Wednesday, 10 May 2017

सेल, सेल, सेल..
खरं तर, सेल या शब्दाचा अर्थ फक्त विक्री असा आहे. पण आपण मध्यमवर्गीय लोकांनी, सेल या शब्दाचा स्वस्तातील विक्री असा सोयीस्कर अर्थ लाऊन घेतला. किंवा व्यापारी लोकांनी तशा प्रकारचं या शब्दाचं मार्केटिंग केलं असावं.
कोणतीही वस्तू स्वस्तात मिळत आहे म्हंटलं, कि सर्वसामान्य व्यक्तींची पावलं त्या मार्गाने अपोआप वळू लागतात. काय आहे, प्रत्येक व्यक्ती कोणत्याही खरेदीमध्ये आपले दोन पैसे कसे वाचतील हे पाहत असतो. पण याच गोष्टीची दुसरी बाजू पाहत असताना. समोरचा व्यापारी कोणतीही वस्तू स्वस्तात किंवा खोट खाऊन विक्री करणार आहे का..? किंवा तसं असेलच तर त्यात नक्कीच काहीतरी फसवणूक होत असणार आहे. याचा आजवर बऱ्याच जणांना अनुभव आला असावा.
पाच सहा दिवसापूर्वी, फेसबुकवर सर्चिंग करत असताना. एक जाहिरात माझ्या समोर आली.
फक्त नऊशे नाव्व्यान्नव रुपयामध्ये, पाच लंडन ब्रांड शर्टची विक्री अशी ती जाहिरात होती. शर्टचे पोस्टर सुद्धा खूप आकर्षक होते. हजार रुपयात काय येतंय हो.. असा विचार करत, मी सुद्धा गरिबी गरिबीत ती ऑर्डर बुक करून टाकली. त्यानंतर तीन दिवसांनी, मला त्या कंपनीतून फोन आला.
तुम्ही ती ऑर्डर घेणार आहात ना...?
मी सुद्धा त्यांना होकार कळवला, त्यांनी पुन्हा एकदा माझा सविस्तर पत्ता विचारून घेतला.
 झालं, सगळे सोपस्कार पार पडले.
पाच सहा दिवसांनी ते पार्सल माझ्या घरी येईल असं मला सांगण्यात आलं.
मला थोडी शंका आली होती. कारण, आजवर मी बऱ्याच वस्तू ऑनलाईन खरेदी केल्या आहेत. पण परत फिरून त्यांचा मला कधी फोन आला नव्हता. डायरेक्ट ती वस्तूच घरी यायची. आणि त्यात माझी कधी फसवणूक सुद्धा झालेली नाहीये.
त्यामुळे घरी आल्यावर, वरील सगळी हकीकत मी माझ्या मुलाला सांगितली. त्याला सुद्धा थोडी शंका आल्याने, त्याने सुद्धा नेटवर ताबडतोब सगळी जाच पडताळणी केली.
आणि म्हणाला.. पप्पा ती फ्रोड साईड आहे.
जुने, पुराने किंवा फाटके कपडे आपल्याला पाठवले जातात. आणि, ती वस्तू परत करण्यासाठी आपण त्याठिकाणी फोन केल्यावर, ते फोन घेतले जात नाहीत. आपण फसवले जातो.
ते पार्सल आल्यावर आपण घ्यायचं नाही, असं मी घरात सांगून ठेवलं, आणि कामावर निघून गेलो. तर काल दुपारी, मला एका कुरियर कंपनीचा फोन आला.
हेल्लो.. तुम्ही कुंभार बोलताय का.
मी हो म्हणालो,
त्यावर तो मुलगा म्हणाला, तुमचं एक पार्सल आलं आहे. तुम्ही ते कशाला घेताय. सगळा नकली माल असतो, फार मोठी फसवाफसवी चालू आहे.
मी सुद्धा त्या मुलाला म्हणालो, हो मला सुद्धा हे कालच समजलं.
तर तो मुलगा म्हणाला.. फक्त एक काम करा, त्या कंपनीतून तुम्हाला फोन आला. तर पैसे नसल्याने आम्ही ते पार्सल घेऊ शकलो नाही असं सांगून टाका.
मी सुद्धा त्या मुलाला माझा होकार कळवला. आज उद्या मला त्या कंपनीतून फोन येईलच. त्यांना बोलून काही फायदा नाही. सरळ नकार द्यायचा. कारण अशी नकली कामं करणारी लोकं साधीसुधी नक्कीच नसतात.
पण एका गोष्टीचं मला फार कौतुक वाटलं. मराठी माणसात अजून बरीच माणुसकी शिल्लक आहे. तो कुरियरवाला ते पार्सल माझ्या माथी मारून निघून जाऊ शकत होता. पण व्यवसायात त्यांना सुद्धा काही बरे वाईट अनुभव आले असतील. त्यामुळे त्याने सुद्धा मला वेळीच सावध केलं असावं.
तर मित्रानो.. सांगायचं हेच आहे, या जगात चमकणारी प्रत्येक वस्तू सोनं किंवा हिरा असेलच असं सांगता येत नाही. जास्तीचे दोन पैसे गेले तरी हरकत नाही. पण नेहेमी ब्रान्डेडे आणि नामांकित कंपन्यांन कडून वस्तू खरेदी करण्याला प्राधान्य देत चला. फसवणूक सुद्धा होणार नाही. आणि आत्मिक समाधान सुद्धा मिळेल..!

No comments:

Post a Comment