Saturday, 12 November 2016

२५ वर्षांपूर्वीची..
एक, दिवाळखोर दिवाळी. आणि, दैवी चमत्कार..!
बरीच लोकं म्हणतात.. या जगात देव वगैरे काही नाहीये. या सगळ्या दैवी संकल्पना म्हणजे निव्वळ थोतांड आहे. पण मित्रांनो, या भारत वर्षातील म्हणा, किंवा.. जगद्विख्यात म्हणा. एक असे महान व्यक्ती या पृथ्वी तलावर होऊन गेले आहेत. जे कि, सुरवातीला नास्तिक होते. आणि, काही काळानंतर ते पुन्हा आस्तिक झाले होते. आणि, त्यांच्या हयातीत त्यांनी, त्यांच्या आस्तिक होण्याची बरीच कारणं सुद्धा लिहून ठेवली आहेत. ती आजवर, आपल्या सर्वांना मार्गदर्शक ठरत आहेत. आणि, ठरत राहतील..!
अशा, श्री. स्वामी विवेकानंद.. यांना सविनय दंडवत घालून, मी माझं लिखाण पुढे चालू ठेवतो.
तर मित्रहो..
हि, एकोणीसशे नव्वद सालातील मी स्वतः अनुभवलेली एक सत्यघटना आहे..!
मी काहीतरी रोजगार करावा, म्हणून..माझ्या वडिलांनी आमच्या गावामध्ये एका नवीन इमारतीच्या खाली असणारं एक दुकान खरेदी केलं. त्यांचा विषय हाच, कि पुढे चालून आपला एखादा मुलगा या निमित्ताने नक्क्कीच एक चांगला व्यवसायिक होईल.
पण, माझ्या वडिलांनी घेतलेलं ते दुकान, मुख्य बाजारपेठेपासून बरंच आतील बाजूस होतं.
( आणि, आजही ते दुकान माझ्या मालकीचं आहे. ) पण त्याला पर्याय नव्हता. दुकानाचा ताबा मिळाल्यावर, त्या ठिकाणी आम्ही सर्व कुटुंबीयांनी मिळून, त्या नवीन वास्तूमध्ये एक कटलरी दुकान सुरु केलं.
आणि, त्याची संपूर्ण धुरा माझ्या हाती दिली गेली. मुख्य चौकात असणाऱ्या दुकानात फार मोठमोठे व्यवसाय होत होते. पण माझं दुकान थोडं आतील बाजूस असल्याने,तिथे म्हणावा असा व्यवसाय होत नव्हता. किंवा होणार सुद्धा नव्हता, हे मी पुरतं जाणून होतो. पण त्याला नाईलाज होता.
त्याकाळी.. थोडे थोडके नाही, तर माझ्या बापाने, तब्बल एक लाख रुपये त्या व्यवसायात गुंतवले होते. जे कि, त्यावेळी सोनं अगदी साडेतीन ते चार हजार रुपये तोळा होतं. ( त्या रकमेचा, त्यावेळी योग्य विनियोग केला गेला असता. तर, त्या लाखाचे आज एक करोड रुपये तरी नक्कीच झाले असते. पण शेवटी काय आहे, नशिबात लिहिलेल्या गोष्टी कधी टळत नसतात. )
झालं, एकदाचं माझं कटलरी दुकान सुरु झालं..
दुकानच्या उद्घाटनाच्या दिवशी, मोजून आठशे रुपये धंदा झाला होता. त्यावेळी, आठशे रुपये.. हि फार मोठी रक्कम होती बरं का. माझ्या दुकानातील, तो सर्वात मोठा आणि शेवटचा रोख रकमेचा धंदा ठरला.
सुरवातीला.. नवीन-नवीन, रोजच्याला शे-दोनशे रुपये धंदा व्हायचा. गिर्हाईक लोकं रोज एकएक नवीन वस्तूची मला मागणी करायचे. आणि, गिर्हाईकांना हव्या असणार्या त्या वस्तुंची मी यादी बनवायचो. आणि, त्या वस्तू मी पुण्याहून खरेदी करून घेऊन यायचो. मला मागणी झालेली ती वस्तू, फक्त पन्नास रुपयांची असायची. आणि त्यात, मिळणारा नफा सुद्धा अवघा दोन पाच रुपयाचा असायचा. पण त्याकरिता, पुण्याला जाण्यात गाडी भाड्यात माझे वीसेक रुपये खर्च व्हायचे. आणि असं करता-करता..
मी, आणि माझा व्यवसाय कधी डबघाईला आला. ते माझं मला सुद्धा समजलं नाही.
पण तेवढ्यातहि काटकसर करून, मी एक चांगली गोष्ट केली होती. वीस लोकांच्या ग्रुपमध्ये मी दरमहा दोनशे रुपयांची एक भिशी लाऊन ठेवली होती.
सकाळी आठ ते दुपारी दोन, आणि दुपारी चार ते संध्याकाळी नऊ. हि माझ्या दुकानाची वेळी होती. पण माझा धंदा चौपट झाला असल्याने, मला संध्याकाळी लवकर घरी जाऊ वाटायचं नाही. माझे वडील मला काहीतरी विचारतील. याचं, फार मोठं भय मला वाटत होतं. पण हा ससेमिरा मी कुठवर चुकवणार होतो.? एके दिवशी तर, माझ्या दुकानात दिवसभरात फक्त दोन रुपये धंदा झाला होता. इतके भयंकर दिवस मी त्यावेळी अनुभवले आहेत.
घरच्यांना वाटायचं, येवढ्या मोठ्या दुकानातून काहीतरी आमदनी नक्कीच झाली असेल. तर, मी ती आपल्या घरात द्यावी. पण माझं दुखः मला माहित होतं. या नको त्या व्यवसायाने, मी अगदी डिप्रेशनमध्ये गेलो होतो.
शेवटी.. एकेदिवशी माझे वडील मला म्हणाले..
अरे.. तुझा व्यवसाय कसा काय चालू आहे..? तू आम्हाला त्यातील काहीच का सांगत नाहीस..?
एकतर, माझे वडील खूप तापट स्वभावाचे होते. माझा धंदा चौपट झाला आहे. हे त्यांना सांगावं तरी कसं..? ते मला समजत नव्हतं. मी, एक-एक दिवस पुढे रेटत होतो.
महिन्या भराने दिवाळसन होता.
दिवाळीसाठी, मी कोणतच अत्यावश्यक सामान माझ्या दुकानात भरलं नव्हतं. का तर, माझ्याकडे त्यावेळी पुरेसा पैसा नव्हता. काय करावं..? मला तर काहीच सुचत नव्हतं.
माझ्यासमोर आता एकमेव आसरा होता. तो म्हणजे..
माझी, चार हजाराची भिशी. हि भिशी मला मिळाली, तर त्यावेळी माझं सगळं काही ठीक होणार होतं. किमान, हि भयंकर वेळ तरी निघून जाणार होती.
त्यामुळे, त्या भिशी मालकाला मी माझी कैफियत सादर केली. पण तो म्हणाला..
तुझं सगळं खरं आहे. पण, दिवाळी आपला वर्षाचा सन आहे. प्रत्येकाला पैश्याची निकड असते. हि भिशी, तुला कोणीच देऊ करणार नाही. हवं तर, ज्याची चिट्ठी निघेल त्याला विचार. त्याने हि भिशी तुला दिली तर दिली..!
पैसा खूप वाईट गोष्ट हो, स्वतःला लागेलेली भिशी दुसऱ्याला कोण देणार आहे..?
दिवसेंदिवस माझी चिंता वाढत चालली होती.
आणि, प्रत्यक्ष तो दिवस उजाडला.. आज संध्याकाळी भिशी फुटणार होती. मी सकाळपासूनच देवाला साकडं घालून ठेवलं होतं.
देवा.. आज कोणत्याही परिस्थितीत माझाच नंबर लागू दे..!
पण, या बदल्यात मी देवाला..
नारळ फोडेल, पेढे वाटेल अशी कोणतीच प्रलोभने दाखवली नव्हती.
संध्याकाळ झाली, तशी माझी धाकधुक फार वाढू लागली. आठ वाजता भिशी फुटणार होती. वीस मेंबर पैकी, दहा बारा जन तिथे हजर होते.
त्यावेळी, आमच्यात एक नियम होता. भिशीमध्ये असणाऱ्या मेंबरने चिट्ठी उचलायची नाही. त्याकरिता, कोण्यातरी लहान मुलाला आम्ही चिठ्ठी उचलायला बोलवायचो.
पण त्यादिवशी, त्या भागात एक सुद्धा लहान मुलगा किंवा मुलगी तिथे आम्हाला दिसत नव्हती. जे कि, त्या ठिकाणी रोज संध्याकाळी बरीच लहान मुलं लपाछपी किंवा अन्य खेळ खेळत असायचे.
आम्ही बराच वेळ वाट पाहिली. पण, एकही मुल आम्हाला त्याठिकाणी दिसलं नाही.
शेवटी.. कोणाच्यातरी घरून एखाद्या लहान मुलाला घेऊन यायचं ठरलं.
आणि तितक्यात..
त्या काळ्या कुट्ट मोकळ्या डांबरी रस्त्यावरून.. उत्तरेच्या दिशेने, एक सात आठ वर्षाचा मुलगा चालत येताना मला दिसला. मी म्हणालो,
ए.. नका पाठवू कोणाला.. ते बघा, तिकडून एक लहान मुलगा येताना दिसतोय..!
त्या लहान मुलाला पाहून, सगळ्यांना हायसं वाटलं होतं. त्या लहान मुलाने, शाळेचा गणवेश.. खाकी हाफ पँट आणि पांढरा शर्ट परिधान केला होता. मी त्या काळ्या सावळ्या मुलाला जवळ बोलावलं. तो मुलगा म्हणाला..
काय ओ काका, काय काम आहे..?
मी त्याला म्हणालो, एक काम कर बेटा.. या भिशीच्या चिट्ठी मधून एक नंबर काढ..!
माझ्या वक्तव्यावर, त्या मुलाने सुद्धा होकारार्थी अशी किंचित मान हलवली..
भिशीच्या चिठ्ठया ज्यात ठेवल्या होत्या, त्या पत्र्याच्या लहानशा डब्यामध्ये, एकूण पंधरा एक कागदी चिठ्ठ्या होत्या, खडखड- खडखड आवाज करत तो डब्बा एकदा जोरात हलवला गेला.
आणि, डब्याचं झाकण खोलताच सगळ्या चिठ्ठ्या ज्या ठिकाणी आमची भिशी फुटणार होती. त्या दुकानाच्या कौंटरवर विखुरल्या गेल्या.
त्या दहा बारा चिठ्ठ्या मधून.. त्या लहानग्या मुलाने, त्यातील एक चिठ्ठी उचलून आमच्या बॉसच्या हातामध्ये दिली. सगळ्यांचं लक्ष, त्या चीठ्ठीकडे लागून राहिलं होतं.
हळुवारपणे त्या पांढऱ्या शुभ्र चिठ्ठीची एक-एक घडी उघडली जाऊ लागली. तसा, सगळ्यांच्या छातीचा भाता जोरजोरात खालीवर होऊ लागला होता. प्रत्येकाला पैश्याची निकड होती. आता कोणाचा नंबर लागणार.? याची सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली होती. आणि,
थोड्याच अवधीत चिठ्ठीची शेवटची घडी उघडली गेली. आणि, त्या चिठ्ठी मध्ये लिहिलेल नाव होतं.
" पंडित कुंभार. "
तुम्हाला काय सांगू मित्रांनो, त्यादिवशी.. आनंदाने मला अगदी रडू आलं होतं. पण मी, चारचौघात स्वतःला खूप सावरलं. त्या ठिकाणी परमेश्वराचे मी लाख लाख आभार मानले. त्या लहान मुलाच्या रूपाने साक्षात परमेश्वरच माझ्या भेटीला आला होता. मी लगेच मनात विचार केला, माझ्या भाग्य विधात्या त्या चिठ्ठी काढणाऱ्या मुलाला, काही नाही तर, किमान एखादा बिस्किटचा पुडा तरी घेऊन देऊयात.
म्हणून.. मी त्या लहान मुलाला माझ्या आजूबाजूला पाहू लागलो. दुकानाच्या दोन्ही बाजूला पन्नास मीटरचा भला मोठा रोड होता. पण अवघ्या पंधरा विस सेकंदात, तो मुलगा त्या ठिकाणावरून चक्क गायब झाला होता.
या अनपेक्षित घटनेने मी तर फारच अचंबित झालो होतो.
अचानक तो मुलगा कुठे गेला असेल..?
आम्ही बरीच शोधाशोध केली, पण त्या परिसरात तो मुलगा मला कुठेच आढळून आला नाही.
मला जे समजायचं होतं, ते मी समजून गेलो होतो. शेवटी, माझ्या मदतीला " तो " स्वतः धावून आला होता. त्याचं काम त्याने चोख बजावलं होतं. परमेश्वरा तुझे लाख उपकार आहेत रे माझ्यावर..!
त्या आनंदाच्या भरात.. दुसऱ्या दिवशी मार्केट मधून मी दिवाळीचं बरंच अत्यावश्यक सामान दुकानामध्ये घेऊन आलो. आता कुठे माझं दुकान एक मस्त आणि भरगच्च दुकान वाटत होतं.
त्यादिवशी, रात्रीच्या वेळी माझ्या वडिलांनी दुरूनच माझं दुकान पाहिलं. दुकानाबाहेर चकाकणारे आकाश कंदील आणि विद्युत रोषणाई पाहून माझ्या वडिलांचा रोष बराच कमी झाला होतां. माझ्या मुलाचा व्यवसाय अगदी मस्त चालू आहे. अशी त्यांची समजूत झाली होती.
त्यावर्षी, दुकानात तर मी मुबलक सामान भरलं होतं. पण दिवाळीचा सण आहे म्हणून माझ्या अंगावर मी नवीन कपडा काही घेतला नव्हता. पण, एक फार मोठं काम मी केलं होतं.
धंद्यातून मिळालेल्या पैशातून, दिवाळीसाठी माझ्या आईला एक नवी कोरी सहावारी साडी आणि वडिलांना पायजमा शर्टचं कापड मी विकत आणलं होतं.
त्यामुळे, ते दोघेही माझ्यावर खूप खुश झाले होते.
ती दिवाळी, माझ्या आयुष्यातील अगदी अनमोल अशी दिवाळी होती. आज, आई बापाच्या पुण्याईने मी अगदी सुखी आणि समाधानी जीवन जगत आहे.
सगळी सुखं, अगदी हात जोडून माझ्यासमोर उभी आहेत. पण मागे वळून पाहताना,
पुन्हा ते दिवस आठवले.
कि माझा जीव अगदी रडकुंडीला येतो.
आणि, माझे डोळे अपोआप पाणावतात.
पण त्यावेळी, माझ्या डोळ्यातील ते अश्रू खारट मुळीच नसतात. दिवाळ सणाचा सगळा गोडवा, माझ्या त्या अश्रूंमध्ये सामावलेला असतो.

No comments:

Post a Comment