Tuesday, 31 July 2018

आत्ता, इथेच टाईम पास करत बसलो होतो. तितक्यात बायकोने आवाज दिला.
अहो.. जरा इकडे या ना.!
नेमका काय प्रकार आहे... म्हणून, तो पाहायला मी ग्यालरीत गेलो. तर, माझ्या घराशेजारील झाडावर एक मांजराचं पिल्लू जीवाच्या आकांताने ओरडत होतं. दुसऱ्या मजल्या इतकं अंतर, त्याला झाडावरून खाली काही उतरताच येत नव्हतं. चुकून खाली पडलं, तर ते नक्की मरणार, किंवा जखमी तरी होणार. कारण, खाली मोकळ्या प्लॉट मध्ये भली मोठी अणकुचीदार दगडं आहेत.
काय करावं.? ते पिल्लू, माझ्याकडे खूप आशेने पाहत, म्यावsss म्यावsss करत होतं.
जसं काही ते मला म्हणत होतं. " प्लीज, वाचवा हो मला "
माझ्या एकदम लक्षात आलं, कि फायर ब्रिगेडला फोन करून बोलवून घ्यावं.
पुन्हा, मनात विचार आला. ते येईपर्यंत, चुकून ते खाली उतरलं किंवा पडलं तर, त्यांना काय जाब द्यायचा.?
शेवटी, मीच प्रयत्न करायला सुरवात केली. सुरवातीला, एक छोटा बांबू मी त्या पिल्लापर्यंत सोडला. वाटलं, त्याला धरून त्यावर चालत ते वर येईल. पण नाही...
ते त्या बांबुकडे पाहून फक्त ओरडत होतं. आणि, त्या घसरड्या लहानशा बांबुवरून त्याला वर येता सुद्धा आलं नसतं. खाली बघ्यांची ( लहान मुलांची ) बरीच गर्दी जमा झाली होती.
कोण म्हणत होतं..
अंकल उसको नीचे ढकल रहे है, तर कोण म्हणत होतं, नही अंकल उसको बचा रहे है..!
माझ्यावर, मोठी जबाबदारी येवून पडली होती.
सगळ्यांचं, माझ्या कामगिरीकडे लक्ष लागून राहिलं होतं. चुकून मांजर खाली पडलं, तर मलाच बोल खावे लागणार होते.
मांजर... गमती जमतीत झाडावर चढून आलं होतं. पण आता, खाली उतरण्यासाठी ते पुरतं हतबल ठरलं होतं.
बायको म्हणाली, तुम्ही एक काम करा.. त्याच्या, गळ्यात दोरी टाका. आणि, त्याला वर ओढून घ्या. पण, तसं करणं शक्य नव्हतं. शेवटी, मी डोकं लढवलं...
एका काटीला, नायलॉनची दोरी फासाप्रमाणे बांधली. आणि, हळुवार त्या पिल्ला पर्यंत नेली. ती दोरी, मी त्या पिल्लाच्या गळ्यात घातली. त्याने, त्या फासात पाय घालावे. असं मला वाटत होतं. पण, भांबावलेल्या त्या पिल्लाला काय करावं तेच समजत नव्हतं.
आता त्याला, तसच ओढावं म्हंटलं... तर, उचलताना त्या पिल्लाने काही चळवळ केली. आणि, त्या दोरातून त्याची मान सटकली. तर, ते सरळ खाली पडणार होतं.
बायको म्हणाली, एक काम करा.. ती काटी, जागेवर गोल फिरवून त्याच्या गळ्याला दोरीचा घट्ट फास तयार करा.. मी म्हणालो, अगं त्याला फास बसला तर काय करायचं ?
म्हणाली, तुम्ही दोरी घट्ट आवळून घ्या, फक्त पिल्लू दोरीतून सुटणार नाही याची काळजी घ्या.
तिच्या म्हणण्या प्रमाणे, त्या दोरीचा फास मी त्या पिल्लाच्या मानेभोवती घट्ट आवळला.
आणि, त्याला उचलण्याचा प्रयत्न केला. तसं, ते पिल्लू त्याची नखं झाडाच्या फांद्यामध्ये घट्ट रोवू लागलं. शेवटी, जोर लावून मी त्याला वर उचललं.
आणि, काही सेकंदातच मी त्याला आमच्या ग्यालारीमध्ये ठेवलं. आणि, पटकन त्याच्या गळ्यातून ती दोरी दूर केली.
नशीब, त्याला फास वगैरे काही बसला नव्हता. पिल्लू सुखरूप होतं..
खाली, डोळे लावून बसलेल्या लहान मुलांना वरूनच हातात घेऊन ते पिल्लू मी दाखवलं.
त्यांच्या चेहेऱ्यावर, आनंद ओसंडून वाहत होता. त्यांनी खालूनच, उड्या मारत टाळ्या वाजवून माझं स्वागत केलं.. बहुतेक, ती सगळी मुलं त्या पिल्लाशी रोज खेळत असावीत. त्या पिल्लाला मी उचललं. आणि, तळमजल्यावर नेऊन त्या मुलांकडे सुपूर्त केलं.
चला, रविवार सार्थकी लागला.
एका मुक्या प्राण्याचा जीव वाचवण्याचं चांगलं काम आज माझ्या हाथून घडलं..!

No comments:

Post a Comment