Sunday, 16 October 2016

आज.. एक गम्मतच झाली..
काल दसरा, आज मोहरम..अशा लागोपाठ दोन सरकारी सुट्ट्या आल्या,
खरं सांगायला गेलं तर. कामाच्या माणसाला सुट्ट्या नकोशा वाटतात. रोजची कामाची सवय, त्याच्या अगदी अंगवळणी पडलेली असते. आणि या गोष्टी, वेळेनुसार आपसूक घडत असतातच.
कालचा दिवस, वाहन खरेदी आणि पूजा अर्चा करण्यात निघून गेला. पण आजचा दिवस, मला सरता सरत नव्हता. दुपारपर्यंत मी कशीतरी टंगळ मंगळ केली. आणि अचानक, मला एक काम आठवलं. बरेच दिवस झाले, माझं एक काम पेंडिंग पडलं होतं.
आमच्या सोसायटीच्या लोखंडी गेटला रंग द्यायचा होता. आणि, त्या कामाकरिता मला काही वेळ मिळत नव्हता. किंवा दर रविवारी काहीतरी काम निघत असल्याने. ते काम फारच लांबणीवर पडलं होतं. तुम्हाला म्हणून सांगतो, घरातील अशी छोटी मोठी कामं करायला मला खूप आवडतं.
लोखंडी गेटसाठी.. सिल्वर कलर, स्पंच, ब्रश, थिनर असं सगळं सामान मी दोन महिन्यांपूर्वीच घरी आणून ठेवलं होतं.
आणि आज.. चांगला मुहूर्त सुद्धा मिळाला होता. माझ्याकडे भरपूर वेळ सुद्धा होता. आणि माझी सुट्टी सुद्धा फळाला येणार होती. त्यामुळे, बिलकुल वेळ न दवडता मी ताबडतोब कामाला लागलो.
सुरवातीला.. अंगावर रंग उडून कपडे खराब होऊ नये. म्हणून ठेवणीतील जुने कपडे मी अंगावर चढवले. सुट्टीचा दिवस असल्याने, आळसाने आज मी दाढी सुद्धा केली नव्हती. त्यामुळे, माझा अवतार अगदी प्रोफेशनल पेंटर सारखा दिसत होता. दुपारची वेळ, सगळीकडे सामसूम झाली होती.
आणि मी माझ्या कामाला सुरवात केली.
बघता-बघता लोखंडी गेट सिल्वर रंगाने उजळून आणि चकाकून निघायला लागलं होतं. तासाभरात, माझं एका बाजूचं गेट रंगवून झालं. आता अशा नको त्या कामाची सवय मला उरली नाहीये ना, त्यामुळे माझी पाठ आणि हात थोडा अवघडला होता. त्यामुळे, थोडासा आराम केला, पाणी वगैरे पिलं. आणि, पुन्हा दुसरं गेट रंगवायला मी सुरवात केली.
घरचं काम असल्याने, अगदी तल्लीन होऊन आणि मन लाऊन मी गेटला रंग देत होतो. तितक्यात, रस्त्यावरून जाणारी एक बाई माझ्यापाशी आली. आणि मला म्हणाली..
तुम्ही रंग देण्याची कामं करता का..?
मी मान वर करून त्या महिलेकडे पाहिलं, ती बाई काही माझ्या ओळखीची नव्हती.
थोडीशी गंमत करावी असं ठरवून, मी त्या बाईला म्हणालो..
हो.. रंगाची कामं करतो मी..!
त्यावर, ती बाई म्हणाली..
आमच्या सोसायटीच्या गेटला पण असाच चंदेरी रंग द्यायचा आहे. ते काम करताल का तुम्ही..?
मी तिला ताबडतोड,
हो.. करतो ना म्हणालो, आणि तिला विचारलं, कुठे आहे तुमची सोसायटी..?
ती महिला म्हणाली..
ते पलीकडे उद्यमनगर मध्ये चार फ्ल्याटची एक छोटी सोसायटी आहे आमची. तुम्ही आत्ता रंगवताय येवढच छोटं गेट आहे आमच्या सोसायटीचं. त्याचे किती पैसे घेणार तुम्ही..?
ती बाई, सगळं काही अगदी एका दमात बोलून गेली होती. तिची फिरकी घ्यावी, या हिशोबाने मी तिला म्हणालो.
" दहा हजार रुपये होतील बघा एका गेटचे..! "
यांच्याकडून सुद्धा, मी तितकेच पैसे घेतले आहेत. वाटल्यास कधी विचारून पहा तुम्ही येथील लोकांना.
दहा हजाराचा आकडा ऐकून ती महिला अगदी अवाकच झाली. आणि म्हणाली,
दहा हजार कशाला लागतायेत हो. त्या रंगात काय तुम्ही चांदीचं पाणी टाकलय कि काय..?
मला तर, अनपेक्षितपणे आयातंच बोल भांडवल मिळालं होतं.
मी त्या महिलेला म्हणालो, तुम्हाला कसं कळालं, कि मी या रंगामध्ये खर्याखुर्या चांदीचं पाणी सुद्धा मिसळत असतो म्हणून..?
आता मात्र, ती महिला फारच चकित झाली होती. आणि, आवक होऊन तिने तिच्या तोंडाचा आ वासला होता.
पुन्हा.. मीच त्या बाईला म्हणालो,
बोला कधी करायचं काम..! रंग माझा मेहेनत माझी. फक्त दहा हजार रुपये द्या. तुमच्या सोसायटीचं गेट सुद्धा चांदीचं आणि चकाचक करून सोडतो बघा.
त्यावर ती बाई म्हणाली..
एवढा मोठा खर्च म्हणल्यावर सोसायटी मधील बाकी लोकांना पण विचारावं लागेल हो.
मी म्हणालो, बघा विचारून ठेवा.. आणि तसं मला कळवा.
त्यावर ती बाई म्हणाली, तुमचा पत्ता आणि फोन नंबर देऊन ठेवा ना मला.
त्यावर मी त्या महिलेला म्हणालो,
फोन नंबर कशाला..
हे काय.. या सोसायटीतील दुसऱ्या मजल्यावर माझा फ्ल्याट आहे. तिथे मी राहत असतो.
माझं हे वाक्य ऐकताच, ती बाई भलतीच गडबडून गेली. तिला लगेच कळून चुकलं. कि आपला राँग नंबर लागला आहे.
हा व्यक्ती, या बिल्डींग मध्ये राहणारा व्यक्ती आहे. आणि, एक विरंगुळा म्हणून तो हे काम करत असावा. हा सगळा प्रकार घडल्या नंतर,
मी त्या महिलेकडे छद्मी चेहेरा करून पाहत होतो. आणि ती बिचारी महिला तर पक्की ओशाळून गेली होती. त्यानंतर, अचानक माझी बायको घरातून खाली आली. आणि, नेमका तिने हा प्रकार पाहिला,
ती लगेच म्हणाली.. अहो, काय पाहिजे त्या बाईला. काय म्हणतेय ती..?
माझ्या बायकोचा हा पवित्रा पाहून, त्या बाईने झपाझप पावलं टाकत समोरच्या दिशेने चालायला सुरवात केली. ती बाई बरीच दूर निघून गेली, पण त्यानंतर, पुन्हा काही तिने मागे वळून पाहिलंच नाही.
आणि मी सुद्धा, पुन्हा.. दुसरं एखादं गिर्हाईक येण्या अगोदरच माझं काम आटोपतं घेतलं.
आणि, माझ्या बायकोला घडलेलेला सगळा समाचार सांगत. दुसऱ्या मजल्यावरील माझ्या घरचा रस्ता धरला.
शमी पत्रांनाही, सोन्याचा मान दयावा..
असा दसरा सण, 
फक्त भारत वर्षात व्हावा..!!
दांडिया खेळताना. सर्व भागात ती एकच कॅसेट हमखास वापरात येत असावी, असं माझं ठाम मत आहे. मी कोणत्या कॅसेट विषयी बोलतोय ते तुम्हाला समजलं असेलच.
" दय्या रे दय्या रे चढ गयो पापी बिछुवा "
कारण आजही, दुसऱ्या कोणत्याही नवीन कॅसेट मधील रिमिक्स गीतांवर. म्हणावं असं, मनभरून नाचू खेळू वाटत नाही. किंवा, तसा जल्लोष किंवा उत्साह सुद्धा निर्माण होत नाही. त्यामुळे, त्या कॅसेटचा निर्माता ती एकच कॅसेट विकून आजवर अब्जोपती झाला असावा. असा माझा गोड समज आहे.
जवळ-जवळ सत्तावीस वर्ष झाली. मी स्वतः दांडिया खेळत असताना, हि एकच कॅसेट ऐकत आलोय. आणि, त्यावर दांडिया सुद्धा खेळत आलोय. विविध दर्जेदार हिंदी सिने गीतांचा भरणा असणाऱ्या या सीडीमध्ये, ( आता.. आपण तिला सीडी म्हणूयात. कारण आता कॅसेटचा जमाना उरला नाहीये. ) एक वेगळाच संचार होता. या सर्व गोष्टी फार जुन्या असतील, पण, माझ्या आठवणी मात्र आजही अगदी जशाच्या तशा आणि ताज्या टवटवीत आहेत.
कारण.. त्या नव्वदीच्या दशकात, आमच्या भागात, दांडिया हा खेळ प्रकार सुरु करणारा मी पहिला मुलगा होतो. थोडक्यात, त्या खेळाचा आमच्या भागातील मी संस्थापक आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही. त्यावेळी..तो खेळ नव्याने सुरु करण्यात मला माझ्या बऱ्याच मित्रांची अमुल्य साथ लाभली. कारण, हा खेळच तितका गुणी आहे. आणि, त्याकाळी तरुण पिढीच्या मौज मजेसाठी कोणीतरी पुढाकार घेणं फार महत्वाचं सुद्धा होतं. ते योगदान माझ्या हाथुन घडलं.
तसं पाहायला गेलं तर.. हा मारवाडी किंवा गुजराती खेळ.
त्यात.. आमच्या तरुणपणी,
आज जसे गल्लोगल्ली रास दांडियाचे खेळ भरवले जातात. तसा, बिलकुल विषय नव्हता.
त्यावेळी, फक्त गुजर मारवाड्यांच्या किंवा हाय फाय लोकांच्या कॉलनी मध्येच हा खेळ खेळला जायचा.
त्यावेळी महत प्रयासाने.. माझ्या एखाद्या मारवाडी मित्राला वशिला लाऊन. कसंबसं.. आम्हा, चार पाच मित्रांना त्या दांडिया ग्रुपमध्ये खेळायला परवानगी मिळायची.
कारण, तिथे खेळत असणारे सगळे लोकं गुजर मारवाडी किंवा अगदीच हाय फाय असायचे. आणि, त्यात आवडीने अतिक्रमण करणारी आम्हीच काय ती मोजकी मराठी मुलं.
काय सांगू तुम्हाला..
त्या रंगीबेरंगी गोतावळ्यात दांडिया खेळत असताना. एकतर, आम्हा सगळ्या मित्रांना आभाळ ठेंगण झालेलं असायचं. त्यात कमी कि काय म्हणून, आमचे काही मित्र त्या रिंगणा बाहेर सुद्धा असायचे. त्यामुळे, आम्हाला आणखीनच चेव चढायचा.
रिंगणात आमच्या समोर दांडिया खेळत असणाऱ्या गोऱ्या गोमट्या, चिकण्या चोपड्या, मुली सुद्धा खूप एकसे बढकर एक असायच्या.
त्यांना पाहून.. विनाकारणच " मेरा नंबर कब आयेगा..? " असंच काहीतरी मनात चालू असायचं. दांडिया खेळताना, आमचंच काय सर्वांचं लक्ष अगदी चौफेर असायचं.
तर.. या रिमिक्स दांडिया गीतांवर पाय थिरकत असताना.
अचानक..
" प्यार का.. दर्द है.. मिठा-मिठा, प्यारा-प्यारा "
हे गीत लागल्यावर, आपल्या समोर दांडिया खेळणारी एखादी सुंदर अप्सरा असेल. तर आम्ही, तिच्या मादक नजरेत नजर मिळवत विनाकारण तिच्या प्रेमभऱ्या होकाराची पोचपावती मिळवण्याचा लटका प्रयत्न करायचो. ती सुंदरी सुद्धा, मस्त मूडमध्ये नाचत असताना.
आम्हाला.. एखादी मदभरी स्माईल अगदी फुकट देवून जायची. आणि या खेळात, ते.. स्वाभाविक आणि नैसर्गिक सुद्धा असायचं. पण, त्यावेळी अशा गोड गुलाबी स्माईली पाहून आमच्या पोटात मात्र भयंकर मोठा गोळा उठायचा.
हा खेळ चालू असताना, तिच्या एका मधभऱ्या झलकेमुळे आम्हाला तर त्या ठिकाणी अगदी जग जिंकल्याचा फील यायचा.
पण.. दांडिया संपल्यावर आम्हाला समजायचं.
ते पाखरू, कोण्या दुसऱ्याच फांदीवरचं असायचं.
आणि, सरतेशेवटी हा खेळ संपल्यावर.. त्या तरुण मुलाच्या खांदा नामक फांदीवर ती तरुणी आपली मान आणि डोकं ठेवून, त्याच्या गळ्यात हाताची वरमाला घालत, लाडीक अंदाजात आमच्या समोरून जेंव्हा चालती व्हायची.
तेंव्हा..
" दिलके तुकडे, तुकडे करके मुस्कुराके चल दिये. "
या गीताची, अगदी तीव्रतेने आठवण व्हायची.

सर्वांसाठी, बुद्धीला चालना देणारं एक भयंकर कोडं..
आटपाट नगरात, एक राजा आणि त्याची पट्टराणी सुखा समाधानाने राज्य करत असतात. सगळी प्रजा गुण्यागोविंदाने नांदत असते, पण राजाला एक गोष्ट फार खटकत असते..
ते म्हणजे, त्याच्या राणीचं असणारं श्वान प्रेम..!
राणीने, माहेराहून आणलेलं एक श्वानाचं लहान पिल्लू..
ती राणी, त्या कुत्र्याच्या पिल्लात फारच गुरफटून गेलेली असते. ती त्या पिल्लाला इतका जीव लावत असते. कि, महालात महाराज आले काय आणि गेले काय. याची सुद्धा तिला शुद्ध राहत नव्हती. इतकं भयंकर प्रेम त्या कुत्र्यावर ती करत असते.
त्यामुळे.. महाराज, तिच्या या स्वभावाला फार त्रासलेले असतात.
या कुत्र्याचा बंदोबस्त केल्याशिवाय मला चैन पडणार नाही. असा, त्यांनी विडाच उचललेला असतो. आणि, ते सदैव त्याच चिंतेत असत.
एकदा.. प्रधान त्यांना त्यांच्या चिंतेचं कारण विचारतात.
महाराज सुद्धा, आपली सगळी कर्मकहाणी त्यांच्यासमोर कथन करतात. प्रधान सुद्धा चिंतेत पडतात, आता करावं तरी काय..?
त्यावर, प्रधानजी महाराजांना एक युक्ती सुचवतात..!
महाराज, राणी साहेबांच्या अनुपस्थितीमध्ये आपण या कुत्र्याचा काटा काढूयात.
या कल्पनेने, महाराज सुद्धा खूप खुश होतात.
पण हे सगळं करायचं कसं..? कारण, हे बिंग फुटलं तर राणी साहेबा राजावर रुसून बसणार. त्यामुळे, सगळं काम अगदी सावधानतेने करावं लागणार होतं. आणि, हे काम आता प्रधानमंत्री पार पाडणार होते.
बराच विचार केल्यानंतर, त्यांना एक युक्ती सुचली.
कि.. राजमहालात येऊन या कुत्र्याला जो कोणी व्यक्ती जीवे मारेल. त्याला, एक लाख सुवर्णमुद्रा देण्यात येतील. अशी गुपचूपणे दवंडी पिटवण्यात आली.
आणि त्या कुत्र्याला मारल्या बरोबर त्या व्यक्तीचा सुद्धा खात्मा करण्यात येईल. अशी दवंडी दिली गेली.
बरेच दिवस गेले.. पण हा पैजेचा विडा उचलायला कोणीच तयार होत नव्हतं. कारण, कुत्रा मारल्या नंतर त्या पैज कर्त्याला सुद्धा मरनं अटळ होतं. आणि, आपल्या जीवाची बाजी द्यायला कोण तयार होणार..? हा फार मोठा प्रश्न त्या राज्यात आ वासून बसला होता. सोन्याच्या मोहोरांसाठी जीवाची बाजी कोण लावणार.! असे बरेच दिवस गेले, आणि..
शेवटी, तो दिवस उजाडला..
एकेदिवशी, एक व्यक्ती राज महालात आला. आणि त्याने हा पैजेचा विडा उचलला. पण, कुत्र्याला मारणाऱ्या व्यक्तीकडून सुद्धा, राजाला एक भयंकर अट घालण्यात आली.
" त्या कुत्र्याला, मी ज्या पद्धतीने मारेल. अगदी त्याच पद्धतीने मला सुद्धा मारण्यात यावं..! "
राजा आणि प्रधानाने, त्या व्यक्तीची हि अट बिनशर्त मान्य केली..
आणि, एकेदिवशी..
राणीच्या अपरोक्ष, शयनगृहात त्या व्यक्तीने सर्वांसमक्ष कुत्र्याला ठार मारलं.
राणीचा आवडता कुत्रा, राजा आणि प्रधाना समोर निपचित मरून पडला होता. राणी आक्रोश करत होती. परंतु, त्या व्यक्तीने कुत्र्याला ज्या कोणत्या पद्धतीने ठार मारलं होतं.
अगदी त्याच पद्धतीने, राजा आणि प्रधान त्या व्यक्तीला ठार मारू शकत नव्हते. किंवा, तशा प्रकारचा दंड ते त्याला देऊ शकत नव्हते..!
तर मग..
त्या व्यक्तीने, कुत्र्याला कोणत्या आणि कशा पद्धतीने मारलं असावं..?
( हि पोस्ट..भावनिक न होता, फक्त एक कोडं म्हणून वाचावी. )

काही व्यक्ती गुठ्का खात असतात, हि गुठ्क्याची एक पुडी साधारण दहा ते पन्नास रुपयांपर्यंत असते. काही लोकं सिगारेट पित असतात, ह्या वेगवेगळ्या ब्रांडच्या सिगारेट्स किमान दहा रुपये ते त्यापुढे असतात. तर काही लोकं, दारू पित असतात..
आता, या दारूचे भाव मी न सांगितलेलेच बरे..
तर.. गुठ्का खाणाऱ्या व्यक्ती, दिवसातून किमान तीन चार गुठ्क्याच्या पुड्या तरी नक्की खात असतील. आणि, जवळपास.. शे दोनशे रुपये नक्कीच थुंकून देत असतील. तर..सिगारेट पिणारा व्यक्ती सुद्धा, रोजच्याला शे दोनशे रुपयाचा धूर करत असतो. आणि, दारू पिणारा व्यक्ती..
रोजच्याला, स्वतःला किमान दीड दोनशे रुपयाला तरी नक्कीच चुना लावून घेत असतो.
आता तुम्ही म्हणाल.. हे सगळं हा व्यक्ती आम्हाला का म्हणून सांगतोय..?
तर मित्रांनो, प्रत्येकाची व्यसनं प्रत्येकाला लखलाभ असोत. मला त्याबद्धल काहीएक म्हणायचं नाहीये. कारण, मी सुद्धा काही धुतल्या तांदळाचा नाहीये.
परंतु, सर्व मित्रांना माझी एक हात जोडून विनंती आहे.
आपण सगळे जन, रोजच्या रोज असे शेकडो रुपये व्यसनासाठी उडवत असतो. त्याचं आपल्याला काहीएक सोयरसुतक नसतं.
तर मित्रांनो, जमल्यास तुम्ही एक काम नक्की करा..
रोजच्या प्रवासात, तुम्ही सिग्नलवर थांबले असता. तुमच्यासमोर एखादी लहान मुलगी, मुलगा किंवा एखादा अपंग व्यक्ती..
हातामध्ये, मोगऱ्याचा किंवा पिवळ्या चाफ्याचा गजरा घेऊन विक्री करण्यासाठी धडपडत असेल. तर, तुम्ही त्याला बिलकुल नाऊमेद करू नका. त्यांच्या, छोट्याशा व्यवसायाला एक छोटासा हातभार तुम्ही नक्की लावत चला.
तुम्हाला.. फुलांची आवड नसली तरीही, तुम्ही त्यांचा तो दहा वीस रुपयाचा गजरा विकत घ्याच.
काही नाही तर, तो गजरा तुमच्या ऊंची कारमध्ये एक मंद धुंद आणि तुम्हाला हवाहवासा सुगंध नक्कीच निर्माण करेल. हे मी तुम्हाला पैजेवर सांगू शकतो. आणि हो, गजरा खरेदी करते वेळी एक गोष्ट मात्र तुम्ही पाहायला विसरू नका.
तो गजरा खरेदी करतेवेळी, त्या लहान मुला मुलीच्या किंवा त्या अपंग व्यक्तीच्या चेहऱ्यावर तुम्हाला एक फार मोठा आनंद पाहायला मिळेल.
तो आनंद किती मोठा असतो,
ते मी.. तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. त्याकरिता माझे शब्द सुद्धा खूप तोकडे पडतील.
त्याचा, एकवार तुम्ही अनुभव घ्याच.
बाईकवर स्वार असणाऱ्या माझ्या मित्रांनी सुद्धा, आपल्या बायको किंवा प्रेयसीसाठी हा गजरा अवश्य विकत घ्या. बघा, हा गजरा पाहताच तिच्या गालावर नक्कीच एक गोडशी कळी खुलेल. आणि, आनंदाने ती तुमच्या बाहूत विसावेल..
हे सगळं, मी तुम्हाला का सांगतोय माहित आहे का..?
कारण, त्या गजर्याच्या फुलांचं आयुष्य अगदी जेमतेम दोन चार तासांचं असतं.
जर.. ते गजरे कोणी विकत घेतले नाहीत ना.
तर ती मुलं, हताश होऊन ते गजरे अक्षरशः सिग्नलच्या खांबाला अडकवून घरी निघून जात असतात. हे मी, माझ्या डोळ्याने पाहिलं आहे. एखाद्या गरीब व्यक्तीच्या घरातील चूल पेटण्यासाठी मदतनीस व्हायला आपल्याला काय हरकत आहे..!
परमेश्वराच्या चरणी फुलांचं निर्माल्य होत असतं..
मित्रांनो, तुम्हाला संधी मिळाली आहे.
कलियुगातील " परमेश्वर " होण्याची हि संधी तुम्ही बिलकुल दवडू नका..!
लफडी करणं काही सोपं काम नसतं..
या प्रकरणात.. कोणा एकाला दोष न देता, स्त्री आणि पुरुष दोघेही अगदी तितकेच दोषी असतात.
काही स्त्री, पुरुष या अनैतिक संबंधांना नैतिक रूप आणि एकमेकांना आधार देत. आयुष्याचे खरे जोडीदार बनलेले सुद्धा पाहायला मिळतात. तर काही लोकं, एकमेकाच्या संसाराची अगदी राख रांगोळी करून मोकळे झालेले सुद्धा पाहायला मिळतात.
माझ्या पाहण्यात, अशी बरीच.. बरी, वाईट उदाहरणं आली आहेत.
माझ्या पाहण्यातल्या एका रूपगर्वीतेणे, बऱ्याच व्यक्तींना तिच्या जाळ्यात ओढलं. आणि, त्यातील प्रत्येक व्यक्तीला तिने अगदी बरबाद करून सोडलं. मी त्या बाईला दोष देत नाहीये. कारण सगळी चूक हि पुरुषांचीच असते. तो तिच्यावर फिदा नसता झाला, तिच्या मागे लागला नसता, तर हि काय त्याच्या घरी येणार होती का..? कारण, आपला पुन्हा तोच जुना डायलॉग..
कोही हसीना कदम पहेले बढाती नही, मजबूर दिलसे ना हो तो पास आती नही..
तर..ती बाई इतकी भयंकर होती, कि तिचा नवरा सुद्धा तिच्या सोबत टिकला नाही. तिचं काम एकच, धनाढ्य पुरुषांना आपल्या जाळ्यात ओढायचं. सुरवातीचे नव्याचे नऊ दिवस सरले, कि त्या संभाव्य व्यक्तीकडून अवास्तव मागण्या करायला सुरवात करायची. आणि, त्या व्यक्तीने तिच्या मागण्या पुरवल्या नाही. तर ती सरळ, त्याला त्याच्या घरी येण्याची धमकी द्यायची. आणि, तुझ्या बायको मुलांसमोर तुझी सगळी पोलखोल करेल म्हणायची.
अगदी नंगड बाई हो, अशाने तो मनुष्य चांगलाच कचाट्यात सापडायचा. अब्रुनुकसानीला घाबरून ती लोकं तिच्या हव्या त्या मागण्या मान्य करायचे. अशाप्रकारे..त्या महिलेने, विविध प्रकारच्या उच्चभ्रू लोकांना लाखो रुपयांना गंडा तर घातलाच. पण माझ्या पाहण्यातल्या एका गरीब व्यक्तीला, त्याचा पिच्छा सोडण्यासाठी तिने त्याच्याकडे चक्क एका चारचाकी गाडीची मागणी केली. आणि, ती मागणी त्या व्यक्तीला मान्य सुद्धा करावी लागली. त्या बाईला कर्ज काढून याने एक चारचाकी गाडी घेऊन दिली, आणि आता.. तो मात्र भाड्याच्या सिंगल रूम मध्ये राहत आहे. पण त्याचं नशीब मोठं, कि येवढा मोठा पैसा खर्च करून समाजातील मानहानीकारक वागणुकीला आणि घरातील स्वतःच्या ( खोट्या ) सशुद्ध चारित्र्याला तो अबाधित तरी राखू शकला.
तर दुसऱ्या प्रकरणात, माझ्या ओळखीतल्या एका सुंदर दिसणाऱ्या ड्रायव्हर मुलाने. एका मोठ्या कंपनीच्या कारवर काम करत असताना. कामानिमित्ताने साहेबांच्या घरच्या वाऱ्या करून, त्यांच्या घरची सगळी कामं करून. अगदी, हरकाम्या म्हणून त्या कंपनीत आणि घरात दिवस काढले. आणि काही दिवसात.. त्याने चक्क त्या कंपनीच्या मालकिणीलाच पटवलं. कंपनीचा साहेब कामात पुरता अडकलेला असायचा, त्यामुळे.. त्या महिलेने आणि या मुलाने चांगलाच डाव साधला.
मग काय सांगायचं... हि साधारण वीसएक वर्षांपूर्वीची घटना आहे.
त्यावेळी त्या मुलाचा रुबाब काहीतरी वेगळाच हो. अगदी उंची राहणीमान हातभट्टी पिणारा गडी आता स्कॉच शिवाय दारूचं नाव घेत नव्हता.
ती मालकीण बाई त्याच्यावर जाम फिदा झाली होती. ती, त्याला लागेल तितका पैसा पुरवायची. त्याकाळी, त्याच्या घरात नको ती वस्तू होती. पण, या गोष्टीची आम्हा कोणालाच काही खबरबात नव्हती.
वर्षा दोन वर्षानंतर या मुलाची डेरिंग खूपच वाढू लागली. तो त्या महिलेला नको त्या अवास्तव मागण्या करू लागला. शेवटी तिला सुद्धा कोणी विचारणारा असेल कि नाही. याचा बिलकुल विचार न करता, हा गडी..कधी कधी तर दारू पिऊन तिच्या घरी जाऊ लागला.
या मुर्खाला.. मुंगी होऊन साखर खाता आली नाही. याने चक्क सोन्याचं अंडं देणारी कोंबडीच कापायला सुरवात केली. हा तिला विनाकारण ब्लेकमेल करू लागला. शेवटी ती सुद्धा कंपनीची मालकीण होती. आणि एके दिवशी, तिने रचलेल्या सापळ्यात तो अलगद सापडला. तो तिला, दारू पिऊन त्रास करत असताना घरातील सीसी टीव्हीत रंगेहात पकडला गेला. हि खबर मालका पर्यंत पोहोचली. बाईने.. मी नाही त्यातली चा खोटा आव आणला. मग काय, त्या मालकाने नोकरांकरवी त्याला कुत्र्या सारखा बडवला, आणि पोलिसात सुद्धा दिला. नोकरी गेली, सोबत छोकरी सुद्धा गेली. सगळा दोष त्याच्यावर टाकून ती बाई नामानिराळी झाली. त्यात तिचा काहीच दोष नव्हता. ज्याचा माज त्याला नडला होता. या नको त्या प्रकारातून, कदाचित ती मालकीणबाई सुद्धा नंतर शहाणी झाली असावी.
तर.. अशा प्रकरणात हि अशी दोन प्रकारची विविध अंग आपल्याला पाहायला मिळतात. कसा वाटला तुम्हाला हा लफड्या लफड्या मधील विसंगत असा विरोधाभास..
उगाच नाही म्हंटलं गेलं.
ये इश्क नही आसान.
आणि, असली लफडी तर त्याहून भयंकर कठीण..!
काही लोकांना बोलताना अशी सवय असते. कि त्यांना ज्या गोष्टी विषयी विचारणा करायची असेल. त्याला ते दोनदा उच्चारतात. पण जरा विचित्र पद्धतीने. म्हणजे, ते उच्चारनाऱ्या पहिल्या शब्दाचा दुसऱ्या शब्दाशी काडीमात्र संबंध नसतो.
उदा :- जेवण, बिवन झालं कि नाही...!
आता यातील जेवण ठीक आहे. पण, बिवन या शब्दाचा अर्थ लागत नाही. पण काही लोकं सर्रास असंच बोलताना आढळतात.
आणि.. बोली भाषेतला तो विशिष्ट शब्द कोणताही असुध्यात. पण त्यापुढे येणारा दुसरा प्रतीशब्द हा बिनदिक्कत फक्त " बी " या मुळाक्षरानेच सुरु होतो..
उदा :- झोप, बीप. काम, बीम. जाऊ, बिऊ. मारतील, बिरतील.. इत्यादी.
हीच मात्रा.. हिंदीमध्ये, व, वा किंवा वी ने सुरु होते.
उदा :- खाना, वाना. निंद, विंद. जाणा, वाना. मारणा, वारणा..
पण कधी कधी.. मराठी मधील शब्द उच्चारत असताना. तोच-तोच प्रत्यय समोर येतो..!
बिघडेल, बिघडेल. बिळात, बिळात. बियर, बियर. इत्यादी.
हा सगळा, " ब " आणि " व " चा खेळ आहे.
त्या शहराचं नाव " बिहार " जरी असलं. तरी त्याला मराठीत " विहार " असंच म्हंटलं जातं.
आणि , रामायणातला " वाली " हिंदीमध्ये " बाली " म्हणून ओळखला जातो..!!
कशी वाटली हि शाब्दिक गंमत जम्मत..!!
खरं तर..
प्रत्येक गोष्ट कशी, अगदी वेळेत व्हायला हवी..!
शाळेमध्ये कधीही अनुत्तीर्ण न होता, अगदी व्यवस्थितपणे शिक्षण पूर्ण व्हायला हवं. त्यानंतर, ठराविक वेळेतच नोकरी किंवा व्यवसाय सुरु व्हायला हवा. सुरवातीपासून खस्ता खात सुरु झालेला व्यवसाय किंवा नोकरी, जीवनाचा खराखुरा आनंद आपल्याला बहाल करतो. त्यानंतर, ठराविक वेळेत होणारं लग्न. आपल्या मनाप्रमाणे आवडणारी एखादी मुलगी आपल्या आयुष्यात येणं. हि एक, फार मोठी जमेची बाजू असते. त्यानंतर, सुखी आणि समाधानी जीवनाचा पुरस्कार म्हणजे. त्या संसार वेलीवर बहरणारी फुलं. आता, हि फुलं किती असावीत. हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.
तर, प्रत्येक स्त्री पुरुषाच्या जीवनात हि सिक्वेन्स अगदी जशीच्या तशी पार पडतेच असं नाही.
नाही म्हणता, काही भाग्यवान लोकं सुद्धा ह्या यादीमध्ये नक्कीच असतील. तर काही जन, प्रत्येक गोष्टीत झगडत, भयंकर काथ्याकुटीनंतर. हे सगळं, काही वेळेनंतर थोड्या उशिराने साध्य करतात. अशा मंडळी, जीवनात बऱ्याच अंशी मला उदास वाटल्या आहेत.
सगळं काही त्यांच्या पदरी असतं. पण ते सर्व, आपल्याला हव्या त्या वेळेवरच का मिळालं नाही..? हा हट्ट, ते आपल्या मनात धरून बसलेले असतात. अशा वागण्याने, त्यांना साध्य तर काहीच होणार नसतं. पण या हट्टीपणामुळे, आपण आपल्या आयुष्यात आलेले आनंदी क्षण नकळत गमवून बसत असतो. आणि सोबतच, आपल्या सहचारिणीला आणि मुलाबाळांना सुद्धा निराश करत असतो. याचं मुळी त्यांना भानच राहत नसतं. हे सगळं ठरवून जरी होत नसलं, तरी ते होऊ नये. त्याकरिता, काही उपाययोजना आखणं खूप जरुरी असतं. आणि हा नियम प्रत्येकाने अगदी काठेखोरपणे पाळायला हवा आहे.
तर, याविरुद्ध एक दुसरी बाजू सुद्धा आहे. योग्य वयात सगळं काही पार पडत असताना. अचानकपणे कामा धंद्यात बरकत मिळून, अवाजवी रक्कम आपल्याकडे येते. त्यावेळी, तो मनुष्य चुटकीसरशी सगळं जग, सगळी सुख समाधानं आपल्या पायाशी घेऊन येतो. व्यवसाय, बंगला, गाडी, नोकर चाकर अगदी सगळी सुखं त्याच्यासमोर हात जोडून उभी असतात. सगळं काही त्याने उपभोगलेलं असतं. आता जीवनात नव्याने करण्यासाठी त्याच्याकडे काहीएक पर्याय शिल्लक उरलेला नसतो.
आता पुढे काय..?
हा प्रश्न त्याला सतत भेडसावत असतो. तो मानसिक समाधानाला कधीचा पारखा झालेला असतो. तो त्याच्या आयुष्याचा सगळा सार ऐन चाळीशीतच उपभोगुन बसलेला असतो. अशावेळी, आता काय करावं..? हे त्याला सुचत नसतं. हे सगळं सुख समाधान अगदी क्षणभंगुर आहे, याची त्याला पूर्ण जाणीव झालेली असते. आणि आता, तो खऱ्या आनंदाच्या शोधात निघालेला असतो. पण ते काही त्याला सहजासहजी मिळत नसतं. त्यामुळे, तो पुरता हतबल झालेला असतो. आणि हा क्षण त्याच्या जीवनातला सगळ्यात कठीण काळ असतो. अशावेळी योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने काही लोक मानसिक रुग्ण झालेले सुद्धा मी पहिले आहेत. तर काही लोकांनी, या निराशेच्या पोटी आपल्या जीवनाचा अंत सुद्धा करून घेतला आहे. तर काही लोकं, हे सगळं सुख सोडून आध्यात्मिक वाटेने मार्गक्रमण करताना सुद्धा मी पाहिल्या आहेत.
जीवन हा " विषय " म्हणावा इतका " सोपा विषय " नाहीये.
मनुष्यप्राणी उद्या मध्ये गुरफटून पडला. कि त्याचा वर्तमानकाळ नेमका कसा असेल याबाबत काही सांगता येऊ शकत नाही. उद्याच्या मागे नक्कीच पडावं, पण त्याला सुद्धा काही मर्यादा आहे. सुरवातीला आपल्या गरजा कमी होत्या.. " अन्न, वस्त्र आणि निवारा. "
पण.. या तिन्ही गोष्टीत आपण दिवसेंदिवस आधुनिकता आणत गेलो. आणि नेमका
तिथेच सगळा समतोल ढासळला. आला दिवस जाणार आहे, चोच आहे त्याला दाना मिळणार आहे. म्हणून, जास्तीची काळजी न करता. आला दिवस आनंदात घालवा. सुखासमाधानाने आयुष्य व्यथित करा. जीवनाचा खराखुरा आनंद लुटा.
वीतभर पोटासाठी करा, परंतु..चोरासाठी बिलकुल करून ठेवू नका..!
तुझ्या आठवणीची गणितं, सुटता सुटत नव्हती.
केवळ नाईलाज म्हणून, इतिहासाकडे वळालो.
पुन्हा तुझाच इतिहास आठवून, तुझ्या मध्येच रमलो.
आणि या न त्या कारणाने, मी मात्र " ऐतिहासिक " ठरलो.