Wednesday, 10 May 2017

शम्मी कपूर आणि वैजयंती माला या मदहोश जोडगोळीला घेऊन, निर्माते..एफ.सी. मेहेरा आणि लेख टंडन भारत वर्षातील एक अद्भुत सिनेमा आपल्या भेटीला घेऊन आले होते.
त्या सिनेमाचं नाव होतं..
" प्रिन्स "
सत्तरीतल्या दशकामध्ये.. शम्मी कपूर आणि वैजयंतीमाला सारख्या दोन दिग्गज अभिनेत्यांना घेऊन सिनेमा करणं म्हणजे सोनेपे सुहागा होतं. सत्तरीच्या दशकात, या सिनेमाने तब्बल चार कोटीचा व्यवसाय केला होता. त्यावेळचे चार कोटी म्हणजे आजचे किती झाले हो..?
खरोखर हा विचार करायला लावणारा प्रश्न होता. पण त्याकाळचे दिग्दर्शक लोकं खर्च करताना कोणतीच कंजुषी करत नसायचे. सगळं काही अगदी दिल खोलके करायचे. या सिनेमाचं काही चित्रीकरण विदेशात सुद्धा झालं आहे. बघा ना किती अजब गोष्ट आहे, हिंदी आणि मराठी भाषेमध्ये अगदी तसूभर सुद्धा अंतर नाही. पण मराठी सिनेमाचं चित्रीकरण, किमान त्या काळात तरी विदेशात झालेलं माझ्या आठवणीत नाही. आणि चुकून झालं असेल तर जाणकारांनी तशी माहिती पुरवावी.
तर विषय असा होता.. शंकर जयकिशन यांचं मदमस्त संगीत असणाऱ्या या चित्रपटातील सर्व गीतं हसरत जयपुरी आणि फारूक कासीर यांनी शब्दबद्ध केली होती.
तर.. या सिनेमातील एका मदमस्त दृश्यामध्ये एक सुंदरसं मधभरं गीत त्यांना अपेक्षित होतं.
पण काही केल्या, त्या गीताची म्हणावी अशी रचनाच होत नव्हती. या सिनेमाचं काही चित्रीकरण विदेशात सुद्धा होणार होतं. आता इतका सगळा लवाजमा घेऊन आपण विदेशात जाणारच आहोत. तर त्या दिग्दर्शकांनी हसरत जयपुरी यांना त्यांच्या सोबत विदेशात येण्याची गळ घातली. थोडासा विरंगुळा आणि विदेशवारी सुद्धा घडेल, असं ठरवून हसरत मिया विदेशात जायच्या तयारीला लागले.
प्रत्यक्षात विदेशात गेल्यावर.. त्यांना त्या विशेष गीताबद्धल काहीतरी सुचावं. या उद्देशाने त्यांना तिथे नेण्यात आलं होतं. आणि एकेदिवशी दिग्दर्शक महाशय हसरत जयपुरी यांना म्हणाले..
चला..आपण जरा डान्स बारमध्ये फेरफटका मारून येऊयात. हसरत भाई यांनी उभ्या जीवनात कधी दारूला शिवलं असं नव्हतं. त्यामुळे त्यांनी या गोष्टीला स्पष्ट नकार दिला. त्यावेळी त्यांची मनधरणी करत ते त्यांना म्हणाले.. मादिरालयात गेल्यावर मद्य प्राशन केलंच पाहिजे असा काही नियम नाहीये. तुम्ही त्याठिकाणी असणाऱ्या ईतर गोष्टी पाहून स्वतःचा जीव रमवा. झालं.. शेवटी नाय होय करत कसंबसं हसरत मिया या गोष्टीसाठी तयार झाले..!
मला तर अगदी आत्ता आत्ता, डान्सबार हा काय प्रकार आहे ते समजलं. म्हणजे बघा, ते गोरे लोकं आपल्या किती पुढे असतील..!
संध्याकाळची वेळ.. रात्र रंगात आली होती. सगळीकडे दारूचा महापूर वाहत होता. प्रत्येक बाशिंदा दर्दी आणि दिवाना झाला होता. आणि त्या मोहक वातवरणात, संगीताच्या तालावर मुरडत, एक मादक नौ यौवना त्या डायसवर आली. चंदेरी रंगाच्या ब्रा आणि पँटीवर आलेली ती अर्धनग्न मादक मंजुळा दिसायला सुद्धा खूपच सुंदर होती. तिच्या चंदेरी रंगाच्या ब्रा आणि पँटीवर असणाते चमकदार छोटे छोटे तेजस्वी हिरे त्या अंधाऱ्या रात्रीच्या झगमगाटात आणखीन उठून दिसत होते. आणि बघता बघता संगीताच्या तालावर त्या कॅब्रे डान्सरचा कमनीय देह नाशिले ठुमके घेऊ लागला.
आणि तितक्यात..आकाशात वीज तळपावी तशी हसरत मियाची लेखणी एकाएकी तळपली. आणि त्या मद्यधुंद, मदमस्त वातवरणात एका मद्यपान न करणाऱ्या गीतकाराच्या हातून एक लाजवाब गीत साकारलं गेलं.
बदन पें सितारे लपेटे हुये,
ओह जाने तमन्ना किधर जा रही हो.
जरा पास आओ तो चैन आ जाये..!
तर अशा पद्धतीने, या मदमस्त गीताची निर्मिती एका डान्स बार मध्ये झाली होती.आणि सत्तरीच्या दशकात या गीताने त्यावेळच्या तमाम तरुणाईवर एक प्रकारची मोहिनी घातली होती. आणि आजही हे गीत खूप लोकप्रिय आहे.

No comments:

Post a Comment