Saturday, 13 May 2017

बरेचदा.. माझ्या असं पाहण्यात आलं आहे. कि,
ट्रकच्या, बसच्या किंवा एखाद्या कारच्या पाठीमागील बाजूस किंवा काचेवर रेडियमच्या अक्षरात लिहिलेलं असतं..
एकच वादा, फक्त.. अमुक, तमुक दादा.
श्री. पै. अमुक, तमुक आमदार / खासदार.. दादा, आबा, भाऊ, तात्या.. आणि बरच काही.
असं संपूर्ण नावात लिहिलेलं मला पाहायला मिळतं. कदाचित, हे सर्व तुम्ही सुद्धा पाहिलं असावं.
खरं पाहायला गेलं तर.. गाडीच्या मागील काचेवर, किंवा ट्रकच्या मागील बाजूस. जी काही नावं लिहिलेली असतात. ती बहुत करून, आपल्या घरातील बच्चेकंपनीची असतात. खरं तर, त्याची आपल्याला सुद्धा आवड असते. आणि लहान मुलांना तर त्याचं फार मोठं अप्रूप असतं.
काही रिक्षावाले.. त्यांच्या रिक्षाच्या मागे, फक्त.. " आई वडिलांचा आशीर्वाद " किंवा " गद्दार " असं नाव लिहून एका मुठीत आवळलेला सुरा त्या नावात खुपसलेला असतो. हे सगळं का ते मला माहिती नाही. पण ते लिहितात तर खरं..
बाहेर राज्यातील, खास करून पंजाब प्रांतातील गाड्यांवर..
सोनू के पप्पा दि गड्डी. किंवा.. सोनिये तू राह तक, मै आ रहा हुं.
किंवा.. अशाच आशयाची वेगवेगळी नावं लिहून आपल्या मुलाचं, बायकोचं आणि आपलं स्वतःचं नाव त्या गाडीवर लिहून काही लोकं खुश होत असतात. वरील, या सर्व गोष्टी मला आणि माझ्या मनाला फार भावतात बरं का.
खरं तर.. आपल्या गाड्यांवर, तिर्हाईत लोकांची नावं लिहिण्यात काय हाशील आहे हो..?
या.. आमदार, खासदार, नगरसेवक लोकांची आपण कितीही नावं लिहिली. किंवा, त्यांचं कितीही लांगूलचालन केलं. तरी, हे.. नकली देव मंडळी आपल्या नवसाला कधी पावणारी असतात का..? तर मग, यांच्या नावाचा येवढा उदोउदो का आणि कशासाठी करा..?
मित्रांनो..मी जे सांगतोय, ते तुम्हाला पटतंय का पाहा.
खरं तर.. आपल्याकडे असणाऱ्या गाड्या या, आपल्या आई बापाच्या पुण्याईने आपल्याला मिळालेल्या असतात. वेळप्रसंगी, स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन. किंवा, आपल्या आवडी करिता, आईने तिच्या अंगावरील आवडते दागिने मोडून ती गाडी आपल्याला विकत घेतलेली असते. किंवा, काहीतरी खटपट करून, आपल्या गाड्यांचे हफ्ते ते लोकं भरत असतात. आपल्याला बाकी, या गोष्टींची बिलकुल भनक नसते. आणि ते ती लागू सुद्धा देत नाहीत.
तर मग, तुम्हाला असं वाटत नाही का. कि येवढ्या खस्ता खाऊन, ज्यांनी आपल्यासाठी काहीतरी केलं आहे. आणि, त्यांनी घेऊन दिलेल्या त्या गाडीच्या पाठीमागे. आपण.. आपल्या आई वडिलांचंच नाव लिहायला पाहिजे. थोडा विचार करा मित्रांनो.
मी तर म्हणतो.. तुम्ही आपल्या गाडीवर, आपल्या आई बापाचं नाव लिहून,
त्यापुढे.. आई वडिलांची कृपा, आशीर्वाद, किंवा पुण्याई असं लिहायला काय हरकत आहे. मराठीत नाही, तर इंग्रजीत तरी लिहा. अरे.. एकदा तुम्ही असं लिहून तर पाहा.
ते वाचून, तुमच्या आई बापाची छाती अभिमानाने अगदी फुलून नाही गेली. तर, मी तुम्हाला म्हणाल ते हारेण.
मित्रांनो, आपल्या अडी अडचणीच्या काळात. आपले आईवडीलच आपल्या मदतीला धावून येत असतात. लागेल तितका पैसा ओततात, लागेल ती मदत करतात.
त्यावेळी.. कोणताही आमदार किंवा खासदार आपल्या मदतीला धावून येणार नसतो.
ज्याचा मान त्याला द्यायला शिका.
ती लोकं सुद्धा, तुमची आदर्श असतील. तर त्यांना जेवढ्यातल्या तेवढ्यात सीमित ठेवा.
कारण,
" मार्ग दाखवणाऱ्या पेक्षा, जन्म देणारा कधीही श्रेष्ठ असतो..! "
दुनिया ज्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. तो मार्ग तुम्हाला योग्य दिशा दाखवेल कि नाही. ते मला सांगता येत नाही. पण आपले " आईबाप " आपल्याला कधीही वेगळ्या आणि वंगाळ मार्गावर भरकटू देणार नाही. याची तर मला शंभर टक्के खात्री आहे. आणि अशी मी तुम्हाला ग्वाही सुद्धा देतो. त्यामुळे, प्रथम आपल्या आई वडिलांचा आदर सत्कार करा.
कारण, ते होते म्हणून आपण आहोत. हे आपण कदापि विसरता कामा नये.

No comments:

Post a Comment