Wednesday, 10 May 2017

जेवढे शिकलेले, तेवढे जास्ती हुकलेले असतात..!
शिक्षणाचा आणि पैश्याचा माज, योग्य ठिकाणीच केला पाहिजे.
परवा.. पुण्यातील ट्राफिक जाम मध्ये, माझ्या कामातील ट्रकच्या पाठीमागे एक कारवाला मुलगा एसीची हवा आणि थोडी आखड खात त्याच्या बायकोशी गप्पा मारत बसला होता.
त्याच्या बायकोसोबत बोलता-बोलता, विनाकारणच तो मधेमधे त्याच्या गाडीचा हॉर्न मोठमोठ्याने वाजवत होता. तुम्हाला म्हणून सांगतो.. हॉर्न वाजवणे, या विषयाची मला फार मोठी चीड आहे. आणि त्यात, हा तर विनाकारण हॉर्न वाजवत होता.
एकतर ट्राफिक जाम काही हटत नव्हता, वाहनं पुढे सरकत नव्हती. आणि, त्या मुलाचा हॉर्न वाजवनं काही बंद होत नव्हतं. शेवटी मी सुद्धा वैतागलो. गाडी बंद केली,
आणि, माझ्या गाडीतून खाली उतरलो. आणि त्याच्या कारपाशी जाऊन त्याला विनाकारण हॉर्न का वाजवतोस म्हणून विचारलं..!
तर म्हणाला.. माझी गाडी आहे, मी काहीपण करेन..!
त्याच्या शेजारी त्याची सुंदरशी गोड गोजिरी बायको बसली होती. तिला पाहून, मी त्याचा अपमान करण्याचं टाळलं. कारण कसं आहे, सगळे अपमान सहन होतात. पण बायको समोर केलेला अपमान फार जिव्हारी लागत असतो.
हे सगळं समजून मी तसाच पुढे निघून गेलो, आणि जाताना मागे वळून सहजच मी त्याच्या गाडीचा नंबर पाहिला. तर त्या गाडीचा नंबर होता
" MH - 31 "
आता.. नागपूरचा नंबर पाहिल्यावर माझा राग लगेच थोडा शांत झाला होता. कारण, विदर्भ हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि, मी सगळं काही विसरून तसाच पुढे निघालो.
तर त्या बहाद्दराने..अती शहाणपणा करत, पुन्हा एकदा त्याच्या गाडीचा जोरात हॉर्न वाजवून, हाताने इशारा करत मला बोलावून घेतलं. एक कुतूहल म्हणून मी सुद्धा मागे फिरलो. बहुतेक तो त्याच्या बायकोसमोर त्याचा रावडी रुबाब मला दाखवू इच्छित असावा.
त्या कोवळ्या तरण्या मुलाने, त्याच्या कारची काच खाली करत नागपुरी स्टाईल मध्ये अत्यंत जरबेच्या आवाजात मला विचारणा केली..
मागे वाकून काय पाहत होता रे तू..?
त्या मुलाची आरे कारेची उद्धट भाषा ऐकून, माझ्यातील जातिवंत पुणेकर लगेच जागा नसता झाला. तर.. ते एक नवलच म्हणावं लागलं असतं.
आणि मी, चिडून कपाळाच्या आट्या आणखी तीव्र करत, खास आमच्या पुणेरी आणि ड्रायव्हरी शैलीत त्याला एकच शिवी हासडली.
तुझ्या, XXXX, XX बघत होतो. ( लेखनाचं बंधन असल्याने, फुल्यांचे अर्थ सर्वांनी आपआपल्या परीने जमेल तसे लावून घ्यावेत. )
माझी शिवी ऐकल्यावर, आणि माझा तो रुद्रावतार पाहिल्यावर, हा नेभळट आयटीकर प्रतिउत्तरार्थ मला काहीच बोलला नाही. पण, त्याची बायको काय समजायचं ते समजून गेली होती. हा गडी आता खूपच रागावला आहे, आणि शेवटी वैतागून ती सुद्धा रागारागाने त्याला म्हणाली..
अरे गप्प बैस रे, हे पुणे आहे तुमचं नागपूर नाही..!
माझ्या अभ्यासा प्रमाणे, बहुतेक ती मुलगी पुणेकर तरी असावी, किंवा नागपुरी तरी नसावी.
पैसा आला, म्हणजे अक्कल आली असं होत नाही.
तुमचं जास्ती शिक्षण झालं असेल, पण समाजात वावरताना, सामाजिक होऊनच वागावं लागतं. नाहीतर, कोणालाही नडताना सगळ्या गोष्टींची ताकत तरी अंगी ठेवावी लागते.
" असं फालतू आब घालवायचं काम केल्यावर, रात्री बायको सुद्धा आपल्याला जवळ करत नाही. याची सगळ्या अतिहुशार लोकांनी नक्कीच दखल घ्यावी.! "
विनाकारण फालतू हुशारी करू नये, ट्रॅफिक चे नियम पाळावेत. आणि जमत नसेल तर भारतात राहू नये..!
ट्राफिकचे नियम न पाळणाऱ्या,
सगळ्या अती हुशार लोकांना, माझ्याकडून हा प्रेमभरा सज्जड दम आहे बरं का..!

No comments:

Post a Comment