Wednesday, 10 May 2017

बंदर चाहे जितना बुढा हो जाय, वोह गुलाटी खाना कभी नही भूलता..!
या हिंदी वाक्प्रचाराप्रमाणे, पुरुषांच्या बाबतीत सुद्धा बरचसं साम्य आपल्याला पाहायला मिळतं. वयाची पन्नाशी ओलांडली तरी, पुरुष व्यक्ती स्त्री सौंदर्य हे न्याहाळत असतोच. असं आपल्याला हमखास पाहायला मिळतं. वाईट नजरेने म्हणता येणार नाही. परंतु, सौंदर्य न्याहाळताना ते कोणताही हातचा ठेवत नाहीत. किंवा फुकाचा आततायीपणा सुद्धा करत नाहीत. सुंदर मुलींना किंवा स्त्रियांना ते अगदी वळून-वळून आणि पुन्हा-पुन्हा पाहण्याचं नेत्रसुख ते घेत असतात. असं आपल्याला सर्रास पाहायला मिळत असतं.
हे झालं पुरुषांच्या बाबतीत..
पण याचप्रमाणे.. चाळीशी किंवा पन्नाशी ओलांडलेल्या महिला.
सुंदर, देखण्या किंवा तरण्याबांड भारदार शरीरयष्टी बाळगणाऱ्या मुलांना, पुरुषांना. एक पुरुषी सौंदर्य म्हणून न्याहाळत असतील का..?


सेल, सेल, सेल..
खरं तर, सेल या शब्दाचा अर्थ फक्त विक्री असा आहे. पण आपण मध्यमवर्गीय लोकांनी, सेल या शब्दाचा स्वस्तातील विक्री असा सोयीस्कर अर्थ लाऊन घेतला. किंवा व्यापारी लोकांनी तशा प्रकारचं या शब्दाचं मार्केटिंग केलं असावं.
कोणतीही वस्तू स्वस्तात मिळत आहे म्हंटलं, कि सर्वसामान्य व्यक्तींची पावलं त्या मार्गाने अपोआप वळू लागतात. काय आहे, प्रत्येक व्यक्ती कोणत्याही खरेदीमध्ये आपले दोन पैसे कसे वाचतील हे पाहत असतो. पण याच गोष्टीची दुसरी बाजू पाहत असताना. समोरचा व्यापारी कोणतीही वस्तू स्वस्तात किंवा खोट खाऊन विक्री करणार आहे का..? किंवा तसं असेलच तर त्यात नक्कीच काहीतरी फसवणूक होत असणार आहे. याचा आजवर बऱ्याच जणांना अनुभव आला असावा.
पाच सहा दिवसापूर्वी, फेसबुकवर सर्चिंग करत असताना. एक जाहिरात माझ्या समोर आली.
फक्त नऊशे नाव्व्यान्नव रुपयामध्ये, पाच लंडन ब्रांड शर्टची विक्री अशी ती जाहिरात होती. शर्टचे पोस्टर सुद्धा खूप आकर्षक होते. हजार रुपयात काय येतंय हो.. असा विचार करत, मी सुद्धा गरिबी गरिबीत ती ऑर्डर बुक करून टाकली. त्यानंतर तीन दिवसांनी, मला त्या कंपनीतून फोन आला.
तुम्ही ती ऑर्डर घेणार आहात ना...?
मी सुद्धा त्यांना होकार कळवला, त्यांनी पुन्हा एकदा माझा सविस्तर पत्ता विचारून घेतला.
 झालं, सगळे सोपस्कार पार पडले.
पाच सहा दिवसांनी ते पार्सल माझ्या घरी येईल असं मला सांगण्यात आलं.
मला थोडी शंका आली होती. कारण, आजवर मी बऱ्याच वस्तू ऑनलाईन खरेदी केल्या आहेत. पण परत फिरून त्यांचा मला कधी फोन आला नव्हता. डायरेक्ट ती वस्तूच घरी यायची. आणि त्यात माझी कधी फसवणूक सुद्धा झालेली नाहीये.
त्यामुळे घरी आल्यावर, वरील सगळी हकीकत मी माझ्या मुलाला सांगितली. त्याला सुद्धा थोडी शंका आल्याने, त्याने सुद्धा नेटवर ताबडतोब सगळी जाच पडताळणी केली.
आणि म्हणाला.. पप्पा ती फ्रोड साईड आहे.
जुने, पुराने किंवा फाटके कपडे आपल्याला पाठवले जातात. आणि, ती वस्तू परत करण्यासाठी आपण त्याठिकाणी फोन केल्यावर, ते फोन घेतले जात नाहीत. आपण फसवले जातो.
ते पार्सल आल्यावर आपण घ्यायचं नाही, असं मी घरात सांगून ठेवलं, आणि कामावर निघून गेलो. तर काल दुपारी, मला एका कुरियर कंपनीचा फोन आला.
हेल्लो.. तुम्ही कुंभार बोलताय का.
मी हो म्हणालो,
त्यावर तो मुलगा म्हणाला, तुमचं एक पार्सल आलं आहे. तुम्ही ते कशाला घेताय. सगळा नकली माल असतो, फार मोठी फसवाफसवी चालू आहे.
मी सुद्धा त्या मुलाला म्हणालो, हो मला सुद्धा हे कालच समजलं.
तर तो मुलगा म्हणाला.. फक्त एक काम करा, त्या कंपनीतून तुम्हाला फोन आला. तर पैसे नसल्याने आम्ही ते पार्सल घेऊ शकलो नाही असं सांगून टाका.
मी सुद्धा त्या मुलाला माझा होकार कळवला. आज उद्या मला त्या कंपनीतून फोन येईलच. त्यांना बोलून काही फायदा नाही. सरळ नकार द्यायचा. कारण अशी नकली कामं करणारी लोकं साधीसुधी नक्कीच नसतात.
पण एका गोष्टीचं मला फार कौतुक वाटलं. मराठी माणसात अजून बरीच माणुसकी शिल्लक आहे. तो कुरियरवाला ते पार्सल माझ्या माथी मारून निघून जाऊ शकत होता. पण व्यवसायात त्यांना सुद्धा काही बरे वाईट अनुभव आले असतील. त्यामुळे त्याने सुद्धा मला वेळीच सावध केलं असावं.
तर मित्रानो.. सांगायचं हेच आहे, या जगात चमकणारी प्रत्येक वस्तू सोनं किंवा हिरा असेलच असं सांगता येत नाही. जास्तीचे दोन पैसे गेले तरी हरकत नाही. पण नेहेमी ब्रान्डेडे आणि नामांकित कंपन्यांन कडून वस्तू खरेदी करण्याला प्राधान्य देत चला. फसवणूक सुद्धा होणार नाही. आणि आत्मिक समाधान सुद्धा मिळेल..!

मला वाटतंय, मनुष्याला व्यसनं लागण्याचा एक ठराविक कालावधी असावा....
कॉलेजमध्ये टुकार मित्रांच्या संगतीने, किंवा.. त्याअगोदर सुद्धा त्याची सुरवात होते. ते, कधीही न थांबण्यासाठीच. पण काहीवेळा, वयाच्या ऐन मध्यानीत सुद्धा काही लोकं छंदिष्ट व्यसनी बनू शकतात. आणि, त्याला कारणं सुद्धा बरीच असतात..!
एक तर, सगळ्या कर्मातून मुक्त असल्याने. किंवा पैशाने, व्यवसायाने स्थिरस्थावर असल्याने.
आता फावला वेळ मिळालाच आहे. तर, यापूर्वी काही न केलेल्या गोष्टी करून पाहायला काय हरकत आहे..? असा, मनाचा हिय्या करून. काही लोकं, व्यसनाच्या नादाला लागतात. पण हि व्यसनं, त्यांचं काही सुद्धा वाकडं करू शकणार नाहीत. असं मी खात्रीने सांगू शकणार नाही. कारण कोणतंही व्यसन हे वाईटच असतं. ....
आजवर.. मी हजारो माणसं वाचली असतील. म्हणून काही मजेशीर अनुभव खास तुमच्याकरिता पेश करतो..!
आम्ही तर, जन्मजात शौकीन लोकं. त्यामुळे, आम्हाला त्या गोष्टीचं काहीच सोयर सुतक नसतं. तर एकदा..
माझ्या काही मोजक्या मित्रांसोबत.. मी एका बारमध्ये मदिरा प्राशन करण्याकरिता एका टेबलवर विराजमान झालो होतो. वेटर त्याच्या लयबद्ध हालचाली करत, सर्वांचे पेग भरत होता. साठ मिली मदिरेमध्ये, बर्फाचे दोन तुकडे आणि फेसाळलेल्या सोड्या सोबत ग्लासमध्ये पाण्याचा मारा केला गेला. आम्ही सर्वांनी, एक-एक पेगचं चांगभलं उरकलं. आणि, माझी नजर माणसं वाचायला निघाली.
माझ्या समोरील टेबलवर, एक पन्नाशी पार केलेला नवशिक्या वारुणी शौकीन बसला होता. गोल गोबरा चेहेरा, डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा, अंगात साधा शर्ट आणि लेहेंगा परिधान केलेला तो गृहस्थ तोंडातल्या तोंडात काहीतरी गाणं गुणगुणत होता. वेटर आल्यावर.. त्याने, कुठलीशी होडका त्याला मागवली. त्यात मिश्रणा करिता, गोड मिरिंडा सुद्धा हजर होती. व्होडका आणि मिरिंडाचा गोडसा पेग भरला गेला. तो, चिंतातूर गृहस्थ आशाळभूत नजरेने त्या पेगकडे पाहात होता. त्यावेळी, त्याच्या मनात दोन प्रश्न निर्माण झाले असावेत. आता हा पेग एका झटक्यात संपवू, कि.. त्याची हळूहळू चव घेत पिऊ..?
कारण.. नवशिक्या लोकांना, दारूची चव अजिबात आवडत नसते. पण काही लोकं सरावासाठी हे सर्व काही करत असतात. तर.. त्या व्यक्तीने, तो मदिरेचा ग्लास त्याच्या ओठांना लावला. आणि त्यातील एक मधाळ घोट त्याने आपल्या मुखात घेतला.
त्यावेळी.. त्याचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झाला होता. कडू लिंबाच्या पाल्याचा रस पिल्यावर लोकं कसं तोंड करतात. अगदी तशाप्रकारचे हावभाव मला त्याच्या चेहेऱ्यावर आढळले. अगदी जीवाच्या आकांताने त्याने तो घोट त्याच्या नरड्यात ओतला. मी त्याच्याकडे, अगदी चोरून पहात होतो. त्यामुळे, आपल्याला कोणीतरी पाहातंय याची त्याला बिलकुल कल्पनाच नव्हती.
पण.. जसजसे त्याने घोटावर घोट घ्यायला सुरवात केली. तशी, माझी नजर सुद्धा त्याच्यावर खिळली. आता त्याला कळून चुकलं होतं.
कि, हा व्यक्ती दारू पिताना आपलं निरीक्षण करत आहे. पण, तो मला काही बोलू शकत नव्हता. कारण, पुरुषांना रोखून पाहायला सेकंदांचा नियम अजून अस्तित्वात आला नाहीये.
पण मी त्याला पहातोय असं समजल्यावर, मादिरेचा घोट पिण्या अगोदर त्याचं माझ्याकडे हमखास लक्ष जायचं. आणि, मी पाहतोय असं आढळून आल्यावर. तो मनुष्य, वैतागून त्याच्या ओठापर्यंत नेलेला ग्लास पुन्हा खाली ठेवायचा. असं बरेच वेळा झालं.
आता तर तो व्यक्ती, दारूचा घोट घेण्याअगोदर माझ्याकडे पाहून फारच टेन्शनमध्ये यायचा. मी त्याच्या रंगाचा पक्का बेरंग करून टाकला होता. शेवटी, आमची मेहेफील आम्ही आटोपती घेतली. आणि आम्ही बारच्या बाहेर पडलो. त्यानंतर तरी, तो व्यक्ती सुखासमाधानाने दारू पिला असेल कि नाही. ते त्याचं त्यालाच माहिती.
असाच अजून एक प्रकार, सिगारेट पिणार्या लोकांच्या बाबतीत मला पाहायला मिळाला. एकदा नागपूरला गेलो असता, तिथे पन्नाशी पार केलेला एक ग्रहस्थ सिगारेट ओढण्याचा किंवा नको ते व्यसन बाळगण्याचा मुद्दाम प्रयत्न करत होता. त्या नवशिक्या व्यक्तीने सिगारेट शिलगावली, तिच्या धुराचा एक मोठासा झुरका त्याने तोंडात ओढला. त्याच बरोबर, त्याने त्याच्या गालाचा मोठा फुगा केला. आणि, त्या धुराला तो तोंडातल्या तोंडात खेळवायला लागला. पण, त्या धुराला तो काही त्याच्या गळ्याखाली उतरवत नव्हता. शेवटी, त्याने ओठाची शिटी करून त्यातून तो धूर लीलया बाहेर सोडला. आणि पुन्हा एकदा तो त्याच क्रियेत मग्न झाला. म्हणजेच, त्याला सिगारेट प्यायची माहिती नव्हती. एक स्टाईल म्हणून तो हे सर्व काही करत होता.
त्यानंतर अजून एक गृहस्थ मला दिसला होता, त्याला सुद्धा सिगारेट प्यायचं बिलकुल ज्ञान नव्हतं. पण चार चौघात रुबाब दाखवण्या करिता तो सिगारेट पीत होता. मी त्याला ताबडतोब ओळखला होता. कि हा नकली स्मोकर आहे. आणि माझ्या सोबत असणाऱ्या मित्राला सुद्धा मी त्याची तशी आगावू कल्पना दिली होती. कि या व्यक्तीला सिगारेट पिता येत नाहीये. पण हा नक्कीच सिगारेटचं पाकीट सोबत ठेवत असणार आहे. माझी शंका खरी ठरली, फक्त तोंडात घेऊन बाहेर धूर सोडणारा हा व्यक्ती चक्क चैन स्मोकर निघाला.
त्यानंतर परवा, मी माझ्या गाडीमध्ये काहीतरी वाचत बसलो होतो. तर बाहेरून मला..
स्स्स्स, स्स्स्स.. असा आवाज यायला लागला. कुतूहल म्हणून मी बाहेर पाहिलं. तर एक नवशिक्या सिगरेट फुक्या मुलगा, सिगारेट पिताना.. तोंडात असलेला धूर स्स्स्स करून जीवाच्या आकांताने नरड्यात ओढत होता. काही लोकं निव्वळ प्रेस्टीज करिता अशा व्यसनांना जवळ करत असतात. त्यापाठीमागे त्यांची नेमकी काय मानसिकता असते. हा माझ्यासाठी एक मोठा प्रश्न आहे.
तर.. अशा शौकीन लोकांना त्या व्यसनांचा काहीतरी त्रास नक्कीच होत असेल. कारण ती लोकं ते व्यसन एक छंद म्हणून करत असतात. व्यसन म्हणून नाही. हे फक्त त्यांना माहित असतं, त्यांच्या शरीराला नाही..!त्यामुळे, काही लोकांना त्याचा साईड इफेक्ट होत असावा, तर काही लोक त्यातून सहीसलामत पार सुद्धा होत असावेत, असं माझं मत आहे..!

२५ वर्षांपूर्वीची..
एक, दिवाळखोर दिवाळी. आणि, दैवी चमत्कार..!
बरीच लोकं म्हणतात.. या जगात देव वगैरे काही नाहीये. या सगळ्या दैवी संकल्पना म्हणजे निव्वळ थोतांड आहे. पण मित्रांनो, या भारत वर्षातील म्हणा, किंवा.. जगद्विख्यात म्हणा. एक असे महान व्यक्ती या पृथ्वी तलावर होऊन गेले आहेत. जे कि, सुरवातीला नास्तिक होते. आणि, काही काळानंतर ते पुन्हा आस्तिक झाले होते. आणि, त्यांच्या हयातीत त्यांनी, त्यांच्या आस्तिक होण्याची बरीच कारणं सुद्धा लिहून ठेवली आहेत. ती आजवर, आपल्या सर्वांना मार्गदर्शक ठरत आहेत. आणि, ठरत राहतील..!
अशा, श्री. स्वामी विवेकानंद.. यांना सविनय दंडवत घालून, मी माझं लिखाण पुढे चालू ठेवतो.
तर मित्रहो..
हि, एकोणीसशे नव्वद सालातील मी स्वतः अनुभवलेली एक सत्यघटना आहे..!
मी काहीतरी रोजगार करावा, म्हणून..माझ्या वडिलांनी आमच्या गावामध्ये एका नवीन इमारतीच्या खाली असणारं एक दुकान खरेदी केलं. त्यांचा विषय हाच, कि पुढे चालून आपला एखादा मुलगा या निमित्ताने नक्क्कीच एक चांगला व्यवसायिक होईल.
पण, माझ्या वडिलांनी घेतलेलं ते दुकान, मुख्य बाजारपेठेपासून बरंच आतील बाजूस होतं.
( आणि, आजही ते दुकान माझ्या मालकीचं आहे. ) पण त्याला पर्याय नव्हता. दुकानाचा ताबा मिळाल्यावर, त्या ठिकाणी आम्ही सर्व कुटुंबीयांनी मिळून, त्या नवीन वास्तूमध्ये एक कटलरी दुकान सुरु केलं.
आणि, त्याची संपूर्ण धुरा माझ्या हाती दिली गेली. मुख्य चौकात असणाऱ्या दुकानात फार मोठमोठे व्यवसाय होत होते. पण माझं दुकान थोडं आतील बाजूस असल्याने,तिथे म्हणावा असा व्यवसाय होत नव्हता. किंवा होणार सुद्धा नव्हता, हे मी पुरतं जाणून होतो. पण त्याला नाईलाज होता.
त्याकाळी.. थोडे थोडके नाही, तर माझ्या बापाने, तब्बल एक लाख रुपये त्या व्यवसायात गुंतवले होते. जे कि, त्यावेळी सोनं अगदी साडेतीन ते चार हजार रुपये तोळा होतं. ( त्या रकमेचा, त्यावेळी योग्य विनियोग केला गेला असता. तर, त्या लाखाचे आज एक करोड रुपये तरी नक्कीच झाले असते. पण शेवटी काय आहे, नशिबात लिहिलेल्या गोष्टी कधी टळत नसतात. )
झालं, एकदाचं माझं कटलरी दुकान सुरु झालं..
दुकानच्या उद्घाटनाच्या दिवशी, मोजून आठशे रुपये धंदा झाला होता. त्यावेळी, आठशे रुपये.. हि फार मोठी रक्कम होती बरं का. माझ्या दुकानातील, तो सर्वात मोठा आणि शेवटचा रोख रकमेचा धंदा ठरला.
सुरवातीला.. नवीन-नवीन, रोजच्याला शे-दोनशे रुपये धंदा व्हायचा. गिर्हाईक लोकं रोज एकएक नवीन वस्तूची मला मागणी करायचे. आणि, गिर्हाईकांना हव्या असणार्या त्या वस्तुंची मी यादी बनवायचो. आणि, त्या वस्तू मी पुण्याहून खरेदी करून घेऊन यायचो. मला मागणी झालेली ती वस्तू, फक्त पन्नास रुपयांची असायची. आणि त्यात, मिळणारा नफा सुद्धा अवघा दोन पाच रुपयाचा असायचा. पण त्याकरिता, पुण्याला जाण्यात गाडी भाड्यात माझे वीसेक रुपये खर्च व्हायचे. आणि असं करता-करता..
मी, आणि माझा व्यवसाय कधी डबघाईला आला. ते माझं मला सुद्धा समजलं नाही.
पण तेवढ्यातहि काटकसर करून, मी एक चांगली गोष्ट केली होती. वीस लोकांच्या ग्रुपमध्ये मी दरमहा दोनशे रुपयांची एक भिशी लाऊन ठेवली होती.
सकाळी आठ ते दुपारी दोन, आणि दुपारी चार ते संध्याकाळी नऊ. हि माझ्या दुकानाची वेळी होती. पण माझा धंदा चौपट झाला असल्याने, मला संध्याकाळी लवकर घरी जाऊ वाटायचं नाही. माझे वडील मला काहीतरी विचारतील. याचं, फार मोठं भय मला वाटत होतं. पण हा ससेमिरा मी कुठवर चुकवणार होतो.? एके दिवशी तर, माझ्या दुकानात दिवसभरात फक्त दोन रुपये धंदा झाला होता. इतके भयंकर दिवस मी त्यावेळी अनुभवले आहेत.
घरच्यांना वाटायचं, येवढ्या मोठ्या दुकानातून काहीतरी आमदनी नक्कीच झाली असेल. तर, मी ती आपल्या घरात द्यावी. पण माझं दुखः मला माहित होतं. या नको त्या व्यवसायाने, मी अगदी डिप्रेशनमध्ये गेलो होतो.
शेवटी.. एकेदिवशी माझे वडील मला म्हणाले..
अरे.. तुझा व्यवसाय कसा काय चालू आहे..? तू आम्हाला त्यातील काहीच का सांगत नाहीस..?
एकतर, माझे वडील खूप तापट स्वभावाचे होते. माझा धंदा चौपट झाला आहे. हे त्यांना सांगावं तरी कसं..? ते मला समजत नव्हतं. मी, एक-एक दिवस पुढे रेटत होतो.
महिन्या भराने दिवाळसन होता.
दिवाळीसाठी, मी कोणतच अत्यावश्यक सामान माझ्या दुकानात भरलं नव्हतं. का तर, माझ्याकडे त्यावेळी पुरेसा पैसा नव्हता. काय करावं..? मला तर काहीच सुचत नव्हतं.
माझ्यासमोर आता एकमेव आसरा होता. तो म्हणजे..
माझी, चार हजाराची भिशी. हि भिशी मला मिळाली, तर त्यावेळी माझं सगळं काही ठीक होणार होतं. किमान, हि भयंकर वेळ तरी निघून जाणार होती.
त्यामुळे, त्या भिशी मालकाला मी माझी कैफियत सादर केली. पण तो म्हणाला..
तुझं सगळं खरं आहे. पण, दिवाळी आपला वर्षाचा सन आहे. प्रत्येकाला पैश्याची निकड असते. हि भिशी, तुला कोणीच देऊ करणार नाही. हवं तर, ज्याची चिट्ठी निघेल त्याला विचार. त्याने हि भिशी तुला दिली तर दिली..!
पैसा खूप वाईट गोष्ट हो, स्वतःला लागेलेली भिशी दुसऱ्याला कोण देणार आहे..?
दिवसेंदिवस माझी चिंता वाढत चालली होती.
आणि, प्रत्यक्ष तो दिवस उजाडला.. आज संध्याकाळी भिशी फुटणार होती. मी सकाळपासूनच देवाला साकडं घालून ठेवलं होतं.
देवा.. आज कोणत्याही परिस्थितीत माझाच नंबर लागू दे..!
पण, या बदल्यात मी देवाला..
नारळ फोडेल, पेढे वाटेल अशी कोणतीच प्रलोभने दाखवली नव्हती.
संध्याकाळ झाली, तशी माझी धाकधुक फार वाढू लागली. आठ वाजता भिशी फुटणार होती. वीस मेंबर पैकी, दहा बारा जन तिथे हजर होते.
त्यावेळी, आमच्यात एक नियम होता. भिशीमध्ये असणाऱ्या मेंबरने चिट्ठी उचलायची नाही. त्याकरिता, कोण्यातरी लहान मुलाला आम्ही चिठ्ठी उचलायला बोलवायचो.
पण त्यादिवशी, त्या भागात एक सुद्धा लहान मुलगा किंवा मुलगी तिथे आम्हाला दिसत नव्हती. जे कि, त्या ठिकाणी रोज संध्याकाळी बरीच लहान मुलं लपाछपी किंवा अन्य खेळ खेळत असायचे.
आम्ही बराच वेळ वाट पाहिली. पण, एकही मुल आम्हाला त्याठिकाणी दिसलं नाही.
शेवटी.. कोणाच्यातरी घरून एखाद्या लहान मुलाला घेऊन यायचं ठरलं.
आणि तितक्यात..
त्या काळ्या कुट्ट मोकळ्या डांबरी रस्त्यावरून.. उत्तरेच्या दिशेने, एक सात आठ वर्षाचा मुलगा चालत येताना मला दिसला. मी म्हणालो,
ए.. नका पाठवू कोणाला.. ते बघा, तिकडून एक लहान मुलगा येताना दिसतोय..!
त्या लहान मुलाला पाहून, सगळ्यांना हायसं वाटलं होतं. त्या लहान मुलाने, शाळेचा गणवेश.. खाकी हाफ पँट आणि पांढरा शर्ट परिधान केला होता. मी त्या काळ्या सावळ्या मुलाला जवळ बोलावलं. तो मुलगा म्हणाला..
काय ओ काका, काय काम आहे..?
मी त्याला म्हणालो, एक काम कर बेटा.. या भिशीच्या चिट्ठी मधून एक नंबर काढ..!
माझ्या वक्तव्यावर, त्या मुलाने सुद्धा होकारार्थी अशी किंचित मान हलवली..
भिशीच्या चिठ्ठया ज्यात ठेवल्या होत्या, त्या पत्र्याच्या लहानशा डब्यामध्ये, एकूण पंधरा एक कागदी चिठ्ठ्या होत्या, खडखड- खडखड आवाज करत तो डब्बा एकदा जोरात हलवला गेला.
आणि, डब्याचं झाकण खोलताच सगळ्या चिठ्ठ्या ज्या ठिकाणी आमची भिशी फुटणार होती. त्या दुकानाच्या कौंटरवर विखुरल्या गेल्या.
त्या दहा बारा चिठ्ठ्या मधून.. त्या लहानग्या मुलाने, त्यातील एक चिठ्ठी उचलून आमच्या बॉसच्या हातामध्ये दिली. सगळ्यांचं लक्ष, त्या चीठ्ठीकडे लागून राहिलं होतं.
हळुवारपणे त्या पांढऱ्या शुभ्र चिठ्ठीची एक-एक घडी उघडली जाऊ लागली. तसा, सगळ्यांच्या छातीचा भाता जोरजोरात खालीवर होऊ लागला होता. प्रत्येकाला पैश्याची निकड होती. आता कोणाचा नंबर लागणार.? याची सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली होती. आणि,
थोड्याच अवधीत चिठ्ठीची शेवटची घडी उघडली गेली. आणि, त्या चिठ्ठी मध्ये लिहिलेल नाव होतं.
" पंडित कुंभार. "
तुम्हाला काय सांगू मित्रांनो, त्यादिवशी.. आनंदाने मला अगदी रडू आलं होतं. पण मी, चारचौघात स्वतःला खूप सावरलं. त्या ठिकाणी परमेश्वराचे मी लाख लाख आभार मानले. त्या लहान मुलाच्या रूपाने साक्षात परमेश्वरच माझ्या भेटीला आला होता. मी लगेच मनात विचार केला, माझ्या भाग्य विधात्या त्या चिठ्ठी काढणाऱ्या मुलाला, काही नाही तर, किमान एखादा बिस्किटचा पुडा तरी घेऊन देऊयात.
म्हणून.. मी त्या लहान मुलाला माझ्या आजूबाजूला पाहू लागलो. दुकानाच्या दोन्ही बाजूला पन्नास मीटरचा भला मोठा रोड होता. पण अवघ्या पंधरा विस सेकंदात, तो मुलगा त्या ठिकाणावरून चक्क गायब झाला होता.
या अनपेक्षित घटनेने मी तर फारच अचंबित झालो होतो.
अचानक तो मुलगा कुठे गेला असेल..?
आम्ही बरीच शोधाशोध केली, पण त्या परिसरात तो मुलगा मला कुठेच आढळून आला नाही.
मला जे समजायचं होतं, ते मी समजून गेलो होतो. शेवटी, माझ्या मदतीला " तो " स्वतः धावून आला होता. त्याचं काम त्याने चोख बजावलं होतं. परमेश्वरा तुझे लाख उपकार आहेत रे माझ्यावर..!
त्या आनंदाच्या भरात.. दुसऱ्या दिवशी मार्केट मधून मी दिवाळीचं बरंच अत्यावश्यक सामान दुकानामध्ये घेऊन आलो. आता कुठे माझं दुकान एक मस्त आणि भरगच्च दुकान वाटत होतं.
त्यादिवशी, रात्रीच्या वेळी माझ्या वडिलांनी दुरूनच माझं दुकान पाहिलं. दुकानाबाहेर चकाकणारे आकाश कंदील आणि विद्युत रोषणाई पाहून माझ्या वडिलांचा रोष बराच कमी झाला होतां. माझ्या मुलाचा व्यवसाय अगदी मस्त चालू आहे. अशी त्यांची समजूत झाली होती.
त्यावर्षी, दुकानात तर मी मुबलक सामान भरलं होतं. पण दिवाळीचा सण आहे म्हणून माझ्या अंगावर मी नवीन कपडा काही घेतला नव्हता. पण, एक फार मोठं काम मी केलं होतं.
धंद्यातून मिळालेल्या पैशातून, दिवाळीसाठी माझ्या आईला एक नवी कोरी सहावारी साडी आणि वडिलांना पायजमा शर्टचं कापड मी विकत आणलं होतं.
त्यामुळे, ते दोघेही माझ्यावर खूप खुश झाले होते.
ती दिवाळी, माझ्या आयुष्यातील अगदी अनमोल अशी दिवाळी होती. आज, आई बापाच्या पुण्याईने मी अगदी सुखी आणि समाधानी जीवन जगत आहे.
सगळी सुखं, अगदी हात जोडून माझ्यासमोर उभी आहेत. पण मागे वळून पाहताना,
पुन्हा ते दिवस आठवले.
कि माझा जीव अगदी रडकुंडीला येतो.
आणि, माझे डोळे अपोआप पाणावतात.
पण त्यावेळी, माझ्या डोळ्यातील ते अश्रू खारट मुळीच नसतात. दिवाळ सणाचा सगळा गोडवा, माझ्या त्या अश्रूंमध्ये सामावलेला असतो.

Monday, 8 May 2017

यावर्षी, फार असह्य उन्हाळा आहे ना..!
आपण सर्वांनी, उन्हाळ्याचं स्वागत करण्यासाठी. घरामध्ये.. फ्रीज, कुलर, एसी, पंखे, खिडक्यांना गारगार वाळ्याचे पडदे, थंडगार सरबतच्या बाटल्या. या सगळ्या गोष्टींची तजवीज तर करून ठेवली आहे. हे आपलं दर वर्षीचंच झालं.
पण, आपण लोकं एक साधा विचार का करत नाही. कि.. दरवर्षी, उन्हाचा चटका वाढतच चालला आहे. त्यावर, आपल्याला काही उपाययोजना करता येईल कि नाही..?
पण नाही.. अपना सर्वांच्या डोळ्यावर, एका अनामिक श्रीमंतीची झापडं चढली आहेत. सगळी सुखं, आपल्यासमोर, अगदी हात जोडून उभी असल्याने. आपल्याला कोणत्याच गोष्टीची चिंता वाटेनाशी झालीय.
पण हे कुठवर..? अजून, दोन तीन वर्षात, उन्हाच्या तापमानाचा पारा अगदी पन्नाशीला येऊन पोहोचेल. आणि, हे अगदी खरं आहे बरं का.
त्यावेळी.. हे कुलर, पंखे, फ्रीज आणि एसी सुद्धा आपल्या काहीच कामाचे उरणार नाहीत. पालिकेच्या नळातून येणारं पाणी सुद्धा, अगदी उष्ण असेल. त्यावेळी आपण काय करणार आहोत..?
मित्रांनो. जमलं तर, थोडं मागे वळून पाहा..
आपण सर्वांनी, आजवर चाळीस पंचेचाळीस उन्हाळे तर नक्कीच पाहिले असतील. त्यातील,सुरवातीचे उन्हाळ्यातील दिवस तुम्हाला नक्कीच आठवत असतील.
ते दिवस आजच्या इतके उष्ण होते का..?
नाही ना. मग, हे तापमानाचं गणित नेमकं चुकतंय तरी कुठे..?
आजवर, ह्या वसुंधरेची आपण होईल तेवढी हेळसांड करत आलो आहोत. वारेमाप वृक्षतोड करून, सिमेंटची देखणी जंगलं आपण उभी केली. आणि, संपूर्ण वातावरणाची आपण वाट लाऊन टाकली.
काय तर म्हणे, काचेची बिल्डींग. अरे त्यामुळे तापमानात अजून वाढ होत आहे. हे आपल्या लक्षात का येत नाही..?
अहो.. तो सूर्यनारायण रोजच्या रोज न चुकता, आपल्याला दर्शन देत असतो. बिचारा वारा तर, आपल्याला दिसत सुद्धा नाही. पण त्यामुळेच, आपण जिवंत आहोत. हे, कोणाच्याच ध्यानात कसं येत नाही. नित्यनेमाने पाऊस पडतोय म्हणून, आपली तृष्णा शांत होत आहे.
अहो.. पाऊस पडेल तेंव्हाच आपल्याला बिसलेरी मिळेल ना..! आणि, शुद्ध वारा वाहील तेंव्हाच एसी आणि आपला श्वास सुद्धा चालु राहील. कि, आता आपण हवा सुद्धा आयात करणार आहोत..?
आपण लोकांनी.. भरमसाठ जनता तेवढी वाढवून ठेवली आहे. पण त्यातला, एक सुद्धा कामाचा नाही. असं म्हणायची आत्ता वेळ आली आहे.
लग्न झाल्यावर, न सांगता प्रत्येक जन.. दोन,चार पोरं तेवढी काढून ठेवत आहेत. पण, या वसुंधरेचं सुद्धा आपण काहीतरी देणं लागतोय. म्हणून. पर्यावरणाशी निगडीत आपण एक तरी गोष्ट निश्चित करायला हवी. असं कधी वाटलं नाही..?
खरं सांगा..आजवर, आपण एक तरी झाड कधी लावलं आहे का हो..?
माझ्या माहितीप्रमाणे.. आजवर, हा मूलभूत प्रश्न तुमच्या मनात कधी आलाच नसेल नाही..!
आपलं तर झालं गेलं हो, पण.. आपल्या नंतर येणाऱ्या पिढीचं काय..?
काल टीव्हीवरील बातम्यात सांगत होते. येत्या शंभर वर्षात, या वसुंधरेचा अंत होणार आहे. त्याकरिता, आपल्याला एखाद्या नवीन ग्रहावर स्थलांतर करावं लागणार आहे. अहो, या पृथ्वीचीच आपण एवढी वाट लाऊन ठेवली आहे. त्यामुळे, हि बातमी जर त्या इतर ग्रहांना समजली तर..? आपण तिथे जाण्या आधीच, आपली ते वाट लाऊन ठेवतील.
हे सगळं स्वप्नवत आहे म्हणा, कारण.. सगळी जग दुनिया चंद्रावर गेली. तरी आपण आपल्या गावात नीट राहू शकत नाहीये. हि भयाण वस्तुस्थिती आहे.
चला तर मित्रांनो.. आपण सर्वांनी एक संकल्प करूयात. रानावनात, मोकळ्या जागेत, डोंगर कपारीत, जमेल तिथे आपण वृक्षारोपण करूयात. आणि आपण लावलेल्या त्या रोपट्याला फक्त तीन वर्ष सांभाळायची तसदी घेऊयात. त्यानंतर, ते झाड आपलं अपुनच वाढत जाईल. आपल्या मुलांना.. आपण जन्मभर पोसत असतो. तर मग, या झाडांना आपल्या खर्या जीवाला आपण फक्त तीन वर्ष पोसू शकत नाही का..?
भारतातील प्रत्येक व्यक्तीने, दरवर्षी एक झाड लावलं. तर, हे भारतवर्ष हरित होण्यात नक्कीच मदत होईल. निसर्ग आजवर आपल्याला भरभरून देत आला आहे. परंतु, आज आपल्याला त्याचं काहीतरी देणं चुकतं करायची वेळ आली आहे. आणि ते सुद्धा, आपल्याच हितासाठी आहे बरं का. हा विषय फक्त वाचून सोडून देऊ नका. यावर क्रिया आणि प्रतिक्रिया फार महत्वाची आहे. चला तर मग.. आपण सगळे एक संकल्प करूयात.
" एक झाड लाऊया, आणि आपली वसुंधरा वाचवूया..! "
करा रे मित्रानो.. आपल्या आज साठी. आणि, आपल्या आप्तांच्या उद्यासाठी. आपण ठोस पावलं उचलनं नक्कीच हितकारक असेल.
वसुंधरे.. तू आम्हाला, हवी आहेस. कारण, आम्ही तुझे आहोत. आणि, सदैव तू आमचीच असशील.

Tuesday, 2 May 2017

कशाला जाता रे तुम्ही विदेशात...?
तुम्हाला, विदेशात सुद्धा आपली लोकं हवी असतील,
तर.. आपल्या स्वदेशाला तेवढं विदेशी करता आलं तर पाहा.
आणि नाहीच जमलं.. तर, खुशाल पुढे चालत राहा....
विदेशी गेल्यावर, नोकरी अगोदर घराची उनिव तुम्हाला भासेलच..
पहिली त्याची सोय करा,
कारण.. आपल्याकडे कोंबड्यांना सुद्धा खुराडं असतं,
गुरा ढोरांची गोष्ट निराळी,
आपण, एक मराठी माणूस आहोत तेवढं बाकी लक्षात राहील असं पाहा..
आणि नाहीच जमलं.. तर, खुशाल पुढे चालत राहा.
जमलं तर, रस्त्यावर थोडं आजूबाजूला पहा.
कदाचित तुम्ही स्वतःच लाजाल, हमरस्त्यावर उघडं नागडं पहायची सवय नसते.
खरं तर, आपल्याला आजूबाजूला पाहिल्याशिवाय जमतच कुठे म्हणा.
पाहताना, लाज मात्र बाळगू नका.
आणि, नाहीच जमलं.. तर, खुशाल पुढे चालत राहा.
मॅक डी मध्ये वेटरचं काम करताना, समोर आपली बायको कस्टमर म्हणून असेल.
तर, बिलकुल लाजू नका.
कारण, आपण तिथे पैसा कमवायलाच गेलो आहोत.
हे आपल्या शिवाय कोणालाच माहिती नसतं. भोळेपणा मस्त एन्जॉय करा.
आणि, नाहीच जमलं.. तर, खुशाल पुढे चालत राहा.
सुट्टी म्हणून अशी घेऊच नका..
सुट्टी दिवशी सुद्धा कामाला जाऊ का..? हा प्रश्न, स्वतःच स्वतःला विचारा.
एखादा, वेगळा पार्ट टाईम जॉब मिळतोय का ते पहा.
तेवढीच, जादा उत्पन्नाची हवा.
आणि, नाहीच जमलं.. तर, खुशाल पुढे चालत राहा.
सोबतने नेलेल्या बायकोचा विचार तर तुम्ही बिलकुल करूच नका.
ती, उशिरा रात्री कामाला जाईल. आणि सकाळी घरी येईल,
येता जाता रस्त्यात तरी तुमची हमखास भेट होईल.
त्यातच, आपलं मिलन साजरं करा.
आणि, नाहीच जमलं.. तर खुशाल पुढे चालत राहा.
हे सगळं करा.. आपल्या देशाला, राष्ट्राला विसरा.
आपल्या आई बापाला विसरा, भाऊ बंधांना तिलांजली वाहा.
आणि, लोकाचा देश मोठा करा.
आणि, नाहीच जमलं.. तर, खुशाल पुढे चालत राहा.
कालांतराने, स्वदेशी आल्यावर तुम्हाला कोणीच ओळखणार नाही.
शप्पत आहे, जुन्या आठवणीत तुम्ही खूप रमताल,
तुमच्या खेळण्या कुद्न्याच्या जागेवर सुद्धा एक भव्य इमारत उभी असेल.
तेंव्हा.. स्वतःचं, " मायकल डिसोजा " हे नाव धारण करा.
स्वतःच, स्वतःला मूठमाती देवून मोकळे व्हा..
आणि, नाहीच जमलं.. तर, खुशाल पुढे चालत राहा.
कीर्तन.. या विषयाची जवळपास सर्वांनाच माहिती असावी..

गेल्या सोमवारी, श्री संत शिरोमणी व संत परिवाराचे परीक्षक " श्री संत गोरा कुंभार " यांची ७०० वी पुण्यतिथी होती. त्यानिमित्ताने, पुण्यातील एका विठ्ठल मंदिरात एक धार्मिक कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता. त्याच बरोबर त्याचदिवशी सायंकाळी आठ वाजता डोंबिवली स्थित एक महिला कीर्तनकार ह.भ.प. म्हात्रे ताई यांच्या कीर्तनाचा सुश्राव्य कार्यक्रम सुद्धा ठेवला होता. माझ्या अपेक्षेपेक्षा सुद्धा जास्ती लोकं तिथे कीर्तन ऐकण्यासाठी जमा झाले होते.

म्हात्रे ताई, खरोखर लाजवाब कीर्तनकार होत्या. ठरल्याप्रमाणे त्यांनी सुद्धा त्यांच्या क्षेत्रातील नामवंत कीर्तनकारांना एकदा हाताखालून घेतलं. त्यात दोन दिग्गज कीर्तनकार लोकांची नावं होती. एक होते बाबा महाराज सातारकर आणि दुसरे होते, निवृत्ती महाराज इंदुरीकर. या दोघांनी.. कीर्तन या विषयीचा अगदी बाजार करून ठेवला आहे. असं त्या ताईचं म्हणनं होतं. आणि त्यात बऱ्यापैकी तथ्य सुधा आहे. एक लाख रुपयाच्या खाली हि लोकं कीर्तन करत नाही. उंची गाड्यात फिरतात, उंची बंगल्यात राहतात. तिथे ते काय करत असतील ते पाहायला कोणी गेलं नाही. पण जगाला शहाणपण शिकवायला हि मंडळी अगदी अव्वलस्थानी असतात. ज्ञानेश्वरी आणि गाथा फक्त पन्नास रुपयात विकत मिळतात. पण त्यावर गाढा अभ्यास करून लोकं लाखो रुपये कमवतात. हि वस्तुस्थिती आहे. शेवटी काय आहे, हा ज्याच्या अकलेच्या वापराचा भाग आहे.

असो..शेवटी काय आहे, ज्या ठिकाणी पैशाचा विषय आला. त्याठिकाणी धंदा हा आपोआप येतोच. या ह.भ.प.ताई सुद्धा आमच्याकडे काही मोफत प्रवचन द्यायला आल्या नव्हत्या. पण त्यांची बिदागी त्यामानाने बरीच कमी होती. आजवर, मांडवात बसून कीर्तन ऐकण्याची माझी हि पहिलीच वेळ होती. कीर्तन म्हंटल कि त्यात धार्मिक विषयापासून राजकारण, विनोद ते समाजकारण सगळं काही ओघाने येतंच. तर त्या कीर्तनात, " झाकली मुठ सव्वा लाखाची " या विषयची मला मस्त उकल मिळाली..
तर, ती बोधकथा अशी होती.

एकदा राजाच्या घरी, धार्मिक कार्य करण्यासाठी एक भटजी जातात. धार्मिक कार्य पार पडल्यावर दक्षिणा म्हणून राजा त्यांना काही रुपये देऊ करतात. ती दक्षिणा, आपल्या मुठीत घेऊन तो ब्राम्हण राजदरबारातून बाहेर पडतो.
गावातील सर्व लोकांना माहित असतं, कि राजाच्या घरी आज काहीतरी पूजा अर्चना आहे. आणि, ते भटजी जसे मुख्य गावात येतात. तशी त्यांच्यापाशी लोकांची एकच झुंबड उडते. आणि एक कुतूहल म्हणून सगळी लोकं त्यांना विचारणा करतात.

राजाने, दक्षिणा म्हणून तुम्हाला काय दिलं आहे..?

भटजी महाचतुर असतात, ते म्हणतात.. मी तुम्हाला ते असं सांगणार नाही. तुम्हीच ते ओळखा. आणि या ओळखा ओळखीच्या खेळाचं कधी एकदा पैजेत रुपांतर होतं.
हे कोणालाच समजत नाही.
एक व्यक्ती म्हणतो.. तुमच्या मुठीत झाकलेली जी काही वस्तू असेल. ती मी दहा हजार रुपयात विकत घ्यायला तयार आहे. तर दुसरा व्यक्ती, लगेच वीस हजाराची बोली लावतो. तिसरा, चौथा, पाचवा, सहावा..असं करता करता ती बोली वाढतच जाते.
आणि बघता बघता हि बोली अगदी एक लाखावर येऊन पोहोचते. आता बाकी सर्व लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचते. कि त्या झाकल्या मुठीत नेमकं काय असेल..?

बाहेर चालू असलेला प्रकार पाहून, खुद्द प्रधानजी सुद्धा त्या गर्दीत सामील होतात. आणि घडला प्रकार पाहून अचंबित होतात. आणि हि हकीकत महाराजांना कळवतात. शेवटी महाराज सुद्धा चिंताग्रस्त होतात. आणि त्याठिकाणी येऊन, ब्राम्हणाला स्वतःच दिलेल्या दक्षिणेची सव्वा लाखाची बोली लावतात. आणि, त्या ब्राम्हणाच्या हातातील ती दक्षिणा गुपचूप आपल्या मुठीत घेऊन निघून जातात.
शेवटी लोकांना सुद्धा वाटतं. कि राजाने ब्राम्हणाला चुकून नक्कीच काहीतरी मौल्यवान भेट वस्तू दिली असणार आहे. त्यामुळेच तर धावत पळत येऊन त्यांनी हि बोली लावली असावी.

तर विषय असा असतो.. राजाने भटजीला फक्त " सव्वा रुपया " दक्षिणा दिलेली असते. झाकली मुठ उघडली, तर राजाच्या नावाने लोकांनी छी थू केली असती. आपला राजा येवढा कंजूस कसा..?
त्यामुळे रयतेसामोर आपली आब जाऊ नये. म्हणून राजाला हि बोली लावणं भाग पडलेलं असतं. शेवटी काय आहे, नदीचं मूळ आणि साधुचं कुळ कधी शोधू नये.
या उक्तीप्रमाणेच, झाकली मुठ कधी उघडून पाहू नये. आणि कोणाला दाखवू हि नये.

कारण.. झाकली मुठ हि, नेहमी " सव्वा लाखाचीच " असते..!