Saturday, 26 August 2017

मी.. सतरा अठरा वर्षाचा असताना..
आमच्या चौकातील सार्वजनिक गणपतीची वर्गणी गोळा करत फिरत होतो. तेंव्हा एका मित्राने, मला तंबाखू खायला शिकवली. त्यावेळी नव्याने व्यसन सुरु केलं असल्याने. तंबाखू खाल्ल्यावर ती किती वेळाने थुंकून द्यायची..? याचं पुरेसं ज्ञान नसल्याने. मी कितीही वेळ ती तंबाखू दाडेखाली धरून ठेवायचो. पण.. हे तंबाखूचं व्यसन मला काही जडलं नाही.
त्यावेळी.. तंबाखू खाणारे एका मित्राचे वडील मला म्हणाले होते. सतत तंबाखू खाऊन, नंतर-नंतर आपल्या तोंडाचा खूप गु घाण वास येतो. हे वाक्य ऐकल्यावर, मला तंबाखू या विषयाची भयंकर शिसारी आली. आणि त्यानंतर, तंबाखू म्हणून मी कधीही तोंडात धरली नाही.
त्याच सुमारास, एका मित्राच्या कटलरी दुकानात वेळ घालवत बसलो होतो. तर त्याने, पिवळ्या रंगाचा सुगंधी पान पराग गुठका मला खाऊ घातला. मी पिवळा का म्हणतोय, कारण त्यावेळी निळा आणि पिवळा असा दोन स्वादात पान पराग मिळायचा. निळा म्हणजे तंबाखू विरहित आणि पिवळा म्हणजे तंबाखू सहित.
पान परागच्या मनमोहक सुगंधामुळे मी त्याकडे लागलीच खेचला गेलो. त्यानंतर, पान परागला स्पर्धा देण्यासाठी माणिकचंद नामक गुटखा बाजारात आला. त्याकाळी भारतभरात अजून सुद्धा बरेच नामांकित गुठ्के अस्तित्वात होते. पण ते, पुण्यनगरी पर्यंत पोहोचत नव्हते.
माणिकचंद नंतर.. फिट, मुलचंद, स्टार, गोवा आणि सर मावा नामक गुठ्के सुद्धा बाजारात आले. आणि बराच पैसा कमवून निघून गेले. पण मी बाकी अगदी ब्रांडेड, म्हणजे माणिकचंद गुठ्काच खायचो.
नव्वद सालात.. माणिकचंद गुठ्क्याची एक पुडी काहीतरी चार पाच रुपायला मिळायची. नाही म्हणता, दिवसाला मी या पाच सहा पुड्या सहज खाऊन जायचो. जवानीचा जोश होता. त्यामुळे हि व्यसनं बिनबोभाट पचून जायचे. पण एकदा काय झालं..
त्यावेळी.. माझं सुद्धा एक कटलरी दुकान होतं. दुकानात बसून मी सुद्धा पक्का मारवाडी झालो होतो. आणि मारवाडी लोकांसारखं, तोंडात दिवसभर गुठ्का कोंबत होतो.
एके दिवशी.. दुपारच्या वेळी, मला छातीत जळजळ होऊ लागली. बहुतेक पित्ताचा त्रास सुरु झाला होता. ओकाऱ्या काढल्याशिवाय मला काही चैन पडणार नव्हता. तोंडात बोटं न घालता, अगदी भडभडून ओकाऱ्या झाल्या. पोटातला सगळा मल बाहेर पडला होता. पण मनाची समाधान होत नव्हती. सुरवातीला, पिवळ्या ओकाऱ्या झाल्या. त्यानंतर, आतड्यांना चिटकून बसलेले गुठ्क्याचे लाललाल बडके बाहेर पडू लागले. आणि नंतर जास्तीचा ताण दिल्यावर.. ओकारी सोबत.. माझ्या तोंडातून रक्त पडू लागलं..!
विषय खल्लास.. त्यानंतर मी खूप घाबरलो, आणि तडक डॉक्टरकडे गेलो. आणि त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्यावर, त्यांनी मला सगळं विचारलं. तू काय करतोस, काय नाही..
मी सुद्धा त्यांना सगळं काही खरं खरं सांगून टाकलं. रोजच्याला पाच सहा पुड्या गुठ्का खात असतो. त्यावर ते मला म्हणाले.. मी तुझ्यावर उपचार करतो. तुला काही होणार नाही याची ग्वाही सुद्धा देतो. पण तुला माझं एक ऐकावं लागेल. इथून पुढे तू कधीही गुठ्का खाणार नाहीस असं मला वचन दे. कारण, तोंडातून रक्त पडणे म्हणजे एकप्रकारे ती कॅन्सर ची सुरवात, किंवा मृत्यला आवाहनाच म्हणा ना. शेवटी, मी डॉक्टरांना तसं वचन दिलं.
त्यानंतर मला त्यांनी समजावून सांगितलं. हे बघ कसं आहे, गुठ्का खाताना तू त्याला जरी बाहेर थुंकत असशील. तरी सुद्धा, नकळत त्याचे काही कन आपल्या शरीरात जातात. आणि ते कण आपल्या आतड्यांना चिटकून बसतात. आणि जेंव्हा आपण जास्तीच्या ओकाऱ्या काढू लागतो. त्यावेळी आपल्या आतड्याच्या बाहेरील बाजूस अतिरिक्त ताण येतो. आणि, आतड्यांना चिकटलेला तो नकोसा थर ओकारी सोबत बाहेर येतो. आतडी अगदी नाजूक असल्याने, ओकारी करताना ताण येऊन त्या ठिकाणी खपली निघते आणि तिथे एक छोटीशी जखम होते. आणि त्याचं पर्यवसान रक्त पाडण्यात होतं. हे सगळं ऐकून, माझ्या मनातील भीती कमी झाली.
त्यानंतर, मी गुठ्का या विषयाला सुद्धा कायमचा रामराम ठोकला. ते आजवर, मी त्या गुठ्क्याला माझ्या मुखात स्थान दिलं नाही.
त्यानंतर.. कॉलेजमध्ये असताना, थोडी शायनिंग मारावी म्हणून. काही मित्रांच्या संगतीने मी सिगारेट सुद्धा प्यायला शिकलो. कॉलेज मधील मुलींना पाहून, धुराचे लोट हवेत सोडताना तेंव्हा फार मजा वाटायची. मला हि सगळी व्यसनं लागण्याची कारणं म्हणजे. नको त्या वयात मिळालेली व्यसनी मित्रांची संगत.
काही व्यक्ती व्यसनांच्या लगेच आहारी जातात. पण ते कसं काय.? हे आजवर मला समजलं नाहीये. नव्वद सालापासून, धरसोड करत. आजवर मी हे सिगारेट पिण्याचं व्यसन पाळलं होतं. रोज संध्याकाळी जेवण झाल्यावर मला सिगारेटची हमखास तल्लफ यायची. पण त्यात सुद्धा माझे काही नियम होते. मला स्वतःला दिवसा सिगारेट पिणं आवडत नव्हतं. किंवा, त्या धुराचा वास सुद्धा मला सहन होत नव्हता. शेवटी, यावर्षी श्रावण महिन्याच्या एक आठवडा अगोदर. कधीतरी पीत असलेली हि सिगारेट सुद्धा मी कायमची सोडून दिली.
खूप लोकं म्हणत असतात, व्यसन एकाएकी सुटत नाही. पण त्यांना मला हा प्रश्न विचारावासा वाटतो. आपण आईच्या पोटातून व्यसन शिकून आलेलो नसतो. नको त्या गोष्टी शिकवायला आपल्याला कोणीतरी गुरु भेटत असतो. तर मग, व्यसन सोडायला मन नामक आंतरिक गुरु आपल्या कामी येऊ शकत नाही का..?
वेळ काही सांगून येत नसते. एखादा त्रास झाल्यावर आपण व्यसनं सोडण्याची भाषा बोलू लागतो. पण मी म्हणतो, ती वेळ येण्याची वाट कशाला पाहा. शरीर निरोगी असण्यासारखी जगातील कोणतीच मोठी श्रीमंती नाही.
तुम्ही सुद्धा मनापासून ठरवा, आणि व्यसनमुक्त व्हा. कोणतीही गोष्ट अगदी सहजशक्य आहे. आज मी अगदी मनमोकळे पणाने सांगू शकतो. कि, कोणत्याच तंबाखूजन्य पदार्थांचं मला व्यसन नाहीये. आणि भविष्यात सुद्धा, या व्यसनांना मी कधीही थारा देणार नाहीये.
मी, काल एका मित्राकडे गेलो होतो..
तर, तो बिचारा.. एका ताटामध्ये शेंगदाणे निवडत बसला होता. हे दृश्य पाहून, मला जरा आश्चर्य वाटलं.
त्यामुळे मी त्याला विचारलं, काय रे बाबा हे काय करतोयस..?
तर म्हणाला.. माझी बायको एक नवीन व्रत करत आहे. श्रावण महिन्यात, पूर्ण महिन्याच्या उपवासा सोबतच. वटवृक्षाला रोज एकशे आठ प्रदक्षिणा घालण्याचा तिने संकल्प सोडला आहे.
पण होतंय काय..
किती प्रदक्षिणा झाल्या आहेत, त्याचं गणित जुळून येत नाहीये. त्यामुळे तिने एक नवीन शक्कल लढवली.
रोज एकशे आठ शेंगदाणे सोबत न्यायचे. एक प्रदक्षिणा पूर्ण झाली, की एक शेंगदाणा तोंडात टाकायचा. शेंगदाणे संपले, की प्रदक्षिणा पूर्ण झाल्या असं समजायचं.
त्यामुळे तिने मला हे एकशे आठ शेंगदाणे मोजून बाजूला काढायचं काम लावलं आहे..!
कशी वाटली, आयडियाची कल्पना..!
आज एक गंमतच घडली..
पुणे महानगर पालिकेच्या कामाचा एक भाग आणि १५ ऑगस्टची पूर्वतयारी म्हणून. सर्व शाळांमधील ध्वजस्तंभ रंगवण्याची आमची घाई चालू होती. यावेळी एक नवीन भाग आमच्या प्रभागात जोडला गेल्याने. त्या भागात असणारी एक प्राथमिक शाळा आम्हाला काही माहिती नव्हती.
शेवटी आम्ही त्या ठराविक भागात जाऊन पोहोचलो. त्या भागात ती एक छोटीशी प्राथमिक शाळा होती.
विचारपूस करावी म्हणून, तिथे असणाऱ्या एका महिलेला मी विचारलं.
इथे.. आतील भागात, काही शाळा वगैरे आहे का..?
त्यावर, ती महिला म्हणाली..
हो आतील बाजूस एक लहान मुलांची प्राथमिक शाळा आहे.
आम्हाला हवी असणारी प्राथमिक शाळा तीच आहे का. याची खातरजमा जमा करण्यासाठी, मी त्या महिलेला शाळेचं नाव विचारलं. आता, शाळेचा विषय चालू होता. म्हणून..त्या महिलेला मी पटकन म्हणून गेलो.
नाव काय आहे..?
तर, ती महिला म्हणाली. " बनसोडे "
बनसोडे हे नाव ऐकून मी जरा विचारात पडलो. आणि त्या महिलेला म्हणालो.
बनसोडे नाही हो..!
आम्हाला तर त्या शाळेचं नाव जाधव प्राथमिक विद्यालय, असं सांगितलं आहे.
त्यावर, थोडी लाजतच ती महिला म्हणाली,
शाळेचं म्हणताय व्हय, मला वाटलं तुम्ही माझंच नाव विचारलं आहे..!
फेसबुकवर.. आजवर, बरीच प्रेमप्रकरणं झाली असतील.
त्यातील सगळीच प्रेमप्रकरणं शेवटाला गेली असतील, कि नाही. ते मला सांगता येणार नाही. परंतु, या माध्यमात आल्यापासून. आजवर, फेसबुकवर प्रेमसंबंध जुळून आलेल्या दोन प्रेमी युगुलांच्या लग्नाला मी स्वतः हजर राहिलो आहे. आणि येत्या काही महिन्यात, अजून एक असाच योग जुळून येणार आहे. वरील दोन्हीही मित्र मैत्रिणींनी सगळी शहानिशा करून आपल्या मर्जीप्रमाणे जोडीदार निवडून लग्न केली. आणि, आज ते अगदी सुखासमाधानाणे आपापला संसार मार्गी लावत आहेत.
आज, हा मुद्दा आठवायचं कारण म्हणजे..
हल्लीच माझा एक मित्र माझ्याकडे तक्रार घेऊन आला होता. कि, त्याच्या मुलीने सुद्धा फेसबुकवर एका मुलाशी आपलं सुत जुळवलं होतं. आणि, प्रेमाच्या आणाभाका घेत ते सुद्धा विवाह बंधनात अडकू इच्छित होते. तर, या प्रेम प्रकरणाचा पूर्वेतिहास असा होता.
माझ्या मित्राची मुलगी, वाणिज्य शाखेच्या शेवटच्या वर्षाला आहे. आणि हे सगळं काही याच वर्षात जुळून आलं होतं. खूपच सुंदर दिसणारी हि मुलगी, अंगापिंडाने सुद्धा अगदी ठीकठाक अशी आहे. फेसबुकवरील नित्य वावरामुळे, ती नकळत एका मुलाच्या प्रेमात पडली होती.
फेसबुक वरील, त्या मुलाचा बायोडाटा सुद्धा अगदी सुंदर होता. पुणे विद्यापीठातून इंजिनिअरची पदवी घेऊन तो मुलगा बाहेर पडला होता. आणि कोणत्यातरी आयटी कंपनीत मोठ्या पगारावर तो कामाला सुद्धा होता. ती मुलगी, या मुलाचा चेहेरा आणि त्याचा बायोडाटा पाहून अगदी मोहित झाली होती. सुरवातीला मेसेंजरवर बोलाचाली चालू होत्या. त्यांतर, एकमेकांचे मोबाईल नंबर घेऊन त्यांचं संभाषण सुरु झालं. त्यानंतर त्यांच्या भेटीगाठी सुरु झाल्या.
आणि शेवटी.. प्रेमाच्या आणाभाका घेत, या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
आता.. याला संयोग म्हणता येईल, किंवा नशिबाचा भाग.
पण त्या मुलीने, एक फार मोठा शहाणा निर्णय घेतला. आणि, हि सगळी खबरबात आपल्या आईवडिलांना सांगितली. मुलीचे हे धाडसी बोल ऐकून तिचे आईवडील अगदी अवाक झाले होते. दोनचार दिवसांनी, आईवडिलांनी मुलीला विश्वासात घेतलं. आणि त्या मुलाची प्रोफाईल पाहिली. आणि ती प्रोफाईल पाहून, मुलीच्या वडिलांना फार मोठा धक्का बसला.
कारण.. त्या फोटोतील मुलाचा चेहरा, चक्क त्यांच्या एका ओळखीतल्या मित्राच्या मुलाशी मिळता जुळता होता. माझ्या मित्राने, त्याच्या मुलीकडून त्या मुलाचा नंबर घेतला. आणि त्याला फोन लाऊन, सगळ्या गोष्टीची एकदा शहानिशा करून घेतली. मित्राचा अंदाज खरा ठरला होता. तो मुलगा, त्याच्या मित्राचाच होता.
आणि.. या प्रकरणात, सर्वात मोठी वाईट गोष्ट हि होती.
कि.. तो मुलगा चक्क दहावी नापास होता. आणि, त्यांच्या घरातील दुधाचा व्यवसाय सांभाळत. दिवसभर तो म्हशींच्या मागे फिरत असतो. शेवटी कोणतंही काम हे छोटं किंवा हलकं नसतं. पण प्रोफाईलवर खोटी माहिती ठेवून फसवणूक करणं, हा सुद्धा एक दखलपात्र गुन्हाच आहे कि.
मित्राने आणि वहिनींनी.. त्यांच्या मुलीला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण, त्याची मुलगी अगदी एक दुजे के लिये झाली आहे. त्या मुलाच्या प्रेमापाई, ती चक्क म्हशींचं शेन काढायला सुद्धा एका पायावर तयार झाली आहे.
माझा मित्र मात्र, फार मोठ्या धर्मसंकटात सापडला आहे.
एकीकडे, त्याला त्याची नाजूक मुलगी दिसतेय. तर दुसरीकडे निबार म्हशींचा भलामोठा गोठा दिसत आहे.
आता, पुढे काय होईल ते परमेश्वरच जाणो.
त्यामुळे.. इथे असणाऱ्या सर्व मुलामुलींना, माझी एक कळकळीची विनंती आहे. प्रोफाईलवर खोट्या माहित्या ठेऊ नका. शक्यतो कोणाचीही फसवणूक करू नका.
सगळी शहानिशा करा, आणि मगच एकमेकाच्या प्रेमात पडा. नाहीतर, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना नको त्या गंभीर प्रसंगाला सामोरं जावं लागेल.
वाहन चालवताना..
एकवेळ, अल्प प्रमाणात दारू पिलेल्या व्यक्तीकडून अपघात घडनं टळलं जाऊ शकतं.
परंतु.. सर्दी झालेल्या वाहन चालक व्यक्तीपासून, आपल्याला अपघाताचा जास्तीचा धोका होऊ शकतो.
कारण..
सर्दी झालेल्या व्यक्तीला वारंवार शिंक येत असते. आणि शिंक आल्यावर, काही सेकंदासाठी आपले डोळे झाकले जातात. आणि, आपल्याकडून सगळ्या क्रिया आपोआप बंद पडतात. आणि आपलं सगळं लक्ष त्या शिंकेकडे एकवटलं जातं. हे सगळं काही, अगदी एका सेकंदात घडून जात असतं. आणि अपघात हा सुद्धा काही सेकंदातच घडत असतो. शिंक सुद्धा काही सांगून येत नसते. आणि अपघात प्रवण स्थळ सुद्धा अगदी अचानक आपल्या समोर येत असतं.
शिंक आल्यावर आपण कितीही प्रयत्न केले. तरी, आपले डोळे उघडे राहू शकत नाही. आणि आपलं चित्तही एका ठिकाणावर स्थिर राहत नाही. हवं तर, एकदा प्रयत्न करून पाहा..!
बी केअरफुल. 
समुद्र हा माझा फार मोठा जिव्हाळ्याचा विषय, आणि कमकुवत दुवा आहे..!
समुद्राची आवड मला कधी कुठे आणि कशी निर्माण झाली ते माहीत नाही. कदाचित, समुद्राचं आणि माझं काहीतरी जुनं नातं असावं. असं सुद्धा मला कधी-कधी वाटून जातं.
समुद्र भेटीसाठी, आजवर मी महाराष्ट्रातील बराच समुद्री भूभाग पालथा घातला आहे. पण सगळ्याच ठिकाणी मला मानवी गर्दीने अगदी नकोनको करून सोडलं. कुठेही जा, एकांत असा मिळतच नाही.
सुरवातीला मला गोव्याचं खूप वेड लागलं होतं. पण अपुऱ्या माहितीमुळे गोव्यातील नेमक्या गजबजलेल्या ठिकाणी जाऊन आम्ही धडकायचो. तिथे तर सगळी हिप्पी लोकांची गर्दी. त्यात भारतीय लोकांची भाऊगर्दी, आणि शेवटी या गजबजाटात पुन्हा एकदा नको ती निराशा माझ्या पदरी पडायची.
अलिबागला.. मुंबई पुणेकरांची भलीमोठी गर्दी असते. म्हणून, दहाएक वर्षापासून मी दापोली जवळील हर्णे बंदरावर समुद्र भेटीला जाऊ लागलो. सुरवातीला हे ठिकाण म्हणावं असं प्रसिध्द नसल्याने, तिथे बऱ्यापैकी एकांत मिळत होता. पण शेवटी त्या भागात सुद्धा मानवी गर्दी वाढू लागली. आणि पुन्हा एकदा माझ्या हाती घोर निराशा पडली.
समुद्रा विषयी माझी नेहेमीची आवड म्हणजे,
समुद्र अगदी निर्मनुष्य असावा. फक्त तो आणि मी, समुद्रातून वाहणारा खारा वारा अंगाला झोंबून आरपार व्हावा. डोळे बंद करून समुद्राच्या लाटांची गाज कानामध्ये आणि मनामध्ये साठवून ठेवावी. अशीच अर्धाएक तास समाधी लागावी. आणि समाधीतून बाहेर येत असताना, हळुवार डोळे उघडताना. समोर पांढरा शुभ्र उधाणलेला समुद्र आपल्या फेसाळलेल्या शुभ्र लाटा, इतस्ततः उधळताना दिसावा.
बरेच दिवस झाले.. हे दृश्य काही माझ्या नजरेस पडत नव्हतं.
पण.. परवा कारवारला गेलो असता. कारवार आणि गोव्याच्या सीमेवर असणाऱ्या पोळे ( पोलेम ) बीचवर आमचं जाणं झालं. आणि मला हव्या असलेल्या त्या सगळ्या गोष्टी पाहायला आणि अनुभवायला मिळाल्या. उधाणलेला स्वच्छ असा निळाशार आणि अगदी निर्मनुष्य असा समुद्र किनारा. समुद्रात दूरवर डोंगरा सारखं दिसणारं एक छोटसं बेट, समुद्राच्या लाटावर विराजमान झालेली एक मासेमारी करणारी होडी. समुद्री पाखरांचा चिवचिवाट समुद्री तटावर निवांत विसावा घेत पहुडलेली एक होडी. समुद्री वाऱ्याने सळसळनारी नारळाची झाडं. काळ्याशार पाषाणाच्या खोबणीत दडून, एकमेकांच्या बाहुपाशात घट्ट बिलगून गेलेलं प्रेमी युगुल. समुद्रा शेजारी असणारं एक छोटसं रेस्टॉरंट.
रविवारचा दिवस असून सुद्धा अगदी पंधरा वीस व्यक्ती असणारं हे ठिकाण मला आणि माझ्या मनाला फार मोठी भुरळ घालून गेलं. तुम्ही सुद्धा एकदा नक्की जाऊन या.
पुण्यातील ज्या भागात आमचं ऑफिस आहे.
त्या भागात.. बहुतेक, हवाई सुंदरी होण्याचे प्रायव्हेट कोर्सेस चालत असावेत. अशी, मला दाट शंका आहे. कारण.. त्या भागात नेमीच. मला,
लाल रंगाचे फारच अपरे स्कर्ट, आणि त्यावर.. लाल रंगाचा ब्लेझर, आणि त्या ब्लेझरच्या आतून बाहेर डोकावत असणारी, ब्लेझरच्या आतील शर्टची पांढरी शुभ्र कॉलर. पायात उंच टाचेचे काळे सँडल,मांड्या पर्यंतचे पाय निर्वस्त्र असल्याचा भास निर्माण करणारे, अगदी जांघे पर्यंत लांब असणारे. जाळीदार पांढरे किंवा काळे पायमोजे घातलेल्या गोऱ्या गोमट्या आणि सुंदर ललना मला हमखास दिसत असतात.
या मुलींना पाहून, माझ्या मनात नेहेमी एक प्रश्न येत असतो.
हवाई सुंदऱ्या म्हंटल, कि त्या कशा अगदी उंच्यापुऱ्या, देखण्या आणि ठसठशीत बांध्याच्या मुली माझ्या नजरेसमोरून तरळून जातात. त्यामानाने, मी पाहत असणाऱ्या पैकी बऱ्याच मुली दिसायला अगदी गोऱ्या आणि खूप सुंदर जरी असल्या. तरी सुद्धा, त्यातील काही मुलींची शारीरिक ठेवण म्हणावी अशी भरदार किंवा बहारदार नसते. त्यामुळे, माझ्या मनात नेहेमी एक शंका निर्माण होत असते..
कि, हवाई सुंदरी होण्याचं स्वप्नं उराशी बाळगणाऱ्या मुलींची भारतात बिलकुल कमतरता नसणार. पण, सगळ्याच सुंदर मुलींना हे सहजशक्य होणार आहे का..?
कारण, एकतर त्या कोर्सची फी अगदी भरमसाठ असणार आहे. त्यात ती संस्था चालवणारी लोकं त्या मुलींना नोकरी देण्याची हमी देत असणार. त्यामुळे तर त्या संस्थेत फारच गर्दी होत असणार.
परंतु, इथे शिकणाऱ्या सगळ्याच मुलींना विमानात प्रवेश मिळणार असतो का..?
त्यामुळे, यातील.. सुंदर दिसणाऱ्या, काही लुकड्या सुकड्या मुलींना पाहून.
मी, देवाला नेहेमी एकच साकडं घालत असतो.
परमेश्वरा, या किरकोळ बांध्याच्या मुलींना लवकरात लवकर अगदी भरगच्च आणि सुडौल बांध्याच्या कर. किमान त्यामुळे तरी, त्यांना विमानातील हवाई सुंदरी होण्याचा बहुमान प्राप्त होईल. नाहीतर, त्यांच्या आई बापाचा सगळा पैसा हवेतच विरून जायचा.
हल्लीच माझ्या मुलाने, एक नवीनच हायफाय अशी जिम जॉईन केली आहे.
तिथे.. ट्रेड मिल, झुंबा डान्स, जिमच्या सगळ्या अध्यायावत सुविधा आणि विविध प्रकारच्या व्यायाम करण्याच्या मशीन्स आहेत. सोबतच, स्टीम बाथ आणि सोना बाथची सुद्धा सोय आहे. आणि मुख्य म्हणजे, प्रशस्थ असा स्विमिंगपूल सुद्धा आहे. त्यामुळे, स्वारी जरा जास्तीच खुश आहे.
तर.. काल मला तो सांगत होता,
म्हणाला..
पप्पा.. या जिम मध्ये, ज्या लोकांची वजनं शंभर किलोच्या आतमध्ये आहेत. अशा व्यक्तींना, त्यांचं वजन करण्यासाठी. नेहेमीचा लाहनसा गोल इलेक्ट्रॉनिक वजन काटा ठेवला आहे.
आणि.. ज्या व्यक्तींची वजनं शंभर किलोच्या पुढे आहेत. अशा व्यक्तींसाठी,
भाजी मंडई मध्ये कांदा बटाट्याच्या पोत्याचं वजन करायला ठेवतात ना,
तसला वजन काटा ठेवला आहे.
हा नवीन प्रकार ऐकून, हसावं कि रडावं तेच मला समजेना झालंय..!
ऐसा भी हो सकता है..?