा एकदा तो त्याच क्रियेत मग्न झाला. म्हणजेच, त्याला सिगारेट प्यायची माहिती नव्हती. एक स्टाईल म्हणून तो हे सर्व काही करत होता.
त्यानंतर अजून एक गृहस्थ मला दिसला होता, त्याला सुद्धा सिगारेट प्यायचं बिलकुल ज्ञान नव्हतं. पण चार चौघात रुबाब दाखवण्या करिता तो सिगारेट पीत होता. मी त्याला ताबडतोब ओळखला होता. कि हा नकली स्मोकर आहे. आणि माझ्या सोबत असणाऱ्या मित्राला सुद्धा मी त्याची तशी आगावू कल्पना दिली होती. कि या व्यक्तीला सिगारेट पिता येत नाहीये. पण हा नक्कीच सिगारेटचं पाकीट सोबत ठेवत असणार आहे. माझी शंका खरी ठरली, फक्त तोंडात घेऊन बाहेर धूर सोडणारा हा व्यक्ती चक्क चैन स्मोकर निघाला.
त्यानंतर परवा, मी माझ्या गाडीमध्ये काहीतरी वाचत बसलो होतो. तर बाहेरून मला..
स्स्स्स, स्स्स्स.. असा आवाज यायला लागला. कुतूहल म्हणून मी बाहेर पाहिलं. तर एक नवशिक्या सिगरेट फुक्या मुलगा, सिगारेट पिताना.. तोंडात असलेला धूर स्स्स्स करून जीवाच्या आकांताने नरड्यात ओढत होता. काही लोकं निव्वळ प्रेस्टीज करिता अशा व्यसनांना जवळ करत असतात. त्यापाठीमागे त्यांची नेमकी काय मानसिकता असते. हा माझ्यासाठी एक मोठा प्रश्न आहे.
तर.. अशा शौकीन लोकांना त्या व्यसनांचा काहीतरी त्रास नक्कीच होत असेल. कारण ती लोकं ते व्यसन एक छंद म्हणून करत असतात. व्यसन म्हणून नाही. हे फक्त त्यांना माहित असतं, त्यांच्या शरीराला नाही..!त्यामुळे, काही लोकांना त्याचा साईड इफेक्ट होत असावा, तर काही लोक त्यातून सहीसलामत पार सुद्धा होत असावेत, असं माझं मत आहे..!



काल.. काही कामा निमित्ताने, मी आमच्या चौकातील मित्र मंडळीला भेटायला निघालो होतो. तर, त्या अगोदर वाटेतच माझा एक जुना मित्र मला भेटला..
आता हा सुद्धा माझा फार जुना आणि जिगरी यार, पण वेळेअभावी या मित्राला सुद्धा मी बरेच दिवस भेटलो नव्हतो. किंवा आमची गाठभेट झाली नव्हती.
त्यामुळे, एकमेकाला पाहताच आनंदाने आम्ही एकमेकाची अगदी कडकडून गळाभेट घेतली. आणि आम्हा दोघांची सकाळ अगदी प्रसन्न झाली.
त्या मित्राची कार, रोडच्या बाजूलाच उभी होती. मी सहजच त्याला प्रश्न केला..!
का रे.. कुठे बाहेर निघाला आहेस का..?
तर म्हणाला..
हो.. मुंबईला निघालो आहे, थोडी दिवाळीची कपडे खरेदी करून येतो.
मी एकवार, त्याच्या कारमध्ये डोकावून पाहिलं,
त्या कारमध्ये कोणीतरी त्याचा आणि माझ्यासाठी अनोळखी असणारा असा एक मित्र बसला होता.
मी त्याला सहजच म्हणालो..
कपडे खरेदीला, सोबत वहिनी येणार आहेत का..?
तर तो म्हणाला.. नाही रे,
आता जग खूप जवळ आलं आहे. तिच्याकरिता मला आवडणारे जे लेडीज ड्रेस आहेत. त्यांचे फोटो काढून, मी तिला व्हाट्सअपवर पाठवून देईल. तिनेच तसं मला सांगितलं आहे. आणि, त्या फोटोवरून ती तिच्या ड्रेसची पसंती मला कळवेल. असं आमचं ठरलं आहे.
आणि, राहता राहिला " साईजचा " विषय. तो तर, आपल्याला माहीतच असतो कि..!
माझ्या मित्राच्या, या शेवटच्या वाक्यानंतर...
" साईज " या शब्दाच्या डबल मिनींग मुळे. नकळत, आम्हा दोघांमध्ये एक जोरदार हशा पिकला. आणि एकमेकांच्या हातावर जोरदार टाळ्या देत आम्ही तेथून एकमेकांचा निरोप घेतला.

पासपोर्ट काढून दोन वर्ष झालीत,
पण विदेशात फिरायला जायचा अजून तरी काही योग येत नाहीये. मधंतरी माझा एक मित्र, विदेशात फिरायला गेला होता. त्याच्या ओळखीने, जरा स्वस्तात असं टूर पेकेज मला सुद्धा मिळत आहे. पण गम्मत काय झाली आहे.
विदेशात फिरायला जाण्यासाठी त्या टूर मेनेजरने निवडलेलं स्वस्त आणि मस्त ठिकाण.
ते म्हणजे.. बँकोक अणि पटाया.
आता, सगळी शोधाशोध केल्यानंतर ओळखीने आम्हाला येथील पैकेज थोडा स्वस्तात आणि मनसोक्त फिरता येईल असा मिळतोय.
परंतु, विदेशातील या दोन शहराचं नाव उच्चारताच, प्रत्येक व्यक्तीच्या भुवया लगेच उंचावतात.
काय घोडं मारलं आहे हो या ठीकानाने..?
तसं पाहायला गेलं तर.. जगातील कोणत्या शहरात नाईट लाईफ नाहीयेत..?
जगातीलच काय, तर भारतातील प्रत्येक शहरात नाईट लाईफ, मसाज पार्लर हि आहेतच.
पण.. या दोन शहरांच्या नावाने लोकं फारच बोंबा मारत असतात.
बरं, त्याठिकाणी दुसरी प्रेक्षणीय स्थळं असतील कि नाही..? कि सगळीकडे फक्त हाच बाजार चालू असतो..? मी तर असं देखील ऐकलंय, कि काही हनिमून कपल सुद्धा या ठिकाणी फिरायला जात असतात. मग, त्यांना काय वेड लागलं आहे का..?
पण म्हणतात ना.. एकदा कानफाट्या नाव पडलं कि विषय संपला.
मलातर, हे साफ चुकीचं वाटतंय.
आता.. आपल्या पुण्यातीलच आढावा घ्या.." बुधवार पेठ "
हे नाव उच्चारताच बर्याच लोकांच्या मनात लगेच कालवाकालव सुरु होते. कारण, बुधवार पेठेमधील ठराविक एका भागात वेश्याव्यवसाय चालतो म्हणून.
काही लोकांना माहिती नसेल तर त्यांच्या माहितीकरिता म्हणून सांगतो. साठी ओलांडलेली काही पुणेकर मंडळी, बुधवार पेठेला.. आजही " दानेआळी " म्हणून ओळखतात. का तर, पूर्वी त्या ठिकाणी धनधान्याचा फार मोठा बाजार भरायचा. असं मी ऐकून आहे.
उदाहरणार्थ, शेंगदाणा किंवा शेंगदाणे
यातील, दाणे किंवा दाणा या शब्दावरून त्या भागाला दाणेआळी हे माहितीपूर्ण नाव देण्यात आलं. आता, बुधवार पेठमध्ये काही ठराविक भागात वेश्याव्यवसाय चालतो. तो अगदी राजरोसपणे चालतो, आणि जगजाहीर सुद्धा आहे. तो वेश्याव्यवसाय नेमका कधीपासून सुरु झाला आहे. त्याची मला सुद्धा पूर्ण कल्पना नाहीये. किंवा तो, एक स्वतंत्र विषय आहे. त्या विषयवार आपण पुन्हा कधीतरी चर्चा करू.
तर.. पुण्यातील बुधवारपेठेत, फक्त बाहेरख्यालीपणा करण्यासाठीच सगळी लोकं जात असतील का..?
तर.. नाही, बुधवारपेठ आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात बरीच धार्मिक ठिकाणं सुद्धा आहेत.
जसे कि.. दगडूशेठ हलवाई गणपती, दत्त मंदिर, स्वामी समर्थ मठ, आणि अजूनही बरीच धार्मिक ठिकाणं त्या परिसरात आहेत. सर्वात पहिली गुजर मस्तानी तर अगदी बुधवार गल्लीला खेटून आहे. पण हौशी खवय्यांवर त्याचा काहीएक परिणाम होत नाही. त्याशिवाय, पुण्यातील सर्वात मोठा पोलिसी खाक्या, फरासखाना पोलीस चौकी सुद्धा याच भागात आहे.
त्यामुळे, मी बुधवार पेठेत निघालो आहे. असं कोणी म्हणालं.. तर, त्याच्याकडे कोणीही संशयाने पाहू नका. किंवा, किमान आमच्याकडे तरी तसं कोणी संशयाने पाहत नाही.
का.. ते, मी वर सांगितलं आहेच.
आणि त्याचप्रमाणे, त्या बँकोक अणि पटायाला जाणाऱ्या पर्यटकांना सुद्धा कोणी वेगळ्या नजरेने पाहू नये. असं माझं प्रामाणिक मत आहे. त्याकरिता हा लेखप्रपंच.
बघुयात, सगळी जुळवाजुळव करून या विदेशवारीचा योग कधी येतोय ते.