Wednesday, 10 May 2017


काल सकाळी ऑफिसला निघालो असता..
महामार्गावर.. माझ्या शेजारच्या बाजूने बाईकवरून एक नवदाम्पत्य निघालं होतं. मी किंचित मान वाकडी करून त्यांच्याकडे पाहिलं,
तर.. तो मुलगा अगदी निर्विकारपणे त्याची बाईक चालवत होता. आणि त्याच्या पाठीमागे बसलेली त्याची बायको. त्याच्या पाठीवर रेलून, हाताने विशिष्ट हातवारे करत त्याच्या कानापाशी जोरजोरात काहीबाही बडबडत होती.
बहुतेक, काही घरगुती विषयावरून त्यांच्यात जोरदार भांडणं झाली असावीत. आणि, आता घराबाहेर पडल्यावर ती मुलगी त्या मुलाला पिडत असावी. हे मी लगेच ताडलं. माझ्या डोक्यात हेल्मेट असल्याने, ती मुलगी नेमकं काय बोलत आहे. ते मला स्पष्ट ऐकू येत नव्हतं.
आणि थोड्याच वेळात, आमच्या गाड्या सिग्नलला येऊन थांबल्या. त्यांची बाईक अगदी माझ्या शेजारीच होती. आता बाकी त्यांची भांडणं मला स्पष्टपणे ऐकू येत होती.
तर.. ती मुलगी त्याला सुनावत होती,
पण तू, काल तुझ्या आईला बोलला का नाहीस..? सगळं ऐकून घेत होतास, आमच्या वादामध्ये बिलकुल मध्यस्थी करत नव्हतास. सांग ना, चूक फक्त माझीच होते का..? तुझ्या आईची काहीच चूक नाही का..? आणि, बरीच काहीबाही फार मोठी तिची टकळी चालू होती.
सिग्नलवरील आजूबाजूचे लोक आपली भांडणं ऐकत आहेत. याचं सुद्धा तिला बिलकुल भान नव्हतं. आणि, तो मुलगा बिचारा सगळं काही गपगुमान ऐकत होता.
आणि अचानकपणे, त्या मुलाने एक वेगळाच पवित्रा घेतला. त्या सिग्नलवरच, त्याने त्याची बाईक साईड स्टॅन्डवर लावली. आणि, तो बाईकच्या खाली उतरून पलीकडच्या बाजूला निघून गेला. आता, त्या कललेल्या बाईकवर ती एकटीच तिचा एक पाय जमिनीवर टेकवून निर्विकारपणे बसली होती. आणि पुढे जाणाऱ्या त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होती, आता मात्र ती मुलगी मला फारच घाबरलेली दिसत होती.
आणि घाबरून ती म्हणायला लागली..
अरे तू गाडी तरी बंद कर ना. मला बाईक चालवायला येत नाही. अरे ऐक ना.. चुकलं माझं.
अरे तुला ऐकू येतंय कि नाही. आणि एवढं बोलून, तिने डोळ्यातून अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
तोवर ग्रीन सिग्नल पडला, यांची गाडी रस्त्यात तशीच उभी होती. त्यांच्या बाईकच्या मागे नेमकी एक कार असल्याने, लगेच वाहतूक कोंडी झाली. सगळी लोकं, मोठमोठ्याने हॉर्न वाजवू लागले. शेवटी, माझ्या बाजूला उभ्या असणाऱ्या मुलाला मी म्हणालो..
ए बेटा.. ऑफिसमध्ये गेल्यावर भांडत बसा. इथे लोकांचा कशाला खोळंबा करताय..!
त्यावर.. एका विशिष्ट झटक्यात, तो मुलगा त्याच्या बाइकपाशी आला. बाईकवर स्वार झाला, तशी हि सुद्धा पाठीमागे जरा सावरून बसली, आणि तो भुर्रकन पुढे निघून गेला.
मी हि त्यांच्या मागोमाग निघालोच होतो.
त्यावेळी, त्या मुलीने मागे वळून माझ्याकडे पाहत आपले दोन्ही कान धरत, मूक अभिनय करत मला माफी मागितली. आणि, अगदी वायुवत वेगाने ती बाईक तशीच पुढे निघून गेली.
सांगायचं इतकंच आहे, कि.. आजच्या जमान्यात संसाराच्या गाडीची दोन्ही चाकं हि धावतीच असायला हवीत. पण किमान बाईकवरून जात असताना तरी मुलींनी थोडा संयम बाळगायला हवा. या घरगुती भांडणाच्या नादात, चुकून त्या मुलाचा स्वतःवरील कंट्रोल सुटला असता. आणि भयानक अपघात घडला असता तर..?
होत्याचं नव्हतं व्हायला बिलकुल वेळ लागत नाही. थोडं सबुरीने घ्यावं,
लहान मुलाने मांडीवर शु केली म्हणून, लगेच कोणी आपली मांडी कापून टाकत नसतं..! घरगुती भांडणांना आपल्या घरातच मिटवतं घ्यावं, त्याला हायवेवर किंवा चव्हाट्यावर चुकून सुद्धा आणू नये..!

No comments:

Post a Comment