Thursday, 2 November 2017

मी स्वतः, जातीने ड्रायव्हर असल्याने. नाही म्हणता, पोटासाठी माझी भारतात बरीच भटकंती झाली आहे. भारतातील ज्या राज्यात माझं जाणं झालं. त्या राज्यातील पोलिसांच्या अंगी असणार्या काही खुबी. तर, काही जुजबी माहित्या मी तुम्हाला इथे सांगू इच्छितोय.
ज्या, माझ्यासोबत घडल्या आहेत.
पूर्वी.. पोटाची खळगी भरण्यासाठी, ड्रायव्हर म्हणून मी टेल्को ( टाटा ) कंपनीच्या नवीन गाड्या भारतातील इतर राज्यात पोहोचवायचं काम करायचो. या कामासाठी, मी त्या काळात.
सर्वाधिक फेऱ्या ज्या भागात केल्या, तो भाग म्हणजे नागपूर.
आणि त्या खालोखाल.. गोवा, गुजरात, केरळ, दिल्ली, चंडीगड, हरियाना. या भागात, जास्ती नाही, पण एखाद दुसरी वेळ तरी माझं नक्कीच जाणं झालं आहे.
एकदा.. टाटा ४०७ हा ट्रक घेऊन मी चंदीगडला निघालो होतो. तब्बल सहा दिवसात सगळा टप्पा पार करून, अगदी शेवटच्या टप्प्यात. मी चंडीगडच्या आसपास पोहोचलो होतो.
त्यावेळी, त्या भागात रोडच्या नूतनीकरणाची कामं चालू होती. त्यामुळे रस्त्यावर जागोजागी
" USE DIVERTION " लिहिलेले बोर्ड लावलेले दिसत होते.
आता.. हे " युज डायवरशन " म्हणजे काय..? तेच मला माहिती नव्हतं. हा शब्द मी पूर्वी कधीही वाचला किंवा ऐकला नव्हता. बाकी मित्रांचा तर प्रश्नच येत नव्हता.
आणि निव्वळ या इंग्रजीच्या अज्ञानापोटी, नियमाचं उल्लंघन करून आम्ही सर्व ड्रायव्हर नको त्या रोडने पुढे गेलो. साधारण एकोणीसशे सत्त्यान्न्वचा काळ. रात्री आठ साडेआठची वेळ, त्यावेळी पंजाब भागात, खूपच नक्षली कारवाया होत असायच्या. त्यामुळे, वाटेत जागोजागी पोलीस फाटा तैनात असायचा. आम्ही पाचसहा मित्र, त्या चुकीच्या रोडने आमच्या गाड्या दामटत तसेच पुढे निघालो. आणि पुढे गेल्यावर, नेमकी आमच्यापुढे पोलिसांची एक जीप उभी होती. ती जीप पाहून, नाही म्हणता आम्ही खूप घाबरलो होतो. कारण, या कान्वायच्या गाड्यांना दमदाटी करून कोणीही अडवत असतं. त्यातून काही अनधिकृत वाहतूक तरी होत नाहीये ना, याची पडताळणी केली जाते. वेळ प्रसंगी गाडीत पेसेंजर असेल तर दमदाटी करून आमच्याकडून पैसे सुद्धा वसूल केले जायचे. शेवटी, त्या पोलिसांना पाहून आमचा म्होरक्या घाबरून तसाच पुढे निघून गेला.
पोलीस शिट्टी वाजवत होते. पण आम्ही सगळ्यांनी एकामागून एक गाड्या पुढे दामटल्या. आणि काय सांगायचं, ते पोलीस जीप घेऊन आमचा पाठलाग करू लागले.
अवघ्या एका किलोमीटरच्या अंतरावर त्यांनी आम्हाला आडवलं. रागाने..नको तसल्या घाणेरड्या शिव्या देत, आम्हा सर्वांना त्यांनी गाड्यांच्या खाली उतरवलं. विजेरीच्या सहाय्याने सगळ्या गाड्या चेक केल्या. कारण, त्या भागात अमली पदार्थांची फार मोठ्या प्रमाणात तस्करी होत असते. आणि हे तस्कर लोकं, नेमके आमच्या सारख्या गरजवंत कान्वायच्या गाड्यांचा सहारा घ्यायचे. आणि आम्ही सुद्धा, दोन पैसे मिळतील या आशेने गाडीमध्ये प्रवासी बसवायचो.
पण त्यादिवशी, सुदैवाने आमच्या कोणाच्याच गाडीमध्ये प्रवाशी नव्हते. आम्हाला आमच्या गाड्या जमा करायच्या ठिकाणी जायची घाई झाली होती. त्यामुळे, आम्ही रात्रीचा प्रवास करत होतो. बाकी दुसरं कोणतच कारण नव्हतं. शेवटी.. त्या फौजदाराने, आम्हा सर्व ड्रायव्हरांना एका लाईनीत उभं केलं.
आणि आमचा म्होरक्या असणाऱ्या एका मित्राच्या एक जोरदार कानफटात लगावली.
आणि म्हणाला.. बोल.. क्यो भाग राहा था, तू नक्सली है क्या..?
नक्सली हा शब्द ऐकून मी तर जागेवरच गार झालो. कारण, काही कारण नसताना. यांनी जर आपल्यावर तो चार्ज लावला तर काय घ्या..?
या विचाराने मी पुरता घाबरून गेलो होतो. तितक्यात, दुसऱ्या एका जुन्या जाणत्या ड्रायव्हरने त्या साहेबांना सगळं समजावून सांगितलं. आम्ही ड्रायव्हर लोकं आहोत. पुण्यावरून या नवीन गाड्या घेऊन चंडीगडला सोडायला आलो आहोत. गरीब माणसं आहोत. पोटासाठी करतोय, आम्ही नक्सली वगैरे नाहीये.
त्यावर, तो फौजदार म्हणाला.. फिर रॉंग साईडसे क्यु आया, डायवरशन का बोर्ड तुने पढा नही क्या..?
त्यावर तो ड्रायव्हर मित्र म्हणाला.. नही सहाब, अंग्रेजी समजता नही है ना. इसलिये गलती हो गयी. एक बार माफ कर दो, अगली बार गलती नही होगी.
शेवटी ती पोलिसी नजरच.. त्या फौजदाराने, पुन्हा एकदा आम्हा सर्वांना वरून खालून पाहून घेतलं. त्याच्या मनाची खात्री झाली. कि हि लोकं खरोखर ड्रायव्हर आहेत. त्यावेळी,
इन सबकी परची बनावो, असा त्याच्या सोबत असणार्या पोलिसाला आदेश सोडत, तो फौजदार, जीपमध्ये जाऊन बसला.
आता हा पोलीस किती रुपयाची पावती करतोय, याकडे आमचं लक्ष लागलं होतं. कारण त्यावेळी, आमच्या खिशात काही जास्ती पैसे नसायचे. दिवसभर केलेला धंदा मिळून, प्रत्येकाच्या खिशात मोजून अगदी शे दोनशे रुपये असणार. नाही म्हणता, त्यावेळी हि रक्कम सुद्धा फार मोठी होती. पाच पन्नास रुपयात, अगदी भरपेट जेवण होऊन जायचं.
आमच्या खिशात पैसा का नसायचा. तर, त्या सगळ्या गाड्या एका इनचार्जच्या अखत्यारीत असायच्या. तो फक्त आमच्या गाडीमध्ये रोजच्या रोज डीझेल भरायचा. आणि, त्या गाड्या योग्य ठिकाणी पोहोच झाल्यावरच. आमचा पगार आम्हाला दिला जायचा. असा, त्यावेळी तेथील नियम होता.
आमच्या एकूण पाच गाड्या होत्या. तो पोलीस म्हणाला.. चलो,सब लोग सौ सौ रुपये निकालो. नाही म्हणायची बिशाद नव्हती. आम्ही सर्वांनी गपगुमान खिशातून शंभर शंभर रुपये काढले. आणि पाचशे रुपये त्या पोलिसाच्या हातामध्ये टेकवले. पावती मिळण्याचा प्रश्नच येत नव्हता. ते सगळे पैसे त्या पोलिसाने खिशात कोंबले. आणि जीपला यु टर्न मारून ते पुन्हा त्यांच्या स्पॉटवर निघून गेले.
घडलेल्या या प्रकारामुळे मी पुरता घाबरून गेलो होतो. कारण, महाराष्ट्र सोडून गाडी चालवत बाहेर जाण्याची हे माझी पहिलीच वेळ होती. शेवटी, आमच्या म्होरक्याला मी म्हणालो. तुला मुक्कामाचं ठिकाण माहित असेल तरच पुढे चल बाबा, नाहीतर आपण इथेच कुठेतरी मुक्काम करू. आणि सकाळ झाल्यावर पुढे कूच करू.
त्यावर तो मित्र म्हणाला.. हे काय समोरच आलय ते ठिकाण..!
आणि, खुश होऊन समोर दिसणाऱ्या त्या मोकळ्या मैदानात आम्ही चौफेर उधळलो. रात्रीच्या अंधारात आम्हाला काही समजून आलं नाही. पण त्या मैदानात सगळा चिखल झाला होता.
सर्वात पुढे गेलेल्या दोन गाड्या चिखलात फसल्या. त्यामुळे, आम्ही मागचे लोकं लगेच सावध झालो. मग काय.. रात्रभर आम्ही सगळे आहे तिथेच एका जागेवर थांबून, आपापल्या गाडीत उपाशीपोटी झोपी गेलो. सकाळ झाल्यावर व्यवस्थित कोरडा रस्ता पाहून, सायकलचे काही जुने टायर विकत आणून. त्याची चैन बनवून, त्या दोन्ही गाड्या आम्ही चिखलातून बाहेर ओढून काढल्या. आणि समोरच दिसत असणाऱ्या, आरोशात ( R.S.O. ) मध्ये गाड्या जमा केल्या.

No comments:

Post a Comment