Monday, 6 November 2017

पूर्वी.. मी ज्या ठिकाणी, भाड्याच्या फ्ल्याटमध्ये राहायचो.
तिथे.. आमच्या शेजारी एक कुटुंब राहायला होतं. त्या घरात, एक मुलगी तिच्या चुलत्याकडे आश्रित म्हणून राहायला होती. बिचारीच्या डोक्यावरून लहानपणीच तिच्या आईचं छत्र हरपलं होतं. मुलीला सावत्र आई नको, म्हणून.. तिच्या वडिलांनी पुन्हा दुसरं लग्न केलं नाही. त्यामुळे, हि मुलगी तिच्या चुलत्याच्या घरातच लहानाची मोठी झाली.
त्या घरात मी तिला जेंव्हा कधी पाहिलं, तेंव्हा ती बिचारी काहीतरी कामातच असायची. सतत काहीना काही घरकाम करतच असायची. दिसायला सुंदर, आणि हसमुख चेहेर्याची ती मुलगी मला फार आवडायची. बिन आईची पोर.. त्यामुळे, माझी बायको सुद्धा तिला फार जीव लावायची.
एके दिवशी.. माझ्या बायकोने मला सांगितलं, कि राणीचं लग्न ठरलं आहे.
कोण जाने का, पण त्यावेळी मला सुद्धा फार आनंद झाला. मनात वाटत होतं, तिला एखादं चांगलं स्थळ मिळावं. मुलगी चांगल्या खात्यापित्या घरात गेली, तर तिच्या आयुष्याचं कल्याण होऊन जाईल. यथावकाश तिचं लग्न झालं, आम्ही उभयता त्या लग्नाला जाऊ शकलो नाही. कारण ते लग्न महाराष्ट्राच्या बाहेर होतं. त्यामुळे, आमच्या ऐपतीप्रमाणे आम्ही तिला इथेच आहेर केला. आणि, आम्ही आमच्या सामाजिक कर्तव्यातून मुक्त झालो.
त्यानंतर.. मध्यंतरी दोनचार वर्ष आमचा आणि तिचा काहीच संपर्क नव्हता.
पण हल्लीच, ती माझ्या बायकोला एका दवाखान्यात भेटली होती. तिचा नवरा खूप आजारी होता. हिमाचलप्रदेश वरून, पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी हल्लीच ते कुटुंब पुण्यात आलं होतं.
तिच्या नवरोबाने.. अवघ्या चार वर्षातच, दोन मुलांचं ओझं तिच्या गळ्यामध्ये अडकवलं होतं.
एका खाजगी कंपनीत, तिचा नवरा वेल्डर म्हणून कामाला आहे. तिच्या नवऱ्याला, महिन्याला अवघा सात हजार रुपये पगार आहे. आणि त्यात, त्यांच्या घराचं भाडं चार हजार रुपये.
खायचं काय आणि ठेवायचं काय..? हा फार मोठा प्रश्न, त्यांच्यासमोर.. आ वासून बसला आहे.
काही लोकांचं आयुष्य फारच खडतर असतं हो. इतकं खडतर, कि आपन त्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. आणि त्यात, हि मुलगी तर सुरवातीपासूनच खूप खडतर जीवन जगत आहे.
काल संध्याकाळी, अचानक ती मुलगी आमच्या घरी आली.
एक मुल तिच्या काखेवर, आणि एक हातामध्ये. फारच दमून भागून ती आली होती. तिच्या चेहेऱ्यावर फारच तणाव दिसत होता. एकतर ती मुलगी खूप लाजरी, मी घरात आहे हे पाहून. ती आमच्या घरातच यायला तयार नाही. घराबाहेर उभी असलेली राणी, डोळ्यात आसवं आणत, माझ्या बायकोला म्हणाली..
आंटी.. मेरा बच्चा बहोत बिमार है, दवाखाने जाणा है. प्लीज मुझे साठ रुपये दिजीये..!
खरच.. जो माणूस मनापासून याचना करत खरं बोलत असतो. तो आपल्याला, त्याला हवी तितकी आणि नेमकीच रक्कम मागत असतो. त्याउपर, जास्तीचा एक रुपया सुद्धा तो आपल्याला मागत नसतो. जमल्यास कधी पडताळून पाहा. खरं तर, त्याची नड त्याला समजलेलीच नसते. कारण, कितीही केलं तरी, शेवटी तो याचक असतो ना..
माझी बायको घरात आली, आणि तिने वरील विषय मला सांगितला.
मी म्हणालो.. एक काम कर, तिला शंभर रुपये दे..!
बायकोने.. लगेच तिला शंभर रुपये नेऊन दिले. आणि, आल्या पावली तिच्या मुलांना घेऊन ती निघून गेली.
आणि अचानक, माझं मन भूतकाळात गेलं.
माझा मुलगा साधारण वर्षभराचा असताना, नेमका महिना अखेरीला तो आजारी पडायचा. त्यावेळी मी भलताच कफल्लक माणूस. मला धडाचं काम नव्हतं. कुठेही रोजंदारीवर काम करायचो. मुलगा आजारी पडला, कि सकाळी कामाला जाताना बायको मला हे सगळं सांगायची. मग कामावरून घरी आल्यावर, मी घरातून बाहेर पडायचो. आणि कोणाकडून तरी, हात उसने पैसे घेऊन यायचो. हा नियम, अगदी दर महिन्याला ठरलेला असायचा.
मी, जुन्या विचारात बुडालेलो होतो. आणि पटकन माझ्या काहीतरी ध्यानात आलं.
आणि, मी बायकोला म्हणालो..
अगं.. डॉक्टरची फीच फक्त साठ रुपये होईल. उरलेल्या चाळीस रुपयात, लिहून दिलेली सगळी औषधं तिला घेता येणार नाहीत. तू एक काम कर, पटकन खाली जा. आणि, तिला अजून हे शंभर रुपये देऊन ये. आणि तिला हे सुद्धा सांग, कि हे पैसे आम्हाला परत देऊ नकोस..!
माझी बायको धावतपळत पटकन खाली गेली, पण तोवर उशीर झाला होता. तोपर्यंत राणी खूप दूर निघून गेली होती. बायको पुन्हा वर आली, आणि म्हणाली, येवढ्या घाईघाईने का पाठवलं हो मला..?
तर म्हणालो..
अगं.. आपला सोनू, लहानपणी आजारी असताना. दर महिन्याला मी सुद्धा असाच कोणाकडेतरी हात पसरायला जायचो. त्यावेळी, पैशासाठी मला कोणीच आणि कधीही नकार दिला नव्हता.
तर मग, आज माझी वेळ आहे ना.
" उपकाराच्या ओझ्यातून मला थोडं तरी उतराई होऊदेत..! "
त्यावेळी माझी बायको मला म्हणाली.. पण आजवर मला तुम्ही हे कधी बोलला नव्हता..!
म्हणालो.. सगळंच सांगायचं नसतं गं, काही गोष्टी मनात साठवलेल्याच चांगल्या असतात. योग्य वेळी त्या गोष्टी आपल्याला माणुसकी शिकवतात, आणि समाजाचा हिस्सा सुद्धा बनवतात.
त्यावेळी.. एका क्षणात, आम्हा दोघांचे डोळे पाणावले होते.
करत राहायचं, आणि.. देत राहायचं. तो सगळं काही पाहत असतो. परतफेड म्हणून तो आपल्याला अजून दुपटीने देतो. आता म्हणताल, ते कशासाठी..?
तर.. हे सत्कार्य, आपल्या हाताने सदैव घडत राहावं म्हणून..!

No comments:

Post a Comment