Tuesday, 31 July 2018

बारा वर्षांपूर्वी.. पुणे महापालिकेत जेटिंग मशीन नावाच्या एका गाडीवर मी कामाला होतो.
जेटिंग मशीन म्हणजे, पाण्याचा दहा हजार लिटरचा एक मोठा टँकर असतो. त्या गाडीवर एक विशिष्ट प्रकारचं अत्याधुनिक यंत्र बसवलेलं असतं. त्या यंत्राद्वारे टाकीतील पाण्याच्या प्रेशरने एका पाईपच्या सहाय्याने रस्त्यावर असणाऱ्या ड्रेनेज चेंबरचे ( मॅनहोल ) चोकप काढले जायचे.
कधी कधी ते चेंबर इतके भयंकर तुंबलेले असायचे, कि त्यावेळी.. या जेटिंग मशीनने सुद्धा काम होत नसायचं. अशावेळी माझ्या सोबत कामाला असणाऱ्या बिगारी सेवकांना त्या चेंबर मध्ये उतरावं लागायचं. कधी-कधी त्या चेंबरच्या होलमध्ये दगड अडकलेला असायचा, तर कधी.. गोधडी किंवा पोतं अडकलेलं असायचं. तर कधी एखादं मेलेलं जनावर ( डुक्कर, मांजर, कुत्रा ) अडकलेलं असायचं. अशावेळी त्या कर्मचाऱ्यांना स्वतः चेंबरमध्ये उतरून, पाण्यामध्ये बुडी मारून काम करावं लागायचं.
हे सगळं वाचताना तुम्हाला खूप सोपं वाटत असेल. पण ते काम प्रत्यक्ष पाहिलं तर, दोनचार दिवस तुम्हाला जेवण जाणार नाही. इतकी डेंजर परिस्थिती असते. चेंबर मध्ये विष्ठा तरंगत असते. महिलांचे सॅनिटरी नॅपकिन तरंगत असतात, सगळ्या दुनियेची घाण तिथे जमा झाली असल्याने, चेंबर मधील त्या पाण्याला एक वेगळाच घाणेरडा दर्प येत असतो. त्या पाण्यात उतरल्यावर दोन दोन दिवस अंगाचा वास जात नाही. शिवाय त्या पाण्यामुळे त्वचारोग होतात, ते विषय निराळेच. काही मंडळी या घाणीला वैतागून दारूच्या आहारी जातात. इतकी भयाण परिस्थिती असायची. नाही म्हणता, आता ते दिवस उरले नाहीत. त्यामध्ये आता बरीच सुधारणा झाली आहे.
त्यावेळी..वारसा हक्काने एक मुलगा या कामावर नव्याने रुजू झाला होता. सरकारी नोकरी असल्याने, काही मुलं हे सगळे त्रास झेलायला तयार असतात. कारण, बाहेर नोकऱ्या मिळणं आता फार कठीण झालं आहे. शेवटी काय आहे, सरकारी नोकरीला मरण नाहीये. तर त्या नवीन जानजवान आणि चिकण्या चोपड्या मुलाला हे काम करताना पाहून मला खूप वाईट वाटायचं. पण तो मुलगा कोणतीही लाज न बाळगता हसत मुखाने आपलं काम करायचा. त्यात जमेची बाजू म्हणजे, त्याला कोणतं व्यसन सुद्धा नव्हतं. पण या कामात, मनुष्य कधी वाममार्गाला लागले ते सांगता येत नाही. कारण हे कामच तशा पद्धतीचं आहे.
एकदा मी सहजच त्याला त्याचं शिक्षण विचारलं, तर तो म्हणाला मी बारावी पास आहे. त्यावेळी मी त्याला सांगितलं, तू एक काम कर. बाहेरील एका संस्थेत सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स करून घे. भविष्यात तुला याचा नक्की फायदा होईल. नाहीतर आयुष्यभर तुला हि घाण काढत बसावी लागेल. माझं ऐकून त्या मुलाने लगेच त्या कोर्सची तयारी केली. आणि वर्षभरात त्याने तो कोर्स पूर्ण देखील केला. त्यानंतर मध्ये बऱ्याच वर्षांचा कालावधी लोटला.
आणि हल्लीच तो मुलगा पुणे महापालिकेत सॅनिटरी इन्स्पेक्टर या पदावर रुजू झाला. माझ्या कानावर सुद्धा हि बातमी आली होती. पण बरेच वर्ष आमचा संपर्क नसल्याने, यावर आमचा काही संवाद झाला नाही. कि भेटगाठ सुद्धा झाली नाही. या बढतीमुळे त्याचा पगार वाढला, अधिकार वाढले, मानमर्यादा वाढली. एकुणात सगळं काही चांगलं झालं होतं.
परवा काही कामाने मी आमच्या साहेबांना घेऊन मुख्य कार्यालयात गेलो होतो. साहेब त्यांच्या कामासाठी निघून गेले होते. मी गाडीच्या बाहेर येऊन मोबाईल मध्ये तोंड घालून उभा राहिलो होतो. तितक्यात माझं समोर लक्ष गेलं, आमच्या दोघांची नजरानजर झाली.
हो.. तोच मुलगा होता. सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या वेशात असणारा आमचा तो कर्मचारी माझ्यासमोर उभा होता. अगदी आनंदाने माझ्याजवळ येत चारचौघात त्याने चक्क माझे पाय धरले. त्याच्यासोबत त्याचे इतर काही सॅनिटरी इन्स्पेक्टर मित्र सुद्धा होते. ते सगळे जन हा प्रकार पाहून विचारात पडले.
कि.. आपले सहकारी साहेब या ड्रायव्हर व्यक्तीच्या पाया का पडले असतील.?
हि क्रिया पूर्ण होते न होते तोच, मी त्याला एक जबरदस्त आलिंगन दिलं. हसतमुख चेहेऱ्याने तो मुलगा त्याच्या इतर मित्रांना अगदी अभिमानाने सांगत होता.
फार वर्षांपूर्वी या कुंभार साहेबांनी मला योग्य मार्ग दाखवला, म्हणून आज हि वर्दी माझ्या अंगावर आली आहे. नाहीतर अजून सुद्धा मी चेंबर साफ करायच्या कामातच असतो.
कोणी आपल्या पेक्षा लहान असो अथवा मोठा असो. चांगला सल्ला हा कोणीही कोणालाही अगदी मोफत देऊ शकतो. आणि आपल्या सल्ल्याने कोणाचं आयुष्य सुजलाम सुफलाम होणार असेल. तर त्याचा आपल्याला सुद्धा अतोनात आनंद होतो. खरं सांगायला गेलं तर, मी महापालिकेत कामाला लागलो. तेंव्हा मला असा सल्ला देणारा कोणी व्यक्ती भेटला असता. तर खूप बरं झालं असतं.
तीन वर्षाचा इंजिनियरिंगचा डिप्लोम करून घे..!
असं कोणीतरी मला सांगायला हवं होतं. पण माझ्या नशिबाने तसा सल्ला देणारं मला कोणी मिळालं नाही. आणि त्यावेळी मला स्वतःला सुद्धा तेवढी समज नव्हती. नाहीतर मी सुद्धा आज, आमच्या पालिकेत इंजिनिअर म्हणून पदभार सांभाळला असता..!

No comments:

Post a Comment