Wednesday, 10 May 2017

फायनान्स, प्रकरण ( २ )
~~~~~~~~~~~~~~
फायनान्स कंपनीतील त्या बँकांना,
काही फसवणूक करणारी लोकं सुद्धा शंभर टक्के मिळत असतात. त्याकरिता, ती लोकं त्यांचे पैसे वसूल करण्यासाठी, वसुलीची एक खास टीम सुद्धा त्यांनी तयार ठेवलेली असते.
त्या वसुली पथका मधील कामगार सुद्धा.. खूप धीट, अंगापिंडाने अगदी मजबूत. आणि, दिसायला सुद्धा अगदी बेरड असतात. त्यांची भाषा सुद्धा अगदी अरेरावीची असते, शेवटी काय आहे त्यांना सुद्धा हि नोकरी करायची असते. त्यांच्या सुद्धा पोटापाण्याचा प्रश्न असतो. त्यामुळे त्यांना तसं वागावंच लागत असतं. नाहीतर, हकनाक त्रास द्यायला आता काही मोघलाई वगैरे नाहीये.
पूर्वी.. माझा एक मित्र, अशाच एका खाजगी बँकेत वसुली विभागात कामाला होता.
यांना रोजच्या रोज पाच-दहा ठिकाणची वसुली करण्यासाठी. त्या, कर्जदाराचं नाव, पत्ता आणि फोन नंबर लिहिलेला एक कागद दिला जायचा.
रोजच्या रोज, लोकांना दमदाटी करून पैसे वसूल करायचं काम यांना असायचं. आणि सरावाने, यांनी सुद्धा या कामात भलतीच महारत प्राप्त केलेली असायची.
काहीवेळा.. हि लोकं, कर्जदारांना गोड बोलून पैसे वसूल करायचे. तर कधी, दरडावून धमकावून पैसे वसूल करायचे. तर काही ठिकाणी, त्यांना त्यांच्या ओळखीचे लोकं मिळायचे. त्यावेळी, त्यांना समज देऊन पुढील काम ते मार्गी लावायचे. तर काही लोकांना, आपल्या आवेशात घेऊन त्यांच्याकडून काही ठराविक रकमेची " तोडपानी " करून. त्यांना, दोनचार महिन्याचा दिलासा देण्याचं अनधिकृत काम सुद्धा ते करायचे. या वसुली प्रकरणामुळे, समाजात यांना फार मोठा " भीतीयुक्त " मान किंवा आदर असायचा..!
या सगळ्या गोष्टींव्यतिरिक्त.. सगळ्या गोष्टींना पुरून उरणारे काही कर्जदार खूपच भयंकर, आणि फायनान्स कंपन्यांचे बाप असायचे. असं म्हटल तर ते वावगं ठरू नये.
कर्ज घेतल्यानंतर हि लोकं कधीच बँकेचे हफ्ते भरत नसायचे. त्याकरिता, पळवाटा शोधत ते वेळोवेळी त्यांचे फोन नंबर बदली करायचे. वेळप्रसंगी, वसुली पथक घरी आल्यावर घरात असून सुद्धा.. संडास, बाथरूममध्ये ते लपून राहायचे. अशा नामी शक्कल लढवणाऱ्या लोकांना जाळ्यात कसं पकडता येईल..? यासाठी, त्या कर्मचारी लोकांकडून काही नामी युक्त्या लढवण्यात आल्या..!
त्यापैकी.. अशा काही लोकांच्या घरी, ते रात्री अपरात्री जायचे. आणि, त्यांच्या घराची बेल वाजवायचे. रात्रीची वेळ असल्याने, शक्यतो घरातील कर्ता पुरुषच दरवाजा उघडायला यायचा. आणि, आय होलमधून पाहिल्यावर. बाहेरील परिस्थिती आणि काही अनोळखी चेहेरे त्याला समजत नसायचे. पण एक गोष्ट त्याला नक्की समजायची. हे कोणी, चोर वगैरे नाहीयेत, हे कदाचित नक्कीच बँकेचे लोकं असणार आहेत. हे ताड्ल्यावर, तो व्यक्ती यांना पाहून सुद्धा दरवाजा काही उघडायचा नाही.
मग शेवटी, हि लोकं सुद्धा त्यांचं शेवटच " रामबाण " अस्त्र बाहेर काढायचे. आणि, जोरजोरात त्या घराचा दरवाजा बडवायला सुरवात करायचे. आणि मोठ्याने आवाज सुद्धा द्यायचे. याने काय व्हायचं, त्या आवाजाने.. त्यांच्या घराशेजारील लोकं जागी व्हायची. आणि नेमकं काय झालं आहे..? ते पाहायला ती लोकं घराबाहेर यायचे.
तेंव्हा, हि वसुली पथकातील लोकं त्या शेजारी लोकांना सांगायची.
अहो.. यांनी आमच्या बँकेतून अमुक एक लाख रुपये कर्ज करून गाडी घेतली आहे. आणि, आता कर्ज फेडत नाहीत. कि, आम्हाला भेटत सुद्धा नाही. त्यामुळे, आम्हाला असं रात्री अपरात्री यावं लागतंय. असं करायचा आम्हाला काही शौक नाही आला. आम्हाला सुद्धा घरंदारं आहेतच कि..!
शेवटी.. बाहेरील कालवा पाहून, नाईलाजाने तो व्यक्ती त्यांच्या घरचा दरवाजा उघडायचा. पण तोपर्यंत त्याची सगळी अब्रू रस्त्यावर आलेली असायची. सगळा शेजार पाजार त्यांची छी तू करायचा. आणि, या लोकांना हा स्वस्त आणि मस्त मार्ग सापडलेला असायचा.
खरं तर.. हा सगळा नियमबाह्य प्रकार आहे. पण काय करणार, काहीतरी शक्कल लढवावी लागतेच. पण आता, या वसुली पथकातील लोकांची शक्कल ध्यानात आल्याने. काही लोकं, हे रात्री अपरात्री आल्यावर लगेच दरवाजा उघडून त्यांना घरामध्ये घ्यायचे. आणि, हातपाय जोडून त्यांना विनंती करायचे. आणि, कर्जफेड सुद्धा करायचे. त्यामुळे, हि वसुलीसाठी येणारी लोकं भलतीच खुश असायची. आणि त्यांच्या इन्कम मध्ये सुद्धा भरपूर वाढ सुद्धा झालेली असायची.
परंतु.. एकदा काय झालं..
एका माणसाने, बुलेट या दुचाकीसाठी यांच्या बँकेतून काही रकमेचं कर्ज घेतलं होतं. आणि, हा व्यक्ती काही त्याचे हफ्ते भरत नव्हता. आणि, कधी घरी सुद्धा त्यांना सापडत नव्हता. हफ्ते वसुलीसाठी घरी आल्यावर, घरातील बाई माणसला तरी हे काय बोलणार..?
शेवटी.. या वसुली पथकाने, त्यांचा शेवटचा पत्ता टाकला.
आणि.. एके रात्री यांनी त्याच्या घरावर हल्लाबोल केला. रात्रीचे दोन वाजले होते, यांनी त्याच्या घराची डोअर बेल वाजवली. तसं घरातून, आयहोल मधून आतील व्यक्तीने यांना पाहिलं. आणि गपगुमान दार उघडलं. हात जोडून यांना कालवा न करण्याची विनंती केली.
घरात गेल्यावर हि लोकं त्याला म्हणाली, साहेब..तुम्ही जर हफ्ते भरत नसाल. तर, आमच्या त्या गाडीची चावी तुम्ही आम्हाला देऊन टाका. आम्ही येथून गपगुमान निघून जाऊ.
तो व्यक्ती सुद्धा ठीक आहे म्हणाला..
आणि.. त्याच्या बुलेटेची चावी आणायला तो आतील घरात गेला. आणि, तो जसा बाहेर आला.
तसा त्याच्या हातात एक घोडा ( पिस्तुल ) होता. एकतर रात्रीची वेळ. आणि ती पिस्तुल पाहून या दोघांची अगदी पाचावर धारण बसली. कारण, आजवर असा प्रसंग त्यांच्यावर कधी गुजरलाच नव्हता. त्यांना दमात घेऊन तो व्यक्ती यांना म्हणाला..
कुठं पाहिजे चावी..?
त्या व्यक्तीचा हा रुद्रावतार पाहून, या दोघांची तर पक्की बोलती बंद झाली होती.
हे दोघे काही बोलणार.. तितक्यात, तोच व्यक्ती यांना म्हणाला..
तोंडातून जर आवाज काढला, तर.. हितच तुमच्या XXX गोळ्या घालील..!
आता बाकी, यांची सुद्धा जाम फाटली होती. तो व्यक्ती यांना म्हणाला.. आता गपगुमान घरी निघायचं. घर आहे ना..? का ठोकू इथच..?
आणि हो..पुन्हा कधी हिकडं फडकायचं नाय. समजलं का..! नायतर,
या दोघांनी लागलीच तेथून काढता पाय घेतला. पुढे या प्रकरणाचं काय झालं ते मला समजू शकलं नाही. पण, त्या भयाण रात्रीपासून माझ्या मित्राने मात्र ह्या जीवावर बेतणाऱ्या कामाला मात्र कायमचा रामराम ठोकला..!
समाप्त.

No comments:

Post a Comment