Wednesday, 10 May 2017

यावर्षी, फार असह्य उन्हाळा आहे ना..!
आपण सर्वांनी, उन्हाळ्याचं स्वागत करण्यासाठी. घरामध्ये.. फ्रीज, कुलर, एसी, पंखे, खिडक्यांना गारगार वाळ्याचे पडदे, थंडगार सरबतच्या बाटल्या. या सगळ्या गोष्टींची तजवीज तर करून ठेवली आहे. हे आपलं दर वर्षीचंच झालं.
पण, आपण लोकं एक साधा विचार का करत नाही. कि.. दरवर्षी, उन्हाचा चटका वाढतच चालला आहे. त्यावर, आपल्याला काही उपाययोजना करता येईल कि नाही..?
पण नाही.. अपना सर्वांच्या डोळ्यावर, एका अनामिक श्रीमंतीची झापडं चढली आहेत. सगळी सुखं, आपल्यासमोर, अगदी हात जोडून उभी असल्याने. आपल्याला कोणत्याच गोष्टीची चिंता वाटेनाशी झालीय.
पण हे कुठवर..? अजून, दोन तीन वर्षात, उन्हाच्या तापमानाचा पारा अगदी पन्नाशीला येऊन पोहोचेल. आणि, हे अगदी खरं आहे बरं का.
त्यावेळी.. हे कुलर, पंखे, फ्रीज आणि एसी सुद्धा आपल्या काहीच कामाचे उरणार नाहीत. पालिकेच्या नळातून येणारं पाणी सुद्धा, अगदी उष्ण असेल. त्यावेळी आपण काय करणार आहोत..?
मित्रांनो. जमलं तर, थोडं मागे वळून पाहा..
आपण सर्वांनी, आजवर चाळीस पंचेचाळीस उन्हाळे तर नक्कीच पाहिले असतील. त्यातील,सुरवातीचे उन्हाळ्यातील दिवस तुम्हाला नक्कीच आठवत असतील.
ते दिवस आजच्या इतके उष्ण होते का..?
नाही ना. मग, हे तापमानाचं गणित नेमकं चुकतंय तरी कुठे..?
आजवर, ह्या वसुंधरेची आपण होईल तेवढी हेळसांड करत आलो आहोत. वारेमाप वृक्षतोड करून, सिमेंटची देखणी जंगलं आपण उभी केली. आणि, संपूर्ण वातावरणाची आपण वाट लाऊन टाकली.
काय तर म्हणे, काचेची बिल्डींग. अरे त्यामुळे तापमानात अजून वाढ होत आहे. हे आपल्या लक्षात का येत नाही..?
अहो.. तो सूर्यनारायण रोजच्या रोज न चुकता, आपल्याला दर्शन देत असतो. बिचारा वारा तर, आपल्याला दिसत सुद्धा नाही. पण त्यामुळेच, आपण जिवंत आहोत. हे, कोणाच्याच ध्यानात कसं येत नाही. नित्यनेमाने पाऊस पडतोय म्हणून, आपली तृष्णा शांत होत आहे.
अहो.. पाऊस पडेल तेंव्हाच आपल्याला बिसलेरी मिळेल ना..! आणि, शुद्ध वारा वाहील तेंव्हाच एसी आणि आपला श्वास सुद्धा चालु राहील. कि, आता आपण हवा सुद्धा आयात करणार आहोत..?
आपण लोकांनी.. भरमसाठ जनता तेवढी वाढवून ठेवली आहे. पण त्यातला, एक सुद्धा कामाचा नाही. असं म्हणायची आत्ता वेळ आली आहे.
लग्न झाल्यावर, न सांगता प्रत्येक जन.. दोन,चार पोरं तेवढी काढून ठेवत आहेत. पण, या वसुंधरेचं सुद्धा आपण काहीतरी देणं लागतोय. म्हणून. पर्यावरणाशी निगडीत आपण एक तरी गोष्ट निश्चित करायला हवी. असं कधी वाटलं नाही..?
खरं सांगा..आजवर, आपण एक तरी झाड कधी लावलं आहे का हो..?
माझ्या माहितीप्रमाणे.. आजवर, हा मूलभूत प्रश्न तुमच्या मनात कधी आलाच नसेल नाही..!
आपलं तर झालं गेलं हो, पण.. आपल्या नंतर येणाऱ्या पिढीचं काय..?
काल टीव्हीवरील बातम्यात सांगत होते. येत्या शंभर वर्षात, या वसुंधरेचा अंत होणार आहे. त्याकरिता, आपल्याला एखाद्या नवीन ग्रहावर स्थलांतर करावं लागणार आहे. अहो, या पृथ्वीचीच आपण एवढी वाट लाऊन ठेवली आहे. त्यामुळे, हि बातमी जर त्या इतर ग्रहांना समजली तर..? आपण तिथे जाण्या आधीच, आपली ते वाट लाऊन ठेवतील.
हे सगळं स्वप्नवत आहे म्हणा, कारण.. सगळी जग दुनिया चंद्रावर गेली. तरी आपण आपल्या गावात नीट राहू शकत नाहीये. हि भयाण वस्तुस्थिती आहे.
चला तर मित्रांनो.. आपण सर्वांनी एक संकल्प करूयात. रानावनात, मोकळ्या जागेत, डोंगर कपारीत, जमेल तिथे आपण वृक्षारोपण करूयात. आणि आपण लावलेल्या त्या रोपट्याला फक्त तीन वर्ष सांभाळायची तसदी घेऊयात. त्यानंतर, ते झाड आपलं अपुनच वाढत जाईल. आपल्या मुलांना.. आपण जन्मभर पोसत असतो. तर मग, या झाडांना आपल्या खर्या जीवाला आपण फक्त तीन वर्ष पोसू शकत नाही का..?
भारतातील प्रत्येक व्यक्तीने, दरवर्षी एक झाड लावलं. तर, हे भारतवर्ष हरित होण्यात नक्कीच मदत होईल. निसर्ग आजवर आपल्याला भरभरून देत आला आहे. परंतु, आज आपल्याला त्याचं काहीतरी देणं चुकतं करायची वेळ आली आहे. आणि ते सुद्धा, आपल्याच हितासाठी आहे बरं का. हा विषय फक्त वाचून सोडून देऊ नका. यावर क्रिया आणि प्रतिक्रिया फार महत्वाची आहे. चला तर मग.. आपण सगळे एक संकल्प करूयात.
" एक झाड लाऊया, आणि आपली वसुंधरा वाचवूया..! "
करा रे मित्रानो.. आपल्या आज साठी. आणि, आपल्या आप्तांच्या उद्यासाठी. आपण ठोस पावलं उचलनं नक्कीच हितकारक असेल.
वसुंधरे.. तू आम्हाला, हवी आहेस. कारण, आम्ही तुझे आहोत. आणि, सदैव तू आमचीच असशील.

No comments:

Post a Comment