Friday, 28 August 2015

रक्षाबंधन..

सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती,
ओवाळीते भाऊ राया रे,
वेड्या बहिणीची रे वेडी माया.
बहिण भावाचं नातं,
खरोखर, हे अगदी वेडं नातं आहे. जगातल्या, इतर सर्व नात्यांपेक्षा हे नातं श्रेष्ठ असावं असं मला वाटतंय. भाऊ कसाही असुध्यात, बहिणीचा जीव त्याच्यासाठी तीळ-तीळ तुटत असतो. भावा-भावांची भांडणं होतात. हे आपण नेहेमीच ऐकत आणि पाहत आलो आहोत.
पण, बहिण भावाची सुद्धा भांडणं असू शकतात...? नाही... असं, खचितच पाहण्यात येतं.
तसं पाहिलं तर, हि दोन्ही रक्ताची नाती असतात. पण, बहिणीचं नातं काही निराळच असतं.
इथे सुद्धा, बऱ्याच महिला माझ्या ताई आहेत. पण, माझ्या सक्ख्या बहिणी इतकी जिवलग गुंतागुंत माझी कुठेही नाहीये. अशी नाती, निर्माण व्हायला हवीत...
बहिण भावाला ओवाळते, भाऊ तिला ओवाळणी टाकतो. तसं पाहायला गेलं तर, ओवाळणी करिता कोणतीच बहिण भावाला ओवाळत नसते.
आपण हयात आहोत तोपर्यंत, तिला हवं नको ते पाहणं. तिच्या सुखा दुख्हात सहभागी होणं. आणि, जमेल त्याप्रकारे तिची मदत करणं. हे एका भावाचं आद्य कर्तव्य आहे. आणि, प्रत्येक व्यक्तीने ह्याचं पालन करणं महत्वाचं आहे. हीच तिला, खऱ्या अर्थाने ओवाळणी असते.
मी, बहिण भावाचं पवित्र नातं मानतो. त्याला, मान सुद्धा देतो. मानलेली नाती सुद्धा मानतो.
" पण राखीच्या बंधनात अडकनं, मी सोडून दिलं आहे. "
त्याला, कारण हि तसच घडलं...
नाती माननं वेगळं. आणि, त्याला मूर्त स्वरूप देणं वेगळं. सुरवातीला, माझ्या बहिणी व्यतिरिक्त मी कोणाचीच राखी बांधून घेत नव्हतो. नंतर, आग्रहाखातर मानलेल्या बहिणींच्या दोन चार राख्या सुद्धा वाढल्या. पण आजही, माझ्या सक्ख्या बहिणीने राखी बांधल्याशिवाय मी दुसर्या कोणाच्याच राख्या बांधून घेत नाही. पहिला मान, फक्त तिचाच असतो. आणि, का असू नये...
मग त्या बंधनाला, त्या दिवशी कितीही वेळ होवो.
राखी बांधण्याची ज्याची त्याची पद्धत असते. माझी बहिण राखी बांधताना घट्ट अशा दोन गाठी मारते. जेणेकरून, ती राखी दोन एक महिने तरी माझ्या हातात राहतेच.
मग ती, केंव्हा जीर्ण होऊन निघेन तेंव्हाच.
सप्टेंबर २००८ साली... मनाली येथे माझा भीषण अपघात झाला होता. दैवकृपेने, मी त्या अपघातातून सहीसलामत बचावलो होतो. दोन दिवसांनी, जेंव्हा मला कुलुहून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक मध्ये दाखल करण्यात आलं. तेंव्हा, मला पाहायला बरीच लोकं येत होती. पण जेंव्हा, माझी बहिण मला पाहायला आली.
तेंव्हा.... मला पाहून, तिने जो मोठ्याने हंबरडा फोडला होता.
तो आवाज, आजही माझ्या कानामध्ये घर करून बसला आहे. माझ्या बायकोने सुद्धा, मला पाहून इतका आक्रोश केला नव्हता. संपूर्ण दवाखाना, आम्हा दोघांकडे पाहत होता. 
हे सगळं का होतं..? आणि, कसं होतं..? ते फक्त, त्या 'दोन' हृदयांनाच माहीत असतं..
तिचे डोळे पुसण्यासाठी, मी माझा हात पुढे सरसावला. तेव्हा नकळत, माझं सुद्धा माझ्या हाताकडे लक्ष गेलं. तो राखीचा दोरा, अजूनही माझ्या हातामध्ये तसाच होता.
काय सांगावं.. त्या राखीच्या बंधनातली सुद्धा ती ताकत असावी. जो मी इतक्या भयंकर मोठ्या अपघातातून सहीसलामत बचावलो होतो.
आणि त्याच वेळी, अपघातानंतर दोन चार महिन्यांनी का होईना. माझ्या मानलेल्या बहिणीपैकी एकही बहिण माझी साधी विचारपूस सुद्धा करायला येऊ नये. हि, फार मोठी खेदाची गोष्ट होती.
इथे माझ्या बर्याच ताई आहेत. त्यांनी, माझं हे लिखाण मनाला लाऊन घेऊ नये.
परंतु, हि वस्तुस्तिथी आहे. ह्यात, अतिशयोक्ती अशी काहीच नाहीये..
नाती निर्माण करणं.. आणि, त्याला शेवटपर्यंत निभावनं. हे, फार कठीण काम आहे.
फक्त, वर्षातून एकदा राखी बांधणं. किंवा ओवाळणी टाकणं. म्हणजे, बहिण भावाचं नातं नसतं. ह्यापेक्षाही घट्ट अशी आपली नाती व्हावीत.
जी त्या, राखीच्या बंधनाच्या सुद्धा दोन पावलं पुढे असावीत. त्यामध्ये, भावनिक गुंतागुंत असावी. एकमेकाचा आदर सत्कार असावा. एकमेकाची सुखं दुखः वाटून घेण्याची ताकत असावी.
असं मला इथे सांगावसं वाटतंय.
आणि आपण, सगळे मिळून, त्यास नक्कीच पात्र ठरू.
हीच, ह्या लेखामागची बहिण भावाच्या खऱ्या नात्याची कायम स्वरूपी गुंफण व्हावी. 

हीच, ईश्वर चरणी प्रार्थना....

Wednesday, 26 August 2015

विस्मृती..

मनापासून अभ्यास करावा, असं मला कधीच वाटलं नाही. पण, करावा लागायचा. 
काय करणार..? 
किमान त्यामुळे तरी, माझ्या घरच्या लोकांचं समाधान व्हायचं. 
आपलं पोरगं काहीतरी शिकतंय. आणि चांगलं शिकून, मी नक्कीच फार मोठा अधिकारी वगैरे होईल हा त्यापाठीमागचा त्यांचा आशावाद..
पण कसलं काय, मला तर वाटतंय..
पाचवी पूजताना, सटवाईने आपल्या कपाळावर जे लिहून ठेवलेलं असतं. तेच, आणि तसच घडत असतं. आपण मात्र, विनाकारणच त्रास घेत असतो.
असो, हा गमतीचा विषय झाला...

तर, बारावीला असताना.. माझ्या सोबत माझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठा असणारा. एक मित्र, बाहेरून बारावीची परीक्षा देत होता. त्यावेळी, तो एका टेक्नीकल शाळेमध्ये वेल्डर ह्या विषयाचा शिक्षक होता. पण, उरलेलं शिक्षण पूर्ण करण्याची त्याला खूप आवड होती. आणि, तो अभ्यासात सुद्धा खूप हुशार होता. त्यामुळे, त्याला ते शक्य सुद्धा होतं. वयाने मोठा आणि अभ्यासात हुशार असल्यामुळे. आमच्या घरचे, मला त्याच्यासोबत अभ्यासाला धाडायचे. 
अभ्यासाबाबतीत, माझा एकच शिरस्ता असायचा..
शरीराला जास्ती त्रास करून घ्यायचा नाही. झेपेल तेवढाच अभ्यास करायचा. आणि, रात्रीचा दिवस करायचा नाही. 
हि पथ्य, काठेखोरपने पाळल्यामुळे. बारावीत मी जेमतेम मार्काने कसाबसा पास झालो..

त्यावेळी, एक भलताच प्रकार घडला होता... 

उद्या... इंग्रजी विषयाचा पेपर होता. 
नेहेमीप्रमाणे, रात्री नऊ वाजता आम्ही दोघे त्याच्या रूम मध्ये अभ्यासाला बसलो. मी खाटेवर बसून अभ्यास करायचो. तर हा, रूम मध्ये फेऱ्या मारत वाचन करायचा. ह्याची अभ्यास करण्याची पद्धत खूप निराळी होती. तो, इंग्रजी धड्याचं गाईड मधील भाषांतर पाठ करायचा. आणि त्यानुसार, प्रश्नाची उत्तरं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करून लिहायचा.  हे, त्याला खूप मस्त जमून गेलं होतं. तर मी, व्याकरणावर भर देऊन पास होण्याच्या तयारीत असायचो. त्या रात्री, मी अकरा वाजेपर्यंत कसाबसा अभ्यास केला. आणि, पहाटे उठून थोडा अभ्यास करूयात असं ठरवून. मी, झोपण्याच्या तयारीला लागलो.. 
तर हा म्हणाला, तू झोप... मी अजून थोडावेळ पाठांतर करतो..

मला झोप खूप आवडीची, त्यामुळे अंग टाकल्या टाकल्या मी लगेच झोपी सुद्धा गेलो.

आणि काही वेळाने... अचानक कसल्याशा आवाजाने मला जाग आली..
धाप्पकन काहीतरी पडण्याचा आवाज झाला... झोपेतच दचकून, डोळे चोळत मी उठलो. 
पाहतो तर....
माझा मित्र, जमिनीवर चित्र विचित्र अवस्थेत पालथा पडला होता. त्याच्या हातातलं गाईड त्याच्या बाजूलाच पडलं होतं. घड्याळात पाहिलं तर, पहाटेचे पाच वाजले होते. मी झोपून, बराच कालावधी लोटला होता.
मला तर काहीच समजेना, कि नेमकं काय झालं आहे..? 
धाडस करून, मी त्याला उठवलं. तसा, तो हि ताबडतोब उठून बसला. मी त्याला विचारलं, 
काय झालं रे..? 
म्हणाला, कुठे काय..? मी तर झोपलो होतो. आणि, त्याने घड्याळाकडे पाहिलं..
अरे... पाच वाजलेत. चल, आपण बाथरुमला जाऊन येवूयात.. 

त्यावेळी, त्याच्या घरात शौचालय नव्हतं. म्हणून आम्ही, शौचासाठी तेथे जवळच असणाऱ्या ओढ्याला गेलो. तिथे एक वेगळाच प्रकार मला पाहायला मिळाला.. 
ह्या बहाद्दराने, शौचाला बसण्यासाठी एक एक करून अंगावरील सगळी वस्त्र काढून ठेवली. आणि उघडाबंब होऊन शौचाला बसला. असला भलताच प्रकार पाहून, मी तर जाम घाबरून गेलो होतो. हा भयंकर प्रकार पाहून, मी त्याच्या पासून थोडं अंतर राखूनच बसलो होतो. 
जवळ-जवळ तासभर तो तिथेच बसला होता. शेवटी, थोड्या वेळाने तांबडं फुटलं. तसा त्याला घेऊन, मी रूमवर आलो...
रूमवर आल्यावर, अभ्यासासाठी त्याने ते गाईड उघडलं. आणि, अभ्यासाला बसला. थोडा वेळ त्याने वाचन केलं. आणि, मला म्हणाला..

पंडित, मी रात्रभर खूप अभ्यास केला होता रे.. पण, आता मला काहीच आठवत नाहीये...! 

त्याच्या ह्या वाक्यासरशी मी तर खूपच शॉक झालो.. आणि, काहीही न बोलता मी आमच्या घरी निघून गेलो. त्या दिवशी, मी पेपरला गेलो. पण, तो काही पेपरला आला नव्हता...
आणि, तिथून पुढच्या कोणत्याच पेपरला तो आला नाही. 
अर्थात, तो नापास झाला. आणि मी पास झालो. 

त्यानंतर, ऑक्टोबरमध्ये तो सगळे विषय घेऊन पुन्हा परीक्षेला बसला. आणि चांगल्या मार्काने पास सुद्धा झाला. पण, त्यारात्री नेमकं काय घडलं होतं..? 

ते, त्यालाही माहित नव्हतं. आणि, मला सुद्धा कधी समजलं नाही...!

Saturday, 22 August 2015

भुलभुलैय्या..

बरेच दिवस, त्यांचं एकमेकांकडे गुपचूप पाहणं चालू होतं. पण, पुढाकार कोण घेणार..? हा फार मोठा प्रश्न होता. 
मुलीची जात म्हणजे.. 

कोही हसीना कदम पहेले बढाती नही..
आणि,
मजबुरी दिलसे ना हो तो पास आती नही.

मुलींना कसली आलीय हो मजबुरी..!  
प्रेमवेडा मुलगाच मजबूर असतो. तिच्या प्रेमात अगदी वेडा पिसा झालेला असतो. तहान, भूक, झोप सगळं काही विसरून गेलेला असतो. अभ्यासाच्या नावाने तर, निव्वळ बोंबाबोंब असते. हवं तर, त्याचा विषयच येत नाही म्हणा ना.. 
आणि चुकून, त्या मुलीची त्या मुलात काही भावनिक गुंतागुंत असलीच. तरी, ती त्या कधी दाखवत नाही. ह्या बाबतीत त्या फारच वाकबगार असतात. हा त्यांच्या अंगी असलेला मूळ आणि सुंदर गुण. मुलीला, मुलगा किती जरी आवडला असेल. तरी ती स्वतः कधीच पुढाकार घेत नाही. ( काही अपवाद वगळता. ) हे मी, स्वानुभवावरून सांगतोय..

तर, इथे सुद्धा नेमकं तेच घडलं..

मुलीने, तिची बाजू पूर्ण सांभाळली होती. त्याला पाहून, तिचं गालातल्या गालात हसणं. त्याच्याकडे, तिरक्या नजरेने चोरून पाहणं. तिच्यापरीने, तिला जे जमेल ते ती सगळं काही करत होती. पण, ह्या गड्याची काही डेअरिंग होत नव्हती. 

आणि, शेवटी तो दिवस उजाडला.. 

रस्त्याच्या विरुद्ध बाजूने, ती लाजत मुरडत निघाली होती. याला पाहून, नकळत तिच्या गालावर सुद्धा एक वेगळीच लाली चढली. वाऱ्याच्या हळुवार झुळकेने उडणाऱ्या तिच्या केसांच्या बटा. कमालीच्या सुंदर दिसत होत्या. आज मात्र त्याला राहवत नव्हतं.. तिला पाहून, त्याच्या अंगामध्ये भलताच संचार झाला होता. कोणीतरी पाठीराखा असावा. म्हणून, सोबत एका मित्राला घेऊन, तो तिच्या दिशेने निघाला...
आणि... तिच्या समीप जाताच, मनाचा हिय्या करून तो तिला म्हणाला.

ए... जरा थांबतेस का. मला, तुझ्याशी काही बोलायचं आहे...!

पडत्या फळाची आज्ञा झेलावी. तशी, ती सुद्धा ताबडतोब एका जागेवर स्तब्ध झाली. हातामध्ये असणाऱ्या पर्सशी लाडिक चाळे करत ती आजूबाजूला पाहत होती.
जशी ती थांबली, तसे इकडे याच्या मनात लाडू फुटू लागले.. थांबली, म्हणजे आपलं काम फत्ते झालं..
आता मात्र, हा थोडा निडर झाला होता. त्याच्या मनावरचं दडपण थोडं कमी झालं होतं.
तो तिच्या समीप गेला.. 
आणि, हा काही बोलणार, तितक्यात तीच त्याला म्हणाली...

" मी तुला, एकदा नाही म्हणून सांगितलंय ना..! "

हा.. हैराण, परेशान...
मी तर हिच्याशी कधीच काहीच बोललो नाही. आणि, हि असं काय बोलतेय..?

याला, जबरदस्त धक्का बसला. त्या धक्क्यातून, त्याने कसबसं स्वतःला सावरलं. आणि, आजूबाजूला पाहिलं. सोबत आलेला मित्र, त्याच्या सोबत नव्हताच. त्याने, मागच्या मागे कधीच पोबारा केला होता. आणि, एका झाडामागे लपून तो हा सगळा प्रकार पाहून फिदीफिदी हसत होता. इकडे, ह्याची नजर वळते न वळते. तोवर, ती सुद्धा पुढे निघून गेली होती. 

आता, सगळा प्रकार याच्या लक्षात आला होता.

याच्या सोबत आलेला मित्र, तिला पहिलच 'विचारून' मोकळा झाला होता. त्याने, तिचा नकार पचवला होता. आणि, ती मात्र अजूनही त्याच भ्रमात होती...  
तिला वाटत होतं..

" कि हा सुद्धा, त्याला सोबत घेऊन पुन्हा त्याचीच 'मागणी' घेऊन तिच्याकडे आला आहे. "

ह्याचा नंबर लागणार होता. पण, राँग नंबर मुळे सगळी गडबड होऊन बसली.. 

Thursday, 20 August 2015

हतबल..

आयुष्याच्या ऐन मध्यानीत... 

दारू पिऊन जर्र जर्र झालेलं शरीर. लहानपणी दुडूदुडू धावलेली पावलं. आता, एका इतेच्या पुढे सुद्धा झेप घेत नव्हती. इतकं भयंकर थकलेलं शरीर. 
ऑफिसमध्ये झाडू पोछा करायचा. आणि दिवसभर, एका खुर्चीवर बसून राहायचं. बिडी शिलगावली, कि तात्पुरती ब्रम्हानंदी टाळी लागायची. सोबत थरथरत्या हाताच्या, दोन बोटात धरलेल्या बिडीचा ओठा पर्यंतचा प्रवास अगदी स्लो मोशन मध्ये असायचा. ओठातून पोटात गेलेला धूर सुद्धा, लवकर बाहेर पडायचं नाव घेत नव्हता. असली भयंकर परिस्तिथी. 
काही खास आजार नसल्यामुळे, मेडिकल अनफिट करता येत नाही. कारण, हे व्यसनाने ओढवलेल आजारपण. काही नाही तर, दर महिन्याचा चार आकडी पगार मिळतोय. म्हणून, घरच्यांनी कामावर जाण्याकरिता. त्याच्यासाठी, वर्दीची एक रिक्षा लाऊन दिली आहे. जी त्याला, नित्यनेमाने कामावर नेऊन सोडते. आणि, घरी सुद्धा घेऊन येते.


कोण जाने का.. पण आज त्याला, घरी जायचे खूप वेद लागले होते. त्याने, रिक्षावाल्याला फोन सुद्धा केला होता. पण, तो काही अजून आला नव्हता. मी त्याला सहज विचारलं. 
आज का म्हणून लवकर जायचंय..?
काम आहे...!
बस्स्स....
बोलायला सुद्धा अगदी त्याच्या जीवावर येतं. कारण, अंगात त्राणच नाहीये..
काल गुरुवार होता. पिंपळाच्या झाडाखाली असलेल्या, पंच महाभूताच्या दगडी मूर्तीसमोर नारळ वाढवला होता. मूर्तीला हार फुलं वाहिली होती. एकंदरीत प्रसन्न वातावरण होतं.
भिंतीचा आधार घेत..  हळूहळू मुंगी पावलाने, माझ्यासमोरून तो मूर्तीच्या दिशेने पुढे चालत गेला. मला वाटलं.. तो दुसरीकडे कुठेतरी निघाला असेल. पण नाही, त्याच्या चालण्याचा रोख मूर्तीच्या दिशेनेच होता.
माझ्या मनात, विविध प्रश्न निर्माण होऊ लागले..
कधी नाही तो, आज हा देवाकडे कसा काय निघाला आहे..? देवाकडे, आता तो काय मागणी करणार असेल..? एक ना हजार प्रश्न डोक्यात पिंगा घालू लागले..

आणि एकदाचा, तो त्या दगडी मुर्तीपाशी जाऊन पोहोचला. त्याच्या पायात, चप्पल तशीच होती. ती काढण्याचे मुळी त्राणच त्याच्या अंगात नव्हते.  थोडा वेळ शांतपणे मूर्तीच्या कट्ट्यापाशी उभा राहात. त्याचा थरथरता हात, मूर्तीच्या पायापाशी गेला. 
मनातून, मी सुद्धा थोडा वेळ हळवा झालो. मनात म्हणालो.. देवा ह्याला काय हवं असेल ते द्या, त्याची इच्छा पूर्ण करा..
आणि त्याचा हात, त्या मूर्तीच्या पायापाशी गेला. थरथरत्या हाताने देवाच्या पायापाशी ठेवलेल्या खोबऱ्याच्या पाच तुकड्यांपैकी एक तुकडा त्याने अलगत उचलला. स्वतःच्या मुखात टाकला. आणि, खोबऱ्याचा तुकडा चावत चावत माझ्या समोरून तो निघून गेला..!

सांगा... त्यावेळी माझ्यावर काय प्रसंग गुदरला असेल..?

Tuesday, 18 August 2015

जीर्ण..


पुण्यातील...
कित्तेक जीर्ण वाड्यांमध्ये, काही व्यक्तींच्या अक्षरशः तीन-तीन पिढ्या गेल्या आहेत. ह्या पुरातन वास्तूमधून, आपल्याला काहीतरी मोबदला नक्क्चि मिळेल. ह्या आशेवर, संपूर्ण आयुष्य 'आठ बाय दहा' मध्ये घालवलेल्या. कितीतरी पिढ्या, ह्या पुण्यनगरीने पाहिल्या आहेत.
आणि,
जुने भाडेकरी, कधीतरी हि घरं सोडून जातील. आणि, आपल्या वडिलोपार्जित हक्काची जागा. फक्त, आपल्यालाच मिळेल. ह्या आशेवर,  घरमालकांच्या कितीतरी पिड्या ह्या पुण्यामध्ये बरबाद झाल्या आहेत.
हे कटू सत्य सुद्धा, ह्या पुण्यनगरीनेच पाहिलं आहे.. 

आणि, काही अंशी...

ह्या मालक आणि भाडेकरी,
या दोघांनाही , 
अतिटतीला येऊन, भर पावसात रातोरात जमीनदोस्त झालेल्या वाड्याच्या पांढर्या मातीच्या ढिगाऱ्याखाली. 
कोणी जिवंत व्यक्ती सापडतायत का..? 
हे शोधायची वेळ येते...

आयुष्य खूप छोटं आहे. त्याला आणखीन छोटं का करून घ्यावं..?

Monday, 17 August 2015

दुष्काळ..

मी, दहावीला असताना...
आमच्या घरा शेजारील, एक डबलरूम रिकामी होती. म्हणजे अजूनही आहे. त्यावेळी, भाडेकरू वगैरे असला खास प्रकार नव्हता. कारण, पुण्यामध्ये येणारे बाहेरचे लोंढे तसे फार कमीच होते. आणि जे कोणी होते. ते, आपापली स्वतःची घरं घेऊन राहत होते. त्यामुळे, ती रूम रिकामीची होती. पण, सगळ्या जीवनावश्यक वस्तूने अगदी खचाखच भरलेली होती. 
रोजची वहिवाट असलेली बरी, ह्या उदेशाने त्या घर मालकाने ती रूम मला अभ्यासासाठी म्हणून दिली होती. मी सुद्धा, दोन चार मित्र जमा केले. आणि आमची तिथे अभ्यासिका सुरु झाली. कधी कधी आम्ही, रात्री उशिरापर्यंत तिथे अभ्यास करायचो. आणि, थकून भागून  तिथेच झोपी जायचो. त्यामुळे, कधी-कधी घरातील लाईट रात्रभर तशीच चालू राहायची. घरचेही आम्हाला उठवून लाईट बंद करायची तसदी घेत नसत. 

एकदा, आम्ही त्या अभ्यासिकेत काही गेलोच नाही. जो तो, आपापल्या घरीच होता. 
नेहेमीप्रमाणे, त्यादिवशीही माझे वडील पहाटे पाच वाजता उठले. घराच्या पायरीवर बसून, तंबाखूचा विडा मळत होते. सोबतच, त्यांचं खाकरनं सुद्धा चालू होतं. चुनामिश्रीत तंबाखूची फक्की त्यांनी तोंडात कोंबली. आणि, त्यांचं लक्ष त्या रूमकडे गेलं. रूमची लाईट सताड चालू होती. मनातल्या मनात त्यांनी, आम्हाला दोन चार अस्सल गावरान शिव्या हासडल्या. 
कारण, ते शिस्तीचे खूप भोक्ते होते.

सकाळ झाली, मोठ्या वहिनी अंगणात सडा रांगोळी करत होत्या. आणि नेमकं, त्यांचं त्या रूमकडे लक्ष गेलं. रुमचा कडी कोयंडा कटावणीने कटवला होता. मलूल अवस्थेत, कुलूप पायरीवर लोटांगण घालत पडलं होतं. हे दृश्य पाहून, वहिनी धावतच घरात आल्या. आणि, माझ्या वडिलांना हा समाचार सांगितला. क्षणार्धात आम्हा सगळ्यांचा मोर्चा, त्या शेजारील घराकडे वळाला. 
घरात चोरी तर झाली आहे. पण, घरातील काय आणि किती मुद्देमाल गेला असेल. ते कळणार कसं..? 
कारण, ते घरमालक पुण्यात राहायला होते. आणि त्यावेळेस, आमच्याकडे आणि त्या घर मालकाकडे फोनची सोय सुद्धा नव्हती.
नाही म्हणता, जवळ-जवळ सगळ्याच संसार उपयोगी वस्तू त्यांच्या घरामध्ये होत्या. 

शेवटी... आम्ही सगळे जन, त्या घरात गेलो. 
आणि समोरचं दृश्य पाहून आम्ही सारेच भांबावून गेलो. त्या चोराने, गेस शेगडी पेटवून त्यावर चहा उकळला होता. आणि त्याने, चहात पोहे भिजवून खाल्ले होते. चहाच्या पेल्यात, पोह्याचे चहा मिश्रित तुकडे आणि चमचा तसाच पडून होता. त्याच्या सगळ्या खुणा अगदी स्पष्ट जाणवत होत्या. 
त्या घरातील, जास्ती माहिती मलाच होती. 
म्हणून, मी चौफेर नजर मारली. घरातील खास काही गेलं नव्हतं. 
त्या चोराने, काय नेलं असावं..?

स्टीलचा एक तांब्या, पेला, एक उशी, आणि सोबत अंगावरची चादर...!

झालं... विषय तिथेच मिटला. 
आम्ही, पुन्हा त्या घराला नवीन कडी कोयंडा बसवून घेतला. पण, मला काहीच कळेना. येवढ्या मोठ्या घरात, तांब्या पितळेची भांडी असताना. त्या चोराने काहीच कसं नेलं नसावं..? 
त्याची उकल, मला बरेच दिवस झाली नाही..
पण, नंतर माझ्या लक्षात आलं. अपुऱ्या पावसामुळे, त्यावर्षी सुद्धा दुष्काळ पडला होता. कोणीतरी खेडे गावातून आलेल्या व्यक्तीने पोटाच्या खळगी करिता हे भीषण कृत्य केलं असावं. 
काही नाही तर, 
किमान एखाद्या आडोशाला पडून राहता येईल. अशा उद्देशाने, त्याने घरातलं पांघरून नेलं असावं. आणि, एखादं भांडं सोबत असावं म्हणून तो तांब्या अन पेला नेला असावा.. 

परमेश्वरा.... दुष्काळ नको रे बाबा..

Sunday, 16 August 2015

नाल..

अमरनाथ यात्रेला प्रारंभ झाला... 


हर हर महादेव, जय हो भोले...च्या आवाजाने आसमंत दुमदुमलं होतं. अमरनाथ यात्रेच्या खडतर प्रवासाला सुरवात झाली होती. सुरवातीला, नव्या दमाने मी चढाईसाठी अत्यंत उत्साहित होतो. पण, जसजसा चढ वाढू लागला. तशी, माझीही दमछाक होऊ लागली. घशाला कोरड पडली होती. छातीत हलकीशी कळ मारत होती. गुडघे दुखू लागले होते. पोटऱ्या भरून आल्या होत्या. पाणी प्यावं, तर पोटात दुखू लागेल. आणि थांबलं, तर पायाचे गोळे वर चढतील. म्हणून, तहान थांबवत. आणि, अंतर लांबवत. हातातील काठीचा आधार घेत-घेत ती अवघड चढाई सर करत होतो. आजूबाजूला, घोड्यांच्या टापांचा सुरेल खडबडाट ऐकू येत होता. एक आगळावेगळा, नयनरम्य प्रवास चालू होता. घोड्यावरून जाणारे यात्रेकरू, पायी निघालेल्या यात्रेकरुंकडे खूप आदराने पाहत होते. आणि अचानक, माझं एका ठिकाणी लक्ष गेलं.


घोड्यावर बसून यात्रेला निघालेली एक महिला, तिच्या सोबत घोड्यावर बसून निघालेल्या तिच्या यजमानांना हाताने इशारा करीत. मोठ मोठ्याने ओरडत, ती त्यांना काहीतरी सांगत आणि दाखवत होती. ती काय बोलतेय, ते मला समजत नव्हतं. तिची भाषा, मला बिलकुलच नवीन होती. चालून-चालून थकवा आल्याने, माझ्या डोळ्यावर थोडी अंधारी आली होती. तरीही, चालता-चालता ती महिला हात करत असलेल्या दिशेला, डोळे फाडून पहायचा केविलवाणा प्रयत्न केला. 

दगडांच्या नैसर्गिक पायर्यांवर, एका खाचेमध्ये... " घोड्याची नाल " पडली होती...! 

खडबडीत रस्त्यामुळे, घोड्यांच्या पायातील नाला सर्रास निखळून पडत असतात. पण, ती नाल ज्याला सापडेल, तो खरोखर भाग्यवान म्हणावा लागेल. 
क्षणाचाही विलंब न करता. मी, त्या नालेच्या दिशेने झेपावलो. घोड्याची लीद आणि चिखलामध्ये माखलेली ती नाल मी उचलली. भोले नाथाचा कृपा प्रसाद समजून ती नाल मी माझ्या बेग मध्ये ठेऊन दिली. आणि, पुढील चढाईला सुरवात केली..  
हे दृश्य पाहून, घोड्यावर असणाऱ्या त्या महिलेला खूप वाईट वाटलं. कारण, त्या नालेवर प्रथम तिची नजर पडली होती. पण, घोड्यावर असल्यामुळे. ती महिला, ती नाल हस्तगत करू शकली नव्हती. यात्रेला चालत जाण्याचा, मला असाही 'लाभ' झाला होता. कारण, ज्या दिवशी मला ती नाल सापडली. तो दिवस, नेमका " सोमवती अमावास्येचा " होता. आणि ह्या दिवशी, घोड्याची नाल सापडणं आपल्या धर्मात खूप 'शुभ' मानलं जातं. यात्रेची सुरवात अगदी मस्त झाली होती. त्यानंतर, बर्फानी बाबांचे मनभरून दर्शन झाले. माझी यात्रा सफल झाली. आणि आम्ही, परतीच्या प्रवासाला निघालो. 

परतीच्या प्रवासात असताना, माझ्या घोडेमालकाला माझा स्वभाव फार आवडला. त्यामुळे, आमचा प्रवास संपल्यानंतर. खुश होऊन, त्याच्याकडे असलेली घोड्याच्या पायातून पडलेली एक नाल त्याने मला भेट म्हणून दिली. ती लोकं, धर्माने मुस्लीम जरी असलीत. तरी, त्यांना हिंदू धर्मीय लोकांची श्रद्धास्थानं चांगलीच ठावूक आहेत.
धार्मिक बाब म्हणून, माझ्याकडे आता दोन नाला झाल्या होत्या. त्या दोन्ही नाला मी घरी आणल्या. त्याची, यथासांग पूजा केली. पण त्यावेळी, घाई गडबडीत सोमवती अमावास्येला मला जी नाल सापडली होती. त्यावर, काहीतरी विशिष्ट खून करायला मी विसरून गेलो. 
त्यामुळे, आता ह्या दोन्ही नाला माझ्यासाठी तितक्याच पवित्र आहेत. 

यात्रेहून येऊन, मला आता दोन वर्ष झाली. परंतु, त्यांना अजून काही मी माझ्या घराच्या दरवाजावर किंवा उंबर्यावर बसवलं नाहीये. अनायसे, आता श्रावण महिना सुद्धा सुरु झाला आहे. मला वाटतंय, हीच योग्य वेळ आहे. श्रावणातील पहिल्या सोमवारी हे दैवी कार्य हातून पार पडेल अशी आशा आहे. आणि अशीच, श्रींची सुद्धा इच्छा असावी..
Add caption

Friday, 14 August 2015

चतुराई..


दुपारी, दोन सव्वादोन वाजता..

सुंदरसा चुडीदार घालून, काळेभोर केस पाठीवर मोकळे सोडून, सोबत लाली पावडरचा भपका. आणि, सेंटचा घमघमाट. 
अगदी नटून थटून ती ऑफीस मध्ये आली.
सर्वांना... गोड आवाजात, गुड मोर्निग म्हणाली....!
तितक्यात, त्यातील एकजण तिला म्हणाला,  अहो मेडम, आता तर टळटळीत दुपार झाली आहे. आता कसली आम्हाला गुड मोर्निंग करताय..?
ती, तोर्यातच म्हणाली...

मी, ज्यावेळी ऑफिसमध्ये पोहोचते. ती वेळ, माझ्यासाठी गुड मोर्निगच असते.

आज, तिचा मूड फारच फ्रेश दिसत होता. आणि आज, रोजच्या पेक्षा ती थोडी सुंदर सुद्धा दिसत होती.
सगळे मित्र मंडळी, तिच्या सौंदर्याची तारीफ करत होते..
तेवढ्यात,
तिच्या पाठमोऱ्या भागात जेवण करत असणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याने, 
तिच्याकडे पाहत, तिला एक प्रश्न केला..!

" तुझी केसं का गं इतकी विसकटली आहेत...? "

एक महिला, दुसर्या महिलेला अगदी ताबडतोब ओळखते. आणी, जागच्या जागीच तिला आपली जागा सुद्धा दाखवते..!

बाकी सगळे मित्र, तिझं सौंदर्य पाहण्यातच दंग होते.
त्या बाईचं, वरील वाक्य ऐकताच. सगळे, भानावर आले. आणि, तिने तर तेथून न बोलताच पोबारा केला...!

Tuesday, 4 August 2015

वेळ

सकाळची वेळ, 
उडप्याच्या हॉटेलमध्ये विविध पकवान बनत होते. लोकांच्या गर्दीने हॉटेल अगदी वाहून चाललं होतं. नाश्ता करताना, लोकांच्या हाताची आणि तोंडाची घाई अगदी बघण्यासारखी होती. 
टिंग, टिंग...
कौंटर वरची घंटी वाजली, तसा वेटरने आवाज दिला.. 

सात नंबरपे.. एक वडा सांबर, एक इडली और एक मसाला डोसा...! 

बिलाची पावती लांबसर खिळ्यामध्ये खुपसली गेली.  हॉटेल मालकाची, बिल घेण्याची लगबग चालू होती. शंभराची नोट गल्ल्यामध्ये सरकवली गेली.
मोठ्ठ्या आणि जाडसर तव्यावर बनणाऱ्या डोस्याचा सुवास चौफेर दरवळत होता. त्यावर सोडलेली तुपाची धार, क्या बात.. हे का कमी, म्हणून सांबाराचा मधुर सुवास त्यात कमालीची भर घालत होता. आचारी त्याचं काम अगदी मन लाऊन करत होता. 
ह्या सुमधुर वाफाळलेल्या गंधाने, लोकांची भूक चाळवली गेली नाही. तर, त्याला नवलच म्हणावं लागेल. क्षुधाशांती साठी, प्रत्येक व्यक्तीची पाऊलं नकळत त्या उपहारगृहाकडे वळत होती. 

हॉटेलच्या बाहेर तो सुद्धा उभा होता. अस्ताव्यस्त केसं आणि चेहेर्यावरील वाढलेले दाढीचे खुंट त्याच्या गरिबीत कमालीची भर घालत होते. त्याच्या कपड्यावर, विविध रंगाचे डाग होते. बहुतेक रंगारी असावा. विविध पदार्थांच्या सुगंधाने त्याची भूक सुद्धा चाळवली गेली होती.
आशाळभूत नजरेने, हॉटेलकडे पाहात...
पुन्हा एकवार, त्याने आपला रिकामा खिसा चाचपला. 

आणि, हताश मनाने.. 
दूरवर पसरणाऱ्या पायवाटेकडे तो मार्गस्थ झाला..

Monday, 3 August 2015

आखाड..


आखाडाला आमच्याकडे ( देवाला ? ) कोंबडा द्यायचा प्रघात आहे. 
जवळ-जवळ सगळीकडेच अशी पद्धत रूढ आहे. तसा, तो प्रघात आमच्याकडे सुद्धा चालू आहे. लहानपणापासून मी पाहत आलोय.... 
माझे वडील, बाजारातून एक गावरान.. हो, गावरानच हं ( देवाला.. इंग्लिश कोंबडा चालत नाही. असं, माझे वडील म्हणायचे. ) तो कोंबडा ते खरेदी करून आणायचे. आणि, त्याचा बळी देण्यापासून ते, त्याचे छोटे-छोटे भाग करेपर्यंत सगळी कामं ते स्वतःच करायचे. 

दोन वर्षांपूर्वी, माझ्या वडिलांना देवाज्ञा झाली. 
पण, तोच वारसा आम्ही पुढे चालवत आहोत. हि काय, फार मोठेपणाची बाब नाही. 
पण, आमचे वडील आम्हाला तसं सांगून गेलेत.. 

" बाबांनो, माझ्या माघारी बी ह्यात खंड पाडू नगासा." 

त्यामुळे, आम्ही ती पद्दत तशीच चालू ठेवली आहे. 
काही शाकाहारी मंडळी, किंवा प्राणीमित्र माझ्यावर डूख धरतील. अशा सर्वांची मी एक वेळ माफी मागतो. 

गेल्यावर्षीच्या आखाडात, तोच ( घरगुती ) कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता. आम्ही सगळे भाऊ एकदिलाचे आहोत. त्यामुळे, प्रत्येक जन आपआपलं काम वाटून घेत असतो. 

हौसेने... गतवर्षी, मी कोंबडा विकत आणतो..!  असं, मोठ्या बंधूंना मी सांगितलं.

माझ्या पाहण्यात, तसा एक भरभक्कम कोंबडा आला होता. हा कोंबडा, एवढा  देखणा आणि 'खेळकर' होता. कि, त्यांच्या घरातील.. गोतावळ्यातील एका सुद्धा कोंबडीच्या डोक्यावर.. 
त्याने, एक केस ( पीस ) म्हणून ठेवला नव्हता. 
सगळ्या कोंबड्या, त्याने अक्षरशः 'टकल्या' करून सोडल्या होत्या. 
त्या बाईकडे, एकूण तीस चाळीस कोंबड्या होत्या. आणि, तेवढ्या कोंबड्यानमध्ये हा एकमेव 'हिरो' कोंबडा होता. 
अडीच किलोच्या आसपास त्याचं वजन असावं.
आणि.. आता, माझा त्याच्यावर जीव जडला होता. 
ती बाई, माझ्या ओळखीचीच होती. 
आखाडाच्या महिनाभर अगोदरच, मी तिला त्या कोंबड्या बद्धल विचारलं होतं. 
म्हणाली... साहेब, तुम्हालाच पाहिजे का ? 
मी, हो म्हणालो.. 
म्हणाली, घेऊन जावा. 
मी, कितीला आहे..?  असं विचारलं. 
म्हणाली, काय द्यायचे ते द्या. 
मी, तसं नको म्हणालो... तेंव्हा तिने, लाजत काजत मला.. " सहाशे रुपये द्या असं म्हणाली." 
मी लगेचच ठरलेली सगळी रक्कम, तिच्या हवाली केली. 
आणि, महिनाभर त्याला तुमच्याकडेच राहूद्या.. असं सांगून, मी तेथून निघून गेलो.

आखाड आला,
महिनाभराने, मी तो कोंबडा घ्यायला तिच्याकडे गेलो. 
तेंव्हा मला कळालं... कि, हल्लीच त्यांच्या कोंबड्यावर कोणता तरी रोग आला होता. 
त्यामुळे, त्यांच्या बऱ्याच कोंबड्या मेल्या होत्या. 
पण 'हा' ( कोंबडा ) त्यातून वाचला होता. आणि, निरोगी सुद्धा होता.

वाचतोय कसला, मी त्याला बळी देण्यासाठी घेऊन जायला आलो होतो. 
हा कोंबडा, फारच धष्टपुष्ट होता. त्याला, कारण हि तसच होतं. ती मालकीण, तिच्या सगळ्याच कोंबड्यांना मेथी, शेपू, पालक, कोतमिर, कोबी.. अशा विविध प्रकारच्या भाज्या चिरून खाऊ घालायची. त्यांना, काही म्हणून कमी पडू देत नव्हती. त्यामुळे, सगळ्या कोंबड्या आणि हा कोंबडा अगदी टूमटूमित होते.

त्या बाईच्या शेजारी राहणारी दुसरी एक बाई, गावी जाणार होती. त्यामुळे तिने, तिच्याकडे असणाऱ्या काही कोंबड्या ह्या बाईकडे सांभाळायला दिल्या होत्या. पण त्या बाईने, एक चूक केली होती. 
बहुतेक, तिने असं मुद्दामच केलं होतं. असं मला ती बाई म्हणाली.

तिच्या कोंबड्यांना काहीतरी आजार झाला होता. आणि, तो आजार ह्या कोंबड्यांना लागावा. आणि, तिझ्या सगळ्या कोंबड्या मराव्या. आणि, ऐन आखाढात हिचा सुद्धा व्यवसाय होऊ नये. 
हा त्यामागचा दुष्ट हेतू होता.
आणि त्या रोगामुळे, ह्या बाईच्या बऱ्याच कोंबड्या मेल्या सुद्धा होत्या.. 

मी.. 'तो' कोंबडा घ्यायला आलो आहे म्हणून... 
तिने, त्या कोंबड्याला... काही खाऊ घालण्यासाठी जवळ बोलावलं. तो हि, माणसाळलेला  होता. त्यामुळे, तो लगेच तिच्या जवळ आला. आणि शिताफीने, तिने त्याला पकडून माझ्या हवाली केलं.

मी त्याला, माझ्याकडे असणार्या पिशवीमध्ये कोंबला. आणि, घरचा रस्ता धरला. घरी गेल्यावर, त्याला काय हवंय नको ते घरच्यांना सांगितलं. एका दिवसाचा 'पाहुणा' होता. त्यामुळे, घरच्यांनी सुद्धा त्याची खूप बडदास्त ठेवली. पण, तो कोंबडा काही केल्या अन्नच शिवेना. बहुतेक, त्याला आपलं मरण दिसलं असावं. मला सुद्धा खूप वाईट वाटत होतं.
पण, करणार काय..? 

दुसरा दिवस उजाडला, आणि प्रत्यक्ष बळी देण्याच्या कार्यक्रमाला सुरवात झाली. सोबत, मी सुद्धा होतोच. आणि, एकदाचं काम उरकलं. 

जेवण तयार झालं... नियमाप्रमाणे, सुरवातीला सगळ्या महिला आणि लहान मुलांची जेवणं उरकली. आणि, आमच्या जेवणाची वेळ झाली.

पण मी, त्या कोंबड्याचं मास काही खाल्ल नाही.. त्याची उमदी छबी, माझ्या डोळ्यासमोर उमटत होती.
त्याचं राजबिंडेपण माझ्या नजरेसमोरून हालत नव्हतं.

काही जीव हे, फक्त.. बळी देण्याकारीतच निर्माण झालेले असतात.
ह्या गोष्टीचं, मला राहून-राहून दुःखच होत होतं....

कुतूहल

तेंव्हा... मी, साधारण आठ दहा वर्षाचा असेल

त्याकाळी, करमणुकीचे साधन म्हणजे आमच्या घरी फक्त एक रेडियो होता. चांबडी कव्हर असलेला तो रेडियो कायमस्वरूपी भिंतीच्या खुंटीला अडकवलेला असायचा. त्यावर, माझे वडील त्या काळची जुनी गाणी ऐकायचे. त्यांना, म्हणावा असा छंद नव्हता. पण एकदा, त्यांना सुद्धा मी' एक हॉकीची लाईव मेच ऐकताना पाहिलं होतं. कदाचित, ती भारत-पाक ची मेच असावी. असं मला वाटतंय. आणि मला, चांगलं आठवतंय सुद्धा..
तेंव्हा, टीव्ही नामक 'इडियट बॉक्स' आमच्या घरी नव्हता. तुम्हाला म्हणून सांगतो. त्याकाळी, आमच्या पिंपरी चिंचवड भागामध्ये. टेल्को, म्हणजे टाटा मोटर्स चे कामगार म्हणजे लैच हाय फाय. जसे कि, आत्ताचे आय. टी. सेक्टरवाले..
तर,
अशाच एका हाय फाय टेल्को वाल्या काकांच्या घरी. मी, कृष्ण धवल टीव्ही पाहायला गेलो होतो. त्यावेळी, त्यांचंही नवीनच लग्न झालं होतं. ते खरे, त्यांचे गमती जमतीचे दिवस. आणि त्यात, खोगीर भरती म्हणून टीव्ही पाहायला आमची पिलावळ त्यांच्या घरी जमा असायची. आणि, त्याकाळी कोणाला नाही म्हणायची सुद्धा सोय नव्हती. कारण, तो.. 'तो' जमाना होता..
तर, झालं काय..
एकदा त्यांच्या घरी, मी टीव्ही पाहात बसलो होतो. ( सुरवातीला लोकं टीव्ही पाहतोय असंच म्हणायचे. बहुतेक अजूनही म्हणत असावीत. ) 
आणि, नेमका जाहिरातीचा ब्रेक आला.... 
जाहिरात लागली. ती जाहिरात सुद्धा, नेमकी 'निरोध' ची होती. ती वस्तू काय आहे. ते मला समजेना. शेवटी, माझा चिकित्सकपणा जागृत झाला. आणि मी, त्या काकांना विचारलच..
काका.. हि कसली जाहिरात आहे..?
माझ्या ह्या प्रश्नावर, काका सुद्धा अवाक झाले. एकवार, त्यांनी त्यांच्या सहचारणीकडे पाहिलं. आणि, म्हणाले..

अरे, तो एक खराब साबण आहे. तो, आपण वापरायचा नसतो..!

शेवटी, माझं ते बालमनच....
मी सुद्धा, लगेच मान हलवली. आणि, तो किस्सा तिथेच संपला.

कालांतराने, ती वस्तू काय होती..?  त्याची, पुरेपूर माहिती मला मिळाली. 

हल्लीच टीव्हीवर एका अंडर गारमेंटची जाहिरात खूप जोरात चालू आहे. ती जाहिरात पाहून, माझी बायको मला म्हणाली. 
ह्या जाहिरातीवर बंदी का आणत नाहीत..?
मी तिला म्हणालो...
आता सगळ्यांना सगळं काही कळतंय. तर, हे जाहिरातवाले कशाला माघार घेतील. व्हीसपर ची जाहिरात सुद्धा जोरात चालू आहे. जाहिरातीत वापरलेल्या लिक्विडचा रंग फक्त निळा दाखवत आहेत. पण, आपण समजून जातोच ना..! त्यात काय नवीन आहे. जमाना खूप बदलत चालला आहे..

त्यानंतर...
नेमकी आत्ता मध्यंतरीची गोष्ट....

मी, माझ्या एका मित्राच्या घरी बसलो होतो. अर्थात, समोर टीव्ही चालू होताच. आणि, त्यावेळी नेमकी तीच अंडर गारमेंट्सची जाहिरात लागली. माझ्या मित्राचा मुलगा साधारण आठ नऊ वर्षांचा असेल. माझ्याशी, तो अगदी बिनधास्तपणे वागत असतो. त्यामुळे, त्या मित्राच्या मुलाने मला सहजच विचारलं.... 

काका... उडत-उडत आलेली ती चड्डी त्या दुसऱ्या चड्डी शेजारी कशी काय पडली..? आणि, पडली तर पडली. ती त्या, दुसऱ्या चड्डीच्या शेजारी अपोआप कशी काय सरकली..?

आता, माझी आवाक व्हायची वेळ होती...
काय करावं, आणि काय सांगावं..?
फार मोठा गहन यक्षप्रश्न माझ्यासमोर उपस्थित झाला होता.
उत्तर तर द्यावंच लागणार होतं. शेवटी, उसनं अवसान आणून मी त्याला म्हणालो..

अरे चड्डी-चड्डी मित्र असतात ना..! त्यामुळे, ती चड्डी त्या चड्डीच्या जवळ गेली असेल.

माझ्या उत्तरावर, त्या बारक्याने सुद्धा लगेच मान डोलावली.
माझं खोटं पचून गेलं होतं. 
अगदी, लहानपणीच्या त्या साबणाच्या जाहिराती प्रमाणे. शेवटी, मला सुद्धा समजूत काढावीच लागली होती. काही गोष्टी, फिरून-फिरून आपल्यासमोर प्रकट होत असतात.
तेंव्हा मी लहान, आता तो लहान आहे.

नंतर कळेलच कि त्याला. त्या जाहिरातीत, नेमकी काय गम्मत होती ते.