जसे चोर असतात, तशा चोरणी सुद्धा असतात बरं का...!
त्याचा प्रत्यय.. मला मागे एका लग्नात आला. मध्यंतरी माझ्या मित्राच्या मुलाचं लग्न होतं. मंगलाष्टकं सुरु होण्या अगोदर.
स्टेजवर.. काही प्रतिष्ठित नागरिक आणि स्थानिक नगरसेवक यांना यजमानांकडून आमंत्रित करण्यात आलं होतं. शुभमंगल सावधान झालं. यथासांग सगळा शुभविवाह पार पडला.
या शुभ कार्यासाठी, आमच्या गावातील स्थानिक नगरसेविका, आणि, शहराच्या माजी महापौर सुद्धा आल्या होत्या.
एक संस्कार म्हणून, वधुवराला आशीर्वादित करायला स्टेजवर जात असताना. त्या, आपल्या पायातील चप्पल स्टेजच्या खालील बाजूस काढून स्टेजवर गेल्या होत्या.
आणि, लग्न उरकल्यावर खाली येऊन पाहतात तर काय, त्यांच्या चपलेला कोणीतरी " पाय " दाखवला होता.
आता, लगीनघाई मध्ये ती चप्पल गडबडीत कोणी घालून गेलं होतं. कि, ती चप्पल खरोखर चोरीला गेली होती..? ते काही समजू शकलं नाही. पण, चप्पल तर जागेवरून नाहीशी झाली होती.
घडलेल्या या प्रकरणामुळे.. लग्नात, सजून धजून न बोलावलेले काही भुरटे चोर आणि चोरणी देखील येत असतात. याचा मला याची देहा अनुभव आला. कारण, लग्नात आलेल्या आप्त व्यक्ती असा प्रकार कधीच करणार नाहीत. हे मला चांगलं ठाऊक आहे.
खरं तर असं व्हायला नको होतं. शेवटी, आमच्या स्थानिक नगरसेविकेला अनवाणीच आपल्या कार पर्यंत जावं लागलं. जाऊदेत, होतं असं कधी कधी.
पण खरोखर, त्यांची चप्पल जर चोरीला गेलीच असेल. तर.. हा प्रताप करून, ती चोरणी मात्र खूप खुश झाली असेल.
कारण, नगरसेविकेच्या पायातील चप्पल काय स्वस्तातील असणार आहे का..?
आणि त्यात, त्या बाई माजी महापौर सुद्धा होत्या.
त्यामुळे, या प्रकरणा नंतर त्यांच्या चोर महिलांच्या ग्रुपमध्ये, ती बाई अगदी छाती फुगवून सगळ्या चोरनींना सांगत फिरत असेल.
मी काही, कोण्या साध्या सुध्या बाईची चप्पल चोरली नाहीये. महापौर बाईची चप्पल चोरली आहे. काय आहे, प्रत्येक क्षेत्रात प्रत्येकाची वेगवेगळ्या प्रकारची स्टेटस असतातच नाही का.
लग्नात.. एक गंमत म्हणून, आपल्याकडे नवऱ्या मुलाचा बूट चोरायची पद्धत असते. पण यावेळी बाकी, आमच्या माजी महापौर बाईंना त्यांची चप्पल गमावून हे लग्न साजरं करण्याची आगळी वेगळी मौज हकनाकच स्वीकारावी लागली. आणि, त्यासोबतच.. लग्नसमारंभात स्टेजवर जाताना पायातली चप्पल कधीही काढायची नाही. हा एक नवीन धडा सुद्धा त्यांना मिळाला.
परंतु.. घडल्या प्रकारामुळे, आमचे यजमान मित्र बाकी खूपच चिंताग्रस्त झाले होते.
(Y)
No comments:
Post a Comment