Friday, 19 January 2018

कोणताच व्यवसाय, हा छोटा किंवा मोठा नसतो.
फक्त, तुम्ही करत असलेला व्यवसाय कितपत प्रामाणिकपणे करत आहात. याला फार महत्व असतं. सगळेच जन टाटा सारखे मोठे उद्योगपती झाले असते, तर.. बाटा सारख्या स्लीपरची निर्मिती झाली असती का...?
तुम्ही कोणताही व्यवसाय करा, फक्त त्यात कमीपणा बाळगू नका..!
मी एका फार मोठ्या संत व्यक्तीच्या ( बाबा ) तोंडून ऐकलं होतं. कि.. दारू किंवा मास विक्रीचा व्यवसाय तुम्ही कधीही करू नका. म्हणजे, बियर बार किंवा बिर्याणी हाउस वगैरे...
या व्यवसायामुळे, तुमच्या घराला कधीही बरकत मिळणार नाही. हे तत्व सांगणारे ते संत, आमच्या भागात एकदा प्रवचन द्यायला आले असता. त्यांचा मुक्काम, आमच्या भागातील होलसेल मध्ये दारू विक्री करणाऱ्या ( डिस्ट्रीब्यूटर ) व्यक्तीच्या घरी होता. आणि.. तो व्यक्ती सुद्धा त्यांचा निस्सीम भक्त होता. हे सगळं मी माझ्या डोळ्याने पाहिलं आहे. आणि तेंव्हाच, ते प्रवचन सुद्धा मी माझ्या कानाने ऐकलं होतं. सांगा.. यापुढे आता काय बोलणार..?
माझ्या इथे राहणारा.. चिकन विक्री करणारा एक मित्र आज अगदी हायफाय एरियात थ्री बीएचके फ्ल्याट मध्ये अगदी मजेत राहतोय. मटन विक्री करणारा माळकरी व्यक्ती, खूप उंची जीवन जगत आहे. आणि हे सगळं मी फार जवळून पाहत आलोय, या लोकांना कोणतीही रोगराई किंवा त्यांच्या मागे दुसरी कोणतीही पिढा सुद्धा नाहीये. अगदी मजेत आहेत हे सगळे.
मी नाही केलं.. म्हणून, तो व्यवसाय दुसरं कोणी करणार नाही. असं कधीच होऊ शकत नाही. उलटपक्षी चालून आलेली अशा प्रकारची संधी काही व्यक्तींनी डावलली. ती लोकं मला आज कुठेच दिसत नाहीयेत. हि एक भयाण वास्तविकता आहे.
पण काही लोकं निव्वळ पैसा कमवायच्या लालसेने, छोट्या मोठ्या व्यवसायात नको ते प्रकार करत असतात. हे बाकी चांगलं नाहीये. त्यातील, काही ठळक उदाहरणं मी तुम्हाला सांगतो.
काही ठिकाणी.. मक्याची कणसं भाजणारे व्यक्ती. महागातला लाकडी कोळसा आणण्यापेक्षा, स्मशानभूमीत मिळणारा कोळसा किंवा तिथे अर्धवट जळून पडलेले लाकडं आणून त्यावर हा व्यवसाय करत असताना माझ्या पाहण्यात आली आहेत.
शवागारातील टाकून दिलेला बर्फ घेऊन, त्यापासून गारेगार लिंबू सरबत बनवून विक्री करणारी काही लोकं आहेत. असं सुद्धा माझ्या वाचण्यात आलं होतं.
हल्लीच मी एक नवीन प्रकार पाहिला.. एक व्यक्ती, चाळीस रुपयात भाजी चपाती विकण्याचा व्यवसाय करतो. स्वस्तात, पोटभर आणि रुचकर जेवण मिळतय म्हणून. त्याच्याकडे खवैय्यांची भरपूर गर्दी सुद्धा असते. तर तो व्यक्ती, भाजी मंडई मध्ये फेकून दिलेल्या भाज्या जमा करून आणतो. त्याकरिता, त्याने दोन व्यक्ती स्पेशल त्याच म्हणजे, कचरा पेटीत फेकून दिलेली भाजी गोळा करण्याच्या कामावर ठेवल्या आहेत.
फेकून दिलेल्या भाज्या, गोळा करून आणतात. त्या व्यवस्थितपणे निवडून ठेवल्या जातात. आणि त्यांना व्यवस्थित साफ करून त्यापासून भाजी बनवली जाते.
हातगाडीवर.. वडा पाव किंवा भजी बनवणारे काही व्यवसायिक व्यक्ती, बाजारात मंडईत मिळणारा बदला माल खरेदी करतात. " बदला " माल म्हणजे, जो आता टाकून देण्याच्या कामाचा उरला आहे असा माल अगदी स्वस्तात विकला जातो. सडलेला कांदा, टरफल काढून वापरला जातो. किडके बटाटे कापून स्वच्छ करून उकडून वापरले जातात. पिवळी पडलेली कोथिंबीर, नासलेल्या अर्धवट तुटलेल्या किंवा लाल झालेल्या मिरच्या, या वस्तू तिथे वापरल्या जात असतात. हे पदार्थ बनविण्यासाठी कुठलं आणि कसलं पाणी वापरलं जातं. हा विषय तर न सांगितलेलाच बरा.
जास्तीचे दोन पैसे मिळवण्यासाठी काही लोकं नको ती कामं करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पण हे काही चांगलं काम नाहीये. पैसे कमवायच्या नादात, या व्यक्ती.. लोकांच्या जीवाशी खेळत असतात. त्यामुळे आपण लोकांनी शक्य तितकं घरचं अन्न खाण्याला प्रथम प्राधान्य द्यावं. कामावर जाताना, सोबत जेवणाचा डबा न्यायला कसली लाज आहे हो. हे सगळं काही फक्त पोटासाठी चाललं आहे. हे काही लोकांच्या ध्यानातच येत नाही. आणि जेंव्हा ध्यानात येतं, त्यावेळी बराच उशीर झालेला असतो..!
माझा एक तरुण मित्र आहे..
कायमस्वरूपी सरकारी नोकरी, हा विषय त्याच्यासाठी अगदी जीवन मृत्यूचा प्रश्न झाला होता.
दिसायला अगदी सुंदर असणारा हा तरुण, बऱ्यापैकी शिकलेला सुद्धा आहे. नोकरी लागत नाहीये, म्हणून.. हा नको त्या लोकांचे पाय धरत होता.
मला सुद्धा तो सारखा फोन करून त्रास द्यायचा. ठेकेदारीत का असेना, पण सरकारी नोकरीत मला कुठेतरी स्थान मिळवून द्या.
मी त्याला सांगायचो.. अरे, ठेकेदारीत तुला नोकरीत कायम करतीलच याची शाश्वती देता येत नाही. तू या कामाच्या नादाला लागू नकोस. दुसरं काहीतरी काम बघ..!
माझ्या.. या नेहेमीच्या नकाराला कंटाळून, नंतर-नंतर त्याने मला फोन करणंच बंद केलं.
आणि.. परवा अचानक,
तो माझ्या घरी आला. त्याच्या हातामध्ये एक कॅरी बॅग होती. त्या पिशवीतून एक लग्नपत्रिका बाहेर काढत, ती माझ्या हातात देत तो म्हणाला.. भाऊ, पाच दिवसांनी माझं लग्न आहे. लग्नाला सहपरिवार यायचं बरं का..!
मी सुद्धा त्याला माझा होकार कळवला.. आमचं चहापाणी झालं, आणि मी त्याला विचारलं. लग्नाची तू खूप घाई केलीस रे. थोडी " सेटलमेंट " झाल्यावर लग्नाचा विचार करायचा होतास.
त्यावर तो म्हणाला, भाऊ.. सेटलमेंट झालीय, म्हणून तर मी लग्नाला तयार झालोय..!
त्यावर मी सुद्धा त्याचं अभिनंदन केलं. आणि, सहपरिवार लग्नाला येण्याचं त्याला आश्वासन सुद्धा दिलं.
आणि.. शेवटी, तो शुभदिवस उजाडला..!
संध्याकाळचं लग्न होतं.. एक नंबर कार्यालय, एक नंबर व्यवस्था, आणि सगळं काही खूपच खास होतं. बहुतेक त्याला वधू कडील खूप तगडी पार्टी मिळाली होती. असा मी अंदाज बांधला.
वेटर लोकं अगदी जागेवर येऊन सगळी सर्व्हिस देत होते. हा सगळा डामडौल पाहून मी खूपच खुश झालो. या लग्नाला बरीच गर्दी होती, त्यामानाने मी बराच मागे असल्याने सगळे विधी मला काही व्यवस्थित पाहता आले नाही. लग्नं लागलं, शुभमंगल सावधान झालं.
आणि लोकांची जेवणासाठी एकच धावपळ सुरु झाली. जेवणाचे चारपाच बुफे टेबल लावल्याने. म्हणावी अशी गडबड नव्हती. त्या सगळ्या भाऊगर्दीत आम्ही सुद्धा जेवणावर यथेच्छ ताव मारला.
आता.. शेवटचा प्रसंग बाकी राहिला होता.
या नाव दाम्पत्याला भेटवस्तू देऊन आशीर्वादित करणे, आणि त्यांच्या सोबत उभे राहून फोटो आणि विडीयो शुटींग करायची होती. हे सगळं आम्हाला करावंच लागणार होतं. नाहीतर, एवढं सगळं करून आम्ही लग्नाला आलोच नाही, असा शिक्कामोर्तब होण्याची नामुष्की आमच्यावर ओढवली असती.
नवऱ्या मुलाला भेटण्यासाठी गर्दीतून वाट काढत आम्ही पुढे-पुढे निघालो होतो. आणि दुरूनच माझं स्टेजवर लक्ष गेलं. बापरे.. माझा मित्र म्हणवणारा तो मुलगा पन्नास साठ किलो वजनाचा असावा. आणि त्याची धर्मपत्नी झालेली मुलगी, शंभरएक किलो वजनी गटातील होती. ती मुलगी रंगाने गोरीपान होती. पण, दिसायला ती म्हणावी अशी खास नव्हती.
हा.. विजोड " जोड " पाहून, नाही म्हणता मी सुद्धा थोडा अचंबित झालो होतो. पण त्याला मुलगी आवडली आहे म्हंटल्यावर, आपण नाराज होण्यात काहीच अर्थ नाहीये. असा विचार करून, आम्ही त्या उभयतांना शुभेच्छा देऊन त्यांच्या सोबत फोटो आणि शुटींग करून घरी निघून आलो.
तो मुलगा पत्रिका देताना मला म्हणून गेला होता. " सेटलमेंट झालीय म्हणून तर मी लग्नाला तयार झालो आहे..! " हे वाक्य माझ्या कानात सतत गुंजी घालत होतं. पण पुढे दोनचार दिवसात, तो प्रसंग मी विसरून सुद्धा गेलो. आणि एके दिवशी अचानक तो मित्र माझ्या समोर आलो.
तो समोर आल्याबरोबर मी त्याला म्हणालो..
भलतीच " मोठी " रिस्क घेतलीस रे मित्रा..!
त्यावर तो म्हणाला.. भाऊ, माझा नाईलाज झाला होता. काही केल्या मला सरकारी नोकरी लागणार नव्हती. तुम्हाला तर माहिती आहे, आमची परिस्थिती सुद्धा अगदी जेमतेम आहे.
ती अंगाने जरी जाड असली, दिसायला जरी खास नसली. तरी, उद्या ती तिच्या आईच्या जागेवर सरकारी नोकरीला लागणार आहे. शिवाय ती एकुलती एक आहे, त्यामुळे, तिच्या आईवडीलांची सगळी संपत्ती तिच्याच नावे होणार आहे. आता.. मी काहीही छोटं मोठं काम करून गुजारा करून घेईल. आणि त्यात समाधानी सुद्धा राहील.
कारण आजच्याला.. माझ्याकडे सगळं काही आहे. लग्नाची बायको, एक अतिरिक्त आई वडिलांची जोडी, राहायला स्वतःचं हक्काचं घर. आणखीन काय हवंय मला..?
मला हव्या होत्या त्या सगळ्या गोष्टी अगदी हात जोडून मला मिळाल्या आहेत. मी घरजावई झालो असल्याने, सध्या कामाला वगैरे जात नाहीये. वर्षभर आता मला फक्त एकच काम आहे.
काहीही करून.. या वर्षभरात, मी माझ्या बायकोचं वजन शंभर वरून पन्नास किलोवर आणणारच. आणि, या जगातील सर्वात सुखी मनुष्य म्हणून मी मिरवणारच.
इच्छा तिथे मार्ग, हा सुविचार आजवर मी फक्त वाचतच आलो होतो. पण माझ्या या मित्राचं वरील आचरण पाहून. त्या दिवशी, या विषयाची, मला याची देहा प्रचीती सुद्धा आली..!

Tuesday, 16 January 2018


उत्तरांचलमधील एका सफरी दरम्यान, आमच्या सोबत एक फार भयंकर किस्सा घडला होता.
देहरादून फिरून झाल्यावर,
आमची गाडी पुन्हा हरिद्वारला निघाली होती. साधारण रात्रीचे आठ वाजले असावेत.
थंडीचे दिवस, एकाच जागी बसून आमचा बराच प्रवास झाला होता. आणि, आमच्या बस मधील काही व्यक्तींना लघुशंका सुद्धा आली होती. त्याभागात, असे छोटेमोठे " कार्यक्रम " उघड्यावरच करत असतात. 
बस मधील काही लोकांनी, ड्रायव्हरला तशी सूचना केली. एकतर त्या भागात अगदी अरुंद रस्ते. आमच्या ड्रायव्हरने, एक सुनसान आणि मोक्याची जागा बघून ताबडतोब आमची गाडी रोडच्या थोडी बाजूला घेतली.
आमच्या ड्रायव्हरने.. गाडीतील सगळ्यांना एकवार विचारून घेतलं.
कोणाला " बाहेर " जायचं असेल तर जाऊन या..!
कारण, त्या ट्रीपला आमच्या सोबत काही महिला सुद्धा होत्या. अशा नाजूक विषयात, महिला थोड्या बुजऱ्या असतात. त्यामुळे, कोणीच महिला त्या गाडीच्या बाहेर पडल्या नाहीत.
पुरुष मंडळी.. गाडीच्या सामोरील बाजूस लघुशंका करण्यासाठी गेले. कारण, रोडच्या दुतर्फा दरीचा भाग होता. त्याकरिता ड्रायव्हरने सर्वांना बजाऊन सांगितलं होतं.
मी.. बसची हेड लाईट बंद करतो. तुम्ही बिनधास्त मोकळे होऊन या. सगळीकडे किर्रर्र काळोख आहे. त्यामुळे रस्ता सोडून कुठे आडबाजूला जाऊ नका. लागलं तर, रस्त्यावरच मुत्र विसर्जन करा. त्याने सांगितल्याप्रमाणे.. सर्वांनी अगदी तशीच अंमलबजावणी केली. कार्यक्रम उरकल्यावर सगळी लोकं बसमध्ये येऊन बसली. आणि तितक्यात.. एक महिला म्हणाली,
मला " बाहेर " जायचं आहे..!
बहुतेक.. सगळी लोकं बाहेर गेली असल्याने, ती महिला लाजली असावी. पण आता काही काळजी नव्हती. तरी सुद्धा.. तो ड्रायव्हर त्या बाईला म्हणाला.
दीदी.. आप बसके बगलमे, पीछे बाजुमे होके आओ. जादा दूर मत जाणा..!
पण ती बाई लैच अवखळ,
ती.. तो रोड सोडून थोडी आडबाजूला गेली. आणि अंदाज न आल्याने, पाय घसरून ती बाई जवळपास, पंधरा वीस फुट खोल खाली दरीत पडली.
खाली घरंगळत पडताना, ती जोरात किंचाळली. त्यामुळे, सगळे जन सतर्क झाले. लोकांनी पटापट गाडीच्या बाहेर उड्या मारल्या. विजेऱ्या पेटवून सगळे तिला शोधू लागले. शेवटी तिच्या आवाजाचा माग काढत, काही धाडसी लोकं आणि तो ड्रायव्हर त्या दरीत उतरले.
त्या बाईचं नशीब बलवत्तर होतं, सुदैवाने तिला जास्तीचा मार लागला नव्हता. पण तिचा एक पाय फ्रेक्चर झाला होता. त्या सगळ्यांनी मिळून तिला उचलून वर काढलं. तिथून पुढे बरच अंतर गेल्यावर. नजीकच्या भागात जाऊन, तिच्यावर उपचार केले. आणि तिच्या पायाला प्लास्टर वगैरे करून घेतलं. पूर्ण ट्रीप दरम्यान, ती महिला वेदनेने विव्हळत होती. तिची संपूर्ण ट्रीप वाया गेली होती. तिची नसती हुशारी तिच्या अंगलट आली होती.
त्रास तो त्रास.. आणि शिवाय,
येता जाता.. काही महिला तीझी नजर चुकवत हलक्या आवाजात तिला मुद्दाम टोमणा मारत म्हणायच्या. कशाला एवढ्या लांब गेली होती, ते देव जाणो. येवढ्या मोठ्या अंधारात.. हिला, कोण बघणार होतं काय माहिती..!
मृत्यू हा मनुष्याचा खरा मित्र आहे,
प्रत्येकाला वाटत असतं, आपल्याला चांगला मृत्यू यावा. पण तो, कोणत्या आणि कशा रुपात येईल..? ते मात्र कोणालाही सांगता येत नाही...
परंतु, मध्यंतरी मला एक अतिशय सुंदर असा मृत्यू पाहायला आणि अनुभवायला मिळाला.

काकांनी नुकतीच त्यांच्या वयाची पंच्याहत्तरी पार केली होती. त्यांच्या मुलाला आणि सुनेला या विषयाची फारशी आवड नसल्याने. हा सोहळा, त्यांच्या मित्रमंडळी मधील काही खास आणि अगदी जवळच्या व्यक्तींनी पार पाडला होता. त्यामुळे, काकांना अगदी कृतकृत्य झालं होतं. 
काका सुरवातीपासूनच अगदी देवभोळी व्यक्ती, वारकरी संप्रदायातील एक हिस्सा म्हणून सगळा देह त्यांनी पांडुरंगाच्या चरणी झिजवला. पण न जाणो कसं, त्यांचा एकुलता एक मुलगा मात्र अगदी नास्तिक निघाला होता. देवधर्म, कर्मकांड अशा गोष्टी त्याला बिलकुल सहन होत नव्हत्या. धार्मिक वातावरणात वाढलेला मुलगा नास्तिक कसा काय झाला असेल..? हे आजवर मला न सुटलेलं कोडं. त्यामुळे.. काकांचा देव, त्यांच्या रुममध्ये असायचा. 
घरातील इतर भागात त्याचा बिलकुल वावर नसायचा. काका आणि काकू हे दोघेच एकमेकांचे सहचारी आणि जिवलग होते.

काही दिवसांपूर्वी काकांची तब्बेत एकाएकी ढासळली.
काकांना फार मोठ्या इस्पितळात दाखल करण्यात आलं. त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला होता. इस्पितळात उपचार सुरु होते. अवघ्या तीन दिवसात, साडेतीन लाखांचं बिल झालं होतं. काका त्यांच्या मुलाला सांगत होते. 
हि मंडळी.. आपल्याला कापत आहेत. मला घरी घेऊन चल..! 
पण त्यांचा मुलगा काही ऐकायला तयार नव्हता. शेवटी काकांनी मुलाला सांगितलं, माझ्या मोबाईल मध्ये जे काही शंभर एक नंबर सेव्ह आहेत. त्या सर्वांना माझ्या विषयी कळव. आणि त्यांना मला भेटून जायला सांग. 
मुलाने काकांची हि इच्छा पूर्ण केली. जमेल तसं त्यांच्या सर्व मित्रांना त्याने फोन करून कळवलं.
 
दुसऱ्या दिवशी.. काकांना भेटण्यासाठी इस्पितळात लोकांची दिवसभर रीघ लागली होती. कारण, काकांची सून खूप ताठ स्वभावाची होती. तिला आपल्या घरी कोणी आलेलं खपत नव्हतं. त्यामुळे काकांनी सर्वांना इस्पितळातच भेटून घेतलं. आणि मुलाला सांगितलं, 
बस झालं.. आता मला घरी घेऊन चल..!
काकांच्या या बाल हट्टापुढे, त्यांच्या मुलाचं काही एक चाललं नाही. आहे तशा अवस्थेत, त्यांचा मुलगा त्यांना घरी घेऊन आला. 

काकांना त्यांच्या रूममध्ये झोपवलं गेलं. काकांनी त्यांच्या बायकोचा हात हातात घेतला,आणि ते काकूंना म्हणाले.
हे बघ.. मला आता बोलावनं आलं आहे. आपल्या प्रत्येकाला कधीना कधी तरी जायचं आहे. तर, आता माझी घटिका समीप आली आहे. हे ऐकताच, काकू हमसू हमसून रडू लागल्या. काकांनी त्यांची खूप समजूत काढली. आणि म्हणाले, खंबीर हो मुळूमुळू रडू नकोस. अगदी झाशीची राणी हो, नाहीतर सुनबाई तुझा टिकाव लागून देणार नाही. 
आणि हो.. मी गेल्यानंतर, कुंकू पुसायचं नाही. बांगड्या फोडायच्या नाहीत, पायातली जोडवी काढायची नाही. आणि जरा माझ्याकडे ये..
असं म्हणत, काकांनी काकुच्या गळ्यात हात घालून. स्वतःच्या हाताने मंगळसूत्र काढलं. आणि पुन्हा एकदा स्वतःच्या हाताने ते मंगळसूत्र काकूंच्या गळ्यात बांधलं. 
आणि म्हणाले.. हे मी तुला पुन्हा एकदा नव्याने बांधलं आहे बरं का. आता तर हे तू मुळीच काढायचं नाहीस. काकूंना हे सगळं काही अगदी असह्य होत होतं. 

शेवटी काकू म्हणाल्याच.. मी तुमच्या शिवाय जगू शकत नाही हो..!

त्यावर हसत-हसत काका म्हणाले. चल मग, आपण दोघेही विष प्राशन करूयात. आणि या पुढील प्रवासाला सोबतच निघून जाऊयात.
असं म्हणून.. काका पुन्हा एकदा गालातल्या गालात हसले. आणि म्हणाले, अगं वेडाबाई मी गंमत केली गं तुझी..!
 
काकांनी, त्यांच्या वयाच्या तिसाव्या वर्षी मास मच्छी वर्ज केलं होतं. त्या सोबतच, त्यांनी चहा घेणं सुद्धा बंद केलं होतं. पण न जाणो का, आज काकांनी काकूला फर्मान सोडलं.
अगं.. एक काम कर ना, मला जरा मसलेदार चहा बनवून दे. आणि सुनबाईला सांग, संध्याकाळच्या जेवणात, मला चिकन सूप हवं आहे. 
उभं आयुष्य, चहा आणि मांसाहार न करता काढलेल्या काकांच्या तोंडून हि वाक्य ऐकून काकू अगदी अवाक झाल्या. 
शेवटची इच्छा होती.. नाही म्हणून चालणार नव्हतं. त्यादिवशी काकांनी शेवटचा मसालेदार चहा घेतला. संपूर्ण आयुष्य वारकरी संप्रदायात घालवलेल्या काकांनी. श्रावण महिन्यात, संध्याकाळच्या जेवणात चिकन सूप घेऊन, अवघ्या तासाभरातच या नश्वर शरीराला अलविदा केला..!    



Saturday, 6 January 2018

अस्सल प्रेमाचे दाखले देत,
उभ्या आयुष्यात, किमान.. तीन, चार प्रेम प्रकरणाचं " अबोर्शन " करून, नव्या लग्नाला उभे असणाऱ्या मुलामुलींना.
विवाह मंडपात असतानाच,
" नोबल "
पारितोषिक, जाहीर केलं गेलं पाहिजे...!
भरपूर मेकअप करून, आपला चेहरा अगदी टवटवीत, तरुण आणि तजेलदार दिसू शकतो. 
परंतु.. आपण काहीही केलं तरी..
आपल्या मानेवरची सुरकतलेली त्वचा, आपलं खरं " वय " सांगायचा ठासून प्रयत्न करत असते..!

Thursday, 4 January 2018

हॉटेलमध्ये मिळणारं जेवण, किंवा.. इन्सटंट फूड..!
हे म्हणावं इतकं, आपल्या प्रकृतीला लाभदायक नसतं. निव्वळ आपल्या जिव्हेचे चोचले म्हणून आपण या गोष्टी चाखत असतो. आता माझ्या या वयात तर, मला हॉटेलमध्ये मिळणारं जेवण बिलकुल पचनी पडत नाही. त्या जेवणाने मला हमखास पित्ताचा किंवा अपचनाचा त्रास होणारच. याची मला खात्री असते. पण.. घरच्यांना त्याची आवड असल्याने, कधीतरी हॉटेलमध्ये जाऊन मला हे जेवण करावं लागतच..
परंतु, काही ठिकाणी.. मी आवर्जून जेवण करायला जात असतो. कारण, त्या ठिकाणी अगदी खात्रीशीर जेवण मिळत असतं. अर्थातच ते जेवण मांसाहारी असतं. आणि.. त्याचं विशेष महत्व म्हणजे, अशी खानावळ टाईप हॉटेल वाली मंडळी.
सोमवार, गुरुवार, एकादशी, पौर्णिमा, चतुर्थी.. हे दिवस हमखास पाळत असतात. या दिवशी हि लोकं, आपली हॉटेलं बंद ठेवतात. आणि हॉटेल चालू असणाऱ्या दिवशी, रोजच्या हिशोबाने, मोजकंच जेवण ते बनवत असतात. जेणेकरून जेवण शिळं पडता कामा नये. त्यामुळे, तिथे जेवणाऱ्या व्यक्तीला पोटाच्या त्रासदायक अडचणी कधीच जाणवत नाहीत. अशा हॉटेलमध्ये, दुपारी तीन वाजेपर्यंत सगळं जेवण संपून जातं. आणि, मुख्य म्हणजे हि हॉटेलं संध्याकाळी चालू नसतात. कारण मांसाहार हा पचायला जड असल्याने. शक्यतो रात्रीच्या जेवणात त्याचा समावेश करून नये असं म्हणतात. कदाचित.. हा नियम सुद्धा ती हॉटेल वाली मंडळी पाळत असावीत, असा माझा अंदाज आहे.
हे सगळं सांगायचं कारण म्हणजे. पूर्वी माझ्या एका मित्राचं शुद्ध शाकाहारी जेवणाचं हॉटेल होतं.
तिथे भाजीसाठी बनवली जाणारी ग्रेव्ही फार मोठ्या प्रमाणात बनवून ठेवली जात असायची. ती ग्रेव्ही, त्यांना किमान आठवडाभर तरी पुरायची.
कारण.. ग्रेव्ही बनवणं, म्हणावं इतकं सोपं काम नाहीये. विविध प्रकारच्या भाज्या, मसाले भाजून आणि वाटून घेऊन ती ग्रेव्ही बनवली जाते. आणि, रोजच्या रोज अशी ग्रेवी बनवणं म्हणजे फार कठीण काम आहे. त्यामुळे, सर्रास सगळ्या ( काही नियम पाळणारी हॉटेल्स वगळता ) हॉटेल्समध्ये ग्रेव्ही हि वन टाईम बनवली जाते. आणि तीच ग्रेव्ही किमान आठवडाभर तरी वापरली जाते. आणि, हि ग्रेव्ही संपेपर्यंत, रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ तिला गरम केली जाते. त्यामुळे, ती खराब होत नाही. परंतु शिळी मात्र नक्कीच होते. बहुतेक हा प्रकार बऱ्याच मित्रांना माहिती नसावा. पण.. जे आहे ते अगदी खरं आहे. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सुद्धा, अगदी असाच प्रकार असावा. असा माझा अंदाज आहे.
आता, इन्सटंट फूड बाबत आपण बोलूयात..
मला एक गोष्ट समजत नाहीये, आपण जे जीवन जगतोय ते फक्त खाण्यासाठी. तर मग त्याकरिता नको त्या तडजोडी का..?
फ्रोझन फूड हे शरीराला शंभर टक्के हानिकारक असतं. ती फक्त एक तडजोड असते. तो रोजच्या रोज खाण्याचा विषय नाहीये. खरं सांगायला गेलं तर, फ्रोझन फूडमध्ये काहीच चव नसते. चिकन, मटन, मासे, आणि हिरव्या फळ आणि पालेभाज्या आपल्याला फ्रोझन स्वरुपात मिळत असतात. पण तुम्ही कधीही चेक करून पाहा. त्यात बिलकुल चव नसते.
त्या ठराविक भाजीला किंवा मासाला जी चव असते, ती फक्त आणि फक्त त्यात असलेल्या मसाल्याची. असे पदार्थ पचायला सुद्धा खूप जड असतात. आणि पोटाला सुद्धा हानिकारक असतात. पोट ठीक असेल, तर तुमचं जीवन रंगीत असेल.
त्यामुळे.. पोटावर पाय देणाऱ्या,
हॉटेल आणि इन्सटंट फूड पासून नेहेमीच सावध राहा.
( टीप :- वरील मात्रा सरसकट हॉटेल्ससाठी लागू होत नाही. काही हॉटेलमध्ये, रोजच्या रोज ताज्या मसाल्यातील भाज्या सुद्धा बनवून मिळतात. चोखंदळ व्यक्तींनी, याची विचारपूस करून किंवा माहिती काढून, जेवणाचा आस्वाद घ्यावा. )

Show more react
परवाच्या प्रवासात.. त्या विवाहित मुलीने,
ऑ sssssssक करून, ओकारीचा पहिला बॉम्ब जसा टाकला. तो मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्याने पाहिला. ती विवाहिता माझ्या मुलीच्या वयाचीच होती. पण बिचारीने, स्वतःच्या त्रासाची माहिती असल्याने. दोन पाच कॅरी बॅग सुद्धा सोबत ठेवल्या होत्या. आणि तिला आलेल्या वांत्या, ती बरोबर त्या पिशवीमध्येच करत होती. बहुतेक, तिला वीसएक वर्षांचा दांडगा अनुभव असावा.
पण.. ती मुलगी माझ्या उजव्या हाताच्या सीटला शेजारील बाजूस बसली असल्याने. हा सगळा कार्यक्रम मी अगदी लाईव्ह पाहत होतो. कारण न बघून काय करता, तो आवाजच असा असतो. कि आपसूकच आपलं लक्षं तिकडे केंद्रित होतं म्हणजे होतच.
खरं सांगायला गेलं तर, या गोष्टीचं मला फार काही घाण किंवा गलिच्छ असं काही वाटलं नव्हतं. कारण.. उलटी होणं हि एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.
त्या वांत्या करणाऱ्या विवाहितेच्या पुढील सीटवर.. एक नवविवाहित जोडपं बसलं होतं. भरपूर मोठी बॅग घेऊन ते माझ्या समोरच स्वारगेटला एसटी मध्ये चढलं होतं. आणि विशेष म्हणजे, त्यांनी सीट्स आरक्षित सुद्धा करून ठेवल्या होत्या. म्हणजे एकंदरीत हा त्यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम असावा.
तर.. मागील बाजूने.. अगदी जोरात.. ऑ sssssssक असा ओकारी करण्याचा आवाज आल्यावर.
ते दोघे नवरा बायको कमालीचे दचकले. ती नवविवाहिता तर, तिच्या नवरोबाच्या कुशीत पहुडली होती. तरी सुद्धा ती दचकली. घाबरून ते दोघेही मागे वळून पाहण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते. पण त्या सीट्स इतक्या उंच असतात. कि मागे वळून पाहून काहीच दिसत नाही.
आणि थोड्या वेळात.. त्या मुलीने, पुन्हा एकदा जोरात.. ऑ sssssss क केला.
आता मात्र, हा " ऑ " काही थांबायचं नाव घेत नव्हता. त्यामुळे, पुढील जोडपं कमालीचं तणावाखाली आलं. त्यांना नेमकं समजायलाचं मार्ग नव्हता, कि मागे नेमकं काय प्रकरण चालू आहे. कारण.. ते दोघे या साठी घाबरले होते.. कि, त्या ओकारीचे ओघळ आमच्या पाया पर्यंत आले तर काय करायचं..? पण असं काहीही होणार नव्हतं. कारण.. मागे काय प्रोग्राम चालू आहे, ते मला माहिती होतं. आणि काहीच समजत नसल्याने, समोरील जोडपं खूपच तनावाखाली आलं होतं.
शेवटी चहापान करण्यासाठी एसटी थांबली..
तेंव्हा.. त्या दोघांनी, सुटकेचा निश्वास सोडला. बाहेर जाता जाता, न राहवून शेवटी त्या मुलाने मागील बाजूस नेमकं काय घडलं आहे ते पाहिलं. आणि त्याला ओकारीने भरलेल्या केरी बेग दिसल्या, तसा तो थोडा खुश झाला. कि त्या बाईने गाडीत काही घाण वगैरे केली नाही.
परंतु.. हा घडला प्रकार पाहिल्यावर एसटीच्या बाहेर गेल्यावर सुद्धा, त्या दोघांनी काहीच खाल्लं नाही. बहुतेक, त्यांना सुद्धा " उलटी " या विषयाची भीती बसली असावी.
नंतर पुन्हा एकदा सगळे प्रवाशी एसटी मध्ये येऊन बसले. मधल्या काळात, त्या ओकारी करणाऱ्या मुलीने, तिने ओकारीने भरवलेल्या सगळ्या पिशव्या एसटीच्या बाहेर टाकून दिल्या होत्या.
घडल्या प्रकाराने.. लाजेने ती मुलगी नाश्ता वगैरे करायला आली नाही. शेवटी मीच डोकं लढवलं, आणि त्या हॉटेल कामगाराकडून एक लिंबू विकत घेतला. आणि एसटीत जाण्या अगोदर त्या मुलीला मी तो लिंबू दिला आणि म्हणालो.. याला दाबून याच्या सालीच्या गंध घेत राहा. तुला वांत्या होणार नाहीत. बिचारी खूपच लाजली..पण धन्यवाद म्हणायला विसरली नाही.
एसटी सुरु झाली.. ती मुलगी, त्या लिंबाचा वास घेतच प्रवास करत होती. आणि अचानक तिच्याकडे असणारी एक केरी बेग खाली पडली. आणि एसटीच्या हेलकाव्याने सरकत सरकत ती पुढील बाजूस त्या जोडप्याच्या पायापाशी गेली. ज्यावेळी या मुलीच्या लक्षात आलं. कि आपली पिशवी खाली पडून पुढे गेली आहे. तशी ती त्या समोरील मुलाला म्हणाली..
भाऊ... माझी पिशवी तुमच्या पायापाशी आली आहे..!
हे वाक्य ऐकल्यावर, तो गडी एकदम चपापला.. कारण, मगाशी त्याने " त्या " भरलेल्या पिशव्या पाहिल्या होत्या. काय करता, शेवटी चाचपडत त्याने ती संभाव्य पिशवी..
हाताचा अंघठा आणि त्या शेजारच्या बोटाने चिमटीत उचलून त्या विवाहितेला दिली.
त्यावेळी.. ती विवाहिता म्हणाली, या पिशवीत खायच्या वस्तू आहेत.
" ते नाही. "
यावेळी.. हा प्रसंग पाहायला, आणि तो पाहून हसायला मी एकटाच होतो. कारण, हा प्रसंग पाहताना मला कोणी पाहत नव्हतं. अशा अविर्भावात मी मोबाईलवर व्यस्थ होतो. आणि आमचं जाडजूड मंडळ बसच्या हेलकाव्याने निवांत झोपेच्या आहारी गेलं होतं..!
परवाच्या एसटीच्या प्रवासात. थोडा उशीर झाल्याने. आणि नव्यानेच, त्या भागात सुरु झालेल्या अद्ययावत एसटी पाहून, अगदी घाईघाईने आम्ही त्या हायफाय एसी एसटी मध्ये प्रवेशित झालो होतो. त्यामुळे.. एसटी मध्ये प्रवेशित होत असताना. आजूबाजूला किंवा आमच्या, पुढील सीटवर कोण बसलं आहे. ते मी, व्यवस्थितपणे पाहू शकलो नव्हतो.
आम्ही दोघे उभयता, बरोबर त्यांच्या मागे बसलो असल्याने.. आणि थंडीमुळे, समोरील त्या दोन्ही व्यक्तींनी सर्वांग झाकून घेतल्याने. तिथे, नेमकं.. कोण बसलंय, आणि काय आहे. ते सुद्धा मल
समजत नव्हतं.
विषय काही नाही.. फक्त आपली चिकित्सक वृत्ती..!
पण काहीवेळाने मला समजलं.. कि, ते दोघे.. सत्तरी पार केलेले नवरा बायको आहेत.
कारण.. त्या दोघांच्या बोलण्याचा पुरुषी आवाज. आणि, बायकी आवाज मला स्पष्टपणे ऐकू येत होता.
शिरवळच्या आसपासच्या भागात, आमची " शिवशाही " चहापानासाठी थांबली. बघता-बघता सगळी बस रिकामी झाली. परंतु..आमच्या समोर बसलेले काका-काकी काही, एसटीच्या खाली उतरणार आहेत, असं दिसत नव्हतं. म्हणून, सगळ्यात शेवटी आम्ही नवरा बायको दोघे खाली उतरलो.
माझी बायको घाईने पुढे निघून गेली, कारण तिला चहाची तल्लफ झाली होती. आणि, तिच्या मागोमाग मी निघालोच होतो. तर एक.. कुतूहल म्हणून, सहजच मी मागे वळून पाहिलं.
आणि काय सांगावं..!
त्या माझ्या समोर असणाऱ्या दोन्ही सीटवर.. सत्तरी पार केलेले दोन्ही पुरुष मंडळी बसले होते..!
हे दृश्य पाहून.. मी तर पक्का चाट पडलो,
तर गंमत अशी होती. त्या दोघातील, एका व्यक्तीचा आवाज अगदी बायकी होता.
आणि शेवटी.. न राहवून, मी त्या बाबांना म्हणालो.
बाबा.. तुम्हाला थंडी वाजतेय का..!
तर.. त्याच बायकी आवाजात, ते मला " हो वाजतेय ना " म्हणाले..!
मग.. मी त्यांना, डोळा मारत हातानेच दारू पिण्याचा अभिनय करत म्हणालो..
बाबा.. तुम्ही " घेता " कि नाही..?
तर.. अगदी लाजून, ते बाबा मला म्हणाले..
छे हो.. नाही, नाही.. आजवर तसलं अपेय पान मी कधीही घेतलं नाही..!
त्यावर... मी त्या बाबांना म्हणालो.. आजवर कधीही घेतली नाहीये, तर किमान आता या उतरत्या वयात तरी घेत चला..!
माझ्या या उत्तरावर.. ते बाबा, माझ्याकडे अगदी प्रश्नांकित नजरेने पाहत होते.
शेवटी, मीच त्यांना म्हणालो..
काही नाही.. कधीतरी घेतल्याने, किमान तुमचा आवाज तरी थोडा खणखणीत होईल..!
माझ्या या वक्तव्यावर.. त्या बाबांच्या शेजारी बसलेला त्यांचा मित्र, अगदी जोरजोरात हसायला लागला. हे माझं फार मोठं नशीब, हि माझ्यासाठी फार मोठी जमेची बाजू होती. नाहीतर माझी काही खैर नव्हती.
कारण, माझ्या वरील वक्तव्यावर.. ते बायकी आवाजातले बाबा, माझ्यावर खूप खट्टू झाले होते.
शेवटी, एसटीच्या बाहेर जाता-जाता.. मी त्या बाबांना हात जोडून म्हणालो..!
बाबा.. माझ्या बोलण्याचा राग माणू नका बरं का, मला थोडी मस्करी करायची सवय आहे.
त्यावर, त्या बाबांनी सुद्धा मला एक गोड स्माईली दिली.
आणि, क्षणार्धात.. त्यांचा राग सुद्धा कुठेच्या कुठे निघून गेला..!
काल.. काही वस्तू खरेदी करण्यासाठी, मी.. डी मार्ट मॉल मध्ये गेलो होतो.
तेथील माझी खरेदी आटोपली, आणि तिथेच बाहेरच्या बाजूला असणाऱ्या फूड काउंटर मधून, मसाला स्वीट कॉर्न घेऊन, ते खात मी तिथे उभा होतो.
माझ्या समोरच्या बाजूला, एक प्रेमी युगल आईसक्रिमचा एक कोण, दोघात एक घेऊन खात तिथे उभे होते. तो मुलगा, एक बाईट खाऊन झाला, कि.. आईसक्रिमचा तो कोण त्याच्या प्रेयसीच्या ओठाला लावायचा. बराच वेळ त्यांचा हा खेळ चालू होता.
तिथे बाजूलाच.. एक चार पाच वर्षांची लहान मुलगी, तिच्या तरुण आईसोबत आईसक्रिम खात उभी होती. आईसक्रिम खाता-खाता ती लहान मुलगी सुद्धा, या प्रेमी युगुलाचा खेळ अगदी आवडीने आणि कुतूहलाने पाहत होती. आणि अचानक, त्या मुलीने तिच्या आईला विचारलं..
" मम्मी, ते दोघे एकच आईसक्रिम का खात आहेत..? "
मुलीने केलेला हा प्रश्न ऐकून, त्या मुलीची आई भलतीच कोड्यात पडली होती. आता, या मुलीला काय उत्तर द्यावं..? असा विचार करत, तिने आजूबाजूला पाहिलं. मी लगेच त्या गावचा नाहीये असा अविर्भाव आणला. सगळी चाचपणी झाल्यावर, ती तरुण मम्मी तिच्या मुलीला म्हणाली.
अगं.. ते दोघे खूप गरीब आहेत, त्यांच्याकडे दोन आईसक्रिम घ्यायला पैसे नाहीयेत. म्हणून ते दोघे एकच आईस्क्रीत खात आहेत..!
आईचं हे उत्तर ऐकून, त्या चिमुरडीने सुद्धा होकारार्थी मान हलवली. हा प्रसंग संपतोय न संपतोय तोच.. अचानक, त्या मम्मीची नजर माझ्यावर येऊन स्थिरावली.. मी हातानेच, तिला " सुंदर " असा इशारा केला. त्यावर.. तिने सुद्धा लाजतच एक स्माईली देत, डोळ्यानेच मला थँक्स असा अभिप्राय दिला.
तितक्यात.. तिचे मिस्टर कार घेऊन आले. त्या दोघी मायलेकी कारमध्ये बसल्या. आणि काही क्षणातच, ती कार तेथून पुढे निघून गेली. आणि इकडे मात्र.. त्या प्रेमी युगुलाचं,
अजुनही.. तेच, एकुलतं एक " आईसक्रिम " पुरवून-पुरवून खानं चालूच होतं..!