Wednesday, 10 May 2017

" भाजी आणि भाकरी..! "
स्वयपाक करायला येत नाही, अशी महिला शोधून सुद्धा सापडणार नाही. ( काही अपवाद वगळता )
भाजी कोणालाही सहजासहजी बनवता येऊ शकते. परंतु, भाकरी बनवणं खरोखर फारच दिव्य काम आहे. आणि त्यातल्या त्यात त्या भाकरी चुलीवर बनवणे म्हणजे फारच कठीण काम. काही महिला तर या भाकरी चक्क हातावर सुद्धा थापत असतात. ते त्यांचं कसबच म्हणावं लागेल.
परवा माझ्या गावी.. माझ्या नातवाचा जावळाचा कार्यक्रम होता.
कराड भागात, या देवकार्यांसाठी जावळ बकरं आणि पाट, कोंबडं द्यावं लागतं. एकंदरीत, हा तिखट नैवेद्याचा कार्यक्रम असतो.
पूर्वी.. घरातील सगळ्या महिला मिळून हा कार्यक्रम मार्गी लावायच्या.
पण हल्ली, ग्रामीण भागात सुद्धा आचारी लोकं हि कामं करू लागल्याने. घरातील महिलांना थोडा आराम मिळू लागला आहे. या कार्यक्रमात जेवणासाठी अंदाजे दीड दोनशे व्यक्ती तरी हमखास येत असतात. मग इतक्या लोकांसाठी भल्या थोरल्या भाकरी कोण थापणार..? हा फार मोठा प्रश्न असतो.
कराड पासून अवघ्या अकरा किमी अंतरावर डोंगराच्या कुशीत दडलेलं निळेश्वर वडोली नामक आमचं एक छोटसं गाव आहे. तर, त्या गावात आमचा हा जावळ बकऱ्याचा कार्यक्रम होता. आणि त्या कार्यक्रमात, भाकरी थापण्यासाठी आमच्या गावाच्या शेजारी नव्याने निर्माण झालेल्या " सुंदर नगर " नामक लोकवस्ती मध्ये राहणाऱ्या कर्नाटक भागातील दोन महिला तिथे या कामासाठी आल्या होत्या. सहा विटांच्या चुलीवर लोखंडी तवा ठेऊन परातीमध्ये ज्वारीचं पीठ मळून त्याच्या पातळशा भाकरी बनवण्याचं कसब मला त्यांच्याकडून पाहायला मिळालं.
या महिलांनी आम्हाला सुरवातीलाच सांगितलं होतं.. आम्हाला गॅस शेगडीवर भाकरी बनवता येत नाही. आम्हाला फक्त चुलीवरच भाकरी बनवता येतात..!
खरं तर गॅस शेगडीवर हे काम अधिक सोपं झालं असतं. पण चुलीवर बनवलेल्या भाकरीची चव काही लाजवाबच असते. हे त्यापाठीमागील मुख्य कारण आहे. आणि या चुलीवरील कामात त्या महिलांना चांगला उरक सुद्धा आहे.
सहा विटांची चूल पेटवल्यावर, त्या चुलीवर तवा ठेऊन दुसरीकडे परतीमध्ये त्या पिट मळायला घ्यायच्या. एका वेळेला, किमान आठ दहा भाकरी बनतील इतकं पिठ त्या मळून ठेवत होत्या. ज्वारीचं पिठ मळायला सुद्धा कमालीची ताकत लागते बरं का. त्यानंतर, मळलेल्या पिठाचा ठराविक आकाराचा उंडा घेऊन कडप्प्याच्या काळ्या फरशीच्या तुकड्यावर त्या महिला भाकरी थापायला घेत होत्या. विशिष्ट प्रकारचा लयबद्ध हालचाल आणि आवाज करत त्या इतक्या सुरेख आणि पापडा सारख्या पातळ भाकरी थापायच्या. कि पाहणाऱ्याने फक्त पहातच राहावं. ईतकी अजब कला त्या महिलांच्या हातामध्ये होती. भाकरी थापून झाली, कि त्या भाकरीला तव्यावर टाकून त्यावर पाण्याचा हात फिरवून तिला शेकण्यासाठी सोडून लगेच दुसरी भाकरी थापायला घेत होत्या. तोवर त्या चुलीतील लाकडं कमी जास्ती करून विस्तव त्यांना हवा तसा काम जास्ती करत होत्या. आणि बघता बघता, ती पातळशी भाकरी टम्मकण फुगून टमाटम गोल व्हायची.
त्या महिलांच्या कामाचा उरक इतका भयंकर होता. कि अवघ्या तीन चार तासामध्ये, त्या दोघींनी मिळून पाच पायलीच्या भाकरी थापल्या होत्या. ते सुद्धा एकही ब्रेक न घेता. आणि, त्या कामाचा त्यांचा मोबदला सुद्धा अगदी अल्प होता. त्या पाच पायलीच्या भाकरी थापण्यासाठी, त्या दोघींनी फक्त सातशे रुपये घेतले होते. पण त्या भाकरी चवीला अगदी सात हजार रुपये किमतीच्या होत्या. आणि अगदी गोड सुद्धा होत्या.
परमेश्वराने प्रत्येकाला काहीनाकाही कला देऊन ठेवली आहे. भले त्या महिला जास्ती शिकल्या नसतील. पण त्यामुळे त्यांचं काहीएक नडत नाहीये. परमेश्वराने त्यांना सुगरण हे नामांकित कला बहाल केली आहे. कमावती नको, पण असं साजूक आणि शेलकं खाऊ घालणारी धर्मपत्नी सर्वांना मिळो. शेवटी काय आहे.. " खाशील तर होशील, आणि होशील तर जगशील. "
( टीप :- मी टिपलेल्या, त्या महिलांच्या कलाकारीचा हा व्हिडियो पाहायला विसरू नका बरं का. )


माझी आजची ( गेल्या रविवारची ) जेवणाची थाळी खूपच रंगारंग होती.
एका ताटात मावणार नाही इतक्या पदार्थांची इथे रेलचेल आहे.
एका वाटीमध्ये अळणी मटणाचा खुमासदार रस्सा, तर दुसऱ्या वाडग्यात झणझणीत तांबडा रस्सा, आणि त्यात डोकावत असणारे मटणाचे लज्जतदार तुकडे. तर तीसऱ्या वाटीत, तर्रीबाज लालभडक मटन मसाला. जेवताना तोंडी लावण्यासाठी उकडलेल्या अंड्याचे दोन भकले.
आणि.. एका भल्या मोठ्या वाडग्यात अस्सल बासमती तांदळापासून बनवलेली सोनेरी रंगाची सुगंधी मटन बिर्याणी. इतक्या सगळ्या पदार्थांनी ताटाची सगळी जागा व्यापली असल्याने, भाकरी आणि कांदा लिंबूसाठी एक स्वतंत्र वेगळी डिश द्यावी लागत असते.
" हॉटेल जगदंब " जुन्या पुणे मुंबई महामार्गावर असणाऱ्या मांसाहारी हॉटेल ( निगडी उड्डाणपूलाच्या अलीकडे ) मधील हि लाजवाब थाळी आहे.
येथील जेवण अगदी उत्कृष्ट आणि स्वादिष्ट होतं, पण बैठक व्यवस्थेत असणारी त्रुटी.
म्हणजे.. एसी, पंखा, किंवा कुलरच्या अभावामुळे जेवताना अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या.
याठिकाणी स्वतंत्र फेमिली रूम सुद्धा आहे. जेवणात मटणाची मात्रा खूप मोठ्या प्रमाणात असते. मटन वाढताना हॉटेल मालकाकडून बिलकुल हयगय केली जात नाही. आणि हि भरगच्च स्पेशल मटन थाळी फक्त तीनशे रुपयांना आहे.
एका थाळीत एक माणूस पक्का भरपेट होऊन जातो. त्यामुळे अतिरिक्त असं काही मागवावं लागत नाही. आज जेवताना पहिल्यांदाच असं घडलं, कि माझ्या थाळीतील मटणाचे दोन पीस मला उष्टे सोडून द्यावे लागले. खूप मस्त जेवण असतं, एकदा झटका मारून याच.


प्रतिमा हि माणसा पेक्षा खोटी आणि मोठी नसावी.




काल दुपारी एक गम्मतच झाली..!
एकतर उन्हाचा भयंकर तडाखा, आणि त्यात माझ्या कामावरील गाडीतून इलेक्ट्रिक खांबावर लावलेले जुने फ्लेक्स काढायचं आमचं काम चालू होतं. दुपारचे बारा वाजत आले होते.
पुण्यातील मध्यवर्ती भागात, एका दर्ग्या शेजारील खांबावरील फ्लेक्स काढण्यासाठी माझी गाडी त्याठिकाणी रस्त्यावर उभी होती. आमचे कर्मचारी त्यांचं काम करत होते.
तितक्यात, त्या दर्ग्याच्या बाहेर हार फुलं विकणारा एक मुसलमान व्यक्ती माझ्या गाडीपाशी आला. आणि माझ्या गाडीला त्याची गाडी आडवी घालत, तो गाडीत बसलेल्या आमाच्या साहेबांना म्हणाला,
साहेब.. हे सगळं मी फक्त माझ्या पोटासाठी करतोय हो, माझ्याकडे या पथारीचं लायसन सुद्धा आहे. कृपा करून तुम्ही माझी पथारी उचलू नका. तुम्हाला हात जोडून विंनती आहे माझी.
खरं पाहायला गेलं तर, त्याठिकाणी आम्ही त्या अतिक्रमणच्या कामासाठी आलोच नव्हतो.
पण कसं आहे, घाबरणाऱ्या व्यक्तीला फक्त घाबरण्याचा बहाणा हवा असतो. आणि तो आहे सुद्धा बरं का. शेवटी, माझ्या गाडीवर कोणताही लाल, पिवळा दिवा नसताना सुद्धा. माझ्या गाडीची पुणे शहरात फार मोठी दहशत आहे. काय आहे, शेवटी ते आमचं काम आहे
आणि तितक्यात.. सगळा राग एकवटून तो बिचारा स्वतःच बोलायला सुरु झाला.
म्हणाला.. साहेब, मी सुद्धा पूर्वी पोलीस खात्यात कामाला होतो. पण एकदा,
एक आरोपी मी कोर्टात घेऊन जात असताना. दुपारच्या नमाजीची आजान झाली. आणि माझ्यासोबत असणारा तो आरोपी मला म्हणाला,
साहेब तुम्ही सुद्धा मुस्लीम आहात मी सुद्धा मुस्लीम आहे. माझी एक इच्छा मी तुमच्याकडे व्यक्त करतो. उद्या पुन्हा मला जेलमध्ये जावं लागनार आहे.
तर.. आजच्याला तुम्ही मला मस्जिद मध्ये जाऊन नमाज अदा करू देताल का..!
मी सुद्धा.. अगदी मोठ्या मनाने त्याच्या हातातल्या बेड्या काढल्या. आणि त्याला नमाज अदा करण्यासाठी मस्जिदमध्ये सोडला.
आणि, त्या गुन्हेगाराने नमाजचा बहाणा करून तेथून पलायन केलं. आणि, त्या गुन्ह्यात मला नोकरीतून कायमचं निलंबित करण्यात आलं. आणि त्यामुळे, आज मी चक्क रस्त्यावर आलो आहे.
" एके काळचा मी पोलीस व्यक्ती, आज दर्ग्याच्या बाहेर मी हि हार फुलं विकत आहे..! "
वीस वर्ष झाली हो.. तो आयघाला गुन्हेगार आजवर काही सापडला नाही. पण माझ्या नोकरीला बाकी तो पक्का चुना लाऊन गेला.
आमच्या साहेबांना हे सगळं सांगता-सांगता, तो व्यक्ती त्या गुन्हेगाराला खूप शिव्या शाप देत होता. जो कि, हा सुद्धा त्याचाच भाऊबंद होता.
आणि अचानक.. त्या व्यक्तीचं माझ्याकडे लक्ष गेलं. आणि, माझ्या हनुवटी वरील " मुसलमानी " दाढी पाहून, तो सुद्धा फसला. आणि, मला म्हणाला..
शेख साहब, मैने घुस्सेमे बहोत कुछ बोल दिया, इसलिये आपको बी बहोत घुस्सा आया रहेंगा..! लेकीन, मै भी क्या करू. वोह हरामखोर के वजहसे मेरी नोकरी गयी ना. हो सके तो मुझे माफ कर दो..!
शेवटी.. त्याची मनधरणी करण्यासाठी मी सुद्धा त्या व्यक्तीला म्हणालो..
जानेदो भाई, जो नसीब मे लिखा होता है. वोह कभी टलता नही. अल्लाह ताला सबकुछ देख रहा है..!
शेवटी.. त्याची समजूत घालण्यासाठी, थोडावेळ का होईना मी सुद्धा त्याच्या होकारात माझा होकार मिसळला. आणि, सरते शेवटी गालातल्या गालात हसत माझे साहेब सुद्धा मला म्हणाले..
" चला शेख साहेब, आपली गाडी पुढे घ्या आता..! "


लाल दिव्यावरून,
जरा काळ्या काचांचा जुना विषय मला आठवला.
एकदा.. माझ्या मित्राच्या कारमधून मी मुंबईहून पुण्याला येत होतो.
मित्राच्या कारच्या सगळ्या काचा काळ्या फिल्मने झाकून घेतलेल्या होत्या. वाशीच्या थोडंसं अलीकडे, रस्त्यावर पोलिसांचं एक चेकिंग स्कोड तिथे उभं होतं. आम्ही सुद्धा त्या लाईनीत आमची गाडी घेतली.
आणि, त्या पोलीसापाशी आमची कार आल्यावर..
त्या पोलीसाने.. माझ्या मित्राला दोन्ही हात जोडून नमस्कार केला. कारण, आमच्या कारच्या आतील बाजूस " मनसे " झेंडा लावलेला होता.
आणि तो पोलीस माझ्या मित्राला म्हणाला..
नमस्कार साहेब, तुम्ही आता एक काम करा. कृपा करून कोणाचीही ओळख सांगू नका. तुमच्या गाडीच्या सगळ्या काचा काळ्या आहेत. दंड म्हणून तुम्ही त्याची रीतसर पावती करा, आणि निघून जावा. मी तुमच्याशी बिलकुल भांडू इच्छित नाही. कारण तुम्ही राज साहेबांची माणसं आहात..!
एका दमात..एवढं सगळं रामायण घडल्यावर,
आम्ही तरी कशाला काय बोलतोय. झक मारत आम्ही पाचशे रुपयाची पावती केली. आणि पुण्याला निघून आलो.
पण तुम्ही काहीही म्हणा..
राज साहेबांना मुंबई मध्ये फारच रिस्पेक्ट हो. नाहीतर.. आजवर, पोलिसानी आम जनतेला हात जोडून नमस्कार केलाला माझ्या ऐकिवात सुद्धा नाही. आणि पाहण्यात तर, नाहीच नाही..!
औषधी गोळ्या ' स्वस्त ' झाल्या..
तर, आजारांना सुद्धा " किंमत " उरणार नाही..! 


बरेचदा असं पाहायला मिळतं..
आठ दहा ठराविक मित्रांचा एखादा ग्रुप असतो,
त्या ग्रुपमध्ये दोन चार मुली आणि बाकी मुलं असतील. तर, त्या ग्रुपमधील सगळी मुलंमुली अगदी गोळ्या मेळ्याने राहत असतात. त्यावेळी, ते प्रत्येक मित्र मैत्रीण एकमेकांशी अगदी मनमोकळे पणाने संवाद साधत असतात.
पण.. चुकून त्यातील कोणाचे अचानक प्रेमसंबंध जुळले.
तर.. ते दोघे, त्या कंपूमध्ये पूर्वीसारखे एकमेकांशी मनमोकळे पणाने बोलेनासे होतात. काहीच कारण नसताना, त्यांचं मन त्यांना खाऊ लागतं.
" आपल्या बोलण्यातून चुकून यांना काही समजलं तर..? "
आणि, इथेच ती लोकं फसतात. अचानकपणे या दोघात आलेला अबोला. आणि चोरटी नजरानजर काही लोकांच्या नजरेतून सुटत नाही, किंवा पटकन ध्यानात येते.
आणि, आशा रीतीने..
त्या प्रेमप्रकरणाला एका नवीन प्रकारे वाचा फुटते..!