Sunday, 16 October 2016

दांडिया खेळताना. सर्व भागात ती एकच कॅसेट हमखास वापरात येत असावी, असं माझं ठाम मत आहे. मी कोणत्या कॅसेट विषयी बोलतोय ते तुम्हाला समजलं असेलच.
" दय्या रे दय्या रे चढ गयो पापी बिछुवा "
कारण आजही, दुसऱ्या कोणत्याही नवीन कॅसेट मधील रिमिक्स गीतांवर. म्हणावं असं, मनभरून नाचू खेळू वाटत नाही. किंवा, तसा जल्लोष किंवा उत्साह सुद्धा निर्माण होत नाही. त्यामुळे, त्या कॅसेटचा निर्माता ती एकच कॅसेट विकून आजवर अब्जोपती झाला असावा. असा माझा गोड समज आहे.
जवळ-जवळ सत्तावीस वर्ष झाली. मी स्वतः दांडिया खेळत असताना, हि एकच कॅसेट ऐकत आलोय. आणि, त्यावर दांडिया सुद्धा खेळत आलोय. विविध दर्जेदार हिंदी सिने गीतांचा भरणा असणाऱ्या या सीडीमध्ये, ( आता.. आपण तिला सीडी म्हणूयात. कारण आता कॅसेटचा जमाना उरला नाहीये. ) एक वेगळाच संचार होता. या सर्व गोष्टी फार जुन्या असतील, पण, माझ्या आठवणी मात्र आजही अगदी जशाच्या तशा आणि ताज्या टवटवीत आहेत.
कारण.. त्या नव्वदीच्या दशकात, आमच्या भागात, दांडिया हा खेळ प्रकार सुरु करणारा मी पहिला मुलगा होतो. थोडक्यात, त्या खेळाचा आमच्या भागातील मी संस्थापक आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही. त्यावेळी..तो खेळ नव्याने सुरु करण्यात मला माझ्या बऱ्याच मित्रांची अमुल्य साथ लाभली. कारण, हा खेळच तितका गुणी आहे. आणि, त्याकाळी तरुण पिढीच्या मौज मजेसाठी कोणीतरी पुढाकार घेणं फार महत्वाचं सुद्धा होतं. ते योगदान माझ्या हाथुन घडलं.
तसं पाहायला गेलं तर.. हा मारवाडी किंवा गुजराती खेळ.
त्यात.. आमच्या तरुणपणी,
आज जसे गल्लोगल्ली रास दांडियाचे खेळ भरवले जातात. तसा, बिलकुल विषय नव्हता.
त्यावेळी, फक्त गुजर मारवाड्यांच्या किंवा हाय फाय लोकांच्या कॉलनी मध्येच हा खेळ खेळला जायचा.
त्यावेळी महत प्रयासाने.. माझ्या एखाद्या मारवाडी मित्राला वशिला लाऊन. कसंबसं.. आम्हा, चार पाच मित्रांना त्या दांडिया ग्रुपमध्ये खेळायला परवानगी मिळायची.
कारण, तिथे खेळत असणारे सगळे लोकं गुजर मारवाडी किंवा अगदीच हाय फाय असायचे. आणि, त्यात आवडीने अतिक्रमण करणारी आम्हीच काय ती मोजकी मराठी मुलं.
काय सांगू तुम्हाला..
त्या रंगीबेरंगी गोतावळ्यात दांडिया खेळत असताना. एकतर, आम्हा सगळ्या मित्रांना आभाळ ठेंगण झालेलं असायचं. त्यात कमी कि काय म्हणून, आमचे काही मित्र त्या रिंगणा बाहेर सुद्धा असायचे. त्यामुळे, आम्हाला आणखीनच चेव चढायचा.
रिंगणात आमच्या समोर दांडिया खेळत असणाऱ्या गोऱ्या गोमट्या, चिकण्या चोपड्या, मुली सुद्धा खूप एकसे बढकर एक असायच्या.
त्यांना पाहून.. विनाकारणच " मेरा नंबर कब आयेगा..? " असंच काहीतरी मनात चालू असायचं. दांडिया खेळताना, आमचंच काय सर्वांचं लक्ष अगदी चौफेर असायचं.
तर.. या रिमिक्स दांडिया गीतांवर पाय थिरकत असताना.
अचानक..
" प्यार का.. दर्द है.. मिठा-मिठा, प्यारा-प्यारा "
हे गीत लागल्यावर, आपल्या समोर दांडिया खेळणारी एखादी सुंदर अप्सरा असेल. तर आम्ही, तिच्या मादक नजरेत नजर मिळवत विनाकारण तिच्या प्रेमभऱ्या होकाराची पोचपावती मिळवण्याचा लटका प्रयत्न करायचो. ती सुंदरी सुद्धा, मस्त मूडमध्ये नाचत असताना.
आम्हाला.. एखादी मदभरी स्माईल अगदी फुकट देवून जायची. आणि या खेळात, ते.. स्वाभाविक आणि नैसर्गिक सुद्धा असायचं. पण, त्यावेळी अशा गोड गुलाबी स्माईली पाहून आमच्या पोटात मात्र भयंकर मोठा गोळा उठायचा.
हा खेळ चालू असताना, तिच्या एका मधभऱ्या झलकेमुळे आम्हाला तर त्या ठिकाणी अगदी जग जिंकल्याचा फील यायचा.
पण.. दांडिया संपल्यावर आम्हाला समजायचं.
ते पाखरू, कोण्या दुसऱ्याच फांदीवरचं असायचं.
आणि, सरतेशेवटी हा खेळ संपल्यावर.. त्या तरुण मुलाच्या खांदा नामक फांदीवर ती तरुणी आपली मान आणि डोकं ठेवून, त्याच्या गळ्यात हाताची वरमाला घालत, लाडीक अंदाजात आमच्या समोरून जेंव्हा चालती व्हायची.
तेंव्हा..
" दिलके तुकडे, तुकडे करके मुस्कुराके चल दिये. "
या गीताची, अगदी तीव्रतेने आठवण व्हायची.

No comments:

Post a Comment