मी, दहावीला असताना...
आमच्या घरा शेजारील, एक डबलरूम रिकामी होती. म्हणजे अजूनही आहे. त्यावेळी, भाडेकरू वगैरे असला खास प्रकार नव्हता. कारण, पुण्यामध्ये येणारे बाहेरचे लोंढे तसे फार कमीच होते. आणि जे कोणी होते. ते, आपापली स्वतःची घरं घेऊन राहत होते. त्यामुळे, ती रूम रिकामीची होती. पण, सगळ्या जीवनावश्यक वस्तूने अगदी खचाखच भरलेली होती.
रोजची वहिवाट असलेली बरी, ह्या उदेशाने त्या घर मालकाने ती रूम मला अभ्यासासाठी म्हणून दिली होती. मी सुद्धा, दोन चार मित्र जमा केले. आणि आमची तिथे अभ्यासिका सुरु झाली. कधी कधी आम्ही, रात्री उशिरापर्यंत तिथे अभ्यास करायचो. आणि, थकून भागून तिथेच झोपी जायचो. त्यामुळे, कधी-कधी घरातील लाईट रात्रभर तशीच चालू राहायची. घरचेही आम्हाला उठवून लाईट बंद करायची तसदी घेत नसत.
एकदा, आम्ही त्या अभ्यासिकेत काही गेलोच नाही. जो तो, आपापल्या घरीच होता.
नेहेमीप्रमाणे, त्यादिवशीही माझे वडील पहाटे पाच वाजता उठले. घराच्या पायरीवर बसून, तंबाखूचा विडा मळत होते. सोबतच, त्यांचं खाकरनं सुद्धा चालू होतं. चुनामिश्रीत तंबाखूची फक्की त्यांनी तोंडात कोंबली. आणि, त्यांचं लक्ष त्या रूमकडे गेलं. रूमची लाईट सताड चालू होती. मनातल्या मनात त्यांनी, आम्हाला दोन चार अस्सल गावरान शिव्या हासडल्या.
कारण, ते शिस्तीचे खूप भोक्ते होते.
सकाळ झाली, मोठ्या वहिनी अंगणात सडा रांगोळी करत होत्या. आणि नेमकं, त्यांचं त्या रूमकडे लक्ष गेलं. रुमचा कडी कोयंडा कटावणीने कटवला होता. मलूल अवस्थेत, कुलूप पायरीवर लोटांगण घालत पडलं होतं. हे दृश्य पाहून, वहिनी धावतच घरात आल्या. आणि, माझ्या वडिलांना हा समाचार सांगितला. क्षणार्धात आम्हा सगळ्यांचा मोर्चा, त्या शेजारील घराकडे वळाला.
घरात चोरी तर झाली आहे. पण, घरातील काय आणि किती मुद्देमाल गेला असेल. ते कळणार कसं..?
कारण, ते घरमालक पुण्यात राहायला होते. आणि त्यावेळेस, आमच्याकडे आणि त्या घर मालकाकडे फोनची सोय सुद्धा नव्हती.
नाही म्हणता, जवळ-जवळ सगळ्याच संसार उपयोगी वस्तू त्यांच्या घरामध्ये होत्या.
शेवटी... आम्ही सगळे जन, त्या घरात गेलो.
आणि समोरचं दृश्य पाहून आम्ही सारेच भांबावून गेलो. त्या चोराने, गेस शेगडी पेटवून त्यावर चहा उकळला होता. आणि त्याने, चहात पोहे भिजवून खाल्ले होते. चहाच्या पेल्यात, पोह्याचे चहा मिश्रित तुकडे आणि चमचा तसाच पडून होता. त्याच्या सगळ्या खुणा अगदी स्पष्ट जाणवत होत्या.
त्या घरातील, जास्ती माहिती मलाच होती.
म्हणून, मी चौफेर नजर मारली. घरातील खास काही गेलं नव्हतं.
त्या चोराने, काय नेलं असावं..?
स्टीलचा एक तांब्या, पेला, एक उशी, आणि सोबत अंगावरची चादर...!
झालं... विषय तिथेच मिटला.
आम्ही, पुन्हा त्या घराला नवीन कडी कोयंडा बसवून घेतला. पण, मला काहीच कळेना. येवढ्या मोठ्या घरात, तांब्या पितळेची भांडी असताना. त्या चोराने काहीच कसं नेलं नसावं..?
त्याची उकल, मला बरेच दिवस झाली नाही..
पण, नंतर माझ्या लक्षात आलं. अपुऱ्या पावसामुळे, त्यावर्षी सुद्धा दुष्काळ पडला होता. कोणीतरी खेडे गावातून आलेल्या व्यक्तीने पोटाच्या खळगी करिता हे भीषण कृत्य केलं असावं.
काही नाही तर,
किमान एखाद्या आडोशाला पडून राहता येईल. अशा उद्देशाने, त्याने घरातलं पांघरून नेलं असावं. आणि, एखादं भांडं सोबत असावं म्हणून तो तांब्या अन पेला नेला असावा..
परमेश्वरा.... दुष्काळ नको रे बाबा..
No comments:
Post a Comment