Monday, 27 August 2018



भटकंती करायला आवडत नाही, असा मनुष्य शोधून देखील सापडणार नाही.
पण, भटकंती करण्यासाठी.. एकतर आवड असावी लागते. आवड असली तरी सवड असावी लागते, सवड असली तर निवड असावी लागते, आणि निवड असेल तर.. खिशात मुबलक पैसा सुद्धा असायला पाहिजे. तेंव्हा कुठे हि सगळी गणितं जुळून येतात..
खरं तर.. या लेह लदाख ट्रीपला जाण्यासाठी माझ्याकडे पैसेच नव्हते. पण इच्छा झालीय म्हणाल्यावर काहीतरी जुगाड करावा लागतोच. म्हणून या ट्रीपसाठी मी चक्क कर्ज काढून गेलो.
आता काही व्यक्ती, माझ्या या विधानावर आश्चर्य व्यक्त करतील. कदाचित मनामध्ये म्हणतील सुद्धा, हा निव्वळ वेडेपणा आहे. कर्ज करून कोणी फिरायला जात असतं का.?
पण असा विचार करणाऱ्या व्यक्तींना मला एक प्रश्न विचारावासा वाटतो.
आपण, घर घेण्यासाठी कर्ज काढतो. मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज काढतो. इतकच काय, घरातील कोणी व्यक्ती आजारी पडलं, तर त्याच्या उपचारासाठी सुद्धा कर्ज काढतो. मग स्वतःचा जीव रमवण्यासाठी आपण कर्ज काढू शकत नाही का.?
जीवनाचा काय भरवसा आहे हो. आज आहे, तर उद्या नाही. कर्ज काय आजचं उद्या फिटून जाईल. पण वेळ निघून गेल्यावर, हात पाय चालायचे बंद झाल्यावर, हाती आलेला बक्कळ पैसा कोणत्या कामाचा असणार आहे.?
त्यावेळी इच्छा असून सुद्धा आपण फिरायला जाऊ शकत नाही. आणि सरतेशेवटी, आपण जमा केलेला सगळा पैसा चोरांच्या हवाली करावा लागतो. पोरं म्हणजे दुसरे चोरच हो. सगळेच सारखे नसले तरी, काही अंशी आपल्याला अशी उदाहरणं पाहायला मिळत असतातच. त्यामुळे, मी मागचा पुढचा कोणताही विचार न करता. कर्ज करून फिरायला गेलो. आणि मी जे काही पाहून आलो, त्याने नक्कीच ताजातवाना आणि, अतिरिक्त उर्जा सुद्धा सोबत घेऊन आलो.
कुलू-मानली, रोहतांग पास, जीस्पा व्हॅली, लेह-लडाख, खारदुंगला टॉप, नुब्रा व्हॅली, च्यांगला पास, पेंगोंग लेक, अमरनाथ आणि वैष्णोदेवी..
माझ्या प्रवासाचा एकंदरीत असा रूट होता. एकाच धडकेत मी उत्तरेतील बराच पट्टा पालता घालून येणार होतो. त्याभागात पुन्हा कधी जाणं होईल कि नाही ते माहित नव्हतं. त्यामुळे, ट्रीपला जाण्या अगोदर गरीब गरिबीत पंधरा हजाराचा नवा कोरा रेडमी मोबाईल खरेदी केला. त्यात चौसष्ट जीबीची स्पेस आणि चार जीबी रॅम असल्याने, मला मनसोक्त फोटो काढता येणार होते. आणि हव्या तेवढ्या चित्रफिती तयार करता येणार होत्या. साधारण पंधरा दिवस अगोदर माझ्या सगळ्या खरेद्या चालू होत्या. उबदार कपड्या पासून ते अगदी सुख्या मेव्याची सुद्धा तजवीज करून ठेवली होती. आवश्यक असणारी औषधं घेतली, ट्रीपला आमच्यासोबत एक नर्स सुद्धा होत्या, त्यामुळे त्यांनी सुद्धा बरीच औषधं सोबत घेतली होती. काळजी करण्याचं काहीएक कारण नव्हतं. त्या भागात फक्त बी.एस.एन.एल. ला रेंज असल्याने, ते सिमकार्ड सुद्धा घेऊन ठेवलं. कशाची म्हणून उणीव ठेवली नव्हती.
आणि शेवटी तो दिवस उजाडला.. यशवंतपूर एक्सप्रेसने पुण्याहून आम्ही चंडीगडच्या दिशेने रवाना झालो. लेह लडाखच्या ट्रीपला कोणी जावं.? याबाबतचे काही निकष ठरलेले आहेत. पण तरीसुद्धा, आमच्या चमूमध्ये, वय वर्ष सतरा ते सत्तर वर्षांचे एक ग्रहस्थ सुद्धा होते. रेल्वेच्या प्रवासातील पहिला दिवस अगदी आनंदात गेला.
दुसरा दिवस उजाडला, आता काय दिवसभर चरत बसण्यातच वेळ जाणार होता.
दुपारी तीन वाजता आम्ही दिल्ली स्थानक सोडलं. तेंव्हा आमची नुकतीच जेवणं उरकली होती. थोडी वामकुक्षी घ्यावी म्हणून मी स्लीपर कोचवर कलंडलो. झोपेत.. खिशात असणाऱ्या मोबाईलचा अडसर नको. म्हणून तो मोबाईल मी चार्जिंग पॉइंटच्या डेस्कवर ठेवला. माझा नुकताच डोळा लागायला लागला होता. आणि कोणीतरी जोरदार किंचाळल्याचा आवाज झाला. तसा मी दचकून जागा झालो. मला वाटलं, आमच्यापैकी कोणी गाडीतून खाली पडलं कि काय.? पण नाही.. तिथे एक वेगळाच प्रकार घडला होता.
दरवाजात उभं राहून खिडकीत हात घालून चालत्या गाडीतून एका चोराने अगदी चपळाईने माझा नवा कोरा मोबाईल लांबवला होता. त्या डेस्कवर एकूण चार मोबाईल होते, पण त्या चोराने अगदी हेरून माझा नवा कोरा मोबाईल चोरला होता.
हे सगळं काही अगदी एका क्षणात घडलं होतं. डोळ्याची पापणी लवती न लवती तोच, तो चोर मोबाईल घेऊन चालत्या रेल्वेतून उडी मारून पसार सुद्धा झाला होता. झालं.. मोबाईल चोरीला गेला, आणि इथेच माझ्या ट्रीपचं खोबरं झालं असं मला वाटून गेलं. घडला विषय मी लगेच सोडून दिला. कारण.. माझी बायको जिथे खिडकीपाशी बसली होती. तिथेच तिने तिची पर्स सुद्धा ठेवली होती. आणि त्यात रोख चाळीस हजार रुपये होते. चुकून त्या चोराने ती पर्स नेली असती तर..?
हातातलं नेलं होतं, नशिबातलं थोडीच घेऊन जाणार आहे. असा विचार केला, पण मोबाईल नसल्याने आता बराच मोठा खोळंबा होणार होता. फोटो आणि चित्रफितीचा विषय संपला होता. आणि तेवढ्याच रकमेचा नवीन मोबाईल खरेदी करण्यासाठी माझ्याकडे मुबलक पैसा सुद्धा नव्हता. त्यामुळे, जुन्या मोबाईलवर जमेल तितकं शुटींग आणि फोटो टिपूयात असा विचार केला. आणि, पुढील मार्गाला लागलो.
क्रमशः

No comments:

Post a Comment