Tuesday, 31 July 2018

जी आपल्या जीवनातून कधीही जाणार नाही, ती जात आहे.
त्यामुळे.. तिला कितीही जा म्हंटल, तरी सुद्धा ती आपल्यातून जाणार नाहीये. आणि आपण सुद्धा, तिला कदापि जाऊ देणार नाहीये. हि अगदी सत्य परिस्थिती आहे. याला कोणीच नकार देऊ शकत नाहीये. मग ती जात.. चांगल्या करिता असो, अथवा वाईटा करिता..
कारण, प्रत्येक जात.. हि गरीब किंवा श्रीमंत नक्कीच असू शकते..!
त्यामुळेच.. कोणत्याही जातीत जन्म घेतलेलं मुल, हे बुद्धिष्ट किंवा निर्बुद्ध सुद्धा असू शकतं.
हे सुद्धा तितकच खरं आहे.
मला सांगा ना.. शिक्षण क्षेत्रात आरक्षण कशाला पाहिजे.?
आजवर आरक्षणाचा फायदा घेऊन मुख्य प्रवाहात आलेली लोकं सुद्धा, आरक्षणाचा फायदा घेणं सोडत नाहीत. त्यामुळे, आरक्षणासाठी आर्थिक निकष लावले गेले पाहिजेत. आणि हे सर्वानुमते मान्य सुद्धा झालं पाहिजे. असं माझं स्पष्ट मत आहे. किमान शिक्षण क्षेत्रासाठी तरी हे निकष लागू केलेच पाहिजेत.
मी तर म्हणतो.. या आरक्षणाच्या गरगरीत गाजरामुळे, आजची आरक्षण घेणारी मुलं मन लाऊन अभ्यास करेनाशी झाली आहेत. हा माझा स्पष्ट आरोप आहे..!
जाऊदेत रे.. मला पन्नास टक्के मिळाले, तरी माझं एडमिशन नक्की होऊन जाईल..!!
अशा आशयाची कितीतरी वाक्य आजवर माझ्या कानी पडली आहेत.
आणि त्यामुळेच, आरक्षण घेणारा समाज आणखीन दुबळा होत चालला आहे. हि शंभर टक्के सत्य परिस्थिती आहे. कमी टक्क्यात जर हवं तिथे एडमिशन मिळणार असेल,
तर.. कोण आणि कशाला रात्र-रात्र जागून मेरीट मध्ये येण्याचा प्रयत्न करणार आहे.?
मला तर वाटतं, हे सगळं षड्यंत्र आहे.
जेणेकरून मागसलेला समाज मुख्य प्रवाहात तर नक्की यावा, पण तो प्रगल्भ असता कामा नये. हि एकच भयानक मानसिकता त्यामागे असावी अझा माझा स्पष्ट आरोप आहे.
आमच्या भागात.. युपी, एमपी वरून आलेले अशिक्षित लोकं आपल्या ताकतीच्या, श्रमाच्या आणि अकलेच्या जोरावर, स्थिरस्थावर नसताना सुद्धा अब्जाधीश झाले आहेत.
ते हि.. कोणतंही आरक्षण न घेता. हे कसं काय शक्य झालं.?
तर मग.. आपल्या महाराष्ट्रातील लोकांना काय झालं आहे..? ते आपआपली गावं सोडून शहरात येऊन, आपलं भविष्य घडवू शकत नाहीत का.? कि त्यापासून त्यांना कोणी रोखलं आहे.?
वानगीदाखल एक गोष्ट मी इथे तुम्हाला सांगू इच्छितो..
माझ्या मुलाला.. एक इर्षा म्हणून, मी स्वतः ओ.बी.सी. प्रवर्गामध्ये असताना सुद्धा. मुद्दाम मी त्याला ओपनमध्ये शिकवण्याचा अट्टाहास केला.
माझी आर्थिक ताकत नसताना सुद्धा, सलग दोन वर्ष.. लाखभर रुपये फी मी भरली, पण बिलकुल मागे सरलो नाही. पण त्यानंतर, माझ्या मुलाच्या आवडीचा कल बदलला. आणि त्याला, तो संभाव्य विभाग सोडून आयटीआय करावासा वाटला.
खरं सांगतो.. जो व्यक्ती आरक्षणाचा लाभ घेत नाही, किंवा त्याचा अभ्यास ठेवत नाही. त्याला त्रास हा होणारच असतो. आणि तो मला सुद्धा झाला.
तर.. त्यावेळी मोठ्या दिमाखात माझ्या मुलाला मी आयटीआय प्रवेश घेण्यासाठी गेलो.
अर्ज भरला.. दोन चार आयटीआय ची नावं सुद्धा टाकली.
सोडतीला सुरवात झाली. पहिल्या यादीत माझ्या मुलाचा नंबर काही लागला नाही. जे कि, माझ्या मुलापेक्षा कमी टक्के असणार्या मुलांचा त्यात नंबर लागला होता. नंतर, दुसऱ्या आणि तिसऱ्या यादीत सुद्धा माझ्या मुलाचा नंबर काही लागला नाही. कारण, माझ्या मुलाकडे आरक्षण घेण्यासाठी जातीचा कागद नव्हता.
झालं.. हे चालू वर्ष वाया जाणार, यावर आम्ही मोठ्या मनाने शिक्कामोर्तब केला. प्रायव्हेट आयटीआय मध्ये प्रवेश घ्यावा म्हणलं तर, तिथे सुद्धा अव्वाच्या सव्वा फीस मागत होते. ( आणि खरं सांगायला गेलं तर, प्राथमिक शिक्षण प्रायव्हेट शाळेत जरी झालं असलं. तरी उच्चशिक्षनासाठी सर्वांना सरकारी विद्यालयातच प्रवेश हवा असतो. ) शेवटी निर्णय घेतला, आणि या वर्षी शिक्षणाला विश्रांती द्यावी असं ठरलं.
माझा मुलगा तर, या विषयात भयंकर मागास आहे. कि हा नेमका काय प्रकार आहे.? कारण, जात हा विषय मी त्याला कधीच शिकवला नव्हता.
म्हणून साठी, त्याला इतर गोष्टी सांगत न बसता, तो शिकणार असणाऱ्या विषयाला सल्लग्न असणाऱ्या विषयाचे इतर कोर्स मी त्याला लाऊन दिले. आणि, मी माझ्या कामाला लागलो.
मी ताबडतोबीने माझ्या मुलाचा जातीचा दाखला काढून घेतला. त्यासाठी सुद्धा मला बरीच धावपळ करावी लागली. आणि त्यासोबत, इतर जे काही कागदपत्रे लागणार होती. त्याची जुळवाजुळव आणि तजवीज करून घेतली. बघता-बघता एक वर्ष गेलं..
दुसऱ्या वर्षी माझ्या मुलाने पुन्हा एकदा आयटीआय मध्ये त्याचा अर्ज सादर केला. आणि गंमत म्हणजे, अगदी पहिल्याच यादीत माझ्या मुलाला त्याच्या इच्छित ठिकणी प्रवेश सुद्धा मिळाला. हे झाल्यावर खरं तर मी खूप आनंदी होतो, पण त्या दिवशी योगायोगाने.. आमच्या शेजारी एक मुलगा उभा होता. तो आम्हाला म्हणाला,
काका.. झालं का हो तुमचं एडमिशन..?
आम्ही सुद्धा अगदी आनंदाने त्याला.. हो, झालं आमचं एडमिशन असं सांगितलं..!
त्यावेळी तो मुलगा माझ्या मुलाला म्हणाला, किती टक्के होते रे तुला.?
मुलगा म्हणाला.. साठ टक्के आहेत..!
त्यावेळी तो मुलगा लगबगीने आपल्या फाईल मधील त्याची मार्कलिष्ट दाखवत मला म्हणाला. काका.. आम्ही ओपन लोकांनी काय करायचं हो..?
मला तर सत्तर टक्के आहेत, मागचं वर्ष तर गेलच, पण माझा नंबर यावर्षी तरी लागेल असं मला वाटत नाही. गरीब मुलगा होता तो.. कारण, माणसं वाचयला मी कधीच चुकत नाही.
मला सांगा, तो गरीब मुलगा निव्वळ ओपनमध्ये असल्यामुळे त्याला या परीस्थितीचा सामना करावा लागला. त्यावर्षी त्या मुलाला एडमिशन मिळालं कि नाही, ते मला माहित नाही.
परंतु.. माझा मुलगा, यावर्षी त्या क्षेत्रात पास होऊन बाहेर पडत आहे..!
मला सांगा.. शिक्षण या विषयात आरक्षण कशाला पाहिजे..?
पन्नास टक्के घेणारा मुलगा, आरक्षणाचा फायदा उठवत किमान काठावर पास होत.. डॉक्टर, इंजिनिअर नक्की होईल. पण तो मुलगा.. खरोखरच एक बुद्धीजीवी व्यक्ती होऊ शकेल का..?
( टीप :- मी स्वतः सुद्धा आरक्षणाचा फायदा घेणाऱ्या यादीत आहे. तरी सुद्धा मी त्याचा विरोध करत आहे. हे ध्यानात घेऊन प्रत्येकाने आपलं मत प्रदर्शित करावं. उगाच विरोध करायचा म्हणून विरोध करू नका. )

No comments:

Post a Comment