Tuesday, 31 July 2018

मृत्यू हे अंतिम सत्य आहे..
तरी सुद्धा, आपण सगळे जन मृत्यूला विनाकारण घाबरत असतो. आणि, घाबरत राहणार आहोत. ते सुद्धा, अगदी जिवंत असेपर्यंत...!
तसा तर, मी सुद्धा फार भित्रा माणूस आहे. पण, जे आहे ते अगदी खरं आहे. उसनं आवसान आणून, काहीही फायदा नसतो...
तर.. परवा, माझ्या मित्राच्या वडिलांना देवाज्ञा झाली.
आम्ही सगळे मित्र, त्या दुक्खात सहभागी होतो. आणि, आम्ही जे अत्यंत जवळचे मित्र होतो. ते सगळे मित्र आम्ही रातोरात त्या इस्पितळात दाखल झालो. जाणकार मित्रांनी, इस्पितळातील सगळे सोपस्कार पार पाडले. नाजूक आणि सुंदर दिसणाऱ्या सावळ्या रंगाच्या केरळी मुली मनात कोणतीही भीती न बाळगता. रात्री बारा वाजता, त्या मृतदेहाला अगदी हसून खेळून अलविदा करत होत्या. खरोखर, त्या मुलींचं काळीज खलास झालं असेल का..? त्या मुलींचा स्वच्छंदी आणि मनमोकळा स्वभाव पाहून. काहीवेळ, माझ्या मनात हि नको ती शंका सुद्धा उत्पन्न झाली. पण काय आहे, काम हे शेवटी कर्म असतं. त्यासाठी, सेवकाने सदैव तत्पर असणं हे त्याचं कामच असतं. आणि त्या सगळ्या तरुणी या कसोटीत अगदी खऱ्या उतरल्या होत्या.
रातोरात.. आम्ही आमच्या काकांचा मृतदेह आमच्या घराजवळील इस्पितळातील शीतगृहात घेऊन गेलो. जेणेकरून सकाळी लोकांचा खोळंबा होऊ नये. आणि पुढील सगळे सोपस्कार सुरळीत पार पाडावेत. हा त्या मागचा मुख्य हेतू होता.
शववाहिका शवागारापाशी दाखल झाली. काही मित्रांनी काकांचा निश्चल पडलेला मृतदेह स्ट्रेचर सहित उचलून शावाघरात नेला. त्यांच्या मागोमाग मी सुद्धा तिथे गेलो. भयाण शांतता असणाऱ्या त्या शवागरात, अंगाचा बर्फ होऊन जावा इतकी भयानक थंडी वाजत होती. एक छोटासा झिरो बल्ब तिथे उजेड देण्याचं काम करत होता. परंतु त्या मिणमिणत्या प्रकाशात उजडे कमी आणि भीतीच जास्ती वाटत होती.
दहा बाय बारा लांबी रुंदी असलेल्या त्या शवागारात भिंतीच्या आतील बाजूस लागून तिन्ही बाजूंनी तीन मजली लोखंडी रेक बसवली होती. आणि त्या प्रत्येक रेकवर पांढऱ्या कपड्यात लपेटलेले निर्विकार मृतदेह ठेवले गेले होते.
मी थोडी नजर चुकवत आजूबाजूला पाहत होतो, शक्यतो माझ्या नजरेला काही दिसूच नये या प्रयत्नात होतो. पण शेवटी चुकून माझी नजर एका ठिकाणी गेली. बहुतेक ते पंधरा एक वर्षाच्या मुलाचं शव असावं. पण जास्ती खोलात न शिरता, कान्हाडोळा करत मी काकांचा मृतदेह त्या लोखंडी रेक्वर ठेवून ताबडतोब बाहेर निघून आलो.
माझ्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. जन्म आणि मृत्युच्या भयाण कचाट्यात आपण कसे सापडले आहोत. क्षणभर का होईना याची जाणीव माझ्या मनाला फार मोठा चटका देऊन गेली. रात्रीचे दोन वाजले होते, उद्या सकाळी अंत्यविधीच्या तयारीला लागायचं होतं. त्यामुळे आम्ही सर्वांनी आपापल्या वाहनांना स्टार्टर मारले, आणि थंडी गारठ्यात आपापलं घर गाठलं. घरी गेल्यावर हातपाय धुवून मी अंथरूणावर अंग टाकलं, डोळे मिटण्याचा प्रयत्न केला. त्यासरशी त्या लहान मृत मुलाचा डोळे बंद असलेला पांढऱ्या कपड्यातून डोकावणारा चेहरा माझ्या नजरेसमोर तरळू लागला. मनातील नको असणारे अविचार डोळ्यासमोर रुंजी घालत होते. शेवटी एकदाची कशीतरी मला झोप लागली. आणि पुन्हा सकाळी सात वाजता माझा डोळा उघडला. त्यावेळी अगदी प्रकर्षाने एक गोष्ट मला जाणवली..
झोप म्हणजे, एकप्रकारचा क्षणिक मृत्यूच आहे. त्यामुळे रात्री झोपून सकाळी सहीसलामत उठल्यावर, आपण सर्वांनी त्या परमेश्वराचे आभार मानायला हवेत.
पुन्हा एकदा सगळी आवराआवर करून, आम्ही सगळे मित्र इस्पितळात दाखल झालो. शवागाराच्या बाहेर, मृत व्यक्तींचे आप्तेष्ट धाय मोकलून रडत होते. ज्याचा जसा नंबर येईल तसे मृतदेह नेले जात होते. तितक्यात माझ्यासमोर त्या लहान मुलाचा मृतदेह बाहेर आणला गेला. छे-छे मुलगा नव्हता तो. दिवसा उजेडी पाहिल्यावर समजलं, ती एक अठरा एकोणीस वर्षांची कोवळी नवविवाहिता होती. शेलाट्या बांध्याची नाकीडोळी नीटशी अशी ती मुलगी पहिल्या बाळंतपणात प्रसव वेदना सहन न झाल्याने तिला मृत्यूला सामोरं जावं लागलं होतं..
तिथे आजूबाजूला काही लोकांची कुजबुज चालू होती..
मुलीला कसलाच त्रास नव्हता हो.. बिपी नॉर्मल, शुगर नॉर्मल तरी सुद्धा मुलगी गेली. काय तर म्हणे.. बाळाने पोटात शी केल्याने असं झालं. तर कोणी म्हणत होतं.. डॉक्टर लोकांचा हलगर्जीपणा नडला. शिकाऊ डॉक्टर लोकांच्या चुकीमुळे मुलगी गेली. मी हे सगळं उघड्या कानाने फक्त ऐकत होतो.
त्या मुलीचा नवरा, एका कोपऱ्यात उभा राहून आसवं गाळत होता. तिच्या आईच्या दुखाला तर पारावारच उरला नव्हता. त्या माऊलीचा हंबरडा आसमान चिरून जात होता. आणि सोबतच तिथे असणाऱ्या जमावाच काळीज पिळवटून टाकत होता. सगळं काही संपलं होतं. आता वाच्यता करण्यात काहीच अर्थ नव्हता.
एक देह कायमचा शांत झाला होता. आणि दुसरा, जन्म घेण्या अगोदरच पुढील योनीत प्रवेशित झाला होता. आणि आम्हाला सुद्धा, आता.. एका निश्चल देहाला मूठमाती देण्यासाठी जावं लागणार होतं..!
माझ्या एका मित्राने.. सेव्हिंग म्हणून, बऱ्याच विमा पॉलिसी काढून ठेवल्या होत्या.
त्याच्याकडे.. अक्षरशः करोड रुपयांच्या वरच्या विमा पॉलिसीसी तयार झाल्या होत्या. हा बर्यापैकी मोठा व्यावसायिक असल्याने, त्याचा हफ्ते भरणा नियमित होत होता. त्यामुळे, विमा एजंटला त्यापासून कसलाच त्रास होत नव्हता. त्याने काढलेल्या पॉलिसीस मध्ये, काही पॉलिसी मेडिक्लेमच्या सुद्धा होत्या.
ज्यामध्ये, अशी सुविधा होती, कि दरवर्षी.. तुम्ही तुमच्या शरीराच्या सगळ्या चाचण्या कोणत्याही इस्पितळात मोफत करून घेऊ शकता.
पण माझ्या मित्राला, कोणतीच रोगराई नव्हती. तो अगदी धडधाकट असल्याने, तो या गोष्टींचा बिलकुल फायदा घेत नव्हता.
एकदा.. त्यांचा विमा पॉलिसी एजंट माझ्या मित्राशी गप्पा मारत बसला होता. त्यात, मी तिसरा गेलो. आमच्या चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या. आणि माझा मित्र, त्याच्या खुर्चीवरून उठला. अंगाला आळोखे पिळोखे देऊ लागला. आणि म्हणाला, आयला बरेच दिवस झाले माझं अंग खूपच दुखतंय. काय होतंय काही समजतच नाही.
आपुलकीच्या भावनेने, तो विमा एजंट त्याला म्हणाला. अहो तुम्हाला तुमच्या पॉलिसीच्या माध्यमातून बरेच फायदे घेता येऊ शकतात. तुम्ही एकवेळ, तुमच्या संपूर्ण शरीराची तपासणी का करून घेत नाही..?
आणि हो.. सगळ्या तपासण्या तुम्हाला पूर्णपणे मोफत करून मिळणार आहे. ते कसं आणि काय ते मी करून देतो. त्याची तुम्ही काळजी करू नका...
नाही म्हणता-म्हणता, शेवटी कसाबसा माझा मित्र त्यासाठी तयार झाला.
त्याने, त्याच्या संपूर्ण शरीराची तपासणी करून घेतली.
आणि, नको तेच घडलं..
त्या तपासणीमध्ये, मित्राला हिप्याटायटीस बी ( पांढरी कावीळ ) आहे असं निदान झालं.
संपलं... त्या मित्राने, त्या रोगाची इतकी धास्ती घेतली कि बस...
कारण, हा रोग सहजासहजी बरा होत नाही. हे, त्याला सुद्धा समजलं होतं.
त्या मित्राने, खूप प्रयत्न केले. नको त्या ठिकाणी गेला. लाखो रुपये खर्च केले. पण काहीच उपयोग झाला नाही.
मला त्याचे हाल पाहवत नव्हते. पण, धीर देण्याचं 'अमुल्य' कार्य मी करतच होतो.
साधारण, वर्ष भरानंतरची गोष्ट....
एके दिवशी, आम्ही दोघे अशाच गप्पा मारत बसलो होतो.
तो, मला म्हणाला...
त्यादिवशी, मी त्या विमा एजंटचं ऐकलं नसतं. तर, खूप बरं झालं असतं.
अजून, दोनचार वर्ष तरी आरामशीर जगलो असतो राव.
तो मित्र खूप दुःखी झाला होता....
मी, त्याला काहीच उत्तर देऊ शकलो नाही.
घरात साप आल्यावर, त्याला दोरी आहे म्हणून डोळेझाक करण्यात काहीच अर्थ नसतो.
जे विधिलिखित आहे ते होणारच.
त्यात, त्या विमा एजंटचा काही एक दोष नव्हता.
आणि, साधारण महिन्या भरातच माझ्या त्या मित्राचा करून अंत झाला...
त्यामुळे कधी कधी वाटतं, अज्ञानातच फार मोठं शहाणपण असतं..!

जी आपल्या जीवनातून कधीही जाणार नाही, ती जात आहे.
त्यामुळे.. तिला कितीही जा म्हंटल, तरी सुद्धा ती आपल्यातून जाणार नाहीये. आणि आपण सुद्धा, तिला कदापि जाऊ देणार नाहीये. हि अगदी सत्य परिस्थिती आहे. याला कोणीच नकार देऊ शकत नाहीये. मग ती जात.. चांगल्या करिता असो, अथवा वाईटा करिता..
कारण, प्रत्येक जात.. हि गरीब किंवा श्रीमंत नक्कीच असू शकते..!
त्यामुळेच.. कोणत्याही जातीत जन्म घेतलेलं मुल, हे बुद्धिष्ट किंवा निर्बुद्ध सुद्धा असू शकतं.
हे सुद्धा तितकच खरं आहे.
मला सांगा ना.. शिक्षण क्षेत्रात आरक्षण कशाला पाहिजे.?
आजवर आरक्षणाचा फायदा घेऊन मुख्य प्रवाहात आलेली लोकं सुद्धा, आरक्षणाचा फायदा घेणं सोडत नाहीत. त्यामुळे, आरक्षणासाठी आर्थिक निकष लावले गेले पाहिजेत. आणि हे सर्वानुमते मान्य सुद्धा झालं पाहिजे. असं माझं स्पष्ट मत आहे. किमान शिक्षण क्षेत्रासाठी तरी हे निकष लागू केलेच पाहिजेत.
मी तर म्हणतो.. या आरक्षणाच्या गरगरीत गाजरामुळे, आजची आरक्षण घेणारी मुलं मन लाऊन अभ्यास करेनाशी झाली आहेत. हा माझा स्पष्ट आरोप आहे..!
जाऊदेत रे.. मला पन्नास टक्के मिळाले, तरी माझं एडमिशन नक्की होऊन जाईल..!!
अशा आशयाची कितीतरी वाक्य आजवर माझ्या कानी पडली आहेत.
आणि त्यामुळेच, आरक्षण घेणारा समाज आणखीन दुबळा होत चालला आहे. हि शंभर टक्के सत्य परिस्थिती आहे. कमी टक्क्यात जर हवं तिथे एडमिशन मिळणार असेल,
तर.. कोण आणि कशाला रात्र-रात्र जागून मेरीट मध्ये येण्याचा प्रयत्न करणार आहे.?
मला तर वाटतं, हे सगळं षड्यंत्र आहे.
जेणेकरून मागसलेला समाज मुख्य प्रवाहात तर नक्की यावा, पण तो प्रगल्भ असता कामा नये. हि एकच भयानक मानसिकता त्यामागे असावी अझा माझा स्पष्ट आरोप आहे.
आमच्या भागात.. युपी, एमपी वरून आलेले अशिक्षित लोकं आपल्या ताकतीच्या, श्रमाच्या आणि अकलेच्या जोरावर, स्थिरस्थावर नसताना सुद्धा अब्जाधीश झाले आहेत.
ते हि.. कोणतंही आरक्षण न घेता. हे कसं काय शक्य झालं.?
तर मग.. आपल्या महाराष्ट्रातील लोकांना काय झालं आहे..? ते आपआपली गावं सोडून शहरात येऊन, आपलं भविष्य घडवू शकत नाहीत का.? कि त्यापासून त्यांना कोणी रोखलं आहे.?
वानगीदाखल एक गोष्ट मी इथे तुम्हाला सांगू इच्छितो..
माझ्या मुलाला.. एक इर्षा म्हणून, मी स्वतः ओ.बी.सी. प्रवर्गामध्ये असताना सुद्धा. मुद्दाम मी त्याला ओपनमध्ये शिकवण्याचा अट्टाहास केला.
माझी आर्थिक ताकत नसताना सुद्धा, सलग दोन वर्ष.. लाखभर रुपये फी मी भरली, पण बिलकुल मागे सरलो नाही. पण त्यानंतर, माझ्या मुलाच्या आवडीचा कल बदलला. आणि त्याला, तो संभाव्य विभाग सोडून आयटीआय करावासा वाटला.
खरं सांगतो.. जो व्यक्ती आरक्षणाचा लाभ घेत नाही, किंवा त्याचा अभ्यास ठेवत नाही. त्याला त्रास हा होणारच असतो. आणि तो मला सुद्धा झाला.
तर.. त्यावेळी मोठ्या दिमाखात माझ्या मुलाला मी आयटीआय प्रवेश घेण्यासाठी गेलो.
अर्ज भरला.. दोन चार आयटीआय ची नावं सुद्धा टाकली.
सोडतीला सुरवात झाली. पहिल्या यादीत माझ्या मुलाचा नंबर काही लागला नाही. जे कि, माझ्या मुलापेक्षा कमी टक्के असणार्या मुलांचा त्यात नंबर लागला होता. नंतर, दुसऱ्या आणि तिसऱ्या यादीत सुद्धा माझ्या मुलाचा नंबर काही लागला नाही. कारण, माझ्या मुलाकडे आरक्षण घेण्यासाठी जातीचा कागद नव्हता.
झालं.. हे चालू वर्ष वाया जाणार, यावर आम्ही मोठ्या मनाने शिक्कामोर्तब केला. प्रायव्हेट आयटीआय मध्ये प्रवेश घ्यावा म्हणलं तर, तिथे सुद्धा अव्वाच्या सव्वा फीस मागत होते. ( आणि खरं सांगायला गेलं तर, प्राथमिक शिक्षण प्रायव्हेट शाळेत जरी झालं असलं. तरी उच्चशिक्षनासाठी सर्वांना सरकारी विद्यालयातच प्रवेश हवा असतो. ) शेवटी निर्णय घेतला, आणि या वर्षी शिक्षणाला विश्रांती द्यावी असं ठरलं.
माझा मुलगा तर, या विषयात भयंकर मागास आहे. कि हा नेमका काय प्रकार आहे.? कारण, जात हा विषय मी त्याला कधीच शिकवला नव्हता.
म्हणून साठी, त्याला इतर गोष्टी सांगत न बसता, तो शिकणार असणाऱ्या विषयाला सल्लग्न असणाऱ्या विषयाचे इतर कोर्स मी त्याला लाऊन दिले. आणि, मी माझ्या कामाला लागलो.
मी ताबडतोबीने माझ्या मुलाचा जातीचा दाखला काढून घेतला. त्यासाठी सुद्धा मला बरीच धावपळ करावी लागली. आणि त्यासोबत, इतर जे काही कागदपत्रे लागणार होती. त्याची जुळवाजुळव आणि तजवीज करून घेतली. बघता-बघता एक वर्ष गेलं..
दुसऱ्या वर्षी माझ्या मुलाने पुन्हा एकदा आयटीआय मध्ये त्याचा अर्ज सादर केला. आणि गंमत म्हणजे, अगदी पहिल्याच यादीत माझ्या मुलाला त्याच्या इच्छित ठिकणी प्रवेश सुद्धा मिळाला. हे झाल्यावर खरं तर मी खूप आनंदी होतो, पण त्या दिवशी योगायोगाने.. आमच्या शेजारी एक मुलगा उभा होता. तो आम्हाला म्हणाला,
काका.. झालं का हो तुमचं एडमिशन..?
आम्ही सुद्धा अगदी आनंदाने त्याला.. हो, झालं आमचं एडमिशन असं सांगितलं..!
त्यावेळी तो मुलगा माझ्या मुलाला म्हणाला, किती टक्के होते रे तुला.?
मुलगा म्हणाला.. साठ टक्के आहेत..!
त्यावेळी तो मुलगा लगबगीने आपल्या फाईल मधील त्याची मार्कलिष्ट दाखवत मला म्हणाला. काका.. आम्ही ओपन लोकांनी काय करायचं हो..?
मला तर सत्तर टक्के आहेत, मागचं वर्ष तर गेलच, पण माझा नंबर यावर्षी तरी लागेल असं मला वाटत नाही. गरीब मुलगा होता तो.. कारण, माणसं वाचयला मी कधीच चुकत नाही.
मला सांगा, तो गरीब मुलगा निव्वळ ओपनमध्ये असल्यामुळे त्याला या परीस्थितीचा सामना करावा लागला. त्यावर्षी त्या मुलाला एडमिशन मिळालं कि नाही, ते मला माहित नाही.
परंतु.. माझा मुलगा, यावर्षी त्या क्षेत्रात पास होऊन बाहेर पडत आहे..!
मला सांगा.. शिक्षण या विषयात आरक्षण कशाला पाहिजे..?
पन्नास टक्के घेणारा मुलगा, आरक्षणाचा फायदा उठवत किमान काठावर पास होत.. डॉक्टर, इंजिनिअर नक्की होईल. पण तो मुलगा.. खरोखरच एक बुद्धीजीवी व्यक्ती होऊ शकेल का..?
( टीप :- मी स्वतः सुद्धा आरक्षणाचा फायदा घेणाऱ्या यादीत आहे. तरी सुद्धा मी त्याचा विरोध करत आहे. हे ध्यानात घेऊन प्रत्येकाने आपलं मत प्रदर्शित करावं. उगाच विरोध करायचा म्हणून विरोध करू नका. )

लहानपणापासून.. मला, वकिली पेशा बद्धल भयंकर आकर्षण होतं.
त्याला कारण म्हणजे, त्याकाळी अंगात कोट परिधान करणाऱ्या दोनच व्यक्ती असायच्या.
एक म्हणजे.. लग्नातला नवरदेव, आणि दुसरा म्हणजे.. वकील बाबू.
कोट परिधान केलेले व्यक्ती, त्यावेळी मला फार जंटलमन वाटायचे. आणि, अजूनही वाटतात.
पण ज्यावेळी.. दोन हजार साली पुणे महापालिकेत, ड्रायव्हर लोकांच्या खटला विभागाचं काम मी पाहू लागलो. त्यावेळी, माझं कोर्टात नेहेमी येणं जाणं व्हायचं, आणि त्यावेळी पाहिलेले काही प्रसंग माझ्या मनाला खूप धक्का देऊन गेले..
काळा कोट परिधान केलेले काही वकील, अगदी घोळक्याने अशीलाच्या मागे अक्षरशः धावायचे.
त्याला अगदी सळो कि पळो करून सोडायचे. आता.. ती लोकं वकीलच होते, कि आणखी काय प्रकार होता..? त्याचा बाकी मला तपास लागला नाही. या प्रकारामुळे, तो बिचारा आशील अगदी गांगरून जायचा.
बोला ना काय करायचं आहे..? नोटरी आहे का..? सांगा तर खरं काय विषय आहे.?
बघुदेत कागदं दाखवा मला.. तुम्ही इकडे या हो, काय ते व्यवस्थितपणे सांगा..!
हा सगळा प्रकार माझ्यासाठी अगदी नवा आणि अनभिज्ञ होता. वकील म्हणजे, त्याकाळी माझ्या मनात त्यांच्या विषयी एक वेगळीच प्रतिमा होती. आणि इथे तर काही वेगळच चित्र मला दिसत होतं. खरं सांगायला गेलं तर, त्यावेळी शिवाजीनगर कोर्टात आरोपी लोकांपेक्षा मला वकीलच जास्ती दिसायचे. ( आत्ताची परिस्थिती मला माहिती नाहीये. ) मग एवढ्या भाऊ गर्दीत, सगळ्यांना रोजगार तरी कसा उत्पन्न होणार.? या प्रश्नाने त्यावेळी मला पुरतं भंडावून सोडलं होतं..!
त्यावेळी.. प्रख्यात वकील, उज्वल निकम साहेब पुण्यातील एका एकतर्फी प्रेम प्रकरणाची केस लढत होते. ज्या मध्ये, त्या मुलीला आपला अनमोल जीव गमवावा लागला होता.
फावल्या वेळात.. एक आवड म्हणून शिवाजीनगर कोर्टात, त्या केसच्या चार पाच हियरिंग मी अगदी मन लाऊन ऐकल्या आहेत.
त्या केसमध्ये.. खून झालेल्या मुलीच्या, अंतर्वस्त्रा पासून, शाळेतील गणवेश, तिची शाळेची बेग तिचे कपडे, वह्या पुस्तकं, कंपासपेटी, पेन पेन्सिल, आणि बरच काही त्या टेबलवर मांडलेलं असायचं. सुनावणी दरम्यान.. आरोपी मुलाला त्याची बाजू मांडण्यासाठी प्रश्न विचारला,
कि.. तो मुलगा फक्त एवढंच म्हणायचा.
मी निर्दोष आहे, मी काहीच केलेलं नाहीये..!
त्या.. आरोपी ? मुलाचा कोर्टातील सहज वावर, सुनावणी दरम्यान त्याच्या आई वडिलांची थंड प्रतिक्रिया. या सगळ्या गोष्टी, त्यावेळी मला फार अजब वाटायच्या. शेवटी, या प्रकरणात त्या मुलाला जन्मठेप सुद्धा झाली. अठरा वर्ष जुनं प्रकरण आहे, बहुतेक.. तो आरोपी मुलगा आता जेलमधून सुटला सुद्धा असावा.
त्या मुलीचा जीव गेला होता, इकडे आरोपी नाही होऊन पडला होता. मग त्या मुलीचा जीव गेला, हे खोटं होतं का.? कि त्या मुलाला या प्रकरणात उगाच गोवला होता.? या विचाराने माझं डोकं अगदी सुन्न झालं होतं.
तेंव्हा.. शिवाजीनगर कोर्टातील एका नामांकित वकिलाच्या ऑफिसमध्ये खाजगी कामासाठी मी आणि माझा एक मित्र गेलो होतो.
ते वकील म्हणजे, अगदी फायटर व्यक्ती. ते चार्जशीट वाचून सांगायचे, केस आपल्या हातात येईल कि नाही.! नाहीतर, ते केस हातात घ्यायचेच नाहीत.
आमचा आरोपी.? गुन्हेगार नव्हता. हे आम्हाला माहिती होतं. पण रायटरने, चार्जशीट अशी काही रंगवली होती. कि, आमचा मित्र त्यात पुरता गुरफटून गेला होता. हे म्हणजे, हकनाक बळी पडायचं काम झालं होतं.
ते वकील सर, विनाकारण कोणाला फासत नव्हते. आणि, निव्वळ पैसे कमवण्यासाठी ते केस हातात घेत नव्हते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. नाईलाज म्हणून मग, केसमध्ये सेटलमेंट करणाऱ्या वकिलाकडे आम्हाला मोर्चा वळवावा लागला होता. आणि, आम्ही त्यात आम्ही सक्सेस सुद्धा झालो होतो. नाही म्हणता, खऱ्याला न्याय मिळाला होता. हि जमेची बाजू आहे. पण त्याकरिता आम्हाला जीवाचं रान करावं लागलं होतं. हा विषय अलहिदा. असो.. तो विषय निराळा आहे.
तर विषय असा होता.. परवा मी जेल नावाचा एक हिंदी सिनेमा पाहत होतो. नील मुकेश या कलाकाराने त्यात प्रमुख भूमिका बजावली आहे.
त्या सिनेमात असं दाखवलं आहे, नील मुकेशचा एक रूम पार्टनर, जो.. त्याच्या कारमधून प्रवास करत असतो. आणि अचानक पोलीस लोकं यांच्या गाडीच्या मागे लागतात. हा पाठलाग होत असताना, खरा गुन्हेगार मित्र.. त्याला कार पळवायला सांगतो.
याला नेमकं गणित कळत नाही. काहीच कारण नसताना, आपण गाडी कशाला पळवायची..?म्हणून तो, अगदी सावकाश गाडी चालवत असतो.
शेवटी.. पोलीस लोकं त्या कारला ओवरटेक करतात, त्याच्या कारला पोलीस जीप आडवी लावतात. तेवढ्यात, त्याचा मित्र कारमधून पळून जातो. पळून जात असताना, पोलीस त्याला गोळी घालतात. तसा तो भयंकर जखमी होतो. आणि.. उपचारा दरम्यान तो कोमात जातो, एकंदरीत असं कथानक दाखवलं आहे.
आणि.. काहीच कारण नसताना, मुख्य हिरो अमलीपदार्थ वाहतुकीच्या किंवा बाळगण्याच्या गुन्ह्यात विनाकारण गोवला जातो. आणि त्याला, हकनाक जेलची हवा खावी लागते.
तर त्यावेळी.. जो वकील हि केस हातात घेतो. तो त्या आरोपीच्या.? आईला आणि प्रेयसीला वचन देतो. कि मी हि केस सुखरूपपणे सोडवणार. आणि तुमच्या मुलाची यातून निर्दोष मुक्तता करणार.
त्यामुळे त्याच्या आईला आणि प्रेयसीला सुद्धा जरा हायसं वाटतं.
आणि जेंव्हा.. तो वकील त्याची फीस सांगतो, त्यावेळी सिनेमा पाहत असताना सुद्धा मी दचकून गेलो होतो.
कारण.. एका हियरिंगचे, लाख ते सव्वालाख रुपये त्याने सांगितले होते.
बापरे.. हि फीस म्हणावी कि काय..?
एवढं करून सुद्धा.. लाखो रुपये फीस घेऊन, शेवटी तो वकील ती केस हारतो. प्रमुख आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने, दुय्यम आरोपीला दहा वर्षांची शिक्षा होते.
बोला, आता काय करायचं..?
या सिनेमात.. फार खास असा वकील पॉईंट दाखवला आहे. जो सिनेमा पाहताना, आपल्या सुद्धा ध्यानात येत नाही. सुरवातीचा वकील कोर्टात नेमके काय मुद्दे मांडतो. आणि, सरकारी वकील त्याला कसं काय फेटाळून लावतो. हे अगदी पाहण्यासारखं आहे. आणि शेवटी, मुख्य अभिनेत्याला, न केलेल्या गुन्ह्यासाठी शिक्षा होतेच.
पण, हि शिक्षा लागल्यानंतर.. बरेच नाट्यमय प्रसंग घडतात. आणि पुन्हा एकदा हायकोर्टात अपील केल्यावर. दुसरा वकील.. जो, अतुल कुलकर्णी दाखवला आहे.
तो.. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर संपूर्ण अभ्यास करून, जज साहेबांना या केस मधील असे काही कमकुवत दुवे दाखवून देतो. कि त्या केसमध्ये काहीच दम उरत नाही. ते सगळे मुद्दे अगदी साधे आणि सोपे असतात. कि ज्याचा, पहिल्या वकिलाने बिलकुल अभ्यास केलेला नसतो.
पण..त्या पहिल्या वकिलाला हे सगळं सिद्ध का करता आलं नाही..?
आणि दुसऱ्या वकिलाने, काही छोट्या पुराव्याच्या आधारे आरोपीला निर्दोष मुक्तता करून दिली होती. हे त्याचं कौशल्य म्हणावं लागेल.
मला सांगायचा विषय हाच आहे, अशीलाच्या मागे धावणारे वकील खरच बुद्धीजीवी वकील असतील का.? किंवा मोठाले एयर कंडीशन ऑफिस उघडून, तिथे व्यवसाय करणारे वकील आपल्या अशिलाला शंभर टक्के न्याय मिळवून देऊ शकतील का.?
या विषयाबाबत, माझ्या मनात फार मोठी साशंकता आणि कालवाकालव सुद्धा झाली.
आपली न्यायदेवता आंधळी आहे. आणि, ती अशी का दाखवली आहे. या विषयी सुद्धा माझ्या मनात फार मोठी शंका आहे. कि, हे फक्त सिनेमातच दाखवलं जातं..? हा सुद्धा एक वेगळाच विषय आहे. वकील व्यक्ती, डोळस आणि अभ्यासू असतात. किमान त्यांनी तरी व्यवस्थितपणे अभ्यास करून आपल्या अशिलाला न्याय मिळवून दिला पाहिजे कि नाही.?
ते म्हणतात ना.. लाख अपराधी सुटले तरी चालतील. पण एक सुद्धा निरपराध व्यक्ती गजाआड गेला नाही पाहिजे. पण प्रत्यक्षात असं होत नाही, याचं फार मोठं दुखः आहे. आणि हे भारतातच नाही, तर सगळ्या जगात अगदी असच चालू आहे.
जेल या विषयावरील प्यापिलोन नावाची कादंबरी वाचून मी अगदी सैरभैर झालो होतो. ( Papilon हि कादंबरी एकदा अवश्य वाचा ) आणि हल्लीच, मी एक इंग्रजी सिनेमा पाहिला.. आणि, कायदा या विषयावरून माझा विश्वासच उडाला.
त्या सिनेमाचं नाव आहे.. Shawshank Redemption. ( हा सिनेमा सुद्धा नक्की पहा )
बेकार काम हो, जर सगळं काही असच चालत राहिलं. तर, निरपराधी लोकं अक्षरशः दाण्याला लागतील..!
आजही कित्तेक निरपराध व्यक्ती न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत असताना आपल्याला पाहायला मिळतील. कारण, त्यांची खरी बाजू सिद्ध करणारा ज्ञानी वकील त्यांना मिळालेला नसतो. किंवा, खऱ्याचं खोटं रंगवून झालेलं असतं. शेवटी काय आहे.. हरणारा सुद्धा वकीलच असतो, आणि जिंकणारा सुद्धा वकीलच असतो.
तर मग, कधी कधी खऱ्याला न्याय का मिळत नाही.?
हा फार मोठा प्रश्न, माझ्यासमोर.. काहीच कारण नसताना आ वासून बसतो..!

बारा वर्षांपूर्वी.. पुणे महापालिकेत जेटिंग मशीन नावाच्या एका गाडीवर मी कामाला होतो.
जेटिंग मशीन म्हणजे, पाण्याचा दहा हजार लिटरचा एक मोठा टँकर असतो. त्या गाडीवर एक विशिष्ट प्रकारचं अत्याधुनिक यंत्र बसवलेलं असतं. त्या यंत्राद्वारे टाकीतील पाण्याच्या प्रेशरने एका पाईपच्या सहाय्याने रस्त्यावर असणाऱ्या ड्रेनेज चेंबरचे ( मॅनहोल ) चोकप काढले जायचे.
कधी कधी ते चेंबर इतके भयंकर तुंबलेले असायचे, कि त्यावेळी.. या जेटिंग मशीनने सुद्धा काम होत नसायचं. अशावेळी माझ्या सोबत कामाला असणाऱ्या बिगारी सेवकांना त्या चेंबर मध्ये उतरावं लागायचं. कधी-कधी त्या चेंबरच्या होलमध्ये दगड अडकलेला असायचा, तर कधी.. गोधडी किंवा पोतं अडकलेलं असायचं. तर कधी एखादं मेलेलं जनावर ( डुक्कर, मांजर, कुत्रा ) अडकलेलं असायचं. अशावेळी त्या कर्मचाऱ्यांना स्वतः चेंबरमध्ये उतरून, पाण्यामध्ये बुडी मारून काम करावं लागायचं.
हे सगळं वाचताना तुम्हाला खूप सोपं वाटत असेल. पण ते काम प्रत्यक्ष पाहिलं तर, दोनचार दिवस तुम्हाला जेवण जाणार नाही. इतकी डेंजर परिस्थिती असते. चेंबर मध्ये विष्ठा तरंगत असते. महिलांचे सॅनिटरी नॅपकिन तरंगत असतात, सगळ्या दुनियेची घाण तिथे जमा झाली असल्याने, चेंबर मधील त्या पाण्याला एक वेगळाच घाणेरडा दर्प येत असतो. त्या पाण्यात उतरल्यावर दोन दोन दिवस अंगाचा वास जात नाही. शिवाय त्या पाण्यामुळे त्वचारोग होतात, ते विषय निराळेच. काही मंडळी या घाणीला वैतागून दारूच्या आहारी जातात. इतकी भयाण परिस्थिती असायची. नाही म्हणता, आता ते दिवस उरले नाहीत. त्यामध्ये आता बरीच सुधारणा झाली आहे.
त्यावेळी..वारसा हक्काने एक मुलगा या कामावर नव्याने रुजू झाला होता. सरकारी नोकरी असल्याने, काही मुलं हे सगळे त्रास झेलायला तयार असतात. कारण, बाहेर नोकऱ्या मिळणं आता फार कठीण झालं आहे. शेवटी काय आहे, सरकारी नोकरीला मरण नाहीये. तर त्या नवीन जानजवान आणि चिकण्या चोपड्या मुलाला हे काम करताना पाहून मला खूप वाईट वाटायचं. पण तो मुलगा कोणतीही लाज न बाळगता हसत मुखाने आपलं काम करायचा. त्यात जमेची बाजू म्हणजे, त्याला कोणतं व्यसन सुद्धा नव्हतं. पण या कामात, मनुष्य कधी वाममार्गाला लागले ते सांगता येत नाही. कारण हे कामच तशा पद्धतीचं आहे.
एकदा मी सहजच त्याला त्याचं शिक्षण विचारलं, तर तो म्हणाला मी बारावी पास आहे. त्यावेळी मी त्याला सांगितलं, तू एक काम कर. बाहेरील एका संस्थेत सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स करून घे. भविष्यात तुला याचा नक्की फायदा होईल. नाहीतर आयुष्यभर तुला हि घाण काढत बसावी लागेल. माझं ऐकून त्या मुलाने लगेच त्या कोर्सची तयारी केली. आणि वर्षभरात त्याने तो कोर्स पूर्ण देखील केला. त्यानंतर मध्ये बऱ्याच वर्षांचा कालावधी लोटला.
आणि हल्लीच तो मुलगा पुणे महापालिकेत सॅनिटरी इन्स्पेक्टर या पदावर रुजू झाला. माझ्या कानावर सुद्धा हि बातमी आली होती. पण बरेच वर्ष आमचा संपर्क नसल्याने, यावर आमचा काही संवाद झाला नाही. कि भेटगाठ सुद्धा झाली नाही. या बढतीमुळे त्याचा पगार वाढला, अधिकार वाढले, मानमर्यादा वाढली. एकुणात सगळं काही चांगलं झालं होतं.
परवा काही कामाने मी आमच्या साहेबांना घेऊन मुख्य कार्यालयात गेलो होतो. साहेब त्यांच्या कामासाठी निघून गेले होते. मी गाडीच्या बाहेर येऊन मोबाईल मध्ये तोंड घालून उभा राहिलो होतो. तितक्यात माझं समोर लक्ष गेलं, आमच्या दोघांची नजरानजर झाली.
हो.. तोच मुलगा होता. सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या वेशात असणारा आमचा तो कर्मचारी माझ्यासमोर उभा होता. अगदी आनंदाने माझ्याजवळ येत चारचौघात त्याने चक्क माझे पाय धरले. त्याच्यासोबत त्याचे इतर काही सॅनिटरी इन्स्पेक्टर मित्र सुद्धा होते. ते सगळे जन हा प्रकार पाहून विचारात पडले.
कि.. आपले सहकारी साहेब या ड्रायव्हर व्यक्तीच्या पाया का पडले असतील.?
हि क्रिया पूर्ण होते न होते तोच, मी त्याला एक जबरदस्त आलिंगन दिलं. हसतमुख चेहेऱ्याने तो मुलगा त्याच्या इतर मित्रांना अगदी अभिमानाने सांगत होता.
फार वर्षांपूर्वी या कुंभार साहेबांनी मला योग्य मार्ग दाखवला, म्हणून आज हि वर्दी माझ्या अंगावर आली आहे. नाहीतर अजून सुद्धा मी चेंबर साफ करायच्या कामातच असतो.
कोणी आपल्या पेक्षा लहान असो अथवा मोठा असो. चांगला सल्ला हा कोणीही कोणालाही अगदी मोफत देऊ शकतो. आणि आपल्या सल्ल्याने कोणाचं आयुष्य सुजलाम सुफलाम होणार असेल. तर त्याचा आपल्याला सुद्धा अतोनात आनंद होतो. खरं सांगायला गेलं तर, मी महापालिकेत कामाला लागलो. तेंव्हा मला असा सल्ला देणारा कोणी व्यक्ती भेटला असता. तर खूप बरं झालं असतं.
तीन वर्षाचा इंजिनियरिंगचा डिप्लोम करून घे..!
असं कोणीतरी मला सांगायला हवं होतं. पण माझ्या नशिबाने तसा सल्ला देणारं मला कोणी मिळालं नाही. आणि त्यावेळी मला स्वतःला सुद्धा तेवढी समज नव्हती. नाहीतर मी सुद्धा आज, आमच्या पालिकेत इंजिनिअर म्हणून पदभार सांभाळला असता..!

माझ्या मित्राच्या पत्नीने, एका गोंडस बाळाला जन्म दिला.
मित्र, आणि मी अगदी सकाळीच दवाखान्यात हजर झालो. मुलगी झाली होती. पहिली बेटी, आणि धनाची पेटी. त्यामुळे ते दोघेही मला खूप आनंदी आणि समाधानी दिसत होते.
माझं सहजच शेजारील बेडवर लक्ष गेलं, तर..शेजारील खाटेवर एक सुंदर दिसणारी पंचविशीतली तरुणी ऍडमिट होती. ती सुद्धा तिथे बाळंतपण करण्यासाठी आली होती. बहुतेक तिची आईच असावी.. ती सुद्धा, तिच्या शेजारीच बसलेली होती. पण त्या दोघींच्या चेहेर्यावर चिंतेची एक विलक्षण छटा मला स्पष्ट जाणवत होती.
मित्र आणि वहिनी दोघे बोलत बसले होते, तोवर मी कँटीन मध्ये जाऊन गरमागरम चहा आणि बिस्किट्स घेऊन आलो. ते वहिनींना खायला दिले. आणि, आम्ही दोघे नाश्ता करण्याकरिता हॉस्पिटलच्या कँटीन मध्ये निघून गेलो.
आमच्या समोरच्याच टेबलवर, कोपर्यामध्ये त्या मुलीची आई सुद्धा नाश्ता करत बसली होती. एका वड्यासोबत दोन पाव घेऊन तेच लाऊन-लाऊन खात होती. बिचारी खूप भुकेलेली दिसत होती. मला काही ते दृश्य पाहावलं नाही. म्हणून त्या मावशी समोर मी एक दुसरा नाश्ता आणून ठेवला. पण त्या काही, तो नाश्ता घ्यायलाच तयार नाही.
मी म्हंटलं, तुमचा मुलगाच देतोय असं समजा. तेंव्हा, कुठे त्यांनी तो नाश्ता घेतला. त्यांचा नाश्ता होईपर्यंत, आम्ही तिथेच थांबलो होता. त्यानंतर त्यांना चहा सुद्धा दिला. चहा घेऊन झाल्यावर मी त्या मावशींना विचारलं.
का हो.. तुम्ही दोघीही माया लेकी मला खूपच उदास दिसताय..?
तेंव्हा त्या मावशी म्हणाल्या. माझी मुलगी दिसायला खूप देखणी आहे. तुम्ही पाहिलंच कि आत्ता तिला. आमची परिस्थिती तशी खूप नाजूक आहे. आमचे मालक माझी मुलगी लहान असतानाच गेले. हि माझी एकुलती एकच, अपार कष्ट करून मी तिला मोठं केलं.
मुलगी देखणी आहे.. म्हणून, चांगलं मोठ्या घरचं स्थळ तिला चालून आलं. माझ्या ऐपतीप्रमाणे मी लग्न लाऊन दिलं. बाकी सगळा खर्च त्यांनीच केला. सगळं काही चांगलं होतं. पण एक गोष्ट वाईट झाली, माझ्या मुलीला पहिल्या दोन मुलीच आहेत. आता, हे तिचं तिसरं बाळंतपण आहे. आणि तिच्या सासरच्या लोकांनी आम्हाला आता दमच दिलाय.
यावेळी मुलगा झाला तर ठीक, नाहीतर.. पोरीला तुमच्याच घरी घेऊन जावा..!
एकवेळ हत्ती पोसता येईल हो, पण जानजवान पोरीला घरात कशी आणि कोणत्या कारणाने ठेऊन घ्यावी.? असं म्हणून ती बिचारी ढसाढसा रडू लागली.
हे सगळं ऐकून, नकळत माझ्या डोळ्यांच्या कडा सुद्धा ओलावल्या. मला खूप वाईट वाटलं. आपला समाज शहाणा तरी कधी होणार..? या विचाराने मी अगदी हवालदिल झालो. शेवटी काय आहे, यात मी सुद्धा त्यांची काहीच मदत किंवा हस्तक्षेप करू शकत नव्हतो. विषय फारच गंभीर होता. आपण काही बोलावं तर, विषयाला संशयाचं एक वेगळच वळण लागलं असतं. माझ्याकडे फक्त एकच पर्याय होता.
शिवाय, देवाला प्रार्थना करण्याच्या..!
पाच दिवसांनी काही कामाने माझं पुन्हा एकदा त्या दवाखान्यात जाणं झालं. तेंव्हा, मला तिथे एक गोड बातमी मिळाली. त्या मुलीला 'मुलगा' झाल्याचं मला समजलं. मला तर, अगदी मनापासून आनंद झाला. मावशी सुद्धा त्या दिवशी खूप खुश दिसत होत्या. सगळं सासर सूनबाईचं कोडकौतुक करत होतं. बराच गोतावळा तिथे जमा झाला होता. त्यांना त्यांच्या वंशाचा दिवा मिळाला होता. आणि, या माय लेकीच्या आयुष्याचा दिवा विझता-विझता राहिला होता. बरं झालं, सुटल्या बिचाऱ्या त्या जाचातून..!

विवाहसंस्था हा कुटुंबाचा पाया आहे..
परंतु.. पृथ्वीतलावर जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीचं लग्न होईलच असं सांगता येणार नाही. तर काही व्यक्तींच्या भाग्यात हे सुख लिहिलेलंच नसतं. असं म्हंटल तर ते वावगं ठरू नये.
शालेय जीवनात माझ्या ओळखीत एक खूप सुंदर मुलगी होती. दहावी पास झाल्याबरोबर तिच्या आई वडिलांनी लगेच तिचं लग्न लाऊन दिलं. खरं तर तिचं अवघं सोळा वर्षाचं वय होतं. पण मुलगी अंगाने भरगच्च आणि उंचीपुरी असल्याने तसं काही जाणवत नव्हतं.
नवरा मुलगा सुद्धा त्यांच्या नातेवाइकां पैकीच असल्याने. फक्त पाहण्याचे साधे सोपस्कार पार पाडले. आणि लग्नाची सुपारी फोडली.
लग्न झालं.. वर्षभरात पाळणा सुद्धा हलला. दोनाचे चार आणि चारचे सहा हात झाले. पण त्यानंतर, दोघांमध्ये काहीतरी कुरबुरी वाढायला लागल्या. आणि ते प्रकरण, अगदी सोडचिठ्ठी पर्यंत येऊन ठेपलं. नेमकं कुठे बिनसलं होतं.? ते सांगता येणार नाही. पण शेवटी, अवघ्या दोन वर्षात त्या लग्नाचा काडीमोड झाला.
जन्मकुंडली या विषयवार माझा बऱ्यापैकी विश्वास आहे. त्यामुळे या गोष्टी मी पाहत असतोच. तर त्याच सुमारास.. आमच्या गावात, कुंडली कशी बनवली जाते. याचे क्लासेस सुरु झाले होते. आवड म्हणून मला सुद्धा त्या क्लासला जायची हौस होती. पण काही कारणास्तव नाही जमलं. तरी सुद्धा कधी कधी मी तिथे जायचो.
तर त्यावेळी.. ते शिक्षक शिकाऊ मुलांना त्यांच्या ओळखीतल्या व्यक्तींच्या जन्म कुंडल्या घेऊन यायला सांगायचे. आणि कुंडली वाचून त्यावर ते योग्य ती टीका टिपणी करायचे. आणि खरं सांगायला गेलं तर, त्या सगळ्या टिपण्या अगदी तंतोतंत असायच्या.
एके दिवशी.. एका मुलीने, वरील पिडीत मुलीची कुंडली त्या गुरुजींना दाखवायला आणली. गुरुजींनी ती कुंडली पाहिली, आणि ते खूपच चिंताक्रांत झाले. समोर बसलेल्या मुलीला काही समजेना झालं. कि नेमकं काय घडलं आहे. त्या मुलीचा घटस्फोट होऊन जवळपास पाच वर्ष ओलांडली होती. आणि गुरुजी म्हणाले.
कोण आहे हि मुलगी..?
तर.. त्या मुलीकरवे त्यांना सांगण्यात आलं, हि माझी मैत्रीण आहे.!
त्यावर गुरुजी म्हणाले.. काय प्रॉब्लेम आहे..?
त्यावर ती मुलगी म्हणाली.. गुरुजी प्रॉब्लेम असा आहे. कि या ताईचं पाच वर्षापूर्वी लग्न झालं होतं. आणि अगदी क्षुल्लक कारणावरून तिचा घटस्फोट झाला आहे.
त्यावर गुरुजी म्हणाले, खरं तर.. हि कुंडली साफ सांगत आहे. कि या मुलीच्या कुंडलीत लग्न योगच नाहीये..!
बापरे.. हे सगळं ऐकून, नाही म्हणता मी सुद्धा हबकून गेलो होतो. असं सुद्धा होऊ शकतं..?
त्यानंतर.. गुरुजींना सगळी हकीकत सांगण्यात आली. त्यावर ते म्हणाले, इथे सगळं काही दिसत आहे. त्यामुळेच तर मी प्रश्नांकित झालो होतो.
त्यानंतर.. ती मुलगी कुठे गेली, किंवा पुढे काय घडलं ते मला समजू शकलं नाही.
काही स्त्री पुरुष हे अगदी ठरवून अविवाहित राहतात. ते का, ते त्यांचं त्यांनाच ठाऊक. अशाच पद्धतीचा माझा एक मित्र आहे. आता त्याने वयाची पन्नाशी ओलांडली आहे.तो चांगल्या हुद्द्यावर नोकरीला आहे. भरपूर पैसा अडका आणि भरपूर इस्टेट सुद्धा त्याच्या नावावर आहे. आता येवढं सगळं आहे म्हणाल्यावर.. याच्या मागे, त्या संपत्तीला कोणी वारसदार पाहिजे कि नको.? त्यामुळे.. आम्ही मित्रांनी त्याला खूप गळ घातली. पण तो त्याच्या मुद्द्यावर अगदी ठाम होत. शेवटी आम्हाला सुद्धा सवय पडली, आम्ही तो विषय त्याच्यासमोर कधी काढतच नव्हतो.
त्यानंतर काही वर्षांनी.. आमच्या समूहात एक नवीन मित्र जमा झाला. आणि त्याने सुद्धा त्याच्यामागे हीच भुणभुण लावली. तू लग्न करून टाक राव. आता सगळ्यांची लग्नं झाली आहेत. तू एकटाच राहिलास, वगैरे-वगैरे..
त्यावेळी नेमकी आमची बैठक बसली होती. आणि तो नवीन मित्र नशेमध्ये त्याला म्हणून गेला.
तुझ्यात काही " प्रॉब्लेम " वगैरे तर नाहीये ना.?
तसा तो अविवाहित मित्र सुद्धा सटकला, आणि मागचा पुढचा कोणताही विचार न करता त्याला म्हणाला. तू एकदा खाली वाक, मग सांगतो मी तुला. माझ्यात काही प्रॉब्लेम आहे कि नाही.!
तर असे विषय जागेवरच सोडून दिले पाहिजे. त्याच्या जास्ती मुळापर्यंत जाण्यात सुद्धा काहीच मजा नसते.
तर काहीवेळा असं सुद्धा पाहायला मिळतं..
घरातील थोर मोठे व्यक्ती अकालीच गेल्यावर. सगळी जबाबदारी मोठ्या बहिणीच्या किंवा भावाच्या खांद्यावर येऊन पडते. मग ते दिवसाची रात्र करून, आपल्या पाठच्या भावा बहिणींना लहानाचं मोठं करतात. उच्च शिक्षित करतात. आणि हे सगळं करता करता ते स्वतःचं लग्न करायचं सुद्धा विसरून जातात. जबाबदाऱ्या पार पाडता-पाडता.. ते आपल्या आयुष्याला विसरून गेलेले असतात. लहान बहिण भाऊ लग्नाच्या वयाचे झाले आहेत म्हणून, त्यांची ताबडतोब आणि वेळेत लग्नं लाऊन देतील. पण स्वतः मात्र आजन्म अविवाहित राहतील. असेच माझे एक रिटायर्ड आणि खूपच सुखवस्तू मित्र आहेत. मध्यंतरी मी त्यांच्या घरी गेलो होतो. आणि बोलता-बोलता मी त्यांना बोलून गेलो.
वहिनी कुठे आहेत.?
त्यावेळी ते एकदम शून्यात गेले. मला वाटलं, बहुतेक अर्ध्यावरती डाव मोडला असावा.
पण दुसऱ्या क्षणात.. ते अगदी खळखळून हसले. आणि म्हणाले. अरे घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळताना माझ्या लग्नाचं वय कधी निघून गेलं तेच मला समजलं नाही. आणि शेवटी ठरवलं, आता पन्नाशी गाठल्यावर लग्न करून तरी काय उपयोग आहे..?
आणि हो.. लग्न केलं नाही म्हणजे, मी काही ब्रह्मचारी वगैरे नाहीये. नाहीतर तुझ्या मनात माझ्या विषयी फारच आस्था निर्माण व्हायची. असं बोलून ते पुन्हा एकदा खळखळून हसले. आणि.. मी आहे त्यात समाधानी आहे, हे सांगून मोकळे झाले..!
शॉपिंग मॉल मध्ये खरेदी करायला आलेले तरुण कपल्स ( स्पेशली #D_Mart मध्ये. ) खूपच हुशार असतात.
त्यांच्या लहान मुलाला.. तिथे असणाऱ्या ट्रॉली मध्ये मस्तपैकी खाली पाय सोडून बसवतात. मॉल मध्ये असणारं एखादं चांगलं खेळणं त्याच्या हातामध्ये खेळायला देऊन, त्याला मस्त नादवतात.. आणि, त्या मोकळ्या ट्रॉली मध्ये तिथे असणारं काहीबाही जड सामान ठेऊन देतात.
मग.. त्या लहान मुलाला तिथेच सोडून, एक बास्केट घेऊन ताबडतोब ते सगळी खरेदी आटोपून येतात. हे सगळं करण्या मागचं कारण, मॉल मधून मुल काही चोरीला जाणार नसतं. आणि त्याला ट्रॉली मध्ये बसवलं असल्याने, ते कुठे हरवणार सुद्धा नसतं. आणि त्याला सोबत काखेवर घेऊन फिरवायचा त्रास सुद्धा वाचणार असतो. मुल रडायला लागल्यावर, कोणीतरी त्याची चौकशी करतच. त्यामुळे ते अगदी बिनधास्त वावरत असतात.
खरेदी करून आल्यावर, मुलाच्या हातातील खेळणं होतं त्या ठिकाणी परत ठेऊन देतात. नको असलेलं ट्रॉली मधील जड सामान, बाजूच्या ट्रॉली मध्ये ठेऊन देतात. आणि खरेदी केलेल्या सामानाचं बिल करून घरी निघून येतात.
आहे की नाही गंमत.  ☺️👍
जस्ट किडींग..

आत्ता, इथेच टाईम पास करत बसलो होतो. तितक्यात बायकोने आवाज दिला.
अहो.. जरा इकडे या ना.!
नेमका काय प्रकार आहे... म्हणून, तो पाहायला मी ग्यालरीत गेलो. तर, माझ्या घराशेजारील झाडावर एक मांजराचं पिल्लू जीवाच्या आकांताने ओरडत होतं. दुसऱ्या मजल्या इतकं अंतर, त्याला झाडावरून खाली काही उतरताच येत नव्हतं. चुकून खाली पडलं, तर ते नक्की मरणार, किंवा जखमी तरी होणार. कारण, खाली मोकळ्या प्लॉट मध्ये भली मोठी अणकुचीदार दगडं आहेत.
काय करावं.? ते पिल्लू, माझ्याकडे खूप आशेने पाहत, म्यावsss म्यावsss करत होतं.
जसं काही ते मला म्हणत होतं. " प्लीज, वाचवा हो मला "
माझ्या एकदम लक्षात आलं, कि फायर ब्रिगेडला फोन करून बोलवून घ्यावं.
पुन्हा, मनात विचार आला. ते येईपर्यंत, चुकून ते खाली उतरलं किंवा पडलं तर, त्यांना काय जाब द्यायचा.?
शेवटी, मीच प्रयत्न करायला सुरवात केली. सुरवातीला, एक छोटा बांबू मी त्या पिल्लापर्यंत सोडला. वाटलं, त्याला धरून त्यावर चालत ते वर येईल. पण नाही...
ते त्या बांबुकडे पाहून फक्त ओरडत होतं. आणि, त्या घसरड्या लहानशा बांबुवरून त्याला वर येता सुद्धा आलं नसतं. खाली बघ्यांची ( लहान मुलांची ) बरीच गर्दी जमा झाली होती.
कोण म्हणत होतं..
अंकल उसको नीचे ढकल रहे है, तर कोण म्हणत होतं, नही अंकल उसको बचा रहे है..!
माझ्यावर, मोठी जबाबदारी येवून पडली होती.
सगळ्यांचं, माझ्या कामगिरीकडे लक्ष लागून राहिलं होतं. चुकून मांजर खाली पडलं, तर मलाच बोल खावे लागणार होते.
मांजर... गमती जमतीत झाडावर चढून आलं होतं. पण आता, खाली उतरण्यासाठी ते पुरतं हतबल ठरलं होतं.
बायको म्हणाली, तुम्ही एक काम करा.. त्याच्या, गळ्यात दोरी टाका. आणि, त्याला वर ओढून घ्या. पण, तसं करणं शक्य नव्हतं. शेवटी, मी डोकं लढवलं...
एका काटीला, नायलॉनची दोरी फासाप्रमाणे बांधली. आणि, हळुवार त्या पिल्ला पर्यंत नेली. ती दोरी, मी त्या पिल्लाच्या गळ्यात घातली. त्याने, त्या फासात पाय घालावे. असं मला वाटत होतं. पण, भांबावलेल्या त्या पिल्लाला काय करावं तेच समजत नव्हतं.
आता त्याला, तसच ओढावं म्हंटलं... तर, उचलताना त्या पिल्लाने काही चळवळ केली. आणि, त्या दोरातून त्याची मान सटकली. तर, ते सरळ खाली पडणार होतं.
बायको म्हणाली, एक काम करा.. ती काटी, जागेवर गोल फिरवून त्याच्या गळ्याला दोरीचा घट्ट फास तयार करा.. मी म्हणालो, अगं त्याला फास बसला तर काय करायचं ?
म्हणाली, तुम्ही दोरी घट्ट आवळून घ्या, फक्त पिल्लू दोरीतून सुटणार नाही याची काळजी घ्या.
तिच्या म्हणण्या प्रमाणे, त्या दोरीचा फास मी त्या पिल्लाच्या मानेभोवती घट्ट आवळला.
आणि, त्याला उचलण्याचा प्रयत्न केला. तसं, ते पिल्लू त्याची नखं झाडाच्या फांद्यामध्ये घट्ट रोवू लागलं. शेवटी, जोर लावून मी त्याला वर उचललं.
आणि, काही सेकंदातच मी त्याला आमच्या ग्यालारीमध्ये ठेवलं. आणि, पटकन त्याच्या गळ्यातून ती दोरी दूर केली.
नशीब, त्याला फास वगैरे काही बसला नव्हता. पिल्लू सुखरूप होतं..
खाली, डोळे लावून बसलेल्या लहान मुलांना वरूनच हातात घेऊन ते पिल्लू मी दाखवलं.
त्यांच्या चेहेऱ्यावर, आनंद ओसंडून वाहत होता. त्यांनी खालूनच, उड्या मारत टाळ्या वाजवून माझं स्वागत केलं.. बहुतेक, ती सगळी मुलं त्या पिल्लाशी रोज खेळत असावीत. त्या पिल्लाला मी उचललं. आणि, तळमजल्यावर नेऊन त्या मुलांकडे सुपूर्त केलं.
चला, रविवार सार्थकी लागला.
एका मुक्या प्राण्याचा जीव वाचवण्याचं चांगलं काम आज माझ्या हाथून घडलं..!