Sunday, 16 October 2016

आज.. एक गम्मतच झाली..
काल दसरा, आज मोहरम..अशा लागोपाठ दोन सरकारी सुट्ट्या आल्या,
खरं सांगायला गेलं तर. कामाच्या माणसाला सुट्ट्या नकोशा वाटतात. रोजची कामाची सवय, त्याच्या अगदी अंगवळणी पडलेली असते. आणि या गोष्टी, वेळेनुसार आपसूक घडत असतातच.
कालचा दिवस, वाहन खरेदी आणि पूजा अर्चा करण्यात निघून गेला. पण आजचा दिवस, मला सरता सरत नव्हता. दुपारपर्यंत मी कशीतरी टंगळ मंगळ केली. आणि अचानक, मला एक काम आठवलं. बरेच दिवस झाले, माझं एक काम पेंडिंग पडलं होतं.
आमच्या सोसायटीच्या लोखंडी गेटला रंग द्यायचा होता. आणि, त्या कामाकरिता मला काही वेळ मिळत नव्हता. किंवा दर रविवारी काहीतरी काम निघत असल्याने. ते काम फारच लांबणीवर पडलं होतं. तुम्हाला म्हणून सांगतो, घरातील अशी छोटी मोठी कामं करायला मला खूप आवडतं.
लोखंडी गेटसाठी.. सिल्वर कलर, स्पंच, ब्रश, थिनर असं सगळं सामान मी दोन महिन्यांपूर्वीच घरी आणून ठेवलं होतं.
आणि आज.. चांगला मुहूर्त सुद्धा मिळाला होता. माझ्याकडे भरपूर वेळ सुद्धा होता. आणि माझी सुट्टी सुद्धा फळाला येणार होती. त्यामुळे, बिलकुल वेळ न दवडता मी ताबडतोब कामाला लागलो.
सुरवातीला.. अंगावर रंग उडून कपडे खराब होऊ नये. म्हणून ठेवणीतील जुने कपडे मी अंगावर चढवले. सुट्टीचा दिवस असल्याने, आळसाने आज मी दाढी सुद्धा केली नव्हती. त्यामुळे, माझा अवतार अगदी प्रोफेशनल पेंटर सारखा दिसत होता. दुपारची वेळ, सगळीकडे सामसूम झाली होती.
आणि मी माझ्या कामाला सुरवात केली.
बघता-बघता लोखंडी गेट सिल्वर रंगाने उजळून आणि चकाकून निघायला लागलं होतं. तासाभरात, माझं एका बाजूचं गेट रंगवून झालं. आता अशा नको त्या कामाची सवय मला उरली नाहीये ना, त्यामुळे माझी पाठ आणि हात थोडा अवघडला होता. त्यामुळे, थोडासा आराम केला, पाणी वगैरे पिलं. आणि, पुन्हा दुसरं गेट रंगवायला मी सुरवात केली.
घरचं काम असल्याने, अगदी तल्लीन होऊन आणि मन लाऊन मी गेटला रंग देत होतो. तितक्यात, रस्त्यावरून जाणारी एक बाई माझ्यापाशी आली. आणि मला म्हणाली..
तुम्ही रंग देण्याची कामं करता का..?
मी मान वर करून त्या महिलेकडे पाहिलं, ती बाई काही माझ्या ओळखीची नव्हती.
थोडीशी गंमत करावी असं ठरवून, मी त्या बाईला म्हणालो..
हो.. रंगाची कामं करतो मी..!
त्यावर, ती बाई म्हणाली..
आमच्या सोसायटीच्या गेटला पण असाच चंदेरी रंग द्यायचा आहे. ते काम करताल का तुम्ही..?
मी तिला ताबडतोड,
हो.. करतो ना म्हणालो, आणि तिला विचारलं, कुठे आहे तुमची सोसायटी..?
ती महिला म्हणाली..
ते पलीकडे उद्यमनगर मध्ये चार फ्ल्याटची एक छोटी सोसायटी आहे आमची. तुम्ही आत्ता रंगवताय येवढच छोटं गेट आहे आमच्या सोसायटीचं. त्याचे किती पैसे घेणार तुम्ही..?
ती बाई, सगळं काही अगदी एका दमात बोलून गेली होती. तिची फिरकी घ्यावी, या हिशोबाने मी तिला म्हणालो.
" दहा हजार रुपये होतील बघा एका गेटचे..! "
यांच्याकडून सुद्धा, मी तितकेच पैसे घेतले आहेत. वाटल्यास कधी विचारून पहा तुम्ही येथील लोकांना.
दहा हजाराचा आकडा ऐकून ती महिला अगदी अवाकच झाली. आणि म्हणाली,
दहा हजार कशाला लागतायेत हो. त्या रंगात काय तुम्ही चांदीचं पाणी टाकलय कि काय..?
मला तर, अनपेक्षितपणे आयातंच बोल भांडवल मिळालं होतं.
मी त्या महिलेला म्हणालो, तुम्हाला कसं कळालं, कि मी या रंगामध्ये खर्याखुर्या चांदीचं पाणी सुद्धा मिसळत असतो म्हणून..?
आता मात्र, ती महिला फारच चकित झाली होती. आणि, आवक होऊन तिने तिच्या तोंडाचा आ वासला होता.
पुन्हा.. मीच त्या बाईला म्हणालो,
बोला कधी करायचं काम..! रंग माझा मेहेनत माझी. फक्त दहा हजार रुपये द्या. तुमच्या सोसायटीचं गेट सुद्धा चांदीचं आणि चकाचक करून सोडतो बघा.
त्यावर ती बाई म्हणाली..
एवढा मोठा खर्च म्हणल्यावर सोसायटी मधील बाकी लोकांना पण विचारावं लागेल हो.
मी म्हणालो, बघा विचारून ठेवा.. आणि तसं मला कळवा.
त्यावर ती बाई म्हणाली, तुमचा पत्ता आणि फोन नंबर देऊन ठेवा ना मला.
त्यावर मी त्या महिलेला म्हणालो,
फोन नंबर कशाला..
हे काय.. या सोसायटीतील दुसऱ्या मजल्यावर माझा फ्ल्याट आहे. तिथे मी राहत असतो.
माझं हे वाक्य ऐकताच, ती बाई भलतीच गडबडून गेली. तिला लगेच कळून चुकलं. कि आपला राँग नंबर लागला आहे.
हा व्यक्ती, या बिल्डींग मध्ये राहणारा व्यक्ती आहे. आणि, एक विरंगुळा म्हणून तो हे काम करत असावा. हा सगळा प्रकार घडल्या नंतर,
मी त्या महिलेकडे छद्मी चेहेरा करून पाहत होतो. आणि ती बिचारी महिला तर पक्की ओशाळून गेली होती. त्यानंतर, अचानक माझी बायको घरातून खाली आली. आणि, नेमका तिने हा प्रकार पाहिला,
ती लगेच म्हणाली.. अहो, काय पाहिजे त्या बाईला. काय म्हणतेय ती..?
माझ्या बायकोचा हा पवित्रा पाहून, त्या बाईने झपाझप पावलं टाकत समोरच्या दिशेने चालायला सुरवात केली. ती बाई बरीच दूर निघून गेली, पण त्यानंतर, पुन्हा काही तिने मागे वळून पाहिलंच नाही.
आणि मी सुद्धा, पुन्हा.. दुसरं एखादं गिर्हाईक येण्या अगोदरच माझं काम आटोपतं घेतलं.
आणि, माझ्या बायकोला घडलेलेला सगळा समाचार सांगत. दुसऱ्या मजल्यावरील माझ्या घरचा रस्ता धरला.

No comments:

Post a Comment