आयुष्याच्या ऐन मध्यानीत...
दारू पिऊन जर्र जर्र झालेलं शरीर. लहानपणी दुडूदुडू धावलेली पावलं. आता, एका इतेच्या पुढे सुद्धा झेप घेत नव्हती. इतकं भयंकर थकलेलं शरीर.
ऑफिसमध्ये झाडू पोछा करायचा. आणि दिवसभर, एका खुर्चीवर बसून राहायचं. बिडी शिलगावली, कि तात्पुरती ब्रम्हानंदी टाळी लागायची. सोबत थरथरत्या हाताच्या, दोन बोटात धरलेल्या बिडीचा ओठा पर्यंतचा प्रवास अगदी स्लो मोशन मध्ये असायचा. ओठातून पोटात गेलेला धूर सुद्धा, लवकर बाहेर पडायचं नाव घेत नव्हता. असली भयंकर परिस्तिथी.
काही खास आजार नसल्यामुळे, मेडिकल अनफिट करता येत नाही. कारण, हे व्यसनाने ओढवलेल आजारपण. काही नाही तर, दर महिन्याचा चार आकडी पगार मिळतोय. म्हणून, घरच्यांनी कामावर जाण्याकरिता. त्याच्यासाठी, वर्दीची एक रिक्षा लाऊन दिली आहे. जी त्याला, नित्यनेमाने कामावर नेऊन सोडते. आणि, घरी सुद्धा घेऊन येते.
कोण जाने का.. पण आज त्याला, घरी जायचे खूप वेद लागले होते. त्याने, रिक्षावाल्याला फोन सुद्धा केला होता. पण, तो काही अजून आला नव्हता. मी त्याला सहज विचारलं.
आज का म्हणून लवकर जायचंय..?
काम आहे...!
बस्स्स....
बोलायला सुद्धा अगदी त्याच्या जीवावर येतं. कारण, अंगात त्राणच नाहीये..
काल गुरुवार होता. पिंपळाच्या झाडाखाली असलेल्या, पंच महाभूताच्या दगडी मूर्तीसमोर नारळ वाढवला होता. मूर्तीला हार फुलं वाहिली होती. एकंदरीत प्रसन्न वातावरण होतं.
भिंतीचा आधार घेत.. हळूहळू मुंगी पावलाने, माझ्यासमोरून तो मूर्तीच्या दिशेने पुढे चालत गेला. मला वाटलं.. तो दुसरीकडे कुठेतरी निघाला असेल. पण नाही, त्याच्या चालण्याचा रोख मूर्तीच्या दिशेनेच होता.
माझ्या मनात, विविध प्रश्न निर्माण होऊ लागले..
कधी नाही तो, आज हा देवाकडे कसा काय निघाला आहे..? देवाकडे, आता तो काय मागणी करणार असेल..? एक ना हजार प्रश्न डोक्यात पिंगा घालू लागले..
आणि एकदाचा, तो त्या दगडी मुर्तीपाशी जाऊन पोहोचला. त्याच्या पायात, चप्पल तशीच होती. ती काढण्याचे मुळी त्राणच त्याच्या अंगात नव्हते. थोडा वेळ शांतपणे मूर्तीच्या कट्ट्यापाशी उभा राहात. त्याचा थरथरता हात, मूर्तीच्या पायापाशी गेला.
मनातून, मी सुद्धा थोडा वेळ हळवा झालो. मनात म्हणालो.. देवा ह्याला काय हवं असेल ते द्या, त्याची इच्छा पूर्ण करा..
आणि त्याचा हात, त्या मूर्तीच्या पायापाशी गेला. थरथरत्या हाताने देवाच्या पायापाशी ठेवलेल्या खोबऱ्याच्या पाच तुकड्यांपैकी एक तुकडा त्याने अलगत उचलला. स्वतःच्या मुखात टाकला. आणि, खोबऱ्याचा तुकडा चावत चावत माझ्या समोरून तो निघून गेला..!

No comments:
Post a Comment