Monday, 27 August 2018



भटकंती करायला आवडत नाही, असा मनुष्य शोधून देखील सापडणार नाही.
पण, भटकंती करण्यासाठी.. एकतर आवड असावी लागते. आवड असली तरी सवड असावी लागते, सवड असली तर निवड असावी लागते, आणि निवड असेल तर.. खिशात मुबलक पैसा सुद्धा असायला पाहिजे. तेंव्हा कुठे हि सगळी गणितं जुळून येतात..
खरं तर.. या लेह लदाख ट्रीपला जाण्यासाठी माझ्याकडे पैसेच नव्हते. पण इच्छा झालीय म्हणाल्यावर काहीतरी जुगाड करावा लागतोच. म्हणून या ट्रीपसाठी मी चक्क कर्ज काढून गेलो.
आता काही व्यक्ती, माझ्या या विधानावर आश्चर्य व्यक्त करतील. कदाचित मनामध्ये म्हणतील सुद्धा, हा निव्वळ वेडेपणा आहे. कर्ज करून कोणी फिरायला जात असतं का.?
पण असा विचार करणाऱ्या व्यक्तींना मला एक प्रश्न विचारावासा वाटतो.
आपण, घर घेण्यासाठी कर्ज काढतो. मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज काढतो. इतकच काय, घरातील कोणी व्यक्ती आजारी पडलं, तर त्याच्या उपचारासाठी सुद्धा कर्ज काढतो. मग स्वतःचा जीव रमवण्यासाठी आपण कर्ज काढू शकत नाही का.?
जीवनाचा काय भरवसा आहे हो. आज आहे, तर उद्या नाही. कर्ज काय आजचं उद्या फिटून जाईल. पण वेळ निघून गेल्यावर, हात पाय चालायचे बंद झाल्यावर, हाती आलेला बक्कळ पैसा कोणत्या कामाचा असणार आहे.?
त्यावेळी इच्छा असून सुद्धा आपण फिरायला जाऊ शकत नाही. आणि सरतेशेवटी, आपण जमा केलेला सगळा पैसा चोरांच्या हवाली करावा लागतो. पोरं म्हणजे दुसरे चोरच हो. सगळेच सारखे नसले तरी, काही अंशी आपल्याला अशी उदाहरणं पाहायला मिळत असतातच. त्यामुळे, मी मागचा पुढचा कोणताही विचार न करता. कर्ज करून फिरायला गेलो. आणि मी जे काही पाहून आलो, त्याने नक्कीच ताजातवाना आणि, अतिरिक्त उर्जा सुद्धा सोबत घेऊन आलो.
कुलू-मानली, रोहतांग पास, जीस्पा व्हॅली, लेह-लडाख, खारदुंगला टॉप, नुब्रा व्हॅली, च्यांगला पास, पेंगोंग लेक, अमरनाथ आणि वैष्णोदेवी..
माझ्या प्रवासाचा एकंदरीत असा रूट होता. एकाच धडकेत मी उत्तरेतील बराच पट्टा पालता घालून येणार होतो. त्याभागात पुन्हा कधी जाणं होईल कि नाही ते माहित नव्हतं. त्यामुळे, ट्रीपला जाण्या अगोदर गरीब गरिबीत पंधरा हजाराचा नवा कोरा रेडमी मोबाईल खरेदी केला. त्यात चौसष्ट जीबीची स्पेस आणि चार जीबी रॅम असल्याने, मला मनसोक्त फोटो काढता येणार होते. आणि हव्या तेवढ्या चित्रफिती तयार करता येणार होत्या. साधारण पंधरा दिवस अगोदर माझ्या सगळ्या खरेद्या चालू होत्या. उबदार कपड्या पासून ते अगदी सुख्या मेव्याची सुद्धा तजवीज करून ठेवली होती. आवश्यक असणारी औषधं घेतली, ट्रीपला आमच्यासोबत एक नर्स सुद्धा होत्या, त्यामुळे त्यांनी सुद्धा बरीच औषधं सोबत घेतली होती. काळजी करण्याचं काहीएक कारण नव्हतं. त्या भागात फक्त बी.एस.एन.एल. ला रेंज असल्याने, ते सिमकार्ड सुद्धा घेऊन ठेवलं. कशाची म्हणून उणीव ठेवली नव्हती.
आणि शेवटी तो दिवस उजाडला.. यशवंतपूर एक्सप्रेसने पुण्याहून आम्ही चंडीगडच्या दिशेने रवाना झालो. लेह लडाखच्या ट्रीपला कोणी जावं.? याबाबतचे काही निकष ठरलेले आहेत. पण तरीसुद्धा, आमच्या चमूमध्ये, वय वर्ष सतरा ते सत्तर वर्षांचे एक ग्रहस्थ सुद्धा होते. रेल्वेच्या प्रवासातील पहिला दिवस अगदी आनंदात गेला.
दुसरा दिवस उजाडला, आता काय दिवसभर चरत बसण्यातच वेळ जाणार होता.
दुपारी तीन वाजता आम्ही दिल्ली स्थानक सोडलं. तेंव्हा आमची नुकतीच जेवणं उरकली होती. थोडी वामकुक्षी घ्यावी म्हणून मी स्लीपर कोचवर कलंडलो. झोपेत.. खिशात असणाऱ्या मोबाईलचा अडसर नको. म्हणून तो मोबाईल मी चार्जिंग पॉइंटच्या डेस्कवर ठेवला. माझा नुकताच डोळा लागायला लागला होता. आणि कोणीतरी जोरदार किंचाळल्याचा आवाज झाला. तसा मी दचकून जागा झालो. मला वाटलं, आमच्यापैकी कोणी गाडीतून खाली पडलं कि काय.? पण नाही.. तिथे एक वेगळाच प्रकार घडला होता.
दरवाजात उभं राहून खिडकीत हात घालून चालत्या गाडीतून एका चोराने अगदी चपळाईने माझा नवा कोरा मोबाईल लांबवला होता. त्या डेस्कवर एकूण चार मोबाईल होते, पण त्या चोराने अगदी हेरून माझा नवा कोरा मोबाईल चोरला होता.
हे सगळं काही अगदी एका क्षणात घडलं होतं. डोळ्याची पापणी लवती न लवती तोच, तो चोर मोबाईल घेऊन चालत्या रेल्वेतून उडी मारून पसार सुद्धा झाला होता. झालं.. मोबाईल चोरीला गेला, आणि इथेच माझ्या ट्रीपचं खोबरं झालं असं मला वाटून गेलं. घडला विषय मी लगेच सोडून दिला. कारण.. माझी बायको जिथे खिडकीपाशी बसली होती. तिथेच तिने तिची पर्स सुद्धा ठेवली होती. आणि त्यात रोख चाळीस हजार रुपये होते. चुकून त्या चोराने ती पर्स नेली असती तर..?
हातातलं नेलं होतं, नशिबातलं थोडीच घेऊन जाणार आहे. असा विचार केला, पण मोबाईल नसल्याने आता बराच मोठा खोळंबा होणार होता. फोटो आणि चित्रफितीचा विषय संपला होता. आणि तेवढ्याच रकमेचा नवीन मोबाईल खरेदी करण्यासाठी माझ्याकडे मुबलक पैसा सुद्धा नव्हता. त्यामुळे, जुन्या मोबाईलवर जमेल तितकं शुटींग आणि फोटो टिपूयात असा विचार केला. आणि, पुढील मार्गाला लागलो.
क्रमशः

Monday, 20 August 2018




आनंद सागर हे अतिशय सुंदर असं फिरण्याचं ठिकाण आहे. पण हल्ली येथील सर्व यंत्रणा कायद्याने बंद पाडण्यात आल्या आहेत. काही विघ्न संतोषी लोकांनी, हे महान कार्य याठिकाणी सुरळीतपणे पार पाडलं आहे. तेच हो.. आपल्या मराठी माणसाची खेकडा प्रवृत्ती.
तिथे असणारी रेल्वेगाडी किंवा इतर खेळणी बंद आहेत, फक्त ध्यान केंद्र चालू आहे. व एका कृत्रिम सरोवराच्या किनार्याने बगिचात फिरता येतं. एक धार्मिक ठिकाण, आणि सोबतच भटकंतीसाठी हे ठिकाण फारच सुंदर आणि कमी खर्चिक आहे.
या आनंद विहारात.. सर्व खेळ आणि रेल्वेगाडी बंद का आहे.? अशी विचारणा मी तेथील एका कर्मचाऱ्याला विचारलं. तर तो म्हणाला.. दुरुस्तीची कामं चालू आहेत.!
त्यावर.. बगीचा फिरून झाल्यावर, आम्ही ध्यान मंदिरात गेलो. तिथे काहीवेळ ध्यानधारणा केली. आणि अभिप्राय वहीत मी माझा अभिप्राय नोंदवला. कि नादुरुस्त खेळणी लवकरात लवकर सुरु करण्यात यावी. जेणेकरून पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागणार नाही.
त्यावर पुन्हा एकदा, अगदी जागेवरच माझ्या शंकेचं निरसन करण्यात आलं. कि सरकारच्या काही अटीमुळे सगळी खेळणी बंद करण्यात आली आहेत. आणि भविष्यात हि खेळणी सुरु होतीलच म्हणून सांगता येत नाही. त्यावर मी त्यांना सांगितलं, कि तुमच्या कर्मचारी लोकांना पर्यटकांना खरी माहिती सांगत चला असे आदेश द्या. त्यामुळे, विविध शंकांना मनामध्ये वाव उरणार नाही. या मानव निर्मित गार्डनमध्ये असणाऱ्या खारुताई खूपच मानसाळल्या आहेत. अगदी आपल्या जवळ येऊन बसतात. आपण देऊ ते खातात. मी तर अगदी त्यांच्या शेजारी बसून त्यांची चित्रफित बनवली आहे. सरोवरात विविध परदेशी पक्षी पाहायला मिळतात.
इथे असणाऱ्या भोजनालयात.. जेवणाची थाळी फक्त पस्तीस रुपयाला होती. खरं तर शेगाव देवस्थानाच्या अखत्यारीत सर्व ठिकाणी एकच जेवण जात असतं. अकोट रोडला, त्यांचा जेवण बनवण्यासाठीचा फार मोठा किचन आहे. देवस्थानात आणि गेस्ट हाऊसला सगळीकडे पन्नास रुपयात अमर्याद थाळी आहे. आणि तिथे जेवण वाढायला वाढपी ( सेवेकरी ) सुद्धा आहेत. फक्त याच ठिकाणी, जेवण घेतल्यावर वाढपी येत नाहीत. आपल्याला जाऊन जेवण घेऊन यावं लागतं. त्यामुळे जेवताना मधेच उठून गेल्यावर, जेवायची लिंक तुटते.
हे असं का केलं आहे..? ते बाकी मला समजलं नाही. जेवणाचे आहे तितके पन्नास रुपयेच घ्या. सेवेकरी ठेवा, बगिचात फिरून दमलेल्या लोकांना पोटभर जेऊद्यात. हि एवढी एकच त्रुटी वगळली, तर बाकी सगळं काही आलबेल आहे.
शेगांव संस्थान चे " Managment-Guru "
" अशाच मेनेजमेंट गुरूची प्रत्येक संस्थेत नितांत गरज आहे.! "
माणसामधला देवमाणूस, कर्मयोगी शिवशंकरजी पाटील शेगांव संस्थानचे प्रमुख आणि निःस्वार्थीपणे श्रध्दापूर्वक काम करणारे शिवशंकरभाऊ.
शिवशंकरभाऊ म्हणजेच माणसामधला देवमाणूस आहे. त्यांना भेटल्याशिवाय ते कळणार नाही. श्री गजानन महाराज संस्थानचा भव्यपणा तिथली टापटिप व्यवस्था आणि निष्ठेने काम करणार्याची तनमयता तिथे गेल्याशिवाय कळणार नाही. त्या मंदिरात सेवा करण्यासाठी हजारो प्रतिक्षा यादी आहे. भाऊंची ही कमाल आहे. तीन हजार सेवेकरी, त्या मंदिराच्या परिसरात तुम्हाला ते सगळे श्रध्देने काम करणारे आहेत. भाऊंनी हे परिवर्तन घडविले. संस्थानच्या कारभाराची सुत्रे भाऊंच्या हातात येण्यापुर्वी या संस्थानची वार्षिक उलाढाल पंचेचाळीस लाख रुपयांची होती. भाऊंनी ही उलाढाल आता १३७ कोटी रुपयापर्यंत आणली, त्यातूनच महाराष्ट्रातले सर्वात्कृष्ठ इंजिनिअरिंग कॉलेज तिथे उभे राहिले. त्यातूनच आनंदसागर सारखे जागतिक किर्तीचा नंदनवन ठरेल, असा भव्य बगिचा उभा राहिला.
शब्दामध्ये वर्णन न करता येण्यासारखा काही विषय सांगून समजत नाही. ते प्रत्यक्ष पाहावे लागतात ऐकण्याचा आनंद वेगळाच. शिवशंकरभाऊ कोणालाही मुलाखत देत नाही. प्रसिद्धी त्यांना नको आहे. शरद पवारांसारखे जेष्ठ नेते भाऊंना माणतात. मला असे वाटते की, शरद पवार एकाच व्यक्तीला वाकुन नमस्कार करतात, ते म्हणजे आमचे शिवशंकरभाऊ. अमेरिकेतल्या सिटी बॅंकेचे विक्रम पंडित, हे गजानन महाराजांचे निस्सीम भक्त ते नेहमीच शेगावी येतात. भाऊंचे काम पाहून ते असे थक्क झाले, की त्यांनी भाऊंना सांगितले. या सगळ्या प्रकल्पासाठी किती कोटी हवे तेवढे सांगा. विक्रम पंडितांनी त्यांच्या बॅंकेमार्फत किती कोटी द्यावेत ? तब्बल ७०० कोटी, कोण येवढे पैसे देईल.?
देणाऱ्याची दानत मोठी असेल, पण घेण्याराचा प्रामाणिकपणा आणि सचोटी माहीत असल्याशिवाय ऐवढी प्रचंड रक्कम कोणती बॅंक देऊ शकेल..? लिखापढी नाही, जामीन नाही , कोणती मालमत्ता बॅंकेकडे गहान नाही, आणि एक भक्त आपल्या बॅंकेचा ऐवढा प्रचंड पैसा भाऊंच्या विश्वासावर देतो. विक्रम पंडितांनी ७०० कोटी रुपये दिले. आमच्या विश्वस्त मंडळाने आराखडा तयार केला. की, किती पैसे लागतील याचा हिशोब केला. किती पैसे परत फेडू शकू ते गणीत बसवले. आणि अस ठरवलं, की ७०० कोटी आपल्याला नकोत फक्त ७० कोटी रुपये घ्यायचे. महाराजांचा असा संदेश असायचा की गरजे पुरते घ्या आणि जे घ्याल ते परत करा. आम्ही विचार केला गरज ऎवढीच आहे . आणि फक्त ७० कोटी घेतले त्यांची परतफेड केली. गजानन महाराज यांच्या प्रेमापोटी विक्रम पंडितांनी ही रक्कम दिली, त्याचा विनियोग कुठेही चुकीचा होणार नाही, याची काळजी घेतली आणि म्हणूनच त्यांचा विश्वास बसला.
भाऊ म्हणाले मी कोणालाही मुलाखत देत नाही पद्मश्री, पद्मभूषण काही घेत नाही, शरद पवार म्हणाले मी शिफारस करतो भाऊ म्हणाले अजिबात नको आणि शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे पण भाऊंना भेटायला आल्या होत्या. त्यांनी काम पाहिले आणि थक्क झाल्या आनंदसागर बघून आल्या, इंजिनिअरिंग कॉलेज पाहिलं , सगळे प्रकल्प पाहिले अत्यंत प्रसन्न होऊन म्हणाल्या, भाऊ तुम्हाला तर भारतरत्न दिले पाहिजे , भाऊ म्हणाले मला कशाला ज्यांना भारतरत्न मिळाली त्यातही काही मंडळी साबणाच्या जाहिराती करत आहेत. अहो काय भावनेने तुम्हाला ऐवढा मोठा सम्मान दिला, आणि तुम्ही काय करीत आहात..? मला कशाचीही हाव नाही, महाराजांनी सेवा करायला सांगीतली न बोलता सेवा करायची, मी संस्थानचे पाणी , चहा घेत नाही घरून पाणी घेऊन येतो. ही महाराजांची शिकवण आहे , आपण देण्यासाठी आहोत घेण्यासाठी नाही, त्यामुळे कसला लोभ नाही, आपण चेतन आहोत, कशाचा लोभ करायला हवा ? पैशाने माणसाची कधी किंमत होत नाही. आणि तशी वस्तूने पण होत नाही.
माणसाला नाचवणारी माया आहे, आणि मायेला नाचवणारी भक्ती आहे श्रध्दा आहेत, आम्ही माया स्वीकारत नाही, आम्ही श्रध्दा स्वीकारतो ते सुत्र आम्ही पाळले. विक्रम पंडितांनी जेंव्हा ७०० कोटी रुपये देऊ केले तेव्हा त्यांना हे सांगितले जेवढे लागतील तेवढे घेऊ ७० कोटी घेतले, त्यांनी पण जाहिरात केली नाही, आणि आम्हीही जाहिरात केली नाही हा भक्तीचा व्यवहार आहे. लोक मला सांगत आहे भाऊ, आनंदसागर पाहण्याची फी ३०० रुपये करा लोक आनंदाने देतील , मी सांगितले नाही, अशा पध्दतीने पैसा मिळवायचा नाही आणि मिळाला तरी टिकायचा नाही. आम्ही ती फी फक्त २५ रुपये ठेवली. आज १३७ कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल आहेत. त्यात १३ टक्के पैसे मानवसेवेवर खर्च करतो रुग्णालये आहेत , औषधे आहेत १० टक्के रक्कम बाजुला काढुन नवीन बांधकामासाठी ठेवतो.
भक्त निवास कशी बांधली आहेत बघा. बाबा आमटे कुठेच जाऊन राहत नव्हते, ते फक्त इथेच यायचे. देऊळातही जात नाही म्हणायचे, आपला उद्देश स्वच्छ असेल तर लोकांना तो समजतो. काम श्रध्देने करा, प्रामाणिकपणे करा, आमच्या शेगांव नगरपालिकेकडे पाणी योजनेला पैसे नव्हते. शेगांव शहरात कमालीची अडचण स्वच्छ पाणी मिळेना, पंधरा दिवसांनी एकदा पाणी मिळायचे, नगर परिषदेचे अधिकारी पाटणकर माझ्याकडे आले. म्हणाले, की पाणी योजना करायला केंद्र सरकार ४२ कोटी रुपये देत आहेत. पण, नगर परिषदेचा वाटा ७/८ कोटी रुपये द्यायलाही पालिकेकडे पैसा नाही. काय करायचे..? मी म्हटले, चिंता करू नका.
संस्थानच्या सर्व विश्वस्थांना सांगून, त्यांच्या मान्यतेने नगर परिषदेला हवे असलेले ७ कोटी ७७ लाख रुपये आम्ही देऊन टाकले. महाराजांच्या आदेशानेच हे केले, आज शेगांवला जे पाणी मिळत आहे, त्यामुळे लोकांच्या चेहऱ्यावर समाधान आहे. आया-बहिणीचे कष्ट वाचले आहेत. त्यांच्या समाधानात आम्ही आमचे समाधान मानतो, तुम्ही त्याला नाव द्या सामाजिक बांधीलकी आम्ही म्हणतो आमचे कर्तव्य.
लेखक अज्ञात..
गजाजन महाराज कि जय.. गण गण गणात बोते..!!

Friday, 17 August 2018





पुण्यावरून शेगावला दर्शनासाठी जायला जास्ती वेळ खर्ची पडत नाही. शनिवारी रात्री, साडेअकराच्या महाराष्ट्र एक्सप्रेसने शेगावला निघायचं. रविवारी सकाळी साडेदहा वाजता तुम्ही शेगावी पोहोचता. भक्त निवासात एखादी रूम घेऊन, अंघोळ उरकली. कि मंदिरात जाऊन तासाभरात दर्शन आटोपून जातं. आनंद सागराला अगदी धावती भेट देऊन आलात तरी जमून जातं. संध्याकाळी आठ वाजता, शेगाव वरून आझाद हिंद एक्सप्रेसने प्रवासाला सुरवात करायची. सकाळी सात वाजता तुम्ही पुण्यात पोहोचताय. अशी एकही सुट्टी खर्च न करता, रात्रभर प्रवासात झोप घेऊन, तुम्ही या ठिकाणी दोन रात्री आणि एक दिवसात जाऊन येऊ शकता.
सोमवारी सकाळी साडेदहा वाजता, आम्ही शेगावी पोहोचलो. शेगाव रेल्वेस्थानकावरून बाहेर पडल्या बरोबर, देवस्थानाच्या बसेस यात्रेकरूंना भक्त निवासापर्यंत नेण्यासाठी उभ्या होत्या. आणि हि सेवा चक्क विनामुल्य होती. तिरुपती बालाजीच्या धर्तीवर सर्व गोष्टी येथे केल्या गेल्या आहेत. तीच भव्यता, तीच स्वच्छता, आणि तेच देखणेपण.
मंदिराजवळ असणाऱ्या भक्त निवासात जागा उपलब्ध नसल्याने, तेथून तीनेक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आनंद विसावा नामक भक्त निवासात संस्थेच्या बस मधून आम्हाला तिथवर नेण्यात आलं. इथे आम्हाला एक रूम नऊशे रुपयाला मिळाली. आणि आम्ही सुद्धा ती मुद्दाम घेतली. शे दोनशे रुपयात आम्हाला रूम नक्कीच मिळाली असती. पण या ना त्या निमित्ताने, जादा रकमेची रूम घेऊन त्या देवस्थानाला आर्थिक मदत सुद्धा करता आली.
आनंद विसावा इथे असणाऱ्या रूम खूपच स्वच्छ नीटनेटक्या आणि सर्व सोयींनी परिपूर्ण होत्या. एका रुममध्ये सहा लोकं आरामशीर झोपू शकतील अशी त्याठिकाणी व्यवस्था करण्यात होती. अंघोळीला गरम पाण्याची सोय, आणि एक मोठा कुलर सुद्धा त्याठिकाणी उपलब्ध होता.
याठिकाणी, सर्व परिसरात फार मोठ्या प्रमाणात फुल झाडं लावण्यात आली आहेत. त्यामुळे, तिथे विविध रंगीबेरंगी फुलपाखरांचा सतत वावर असतो. सेवेकरी मंडळी, कचरा म्हणून रस्त्यावर झाडाचं एक पान दिसू देत नाहीत. इतकी कमालीची स्वच्छता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते.
आनंद विसावा, आनंद विहार आणि मंदिरा नजीक असणाऱ्या भक्तनिवासात एकूण सोळा ते सतराशे रूम्स उपलब्ध आहेत. याशिवाय.. जास्तीची गर्दी झाल्यास, मोठ्या हॉलमध्ये प्रती व्यक्तीला पन्नास रुपये याप्रमाणे एक बेड दिला जातो. हे देवस्थान, त्यांना जितपत सोय करता येतेय. तितपत करण्याचा प्रयास करत आहेत. धन्य आहेत येथील ट्रस्टी.
या देवस्थानात मिळणारं जेवण ( महाप्रसाद ) खूपच चविष्ट असा आहे. फक्त पन्नास रुपयात पोटभर आणि अमर्याद महाप्रसाद मिळतो. नाश्ता आणि चहा कॉफी सुद्धा उत्कृष्ट आहे. सात ते पंधरा रुपयापर्यंत उपलब्ध आहे.
इथे प्रत्येक ठिकाणी, जागोजागी.. अभिप्राय लिहिण्यासाठी वह्या ठेवल्या आहेत. आणि विशेष म्हणजे, अभिप्राय लिहिताना तेथील कर्मचारी आपला अभिप्राय वाचत असतात. आणि तो अभिप्राय सूचनात्मक वाटल्यास, लगेच आपल्या वरिष्ठांना त्याची माहिती कळवतात. आणि जागेवरच आपलं शंका समाधान करतात. मी आजवर कित्तेक ठिकाणी अभिप्राय लिहिले असतील, पण आजवर माझ्या अभिप्रायाची दखल घेणारं हे एकमेव संस्थान माझ्या पाहण्यात आलं.
मंदिराची वैशिष्टे खालीलप्रमाणे.
रेल्वेस्टेशन बाहेर रिक्षा तळ आहे. तिथे मंदिरात किंवा भक्त निवासात जाण्यासाठी एका व्यक्ती साठी दहा रुपये घेतले जातात. तसेच रिक्षा तळाजवळ उजव्या बाजूला संस्थेची मोफत बस सेवा, दर पंधरा ते तीस मिनिटांनी उपलब्ध आहे. प्रवाशांनी पूर्ण भरल्याशिवाय बस जागेवरून हालत नाही. याची यात्रेकरूंनी नोंद घ्यावी.
भक्त निवास या ठिकाणी पोहोचल्यावर भक्त निवास क्रमांक पाच या ठिकाणी जाऊन रूम बुक करून घ्याव्यात. याठिकाणी रूम उपलब्ध न झाल्यास, तेथून जवळच असणाऱ्या.. आनंद विहार किंवा आनंद विसावा भक्त निवासामध्ये रूम बुक कराव्या. याठिकाणी पाचशे ते नऊशे रुपयात मस्त रूम उपलब्ध आहेत.
गजाजन महाराज कि जय.. गण गण गणात बोते..!!

https://l.facebook.com/l.php?u=https%3A%2F%2Fyoutu.be%2F8MixeqSmmWY&h=AT1Mf3ObcBJgv9ciiZyh_9Kp9W3SEyBbyvOhKb-xbM4z64Tg7wGXdwy1BGoVqqpqOXVCRFLU3O-p8C09rOMFsI-147nAgp-MUetvZMB9Fcj3SPnirPNi32rSHB7pI9OpwzL6Vtk8t8daOqImh7kkycTOtOkXgpcrLmgG1ATQsztWQC-8y-kVtztjq9V2pnwuNDrJTAN01DOIBa6Oj9XJwd7xlCdKYw6igwG9WYxX43-S4OSE2EEclmjhKSFO_IRhuHjC77w2ct3T7OJUWgn0_u9Og_OX8K73GNb48XFmXWeREqK7mdp_3c6DdJXruWfrwakzNfz5lxbR5DTm2ElzrpxcMq5iC1z3V1BFxic

Thursday, 16 August 2018

परवाच मी शेगावला जाऊन आलो. तसं तर, विदर्भ आणि माझं फार जुनं नातं आहे.
पोटाची खळगी भरण्यासाठी, तब्बल सात वर्ष या भागात मी अविरत वाऱ्या केल्या आहेत. पण त्या सात वर्षाच्या काळात, श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी मी तिथे फक्त एकदाच गेलो होतो. त्याला सुद्धा आता, तब्बल एकवीस वर्षांचा कालावधी लोटला आहे.
त्याकाळी.. तिथे फक्त समाधी मंदिर होतं, म्हणावी अशी भव्यता नव्हती. थोडं अंधुकसं आठवतंय, कि.. मंदिराच्या बाजूलाच एका प्रसादालयात प्रसाद म्हणून, एक भलीमोठी चपाती आणि त्यावर भाजी दिली जायची. आणि हा प्रसाद फक्त एकदाच आणि विनामूल्य मिळायचा.
त्यानंतर.. परवा मला पुन्हा एकदा गजाजन महाराजांचं बोलावनं झालं. आणि खरोखर हे देवस्थान आणि त्याचा झालेला कायापालट पाहून मी अगदी मोहित होऊन गेलो.
गजानन महाराज संस्थानात.. फक्त तीन ते चार हजार कर्मचारी मानधनावर काम करत आहेत. अशी माहिती मला त्याठिकाणी मिळाली. आणि त्यांना मिळणारं मानधन सुद्धा अगदी अत्यल्प..म्हणजे, मासिक पाच ते नऊ हजार रुपयांच्या घरात आहेत. याव्यतिरिक्त त्या कर्मचाऱ्यांना राहायला घरं, मुलांचं शिक्षण आणि वैद्यकीय सुविधा मोफत देऊ केल्या आहेत. बस्स.. फक्त येवढ्या तुटपुंज्या मिळकतीवर ते भक्तगण तिथे सेवा करत आहेत. इथे सेवा देणाऱ्या कोणत्याच कर्मचाऱ्याला व्यसन नाहीये. चुकून एखादा व्यसनी सेवेकरी आढळलाच, तर त्याला सेवेतून पायउतार केला जातो. हि तेथील शिस्त आहे.
यावर आणखीन एक कोटी मला त्याठिकाणी पाहायला मिळाली. तो विषय म्हणजे..
" सेवेकरी " सेवेकरी हा असा विषय आहे. कि, इथे सेवा देणारे भक्तगण आपल्या सेवेचा काहीच मोबदला घेत नाहीत. सर्व सेवा अगदी विनामूल्य दिल्या आणि केल्या जातात. आणि जे विनामुल्य सेवा करत असतात, त्यांना काम करा म्हणून सांगावं लागत नाही. ते उत्स्फूर्तपणे आपली भूमिका बजावत असतात.
पेड वर्करच्या मागे लागून काम करून घ्यावं लागतं. पण इथे फक्त सेवा हा विषय असल्याने, सगळे भक्तगण आणि सेवेकरी आपली सेवा चोख बजावत असतात. थोड्या चौकशीअंती मला हे समजून आलं. कि त्या संस्थानाचे विश्वस्थ श्री. शिवशंकर पाटील नामक गृहस्थ आहेत. त्यांच्या सुपीक मेंदूतून हि सेवेकरी कल्पना उदयास आली.
आज त्याठिकाणी लाखो भाविक येत असतात, त्यांना सेवा पुरवण्यासाठी किमान दहा एक हजार कामगार तरी नक्कीच लागले असते.
मग देवस्थानात सेवक भरती करा, ते करताना वशिलेबाजी आली, घुसखोरी आली. या सगळ्या विषयांना फाटे देत. पाटील साहेबांनी खूपच कमालीची सेवा त्याठिकाणी घडवून आणली आहे.
" ज्याठिकाणी अर्थकारण आलं, त्याठिकाणी.. समाजकारण कदापी होऊ शकत नाही..!! "
काल माझी हि पोस्ट वाचून, बऱ्याच व्यक्तींच्या मनात एक शंका उत्पन्न झाली असेल. कि आज हे असं लिहिण्यामागे काही खास कारण असावं का.? तर काही व्यक्तींनी विनाकारण हि पोस्ट आपल्याला उद्देशून लिहिली आहे. असा सुद्धा समज करून घेतला असेल.
पण या विषयांतर्गत मला काहीतरी वेगळंच सांगायचं आणि मांडायचं होतं, ते हेच.
जो व्यक्ती खरं समाजकारण आणि समाजसेवा करत असतो, तिथे आर्थिक विषयाला बिलकुल थारा नसतो.
इथे सेवा देणारे सेवेकरी.. महिन्यातून फक्त पाच दिवस सेवा देत असतात. विदर्भात गावोगावी असे हजारो सेवाभावी गट स्थापन झाले आहेत. आणि ते सर्व गट, या देवस्थानात अगदी विनामुल्य सेवा देत आहेत. या सेवेमध्ये.. झाडूकाम, साफसफाई, बगिचांमध्ये देखभाल, वीजतंत्री, चर्मकारी, भोजनालयात वाढपी अशी कित्तेक कामं अगदी सेवाभावाने होत असतात. इथे सेवा देणारे सेवेकरी इतके विनम्र आहेत, कि.. सेवा देताना ते कोणाकडूनही बिदागी स्वीकारत नाहीत. फक्त त्यांच्या मुखात एक नाव असतं " माऊली " बस.. बाकी त्यांना दुसरं काहीच नको असतं. नाहीतर.. पुणे भागात, आता नवीनच " ग्रुप " उदयास येऊ लागले आहेत. आणि राजकीय वरदहस्तामुळे, गुन्हेगार वाढीस चालना मिळू लागली आहे. त्यामानाने.. ग्रामीण भागातील हा सेवेकरी उपक्रम नक्कीच अंगीकारावा असा आहे.
शिर्डीचे साईबाबा हे संस्थान फारच श्रीमंत असं देवस्थान मानलं जातं. त्याच्या खालोखाल, श्री स्वामी समर्थांचे सुद्धा बरेच भक्तगण आहेत. माझ्या माहितीप्रमाणे.. वरील दोन्ही देवस्थानांचं आर्थिक उत्पन्न जितकं असणार आहे. तितकं शेगावच्या देवस्थानाला आर्थिक उत्पन्न नसणार आहे. पण असं असताना सुद्धा, हे देवस्थान.. वरील दोन्ही देवस्थानच्या तुलनेने मला फारच उजवं वाटलं. कारण.. इथे असणारे ट्रस्टी हे अगदी धेय्य्वेडी लोकं असणार आहेत. त्यांच्या अंगी, काहीतरी नवीन करून दाखवण्याची भयंकर तळमळ असणार आहे. आणि हि तळमळ जेंव्हा आपल्या अंगी बाणली जाते. त्यावेळी असं काहीतरी भव्यदिव्य पाहायला मिळतं.
पैसाच सर्व काही नसतो, त्याकरिता आपल्या अंगी प्रामाणिक जिद्द असावी लागते. हे या ठिकाणी मला पुन्हा एकदा पाहायला मिळालं. आणि आवर्जून सांगावसं सुद्धा वाटलं.
श्री गजाजन महाराजांचं मंदिर खूप देखणं आहे. विशिष्ट कलाकुसरीच्या सहाय्याने खूपच सुंदर असं मंदिर उभारण्यात आलं आहे. मंदिरातील शिस्त अगदी वाखाणण्याजोगी आहे, कुठेही गोंधळ गडबड पाहायला मिळत नाहीत. कोणताही सेवेकरी मंदिरात भक्तांकडून दान दक्षिणा मागत नाही. कोणाशीही उद्धटपणाने बोलत नाहीत.
आम्ही गेलो त्यादिवशी.. मंदिरात म्हणावी अशी गर्दी नसल्याने. अगदी दहा मिनिटात आमचं दर्शन झालं. आणि ते दर्शन सुद्धा खूपच निवांत झालं. श्रींच्या समाधीसमोर आम्हाला बराच वेळ व्यतीत करता आला. बालाजी, शिर्डी, अक्कलकोट इथे नित्यनेमाने जाणाऱ्या भक्तगणांनी शेगावी सुद्धा आवर्जून जावं. आणि या देवास्थानाची भव्यता एकवार नक्की पाहून यावी.
गजाजन महाराज कि जय.. गण गण गणात बोते..!!

https://youtu.be/CeHjCnUbWao

Thursday, 2 August 2018

पुण्यावरून नेलेल्या नवीन सुमो गाड्या, दुपारी बारा वाजता नागपुरातील सदर येथील जयका मोटर्स मध्ये जमा केल्या. कि तिथेच अंघोळी उरकून, नागपूरच्या उखाड्याला रामराम करत आम्ही बर्डीला ( सीताबर्डी ) निघून जायचो. तिथे असणाऱ्या, सिंधी व्यक्तीच्या एखाद्या छोट्याशा हॉटेलमध्ये काहीतरी पोटपूजा करायची. आणि.. नागपूरहून पुण्याला येण्यासाठी, लग्झरी गाड्यांच्या ऑफिसपाशी घुटमळत राहायचो. नागपुरात सगळे सिझन अगदी कडक असतात. पाऊस मी म्हणून धोधो पडत असतो. थंडी सुद्धा खूपच बोचरी असते. आणि उन्हाळा तर अगदी तुम्ही विचारू नये, आणि मी सांगू नये. इतका जीवघेणा असतो.
वीस वर्षांपूर्वी.. नागपूर ते पुणे प्रायव्हेट लग्झरी बसने प्रवासासाठी वेगवेगळ्या प्रवासी कंपनीचे चारशे ते आठशे रुपये असे वेगवगळे दर ठरलेले असायचे. त्यावेळी आमचं अगदी हातावरील पोट, त्यामुळे.. लग्झरी मध्ये प्रोपर तिकीट बुकिंग करून आम्ही कधीच येत नसायचो.. .
एखाद्या बसची किती बुकिंग झाली आहे ते पाहायचो, त्यात सीट्स रिकाम्या असतील. तर त्या गाडीच्या ड्रायव्हरला सांगून आम्ही आमची सेटिंग करून घ्यायचो. सीट शिल्लक नसेल, तर ड्रायव्हर केबिन जिंदाबाद.
बर्डीवरून बस निघाली, कि तिचा पहिला थांबा रवीनगरला असायचा. मग आम्ही, तेथील ऑफिस पासून शे दोनशे मीटर लांब पुढे जाऊन थांबायचो. रवीनगर पासून बस निघाली, कि त्या भागात थोडासा चढ होता. चढावर गाडी आली कि आम्ही जिथे थांबलो असु, त्या भागात मोठ्याने हॉर्न वाजवत तो ड्रायव्हर गाडीचा वेग किंचित कमी करत गाडी अगदी हळुवार रस्त्याच्या कडेला घ्यायचा. थांबलेल्या बसमध्ये अगदी विजेच्या चपळाईने आम्ही शिरकाव करायचो. हि लगबग, आम्हाला अगदी दोन पाच सेकंदात उरकावी लागायची. ती ड्रायव्हर मंडळी सुद्धा आमच्याच जातकुळीतले असल्याने. आम्हाला, फक्त दोनशे रुपयात ते पुण्याला आणून सोडायचे. या वरकमाई मध्ये, त्यांचा सुद्धा वरखर्च भागून जायचा..!
दुपारी चार वाजता नागपुरातून निघालेली गाडी, साधारण सात वाजेपर्यंत अमरावती मध्ये पोहोचायची. त्यावेळी पुन्हा एकदा आम्ही गाडगेबाबा नगर बायपासला गाडीच्या खाली उतरून पुन्हा धावत पळत त्या लग्झरीच्या ऑफिसच्या पुढे जाऊन थांबायचो. कारण त्या ऑफिसचे लोक बसमध्ये येऊन सगळी बुकिंग चेक करायचे. आणि सगळं काही आलबेल असलं, कि ती गाडी तेथून पुढे रवाना व्हायची. या सगळ्या धामधुमीत अर्धा पाऊन निघून जायचा. आणि साधारण आठ वाजता, अमरावती सिटी पास केल्यावर हॉटेल मोहिनी मध्ये ती गाडी जेवणासाठी थांबायची.
हायवेवर असणाऱ्या हॉटेलमध्ये नेहेमी थांबणाऱ्या गाड्यांच्या ड्रायव्हर आणि क्लीनर लोकांना अगदी हवं ते जेवण मोफत दिलं जायचं. अशा वेळी, ती ड्रायव्हर मंडळी आम्हाला सुद्धा त्यांच्याबरोबर जेवायला न्यायची. त्यामुळे आमचा जेवणाचा खर्च वाचायचा. कधी कधी ती ड्रायव्हर लोकं प्रेमाखातर आम्हाला म्हणायचे.
" दारू, गिरु पियेंगा क्या बावा. "
त्यावेळी.. एकतर आम्ही याचक असायचो. आम्ही कितीही नाही म्हणलं तरी, आमचा चेहरा पाहून त्यांना समजायचं. हा गडी दारू पिण्यास इच्छुक आहे.
आता.. हॉटेलमध्ये सगळे प्रवासी बाहेर जेवायला बसलेले असायचे. आणि चुकून कोणाची नजर गेली, कि ड्रायव्हरच्या केबिनमध्ये दारू नेली जात आहे. तर फार मोठी गोची होऊन बसेल. म्हणून हि लोकं त्या वेटरला अगोदरच सांगून ठेवायचे. कोणालाही नकळतपणे माल घेऊन ये.
एकदा असाच आखाड महिना चालू होता, आणि आम्ही तीन मित्र ड्रायव्हर सेटिंग मध्ये लग्झरी बसमधून नागपूर-पुणे असा प्रवास करत होतो. अमरावती मध्ये जेवणासाठी हॉटेलमध्ये गाडी थांबली. आता या ड्रायव्हर मंडळींना गाडी चालवायची आहे, म्हणजे त्यांना काही दारू पिऊन जमणार नाही. पण काही लोकांना एक आवड असते बघा. दुसऱ्याला पिताना पाहून, ते स्वतः समाधानी होत असतात. त्यावेळी सुद्धा नेमका असाच प्रकार घडला. त्या ड्रायव्हर मित्राने, आखाड पार्टी म्हणून, खास आमच्यासाठी तीन बियर मागवल्या. तसा त्यांनी वेटरला आदेश सोडला.
तीन बियर.. एक खाली जग में डालके ला, किसीको पता नही चलना चाहिये..!
तो वेटर सुद्धा ते सांगतील तसच ऐकायचा. कारण, नाही ऐकलं तर हि लोकं उद्यापासून जेवणाचं ठिकाण बदलतील. कारण एका वेळेला चाळीस पन्नास लोकांचं जेवण व्हायचं. आणि पर्यायाने त्या हॉटेल व्यावसायिकाचा धंदा सुद्धा खूप जोरात व्हायचा. त्यामुळे सगळ्या गोष्टी अगदी सहजशक्य व्हायच्या. मग आम्ही ड्रायव्हर मित्र मिळून दोन-दोन ग्लास बियर मारायचो.
ती नागपुरातील ड्रायव्हर मंडळी, खास आमच्या करिता एवढी उठाठेव करायची. त्यादिवशी त्यांनी खास आमच्यासाठी चिकन हंड्या आणि मोहिनीची स्पेशल बिर्याणी मागवली होती..
त्यावेळी माझी फारच गरिबी होती. अगदी हातावरचं पोट म्हणा ना. पण माझी तोंडाची श्रीमंती फार मोठी होती. माझ्या तोंडाच्या श्रीमंतीने, मी लगेच कोणालाही आपलंसं करून घ्यायचो.
नंतर जेवणं करून आम्ही पुढील प्रवासाला लागायचो. त्याकाळी, पैसे कमवण्यासाठी स्ट्रगल करत असताना. लग्झरी बसमधील बराचसा प्रवास मी बसच्या केबिनमध्ये बसून केला आहे. फारच झालं तर, दोन्ही सीटच्या मध्ये असणाऱ्या चालत जायच्या जागेत झोपून आराम करत पुण्याला आलो आहे. तोच काय माझ्यासाठी एक नंबर बेड असायचा.
पण.. त्या सात वर्षाच्या काळात, त्या विविध ट्रेव्हल कंपनीच्या ड्रायव्हर मित्रांकडून प्रवासादरम्यान कधीही अपघात घडला नाही. आणि आमच्याकडून सुद्धा, कोणत्याही प्रवाशाला काही त्रास होईल अशी वागणूक घडली नाही.

Tuesday, 31 July 2018

मृत्यू हे अंतिम सत्य आहे..
तरी सुद्धा, आपण सगळे जन मृत्यूला विनाकारण घाबरत असतो. आणि, घाबरत राहणार आहोत. ते सुद्धा, अगदी जिवंत असेपर्यंत...!
तसा तर, मी सुद्धा फार भित्रा माणूस आहे. पण, जे आहे ते अगदी खरं आहे. उसनं आवसान आणून, काहीही फायदा नसतो...
तर.. परवा, माझ्या मित्राच्या वडिलांना देवाज्ञा झाली.
आम्ही सगळे मित्र, त्या दुक्खात सहभागी होतो. आणि, आम्ही जे अत्यंत जवळचे मित्र होतो. ते सगळे मित्र आम्ही रातोरात त्या इस्पितळात दाखल झालो. जाणकार मित्रांनी, इस्पितळातील सगळे सोपस्कार पार पाडले. नाजूक आणि सुंदर दिसणाऱ्या सावळ्या रंगाच्या केरळी मुली मनात कोणतीही भीती न बाळगता. रात्री बारा वाजता, त्या मृतदेहाला अगदी हसून खेळून अलविदा करत होत्या. खरोखर, त्या मुलींचं काळीज खलास झालं असेल का..? त्या मुलींचा स्वच्छंदी आणि मनमोकळा स्वभाव पाहून. काहीवेळ, माझ्या मनात हि नको ती शंका सुद्धा उत्पन्न झाली. पण काय आहे, काम हे शेवटी कर्म असतं. त्यासाठी, सेवकाने सदैव तत्पर असणं हे त्याचं कामच असतं. आणि त्या सगळ्या तरुणी या कसोटीत अगदी खऱ्या उतरल्या होत्या.
रातोरात.. आम्ही आमच्या काकांचा मृतदेह आमच्या घराजवळील इस्पितळातील शीतगृहात घेऊन गेलो. जेणेकरून सकाळी लोकांचा खोळंबा होऊ नये. आणि पुढील सगळे सोपस्कार सुरळीत पार पाडावेत. हा त्या मागचा मुख्य हेतू होता.
शववाहिका शवागारापाशी दाखल झाली. काही मित्रांनी काकांचा निश्चल पडलेला मृतदेह स्ट्रेचर सहित उचलून शावाघरात नेला. त्यांच्या मागोमाग मी सुद्धा तिथे गेलो. भयाण शांतता असणाऱ्या त्या शवागरात, अंगाचा बर्फ होऊन जावा इतकी भयानक थंडी वाजत होती. एक छोटासा झिरो बल्ब तिथे उजेड देण्याचं काम करत होता. परंतु त्या मिणमिणत्या प्रकाशात उजडे कमी आणि भीतीच जास्ती वाटत होती.
दहा बाय बारा लांबी रुंदी असलेल्या त्या शवागारात भिंतीच्या आतील बाजूस लागून तिन्ही बाजूंनी तीन मजली लोखंडी रेक बसवली होती. आणि त्या प्रत्येक रेकवर पांढऱ्या कपड्यात लपेटलेले निर्विकार मृतदेह ठेवले गेले होते.
मी थोडी नजर चुकवत आजूबाजूला पाहत होतो, शक्यतो माझ्या नजरेला काही दिसूच नये या प्रयत्नात होतो. पण शेवटी चुकून माझी नजर एका ठिकाणी गेली. बहुतेक ते पंधरा एक वर्षाच्या मुलाचं शव असावं. पण जास्ती खोलात न शिरता, कान्हाडोळा करत मी काकांचा मृतदेह त्या लोखंडी रेक्वर ठेवून ताबडतोब बाहेर निघून आलो.
माझ्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. जन्म आणि मृत्युच्या भयाण कचाट्यात आपण कसे सापडले आहोत. क्षणभर का होईना याची जाणीव माझ्या मनाला फार मोठा चटका देऊन गेली. रात्रीचे दोन वाजले होते, उद्या सकाळी अंत्यविधीच्या तयारीला लागायचं होतं. त्यामुळे आम्ही सर्वांनी आपापल्या वाहनांना स्टार्टर मारले, आणि थंडी गारठ्यात आपापलं घर गाठलं. घरी गेल्यावर हातपाय धुवून मी अंथरूणावर अंग टाकलं, डोळे मिटण्याचा प्रयत्न केला. त्यासरशी त्या लहान मृत मुलाचा डोळे बंद असलेला पांढऱ्या कपड्यातून डोकावणारा चेहरा माझ्या नजरेसमोर तरळू लागला. मनातील नको असणारे अविचार डोळ्यासमोर रुंजी घालत होते. शेवटी एकदाची कशीतरी मला झोप लागली. आणि पुन्हा सकाळी सात वाजता माझा डोळा उघडला. त्यावेळी अगदी प्रकर्षाने एक गोष्ट मला जाणवली..
झोप म्हणजे, एकप्रकारचा क्षणिक मृत्यूच आहे. त्यामुळे रात्री झोपून सकाळी सहीसलामत उठल्यावर, आपण सर्वांनी त्या परमेश्वराचे आभार मानायला हवेत.
पुन्हा एकदा सगळी आवराआवर करून, आम्ही सगळे मित्र इस्पितळात दाखल झालो. शवागाराच्या बाहेर, मृत व्यक्तींचे आप्तेष्ट धाय मोकलून रडत होते. ज्याचा जसा नंबर येईल तसे मृतदेह नेले जात होते. तितक्यात माझ्यासमोर त्या लहान मुलाचा मृतदेह बाहेर आणला गेला. छे-छे मुलगा नव्हता तो. दिवसा उजेडी पाहिल्यावर समजलं, ती एक अठरा एकोणीस वर्षांची कोवळी नवविवाहिता होती. शेलाट्या बांध्याची नाकीडोळी नीटशी अशी ती मुलगी पहिल्या बाळंतपणात प्रसव वेदना सहन न झाल्याने तिला मृत्यूला सामोरं जावं लागलं होतं..
तिथे आजूबाजूला काही लोकांची कुजबुज चालू होती..
मुलीला कसलाच त्रास नव्हता हो.. बिपी नॉर्मल, शुगर नॉर्मल तरी सुद्धा मुलगी गेली. काय तर म्हणे.. बाळाने पोटात शी केल्याने असं झालं. तर कोणी म्हणत होतं.. डॉक्टर लोकांचा हलगर्जीपणा नडला. शिकाऊ डॉक्टर लोकांच्या चुकीमुळे मुलगी गेली. मी हे सगळं उघड्या कानाने फक्त ऐकत होतो.
त्या मुलीचा नवरा, एका कोपऱ्यात उभा राहून आसवं गाळत होता. तिच्या आईच्या दुखाला तर पारावारच उरला नव्हता. त्या माऊलीचा हंबरडा आसमान चिरून जात होता. आणि सोबतच तिथे असणाऱ्या जमावाच काळीज पिळवटून टाकत होता. सगळं काही संपलं होतं. आता वाच्यता करण्यात काहीच अर्थ नव्हता.
एक देह कायमचा शांत झाला होता. आणि दुसरा, जन्म घेण्या अगोदरच पुढील योनीत प्रवेशित झाला होता. आणि आम्हाला सुद्धा, आता.. एका निश्चल देहाला मूठमाती देण्यासाठी जावं लागणार होतं..!
माझ्या एका मित्राने.. सेव्हिंग म्हणून, बऱ्याच विमा पॉलिसी काढून ठेवल्या होत्या.
त्याच्याकडे.. अक्षरशः करोड रुपयांच्या वरच्या विमा पॉलिसीसी तयार झाल्या होत्या. हा बर्यापैकी मोठा व्यावसायिक असल्याने, त्याचा हफ्ते भरणा नियमित होत होता. त्यामुळे, विमा एजंटला त्यापासून कसलाच त्रास होत नव्हता. त्याने काढलेल्या पॉलिसीस मध्ये, काही पॉलिसी मेडिक्लेमच्या सुद्धा होत्या.
ज्यामध्ये, अशी सुविधा होती, कि दरवर्षी.. तुम्ही तुमच्या शरीराच्या सगळ्या चाचण्या कोणत्याही इस्पितळात मोफत करून घेऊ शकता.
पण माझ्या मित्राला, कोणतीच रोगराई नव्हती. तो अगदी धडधाकट असल्याने, तो या गोष्टींचा बिलकुल फायदा घेत नव्हता.
एकदा.. त्यांचा विमा पॉलिसी एजंट माझ्या मित्राशी गप्पा मारत बसला होता. त्यात, मी तिसरा गेलो. आमच्या चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या. आणि माझा मित्र, त्याच्या खुर्चीवरून उठला. अंगाला आळोखे पिळोखे देऊ लागला. आणि म्हणाला, आयला बरेच दिवस झाले माझं अंग खूपच दुखतंय. काय होतंय काही समजतच नाही.
आपुलकीच्या भावनेने, तो विमा एजंट त्याला म्हणाला. अहो तुम्हाला तुमच्या पॉलिसीच्या माध्यमातून बरेच फायदे घेता येऊ शकतात. तुम्ही एकवेळ, तुमच्या संपूर्ण शरीराची तपासणी का करून घेत नाही..?
आणि हो.. सगळ्या तपासण्या तुम्हाला पूर्णपणे मोफत करून मिळणार आहे. ते कसं आणि काय ते मी करून देतो. त्याची तुम्ही काळजी करू नका...
नाही म्हणता-म्हणता, शेवटी कसाबसा माझा मित्र त्यासाठी तयार झाला.
त्याने, त्याच्या संपूर्ण शरीराची तपासणी करून घेतली.
आणि, नको तेच घडलं..
त्या तपासणीमध्ये, मित्राला हिप्याटायटीस बी ( पांढरी कावीळ ) आहे असं निदान झालं.
संपलं... त्या मित्राने, त्या रोगाची इतकी धास्ती घेतली कि बस...
कारण, हा रोग सहजासहजी बरा होत नाही. हे, त्याला सुद्धा समजलं होतं.
त्या मित्राने, खूप प्रयत्न केले. नको त्या ठिकाणी गेला. लाखो रुपये खर्च केले. पण काहीच उपयोग झाला नाही.
मला त्याचे हाल पाहवत नव्हते. पण, धीर देण्याचं 'अमुल्य' कार्य मी करतच होतो.
साधारण, वर्ष भरानंतरची गोष्ट....
एके दिवशी, आम्ही दोघे अशाच गप्पा मारत बसलो होतो.
तो, मला म्हणाला...
त्यादिवशी, मी त्या विमा एजंटचं ऐकलं नसतं. तर, खूप बरं झालं असतं.
अजून, दोनचार वर्ष तरी आरामशीर जगलो असतो राव.
तो मित्र खूप दुःखी झाला होता....
मी, त्याला काहीच उत्तर देऊ शकलो नाही.
घरात साप आल्यावर, त्याला दोरी आहे म्हणून डोळेझाक करण्यात काहीच अर्थ नसतो.
जे विधिलिखित आहे ते होणारच.
त्यात, त्या विमा एजंटचा काही एक दोष नव्हता.
आणि, साधारण महिन्या भरातच माझ्या त्या मित्राचा करून अंत झाला...
त्यामुळे कधी कधी वाटतं, अज्ञानातच फार मोठं शहाणपण असतं..!