Monday, 15 May 2017

फेसबुक हे एक फार मोठं प्रभावी माध्यम आहे.
याचा.. कोणी चांगल्याप्रकारे वापर करत असतो. तर काही लोकांना सवय असतेच. कि, चांगल्या माध्यमाचा वाईट वापर कसा करता येईल. असो, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय झाला.
तर मित्रानो.. इथे वावरताना, आपल्याला पाहायला कोणी नाहीये. असं मुळीच नसतं. इथे कित्तेक फेक खात्यांना, लोकांनी ट्रेस करून उघडं नागडं पाडलं आहे. तरी सुद्धा, काही लोकं आपले प्रताप सोडत नाहीत. खोटी नावं, खोट्या माहित्या, खोटे फोटो ठेवून आपली खाती चालवत असतात. पण या खोट्याच्या नादात. ते कधी एकदा जन्मभराची " खोट " खाऊन बसतात. हे त्यांचं त्यांनाच समजत नाही.
माझ्या वॉलवर, माझी सगळी खरी माहिती मी लिहिलेली आहे. माझा आणि माझ्या कुटुंबाचा खरा फोटो आणि माझ्या कामाची सुद्धा सगळी खरी माहिती मी इथे ठेवली आहे. कारण, एक खोटं बोलल्यावर त्यामागे शंभर खोटी बोलावी लागतात. आणि हे अगदी खरं सुद्धा आहे. ते म्हणतात ना, सच्चेका बोलबाला, और.. झुटेका मुह काला..!
तर, फेसबुवर सगळी खरी माहिती लिहिण्याचा मला एक फायदा झाला. पण, तो फायदा प्रत्यक्ष माझ्यासाठी नव्हता. तर त्यामुळे, चक्क दुसऱ्या व्यक्तीला अप्रत्यक्षपणे असा फायदा झाला होता.
आमच्या पालिकेतील एक साहेब, एकदा कोकणात फिरायला गेले होते. त्याठिकाणी ते एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले असता. चुकून त्यांच्या खिशातील पैशाचं पाकीट खाली पडलं. आणि, ते काही त्यांना समजलं नाही. त्याच वेळी, नेमके माझे एक फेसबुक मित्र Hrishikesh Ramchandra Madal हे सुद्धा कोकणात फिरायला गेले होते. आणि योगायोगाने नेमकं ते पाकीट यांना सापडलं.
त्यांनी.. आजूबाजूला सर्वांना विचारलं, पण ते पाकीट माझं आहे..! असं म्हणणारा, एकही व्यक्ती त्यांना तिथे भेटला नाही. कारण, त्या पाकिटात पाकीट हरवलेल्या व्यक्तीचे सगळे महत्वाचे डॉक्युमेंट होते. चुकून जर कोणी.. हे पाकीट माझं आहे, असं खोटं बोलला असता. तर माझ्या मित्राने त्याला जागेवरच गारद केला असता. शेवटी, पाकिटातील सगळी कार्ड्स चाळत असताना त्यांना आमच्या पुणे महानगर पालिकेचं साहेबांचं ओळखपत्र दिसून आलं. त्यानंतर जास्ती चौकशी न करता तो विषय तिथेच सोडून, ट्रीप संपल्यावर ते पुण्याला निघून आले.
दुसऱ्या दिवशी सकाळीच मला त्यांचा मेसेज आला.. भाऊ तुमचा फोन नंबर द्या. थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. मी सुद्धा त्यांना माझा नंबर दिला, त्यांनी ताबडतोब मला फोन केला. आणि वरील घडलेला प्रसंग सांगितला.
आता खरं सांगायला गेलं तर, आमच्या पालिकेत जवळपास वीस हजार कर्मचारी आहेत. आणि ते पाकीट नेमकं कोणाचं असेल, आणि काय हा फार मोठा प्रश्न होता.
शेवटी मी त्यांना आयकार्ड वरील त्या संभाव्य व्यक्तीचं नाव विचारलं. आणि योगायोगाने, नेमके ते आमच्या विभागातीलच साहेब होते. हा विषय क्लियर झाल्यावर, मी आमच्या साहेबांना फोन लावला. आणि त्या विषयाची उलटतपासणी घेतली.
नमस्कार साहेब, परवा तुम्ही कोकणात फिरायला गेले होते का..? माझ्या या प्रश्नावर साहेब अगदी अवाक झाले, आणि म्हणाले. तुम्हाला कसं माहिती..?
त्यावर, मी अजून एक दुसरा बॉम्ब टाकला. कोकणात तुमचं पाकीट वगैरे हरवलं आहे का..?
आता बाकी आमचे साहेब अगदी सैरभैर झाले. कि या सगळ्या गोष्टी मला कशा माहिती पडल्या.
त्यावर साहेब म्हणाले.. पाकीट हरवलं आहे खरं. पण त्यात पैसे वगैरे काही नव्हते. पण सगळी महत्वाची कागदपत्र त्यात आहेत.
मग मी त्यांना सगळा खुलासा केला. आणि वरील घडलेला प्रसंग सांगितला. त्यावर साहेब खूप खुश झाले. कारण, आयकार्ड, पॅनकार्ड, व्होटर आयडी कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड काढणं काही सोपं काम नाही.
आमचे साहेब असले म्हणून काय झालं.. मी हृषीकेश यांना सांगितलं. मी तुमचा मोबाईल नंबर मी आमच्या साहेबांना दिला आहे. त्यांचा फोन आला, कि तुम्ही त्यांना तुमच्या ऑफिसमध्ये बोलावून घ्या. आणि मगच ते पाकीट त्यांच्या हवाली करा. नाहीतर माझ्या मैत्री प्रेमामुळे, तुम्ही ते पाकीट त्यांना घरपोच सुद्धा करताल.
शेवटी सगळे सोपस्कार पार पडले. आणि साहेबांना त्यांचं पाकीट मिळालं.
हृषीकेश ने चांगलं काम केल्याचं त्यांना समाधान मिळालं. आणि मी फेसबुकवर ठेवलेल्या खऱ्या माहितीचा चांगला उपयोग झाल्याचा सुद्धा पाहायला मिळालं.
तर मित्रांनो.. वेळ काही सांगून येत नसते. कधी कोणत्या मार्गाने चांगल्या गोष्टी घडतील त्याचा नेम नाही. त्यामुळे, नेहेमी खऱ्याची कास धरा. खरं कधीच वाया जात नाही.

No comments:

Post a Comment