सुरवातीच्या काळात..
नव्याने आलेला 'टीव्ही' म्हणजे माझा अगदी आवडता सोबती होता. पण दुर्दैवाने... मला, त्याची खास सोबत मिळत नव्हती.
कारण, तेंव्हा आमच्या घरी टीव्ही नव्हता ना..!
कालांतराने.. आमच्या घरी सुद्धा एक कृष्ण धवल टीव्ही आला. आणि, माझा आवडता सोबती मला मिळाला. तेंव्हा प्रदर्शित होत असणाऱ्या नवनवीन हिंदी मालिका. माझ्या मनाला, खूप भुरळ घालायच्या. कारण, त्या मालिका आठवड्यात फक्त एकदाच लागायच्या. म्हणून, त्या येणाऱ्या नवीन भागाची मी चक्क आठवडाभर चातका सारखी वाट पाहायचो.
त्यानंतर.. 'शांती' नावाची एक नवीन सिरीयल काय आली. आणि, टीव्हीवर रोजच्या रोज मालिकांचा रतीबच सुरु झाला. आणि तेंव्हा, मला सुद्धा.. तो 'टीव्ही' कुठेतरी इडियट बॉक्स वाटू लागला. त्यानंर मात्र, मी टीव्हीकडे साफ दुर्लक्ष केलं..
नाही म्हणता, सुरभी सारखे कार्यक्रम मी आवर्जून पाहायचो. हल्ली मला टीव्ही पाहायला मिळत नाही. किंवा वेळ नसतो म्हणा. कारण, मी 'इथेच' पडीक असतो ना..
तरी सुद्धा, मी वेळात वेळ काढून " इपिक " नावाचा नवीन सुरु झालेला चानल मात्र अगदी हौसेने पाहत असतो बरं का..
मस्तच.. मला हा भरगच्च कार्यक्रम असणारा चानल फारच आवडतो. फारच नवनवीन माहित्या धार्मिक गोष्टी यात दाखवल्या जातात. या चानल मधील माझा आवडता कार्यक्रम म्हणजे..
" राजा रसोई और कहाणीया "
खानं, पिणं हा माझ्या खास आवडीचा विषय आहे. म्हणून, हा कार्यक्रम मला फार आवडतो.
आपण सगळे, महाराष्ट्रीयन जरी असलो.. तरी, रोजच्या नाश्त्यात.. पोहे, उपीट, शिरा याचबरोबर दक्षिणेतील " इडली सांबर " सुद्धा आपल्या, खूपच जिव्हाळ्याचा विषय झाला आहे. असं म्हंटलं तर ते वावगं ठरणार नाही. मला तर, ते मद्रासी पद्धतीने बनवलेलं आंबटगोड 'रस्सम' सुद्धा फार आवडतं. पण, ह्या वेगवेगळ्याप्रकारे तयार झालेल्या पदार्थाची नावं का आणि कशामुळे पडली असतील..? ते मात्र, आपल्याला माहीत नसतं.
तर, आज हा इपिक चानल पाहत असताना मला एक भव्य दिव्य माहिती ऐकायला मिळाली. शहाजी महाराज, दक्षिणेत राज्य करत त्या दरबारी चाकरीला होते. स्वराज्याची स्थापना केल्यानंतर शिवाजी महाराजांनी सुद्धा दक्षिणेत आपली मोहीम नेली होती. पण, फारच कमी लोकांना हि माहिती असावी..कि संभाजी महाराज सुद्धा दक्षिणेत जाऊन आले होते..!
तर.. त्याकाळी, संभाजी महाराज दक्षिणेत गेले असता. तेथील खानसामा लोकांना प्रश्न पडला. कि येवढा मोठा राजपुत्र, आपल्या दरबारी येत आहे. तर, त्यांचं स्वागत करण्याकरिता आपण कोणता तरी खास पदार्थ बनवला पाहिजे. तर त्यावेळेस, तेथील खानसामा लोकांनी. खास त्यांच्या स्वागतासाठी म्हणून,एक नवीन द्रवपदार्थ बनवला..
आणि, संभाजी महाराजांच्या स्वागताप्रीत्यर्थ त्या नव्याने बनवलेल्या द्रव पदार्थाचं नवीन नामांतर केलं. " सांभार " किंवा सांबर जे, संभाजी महाराजांच्या नावाशी साधर्म्य सांगतं. अशा वेगळ्या पद्धतीने, त्याठिकाणी शंभू राजांचं स्वागत केलं गेलं होतं. हि आम्हा सर्वांकरिता निश्चितच अभिमानाची गोष्ट असावी.
आहे कि नाही मजेशीर आणि आवडती गोष्ट. आपण म्हणत असलेला इडियट टीव्ही कधी-कधी आपल्याला खूप सुंदर माहित्या सुद्धा देऊन जातो बरं का..
No comments:
Post a Comment