Sunday, 8 May 2016

मध्यंतरी...श्रीकांत सर, पुण्यात आले होते.
त्यांनी, मला आणि इतर काही मित्रांना भेटीचं निमंत्रण दिलं होतं. आमची नियोजित भेट, रात्री आठ वाजता ठरली होती. सर, साडेसात वाजता मला फोन करतो म्हणाले होते. पण, त्यांचा फोन काही आला नाही. शेवटी, मला तर कधीतरी पुणेस्टेशन वरून नव्या पेठेत जाणं भाग होतं. कारण, तिथेच जवळपासच्या भागात आमची मिटिंग होणार होती. पण ठिकाण काही ठरलं नव्हतं. त्यामुळे, वेळेची बचत व्हावी म्हणून. वेळ न दवडता, मी माझ्या बाईकला किक मारली..
शनिवार वाड्याला वळसा घालून, ओमकारेश्वर मंदिराचा नदी पात्रातील पहिला टप्पा ओलांडला. आणि, थोडं पुढे गेल्यावर. नदीपात्रातील सर्कस ग्राउंडच्या थोडसं अलीकडे मी थांबून घेतलं. आणि, त्यांच्या फोनची वाट पाण्याकरिता एका बाजूला माझी बाईक पार्क केली.
नदी किनारचा रस्ता.. रस्त्यावरून वाहनांची येजा चालू होती. नुकतेच लागलेले पथदिवे लुकलुक करत होते. रंगबिरंगी विद्युत रोषणाईने आसमंत उजळला होता..
सरांचा फोन येई पर्यंत, इथेच कुठेतरी बसकण मारावी असं मी ठरवलं. आणि, नदीकिनारी असणाऱ्या एका भिंत वजा कठड्यावर मी माझं बुड टेकवलं. डोक्यावरील शिरस्त्राण काढलं, आणि त्याला बाईकच्या हेंडलला अडकवलं. डोक्यावरील रुमाल काढला, आणि त्यानेच एकवार माझा चेहेरा स्वच्छ पुसून घेतला. आता, फोन येईपर्यंत टाइमपासला साधन काय.? तर, आपला ठरलेला मोबाइल. माझ्या सेवेशी हजर होताच.
नदीकिनारी मस्तगार वारा सुटला होता. मी माझ्या मोबाईल मध्ये डोकावत होतो. अधेमध्ये एखादा खट्याळ मच्छर गुणगुण करत येऊन माझी समाधी भंग करू इच्छित होता. पण, मी त्याला सुद्धा माफ केलं. कारण, मी नदीकिनारी त्यांच्या हद्दीमध्ये बसलो होतो ना..
मी माझ्या मोबाईलवर, पोस्ट्स वाचून लाईक कमेंट करण्याच्या नादात पुरता गुरफटून गेलो होतो. परंतु, आपण टीव्ही पाहताना..
चुकून एका कोपऱ्यातून उंदराच पिल्लू गेलं. तर ते, आपल्या नजरेत बरोबर येतं. अगदी तशाच पद्धतीने. माझं लक्ष मोबाईल मध्ये असताना..
माझ्या पासून काही अंतरावर एक मुलगा त्याची बाईक एका रस्त्यावर कलती लाऊन. त्याच्या प्रेयसीशी गप्पागोष्टी करत होता. ती मुलगी, तिचे दोन्ही पाय भिंतीवर टेकवून बाईकच्या सीटवर हलकेच टेकून अलगद बसली होती. तर, हा भिडू भिंतीवर बसला होता. आणि, बोलता-बोलता अचानक आणि अनपेक्षितपणे.. त्या मुलाने, त्याच्या प्रेयसीला हॉट कीस मारला..
तशी माझी नजर, मोबाईल मधून बाहेर पडत त्या दोघांवर स्थिरावली. ते अजूनही त्याच अवस्थेत होते.. काही केल्या त्यांची समाधी भंग पावत नव्हती. कोणीतरी आपल्याला पहातंय, हे त्याच्या गावी सुद्धा नव्हतं.
तितक्यात.. त्या रोडवरून जाणारा एक वाटसरू मुलगा, त्याने सुद्धा यांचा हा प्रताप सताड डोळ्याने पाहिला होता. आणि अकस्मात, तो धक्का त्याला सहन न झाल्याने, तो सुद्धा अगदी स्तब्ध होऊन एकटक त्या दोघांची क्रिया पाहण्यात मग्न झाला होता. थोड्यावेळाने, मी माझी नजर त्या चुंबन दृश्यावरून हटवली. आणि समोर उभ्या असणार्या मुलावर रोखली. तसा तो मुलगा फारच ओशाळला, आणि.. गडबडून आल्या पावली तो तसाच मागे फिरला. आणि.. दूरवर जाऊन, तो यांच्याकडे आशाळभूत नजरेने पाहत उभा होता. कि..कधी एकदा, हि दोघं पुन्हा त्यांच्या ओठाला ओठ भिडवतील.
तो मुलगा दुरूनच डोंगर साजरे करत होता. आणि, इथे माझी चलबिचल सुरु झाली होती. नको म्हणताना सुद्धा, माझी नजर सारखी तिकडेच जायची. हा पुण्यनगरीचा नदीकिनारा आहे. कि, मुंबापुरीचा समुद्रकिनारा आहे..? मला तर काहीच कळेनासं झालं होतं. माझ्या नजरेने पाहताना, पुणं सुद्धा बरंच पुढे निघून गेलं होतं..!
त्यानंतर, त्या युगलामधील काही खट्याळ संवाद माझ्या कानी पडले.. तो मुलगा त्याच्या प्रेयसीला म्हणाला.
" चल.. आता तू एक कीस मार मला..!
" नको-नको... मी नाही जा, ( ती लाजून चूर झाली होती. )
" बघ मग.. कीस घेतला नाहीस तर मी तुला सोडणार नाही..!
शेवटी नाही होय करता.. त्या मुलीने, मुलाच्या ओठावर आपले ओठ टेकवले, आणि वरच्या वर तोंडाच्या आतील बाजूस हवा ओढत. चूर्र sssssss असा आवाज काढला.
त्यावर वैतागून तो मुलगा म्हणाला.. नुसते 'फुकारे' मारू नकोस. नायतर बघ मग तुला कसं करल..
आयला.. वातवरण भलतंच तापलं होतं. आणि, ते बोलनं सुद्धा किती मोठ्याने..!
शेवटी, मी जागच्या जागेवर उठून उभा राहिलो. आणि पुन्हा एकदा सभोवार माझी नजर पेरली. तर त्या नदीकिनारी, थोड्याफार फरकाने सगळीकडे हेच उद्योग चालू होते. शेवटी, मी स्वतःलाच म्हणालो..
मित्रा.. हि " सिंगल " ची नाही तर " कपल " ची जागा आहे.
या जागेतून, आपण लवकरात लवकर फारकत घेतलेली बरी. असं म्हणून, त्या ठिकाणाहून मी ताबडतोब पोबारा केला..!!

No comments:

Post a Comment