Saturday, 13 May 2017

मटन किमा ( खिमा )
************************
मटन किमा हा एक असा प्रकार आहे, जो कि सर्व आबालवृद्ध लोकांना पटकन आपलंस करून टाकतो. जी लोकं मटन खात नाहीत, ती लोकं सुद्धा या मटणाच्या भाजीला चुकून खाऊ शकतात. कारण, यामध्ये मटणाचे पीस दिसत नसतात, असतो तो त्याचा बारीक केलेला किमा.
किम्यासाठी मटन घेताना, मटणाच्या दुकानदाराला बजावूनच ते मटन घ्यावं. अन्यथा ती दुकानदार लोकं, बकऱ्याच्या पोटाकडील भागात असणारा पातळ मटणाचा मांसल भाग किमा देण्यासाठी वापर करत असतात. पण ते, पातळ मटन कोणी चुकून सुद्धा घेऊ नये. त्यात खास अशी चव नसते. किम्याकरिता, पिव्वर मांडीचं मटनच घ्यावं. आणि त्याच्यासोबत एखादा गुडदा, चरबी आणि कलेजी सुद्धा हमखास घ्यावी. मांडीचं मटन घेताना, दुकानदार लोकं तुम्हाला त्यात मुद्दाम मोठ्या हाडकाचा ( नळीचा ) पीस टाकतात. पण खवय्या माणसाने कोणतीही काळजी न करता मांडीतील त्या नळीचा मोठ्या आनंदाने स्वीकार करावा..
मटणाचा किमा करताना, तो किमा सत्तुरच्या सहाय्यानेच बारीक करून घ्यावा. मशीनमध्ये बारीक केलेल्या किम्याला म्हणावी अशी चव लागत नाही. सत्तुरवर पाणी टाकून, लाकडी ओंडक्यावर बारीक केलेला किमा अगदी लाल भडक आणि चरबी असल्यामुळे मध्येच किंचितसा पांढऱ्या रंगाच्या मिश्रणाचा तयार होतो. किम्याच्या त्या मिश्रणात कलेजीचे बारीक तुकडे आणि गुडद्याचे सुद्धा बारीक तुकडे करून घालावेत. कलेजी आणि गुडदा किम्याच्या खुमासदार भाजीची चव वाढवण्याचं काम करतात. शिवाय किमा खाताना, दाताखाली येणारे कलेजीचे आणि गुड्द्याचे मऊ तुकडे कमालीचे चविष्ट लागतात.
चला तर मग.. मटन किम्याच्या प्रत्यक्ष पाककृतीला आपण सुरवात करूयात.
मटन किमा बनवण्यासाठी लागणारं साहित्य :- अर्धा किलो बारीक केलेला मटन कीमा, एक मोठा बारीक कापलेला कांदा, आठ ते दहा लवंगा, दालचीनीचे दोन तूकडे, पाच सहा हिरव्या इलायची, दहा ग्राम काजू, पन्नास ग्राम दही, पाच सहा बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या, कसूरी मेथी, एक छोटा चमचा लसून आणि आल्याची पेस्ट, लिंबू, कोथांबीर, एक उकडलेलं अंडं आणि चवीनुसार मीठ. अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा मटन मसाला,एक छोटा चमचा लाल मिरची पावडर, छोटा चमचा धने पावडर, थोडी हळद पावडर, आणि दोन मोठे चमचे तेल.
सर्वप्रथम, एका भांड्यामध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करून घ्यावं. तेल गरम होईपर्यंत, दुसरीकडे खड्या मसाल्याची तिखट घालून पावडर करून घ्यावी.
तेल गरम झाल्यावर, त्यात बारीक चिरलेला कांदा, हळद, मीठ घालून परतून घ्यावा. पाच मिनिटात तो कांदा तांबूस रंगावर परतला जाईल. यामध्ये, मटन किमा आणि कलेजीचे तुकडे घालून, हे मिश्रण एकजीव करून घ्यावं. आणि तीन चार मिनिटं हे मिश्रण शिजवत ठेवावं.
यानंतर.. मटन किम्यात चिरलेली हिरवी मिरची, एक छोटा चमचा लसून आणि आल्याची पेस्ट, सुखी कसुरी मेथी, धने पावडर, मटन मसाला, गरम मसाला, चवीसाठी थोडं मीठ आणि पन्नास ग्राम दही घालावं.
वरील सर्व सामग्री किम्यामध्ये एकजीव करून घ्यावी. त्यावर वरून थोडे काजूचे तुकडे घालावेत. आणि मंद आचेवर हे मिश्रण शिजू द्यावं. साधारण पंधरा मिनिटात, हा मटन किमा तयार झालेला असेल. त्यानंतर पंधरा मिनिटे त्याला तसाच वाफेवर शिजवत ठेवावा.
तयार झालेल्या लपथपित मटन किम्याला.. लिंबाच्या चकत्या, उकडलेल्या अंड्याच्या फोडी, आणि चिरलेली कोथंबीर पेरून छानसं सजवून घ्यावं. आणि, गरमागरम किमा.. मऊसर चपाती सोबत जेवणासाठी सर्व करावा.

O शेफ O
~PΔΠDIT PΩTTΣR~ 

No comments:

Post a Comment