महिला, किती " सहनशील " असतात..!
काही मुलींना, दुर्दैवाने आईच्या उदरातच मारलं जातं. तर काहींना, जिवंतपणी नरकयातना सहन करत सगळं आयुष्य दुखः वेचत कंठावं लागतं. मुलगी म्हणजे, आपल्या खांद्यावर असलेला एक मोठा बोजा आहे. असं समजणारा प्रत्येक पालक.. त्या महिलेचा, मुलीचा, मातेचा फार मोठा गुन्हेगार असतो. असं धाडसी वक्तव्य मी इथे करू इच्छितोय.
स्त्री हि.. क्षणिक काळाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते. हे आपण, प्रत्यक्ष आचरणात कधी आणणार आहोत..? हा, फार मोठा प्रश्न आज आपल्यासमोर आ वासून बसला आहे.
लहानपणी नकळत्या वयात, आपलं बालपण विसरून. तिच्यापेक्षा, फक्त दोनेक वर्षांनी लहान असणाऱ्या भावंडांना आपल्या काखेवर घेऊन खेळवणारी ती लहान बाहुली. मला बालपणीच माता झाल्यासारखी जाणवते. का कोण जाने, पण ती जान तिला उपजतच आलेली असते. तमाम महिला मंडळींना, परमेश्वराने बहाल केलेली ती एक अनोखी देणगीच असावी..
घराला हातभार म्हणून, सकाळी सडा संमार्जन उरकून स्वयपाकघरात आईला मदत करणारी आपली भगिनी. मला तर ती मुलगी, अन्नपूर्णेचा दुसरा अवतारच वाटते. धाकल्या भावंडांचं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून, आपल्या इच्छा आकांक्षांना तिलांजली वाहत. एखादा प्रायव्हेट जॉब पत्करून, घराची आणि आपल्या लग्नाची आर्थिक धुरा स्वतःच्या खांद्यावर उचलणारी ती मुलगी. मला साक्षात लक्ष्मी मातेच्या रुपात दिसते.
शरमेने, आई वडिलांची मान खाली झुकू नये म्हणून. ते बोट दाखवतील त्या मुलाबरोबर आपला संसार थाटनाऱ्या मुलींच्या अंगी नेमकं कोणतं धाडस असतं..? त्याची मी, आजवर उकल करू शकलो नाहीये. पुढे चालून, तो नवरा मुलगा चांगला निघालाच नाही. तर त्या घडणाऱ्या घटनेला तिलाच दोषी ठरवलं जातं. आणि नाईलाजाने किंवा कर्मधर्मसंयोगाने नशिबाचे भोग म्हणून, कंबर कसून कामाला लागणारी ती मुलगी मला आई सरस्वतीच्या रुपात दिसते.
तर कधी.. तिला मिळालेल्या शापित सौंदर्याला लपवताना. शेकडो स्त्रीलंपट व्यक्तींच्या त्रासाला कंटाळून. अगदीच नाईलाज म्हणून, मेटाकुटीला येऊन त्या नराधमाचा संहार करणारी मुलगी मला प्रत्यक्षात दुर्गामातेच्या अवतारात दिसते. तर कधी, नवऱ्याच्या मृत्युपश्चात आपल्या भावनांना मुरड घालत. हयात असेपर्यंत दुःखाचा डोंगर आपल्या शिरावर झेलणाऱ्या मातेकडे पाहताना. माझ्या अश्रूचा बांध फुटून कधी मोकळा होतो. ते, माझं मला सुद्धा समजत नाही.
हे भोग, फक्त स्त्री जातीलाच का..?
हा प्रश्न, मी खुद्द परमेश्वरला सुद्धा विचारू शकत नाही. कारण, परमेश्वराने स्त्री आणि पुरुषाची निर्मिती करत असताना. दोघांच्याही पारड्यात, अगदी भरभरून असं सगळं काही समसमान आणि तोलामोलाचं दिलं होतं. पण समस्त पुरुष जातीने, स्त्रीवर अधिराज्य गाजवून तिला काळाच्या उदरात गाडून टाकलं आहे. आजच्या स्त्रीने, जी काही उंच भरारी घेतली आहे. ती पाहताना, माझा उर अगदी आनंदाने भरून येतो. पण, हा सोनेरी दिवस जेंव्हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येईल. तेंव्हाच, मानव जातीतली हि दरी खऱ्या अर्थाने मिटल्याचा मला मनापासून आनंद होईल..
आई, बहिण, बायको, मुलगी... अशी विविध नाती जपणाऱ्या. नारीच्या उचित सन्मानासाठी, आजचा दिवस जागतिक " महिला दिन " म्हणून आपण साजरा करत असतो. पण मला वाटतंय, हा दिवस आपण रोजच्या रोज आणि अगदी आनंदाने साजरा करायला हवा आहे. कारण, स्त्रीशिवाय आपण जीवनाची कल्पनाच करू शकत नाही.
" पुरुषाशिवाय स्त्री जरी अधुरी असली. तरी स्त्रीशिवाय हा सगळा संसार अधुरा आणि अपूर्ण आहे. " हे मला, इथे प्रामाणिकपणे सांगावसं वाटतंय..
.
आजच्या ह्या सुंदर दिवशी, इथे असणाऱ्या माझ्या तमाम माता, भगिनींना माझा मनपूर्वक सप्रेम नमस्कार. आणि, पृथ्वीतलावर असणाऱ्या समस्त नारी वर्गाला माझा मानाचा मुजरा आहे..!
No comments:
Post a Comment