Friday, 19 January 2018

कोणताच व्यवसाय, हा छोटा किंवा मोठा नसतो.
फक्त, तुम्ही करत असलेला व्यवसाय कितपत प्रामाणिकपणे करत आहात. याला फार महत्व असतं. सगळेच जन टाटा सारखे मोठे उद्योगपती झाले असते, तर.. बाटा सारख्या स्लीपरची निर्मिती झाली असती का...?
तुम्ही कोणताही व्यवसाय करा, फक्त त्यात कमीपणा बाळगू नका..!
मी एका फार मोठ्या संत व्यक्तीच्या ( बाबा ) तोंडून ऐकलं होतं. कि.. दारू किंवा मास विक्रीचा व्यवसाय तुम्ही कधीही करू नका. म्हणजे, बियर बार किंवा बिर्याणी हाउस वगैरे...
या व्यवसायामुळे, तुमच्या घराला कधीही बरकत मिळणार नाही. हे तत्व सांगणारे ते संत, आमच्या भागात एकदा प्रवचन द्यायला आले असता. त्यांचा मुक्काम, आमच्या भागातील होलसेल मध्ये दारू विक्री करणाऱ्या ( डिस्ट्रीब्यूटर ) व्यक्तीच्या घरी होता. आणि.. तो व्यक्ती सुद्धा त्यांचा निस्सीम भक्त होता. हे सगळं मी माझ्या डोळ्याने पाहिलं आहे. आणि तेंव्हाच, ते प्रवचन सुद्धा मी माझ्या कानाने ऐकलं होतं. सांगा.. यापुढे आता काय बोलणार..?
माझ्या इथे राहणारा.. चिकन विक्री करणारा एक मित्र आज अगदी हायफाय एरियात थ्री बीएचके फ्ल्याट मध्ये अगदी मजेत राहतोय. मटन विक्री करणारा माळकरी व्यक्ती, खूप उंची जीवन जगत आहे. आणि हे सगळं मी फार जवळून पाहत आलोय, या लोकांना कोणतीही रोगराई किंवा त्यांच्या मागे दुसरी कोणतीही पिढा सुद्धा नाहीये. अगदी मजेत आहेत हे सगळे.
मी नाही केलं.. म्हणून, तो व्यवसाय दुसरं कोणी करणार नाही. असं कधीच होऊ शकत नाही. उलटपक्षी चालून आलेली अशा प्रकारची संधी काही व्यक्तींनी डावलली. ती लोकं मला आज कुठेच दिसत नाहीयेत. हि एक भयाण वास्तविकता आहे.
पण काही लोकं निव्वळ पैसा कमवायच्या लालसेने, छोट्या मोठ्या व्यवसायात नको ते प्रकार करत असतात. हे बाकी चांगलं नाहीये. त्यातील, काही ठळक उदाहरणं मी तुम्हाला सांगतो.
काही ठिकाणी.. मक्याची कणसं भाजणारे व्यक्ती. महागातला लाकडी कोळसा आणण्यापेक्षा, स्मशानभूमीत मिळणारा कोळसा किंवा तिथे अर्धवट जळून पडलेले लाकडं आणून त्यावर हा व्यवसाय करत असताना माझ्या पाहण्यात आली आहेत.
शवागारातील टाकून दिलेला बर्फ घेऊन, त्यापासून गारेगार लिंबू सरबत बनवून विक्री करणारी काही लोकं आहेत. असं सुद्धा माझ्या वाचण्यात आलं होतं.
हल्लीच मी एक नवीन प्रकार पाहिला.. एक व्यक्ती, चाळीस रुपयात भाजी चपाती विकण्याचा व्यवसाय करतो. स्वस्तात, पोटभर आणि रुचकर जेवण मिळतय म्हणून. त्याच्याकडे खवैय्यांची भरपूर गर्दी सुद्धा असते. तर तो व्यक्ती, भाजी मंडई मध्ये फेकून दिलेल्या भाज्या जमा करून आणतो. त्याकरिता, त्याने दोन व्यक्ती स्पेशल त्याच म्हणजे, कचरा पेटीत फेकून दिलेली भाजी गोळा करण्याच्या कामावर ठेवल्या आहेत.
फेकून दिलेल्या भाज्या, गोळा करून आणतात. त्या व्यवस्थितपणे निवडून ठेवल्या जातात. आणि त्यांना व्यवस्थित साफ करून त्यापासून भाजी बनवली जाते.
हातगाडीवर.. वडा पाव किंवा भजी बनवणारे काही व्यवसायिक व्यक्ती, बाजारात मंडईत मिळणारा बदला माल खरेदी करतात. " बदला " माल म्हणजे, जो आता टाकून देण्याच्या कामाचा उरला आहे असा माल अगदी स्वस्तात विकला जातो. सडलेला कांदा, टरफल काढून वापरला जातो. किडके बटाटे कापून स्वच्छ करून उकडून वापरले जातात. पिवळी पडलेली कोथिंबीर, नासलेल्या अर्धवट तुटलेल्या किंवा लाल झालेल्या मिरच्या, या वस्तू तिथे वापरल्या जात असतात. हे पदार्थ बनविण्यासाठी कुठलं आणि कसलं पाणी वापरलं जातं. हा विषय तर न सांगितलेलाच बरा.
जास्तीचे दोन पैसे मिळवण्यासाठी काही लोकं नको ती कामं करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पण हे काही चांगलं काम नाहीये. पैसे कमवायच्या नादात, या व्यक्ती.. लोकांच्या जीवाशी खेळत असतात. त्यामुळे आपण लोकांनी शक्य तितकं घरचं अन्न खाण्याला प्रथम प्राधान्य द्यावं. कामावर जाताना, सोबत जेवणाचा डबा न्यायला कसली लाज आहे हो. हे सगळं काही फक्त पोटासाठी चाललं आहे. हे काही लोकांच्या ध्यानातच येत नाही. आणि जेंव्हा ध्यानात येतं, त्यावेळी बराच उशीर झालेला असतो..!

No comments:

Post a Comment