Thursday, 2 August 2018

पुण्यावरून नेलेल्या नवीन सुमो गाड्या, दुपारी बारा वाजता नागपुरातील सदर येथील जयका मोटर्स मध्ये जमा केल्या. कि तिथेच अंघोळी उरकून, नागपूरच्या उखाड्याला रामराम करत आम्ही बर्डीला ( सीताबर्डी ) निघून जायचो. तिथे असणाऱ्या, सिंधी व्यक्तीच्या एखाद्या छोट्याशा हॉटेलमध्ये काहीतरी पोटपूजा करायची. आणि.. नागपूरहून पुण्याला येण्यासाठी, लग्झरी गाड्यांच्या ऑफिसपाशी घुटमळत राहायचो. नागपुरात सगळे सिझन अगदी कडक असतात. पाऊस मी म्हणून धोधो पडत असतो. थंडी सुद्धा खूपच बोचरी असते. आणि उन्हाळा तर अगदी तुम्ही विचारू नये, आणि मी सांगू नये. इतका जीवघेणा असतो.
वीस वर्षांपूर्वी.. नागपूर ते पुणे प्रायव्हेट लग्झरी बसने प्रवासासाठी वेगवेगळ्या प्रवासी कंपनीचे चारशे ते आठशे रुपये असे वेगवगळे दर ठरलेले असायचे. त्यावेळी आमचं अगदी हातावरील पोट, त्यामुळे.. लग्झरी मध्ये प्रोपर तिकीट बुकिंग करून आम्ही कधीच येत नसायचो.. .
एखाद्या बसची किती बुकिंग झाली आहे ते पाहायचो, त्यात सीट्स रिकाम्या असतील. तर त्या गाडीच्या ड्रायव्हरला सांगून आम्ही आमची सेटिंग करून घ्यायचो. सीट शिल्लक नसेल, तर ड्रायव्हर केबिन जिंदाबाद.
बर्डीवरून बस निघाली, कि तिचा पहिला थांबा रवीनगरला असायचा. मग आम्ही, तेथील ऑफिस पासून शे दोनशे मीटर लांब पुढे जाऊन थांबायचो. रवीनगर पासून बस निघाली, कि त्या भागात थोडासा चढ होता. चढावर गाडी आली कि आम्ही जिथे थांबलो असु, त्या भागात मोठ्याने हॉर्न वाजवत तो ड्रायव्हर गाडीचा वेग किंचित कमी करत गाडी अगदी हळुवार रस्त्याच्या कडेला घ्यायचा. थांबलेल्या बसमध्ये अगदी विजेच्या चपळाईने आम्ही शिरकाव करायचो. हि लगबग, आम्हाला अगदी दोन पाच सेकंदात उरकावी लागायची. ती ड्रायव्हर मंडळी सुद्धा आमच्याच जातकुळीतले असल्याने. आम्हाला, फक्त दोनशे रुपयात ते पुण्याला आणून सोडायचे. या वरकमाई मध्ये, त्यांचा सुद्धा वरखर्च भागून जायचा..!
दुपारी चार वाजता नागपुरातून निघालेली गाडी, साधारण सात वाजेपर्यंत अमरावती मध्ये पोहोचायची. त्यावेळी पुन्हा एकदा आम्ही गाडगेबाबा नगर बायपासला गाडीच्या खाली उतरून पुन्हा धावत पळत त्या लग्झरीच्या ऑफिसच्या पुढे जाऊन थांबायचो. कारण त्या ऑफिसचे लोक बसमध्ये येऊन सगळी बुकिंग चेक करायचे. आणि सगळं काही आलबेल असलं, कि ती गाडी तेथून पुढे रवाना व्हायची. या सगळ्या धामधुमीत अर्धा पाऊन निघून जायचा. आणि साधारण आठ वाजता, अमरावती सिटी पास केल्यावर हॉटेल मोहिनी मध्ये ती गाडी जेवणासाठी थांबायची.
हायवेवर असणाऱ्या हॉटेलमध्ये नेहेमी थांबणाऱ्या गाड्यांच्या ड्रायव्हर आणि क्लीनर लोकांना अगदी हवं ते जेवण मोफत दिलं जायचं. अशा वेळी, ती ड्रायव्हर मंडळी आम्हाला सुद्धा त्यांच्याबरोबर जेवायला न्यायची. त्यामुळे आमचा जेवणाचा खर्च वाचायचा. कधी कधी ती ड्रायव्हर लोकं प्रेमाखातर आम्हाला म्हणायचे.
" दारू, गिरु पियेंगा क्या बावा. "
त्यावेळी.. एकतर आम्ही याचक असायचो. आम्ही कितीही नाही म्हणलं तरी, आमचा चेहरा पाहून त्यांना समजायचं. हा गडी दारू पिण्यास इच्छुक आहे.
आता.. हॉटेलमध्ये सगळे प्रवासी बाहेर जेवायला बसलेले असायचे. आणि चुकून कोणाची नजर गेली, कि ड्रायव्हरच्या केबिनमध्ये दारू नेली जात आहे. तर फार मोठी गोची होऊन बसेल. म्हणून हि लोकं त्या वेटरला अगोदरच सांगून ठेवायचे. कोणालाही नकळतपणे माल घेऊन ये.
एकदा असाच आखाड महिना चालू होता, आणि आम्ही तीन मित्र ड्रायव्हर सेटिंग मध्ये लग्झरी बसमधून नागपूर-पुणे असा प्रवास करत होतो. अमरावती मध्ये जेवणासाठी हॉटेलमध्ये गाडी थांबली. आता या ड्रायव्हर मंडळींना गाडी चालवायची आहे, म्हणजे त्यांना काही दारू पिऊन जमणार नाही. पण काही लोकांना एक आवड असते बघा. दुसऱ्याला पिताना पाहून, ते स्वतः समाधानी होत असतात. त्यावेळी सुद्धा नेमका असाच प्रकार घडला. त्या ड्रायव्हर मित्राने, आखाड पार्टी म्हणून, खास आमच्यासाठी तीन बियर मागवल्या. तसा त्यांनी वेटरला आदेश सोडला.
तीन बियर.. एक खाली जग में डालके ला, किसीको पता नही चलना चाहिये..!
तो वेटर सुद्धा ते सांगतील तसच ऐकायचा. कारण, नाही ऐकलं तर हि लोकं उद्यापासून जेवणाचं ठिकाण बदलतील. कारण एका वेळेला चाळीस पन्नास लोकांचं जेवण व्हायचं. आणि पर्यायाने त्या हॉटेल व्यावसायिकाचा धंदा सुद्धा खूप जोरात व्हायचा. त्यामुळे सगळ्या गोष्टी अगदी सहजशक्य व्हायच्या. मग आम्ही ड्रायव्हर मित्र मिळून दोन-दोन ग्लास बियर मारायचो.
ती नागपुरातील ड्रायव्हर मंडळी, खास आमच्या करिता एवढी उठाठेव करायची. त्यादिवशी त्यांनी खास आमच्यासाठी चिकन हंड्या आणि मोहिनीची स्पेशल बिर्याणी मागवली होती..
त्यावेळी माझी फारच गरिबी होती. अगदी हातावरचं पोट म्हणा ना. पण माझी तोंडाची श्रीमंती फार मोठी होती. माझ्या तोंडाच्या श्रीमंतीने, मी लगेच कोणालाही आपलंसं करून घ्यायचो.
नंतर जेवणं करून आम्ही पुढील प्रवासाला लागायचो. त्याकाळी, पैसे कमवण्यासाठी स्ट्रगल करत असताना. लग्झरी बसमधील बराचसा प्रवास मी बसच्या केबिनमध्ये बसून केला आहे. फारच झालं तर, दोन्ही सीटच्या मध्ये असणाऱ्या चालत जायच्या जागेत झोपून आराम करत पुण्याला आलो आहे. तोच काय माझ्यासाठी एक नंबर बेड असायचा.
पण.. त्या सात वर्षाच्या काळात, त्या विविध ट्रेव्हल कंपनीच्या ड्रायव्हर मित्रांकडून प्रवासादरम्यान कधीही अपघात घडला नाही. आणि आमच्याकडून सुद्धा, कोणत्याही प्रवाशाला काही त्रास होईल अशी वागणूक घडली नाही.

No comments:

Post a Comment