Friday, 30 October 2015

आमच्याकडे, कष्टाची कामं करणारी...
म्हणजे, रोडवर खड्डे खांदणारी. काही, ठेकेदारीत कामं करणारी कामगार मंडळी आहेत. ते सकाळी जेंव्हा कामावर येत असतात. तेंव्हा, त्यांच्या सायकलच्या नळीला जेवणाचा 'चार थाळी' डबा दोरीने घट्ट बांधून आणलेला असतो. 
असे, आमच्याकडे दोन चार कामगार आहेत. घरून कामावर येईपर्यंत, ते आपल्या जेवणाच्या डब्याचं लोकांना यथेच्छ दर्शन घडवत असतात. त्यात त्यांना, कोणताच कमीपणा वाटत नाही. कारण, फक्त त्यांनाच माहित आहे. कि, हे जे काही चाललं आहे. 
ते फक्त, ह्या  'पोटासाठी' चाललं आहे. 
आणि, त्यासाठी कसली 'लाज' आली आहे. त्यांचे, भरलेले जेवणाने डबे पाहून, 

कधी-कधी माझी मला स्वतःचीच लाज वाटते. 

माझ्याकडे, जेवण गरम ठेवणारा मिल्टनचा तीन थाळी डबा आहे. त्याला, सोबत घेऊन जाण्यासाठी एक पंधराशे रुपयाची ब्याग आहे. 
आणि, त्या डब्यात जेवण असतं काय..?
तर, दोन चपात्या एखादी सुक्की पालेभाजी. आणि, घरात शिल्लक असेल तर एखादा गोड पदार्थ. 

भाजी सांडून, ती किमती ब्याग खराब होऊ नये. म्हणून, माझी बायको डब्याला पात्तळ भाजी देत नसते. जवळ-जवळ, सगळ्यांच्या घरी हीच कथा असावी. त्यामुळे, जेवताना भाजीला चपाती अगदी टोचून-टोचून खावी लागते. हरपून-वरपून जेवण काही होतच नाही हो..

तर.. या मंडळीचा सकाळी कामावर आल्यावर पहिला उद्योग असतो. तो म्हणजे, भरपेट न्याहारी..
कोठीतल्या फरशीवर, वर्तमान पत्राची पथारी मांडून. हि चार पाच जणं, सकाळी दहा वाजताच आपापले डबे उघडतात. 
तेंव्हा समोरच...
लाल भडक तर्रीबाज पात्तळ भाज्यांचं दर्शन मला घडतं. सोबत, चपाती किंवा भाकरीचा भला मोठा ढीग. पांढरा शुभ्र भात. मिरचीचा ठेचा, लोणचं, विविध चटण्या, लाल भडक कांदा, मुळ्याचा एखादा तुकडा..
हे सगळे जिन्नस पाहून, खरोखरच माझ्या तोंडाला पाणी सुटतं. पण, ती लाळ मला आतल्या आताच गिळावी लागते. मग हे सर्व जन, त्या भोजनावर असे काय तुटून पडतात. 
कि, बास रे बास..
धापकण.. एका बुक्कीत लालेलाल कांदा फोडला जातो. सगळ्या भाज्यांची देवाणघेवाण होते. आणि, भाजीमध्ये चपाती किंवा भाकरी कुस्करून यांचा भोजनाचा कार्यक्रम सुरु होतो. 
मस्तपैकी, मजा मस्करी करत यांचं जेवण सुरु असतं. 
यांचं जेवण जेंव्हा संपतं... 
तेंव्हा... " तृप्तीचा ढेकर काय असतो. " तो, ऐकायला मिळतो. 

कधी-कधी वाटतं. यांना सांगावं, आज मी तुमच्या घरी जेवायला येतोय. मस्त पैकी, माझ्यासाठी चुलीवरील भाजी, भाकरी, भात बनवून ठेवा म्हणून. 
खरोखरच, यांच्या बायका खूप सुगरण असणार आहेत हो. कारण, त्या आपल्या पतीला खर्या अर्थाने जाणत असतात. कि ह्याला, दिवसभर उन्हात खड्डे खांदून त्याचा घाम गाळायचा आहे. त्या पद्धतीत, त्याला भरपेट आणि पोषक आहार सुद्धा मिळायला हवाय. त्याकरिता, 

त्या 'लक्ष्म्या' पहाटे कधी उठून स्वयपाकाला लागत असतील. 
ते, त्यांनाच ठावुक..
  
खरच.. ह्या लोकांची हातावरची पोटं असतात. 
पण ते, 

" खर्या अर्थाने, पोटासाठी जगत असतात."

नाहीतर... आपलं तर, रोजचंच आहे... 
फक्त, 

" पोळी आणि भाजी..! "

Thursday, 29 October 2015

आपला नवरा, किती फास्ट पळू शकतो पाहायचंय..?
फक्त जोरात ओरडा , फोन वाजतोय उचलु का..? 

गेली, तीन चार दिवस झाले. हा विनोद मला बऱ्याच महिलांच्या भिंतीवर पाहायला मिळतोय.
परंतु, हा विनोद काही माझ्या पचनी पडत नाहीये...!

कारण...

अशी लफडी करणारे महाभाग, खूप चतुर प्राणी असतात. एकतर, यांच्या 'तिकडून' येणाऱ्या किंवा जाणाऱ्या फोनच्या वेळा पक्क्या ठरलेल्या असतात. शिवाय, त्यांचे 'असले' फोन नंबर मोबाईल मध्ये विशिष्ट अशा नावाने सेव असतात. त्यामुळे, ते लवकर कोणाच्या लक्षात सुद्धा येत नाही.

सगळ्यांच्या माहिती साठी.. उदा :- तुकाराम प्लंबर. घरगुती बाई, त्या प्लंबर शी बोलायला उत्सुक असणार आहे का..? 

देखो..ये लगा सिक्सर. इथेच त्यांची गेम सक्सेस होऊन जाते.

कितीही टोकाचं संकट आलं तरी सुद्धा. ठराविक वेळेची मर्यादा पाळत. ते कधीच, एकमेकांना फोन करणार नाहीत. लागलं तर, दुसऱ्या दिवशी भेटून कालचा प्रसंग कथन करतील. एकेमेकाचा जीव घेतील. पण, आणीबाणीच्या काळात त्यांच्या कडून कधीच गफलत होणार नाही. एवढं सगळं पाळलं, तरच यांचे खरे खुरे संसार मार्गी लागतात. नाहीतर...

वानगीदाखल, एक उदाहरण पेश करतो...

माझा एक अतिशय देखणा मित्र होता. दिसायला देखणा असल्यामुळे, अर्थातच त्याची सुद्धा बाहेर बरीच 'प्रकरणं' होती. एक प्रकरण तर, अगदी त्याच्या घरापासून दोन चार घरं सोडूनच होतं. हा सुद्धा विवाहित, आणि ती सुद्धा. एक विश्वासू सहकारी म्हणून, त्याने माझी त्या महिलेशी ओळख सुद्धा करून दिली होती. 

एकदा अचानक... वयाच्या चाळीशीतच माझ्या मित्राला हृदयविकाराचा झटका आला. आणि, तो त्यातच गेला. ऐन तारुण्यात, त्याचा संसार उघड्यावर पडला होता. त्याची बायको, त्याच्या कलेवरावर धाय मोकलून रडत होती. बऱ्याच महिला तिची मनधरणी करत होत्या. 
त्या गर्दीमध्ये, ती सुद्धा अगदी त्याच्या कलेवराच्या शेजारीच उभी होती. त्याचं, निस्तेज कलेवर पाहून, तिचं काळीज सुद्धा आतून तीळतीळ तुटत होतं. तिला सुद्धा, मनभरून मोकळं ढाकळ रडावसं वाटत होतं. त्याच्या निश्चल देहाला स्पर्श करावासा वाटत होता. 
पण.. ते शक्य होतं का..? 
नाही, शेवटपर्यंत तिला तिचं मन मारावच लागलं होतं. कारण, प्रेम करणारा तर केंव्हाच निघून गेला होता. आणि, तिझ्या समोर तिचा अक्खा संसार पडला होता.

लोकांच्या नजरेत, एक खरा शेजारधर्म म्हणून ती रडत होती. पण खरं पाहायला गेलं तर, ती तिचं खरं प्रेम व्यक्त करत होती. तोंडाला, साडीचा पदर लाऊन हमसू हमसून रडून मन मोकळं करत होती. मात्र त्यावेळी, तिला सावरायला एक सुद्धा हात पुढे येणार नव्हता. हे तिझं दुर्दैव होतं. तिच्यावर सुद्धा, संकटाचा फार मोठा घाला झाला होता. पण, तो 'अनधिकृत' होता.. 

हे मात्र, माझ्याशिवाय कोणाच्या लक्षात सुद्धा येऊ शकलं नाही.

Wednesday, 28 October 2015

मध्यंतरी, मी कोणाच्या पोस्टवर वाचलं. ते मला, आता नेमकं आठवत नाहीये. 
परंतु... विषय,
" फक्त एक रुपायाचा होता. " 

जो मोठमोठ्या मॉल मध्ये  " एकशे नव्व्याणव "  च्या रूपाने, एक 'रुपाया' राखून. आपल्याकडून अलगद आणि नकळत चोरला जातो.

बहुतेक, अमर घाटपांडे भाऊ यांचा तो विषय होता. 

तर, पोटापाण्या करिता आजवर मी बरेच व्यवसाय आणि नोकऱ्या केल्या आहेत. 
पूर्वी मी... त्यांना 'धंदा' किंवा 'काम' म्हणायचो. 
पण कालांतराने.. जसजसा मी व्यक्त होऊ लागलो. तसे, मला ते शब्दप्रयोग काही ठीकसे वाटले नाहीत.  त्यामुळे, मी लेखणीच्या पूर्वपदावर आलो...

तर, सुरवातीच्या काळामध्ये.. 
मी... भोसरी एमआयडीसी मध्ये, हेल्पर पासून ते थेट सुपरवायझर पर्यंतच्या बऱ्याच नोकऱ्या केल्या आहेत. त्यानंतरच्या काळामध्ये, केवळ पैसे जास्ती मिळत आहेत. म्हणून, इच्छा नसताना सुद्धा मी ड्रायव्हर हा पेशा पत्करला. खरं तर, त्यावेळी त्यात काहीएक स्थैर्य नव्हतं..
कारण, 
त्यावेळी... माझे, नुकतेच दोनाचे 'चार' हात झाले होते. आणि, घरदार सोडून एकटच बाहेर भटकायचं. मला काही पटत नव्हतं. म्हणून.. मी तेंव्हा, तात्पुरता त्या कामाला पूर्णविराम दिला..

तर.. १९९८ साली, 
मी, एक पानपट्टी चालवायला घेतली होती. त्या व्यवसायातलं, मला काहीएक माहित नव्हतं. पण, मी त्यात उडी मारली. आणि, सक्सेस सुद्धा झालो. पहिल्या दिवसापासुनच, माझ्या व्यवसायात मला बढती मिळू लागली. मस्त पैकी, चक्कर आणणारं एकशे वीस- तीनशे, विथ किमाम पान लावायचो. त्याकाळी, माझा रोजचा... सतरा, अठराशे रुपयांचा गल्ला होता. नाही म्हणता, बर्यापैकी मिळकत होती...

ह्या रकमेला तुम्ही कमी समजू नका बरं का.. त्यावेळी, हि लैच मोठी रक्कम होती.

तर, या मिळकतीत अजून कशी बरकत होईल...!  या विचारात, मी होतो..
आणि, मला एक सुंदर कल्पना सुचली....

पानपट्टी मध्ये येणारं गिर्हाईक... 
कोणी पान घ्यायचं, तर कोणी सिगारेट, तर कोणी गुठ्का, तर कोणी काय....
आतासारखीच, त्यावेळी सुद्धा मोठ्या प्रमाणात नाणे टंचाई होती. कि, ती मुद्दाम घडवून आणली जात होती. 

" ते मला, चांगल्या प्रकारे माहित आहे.. "

तर त्यावेळी, 
माझ्या गल्ल्या मध्ये. एकाच ड्रावर मध्ये दोन कप्पे बनवले गेले होते. खालील भागात, नोटा ठेवायच्या. आणि, वरील भागात. एका चपट्या लाकडी फळीवर, सहा मोट्ठे होल करून त्यात स्टीलचे पेले ठेवलेले असायचे. त्यामध्ये.. चाराने, आठाणे, रुपाया, दोन रुपये, पाच रुपये...
अशी नाणी, मी ठेवायचो...

काहीवेळा, गल्ल्यांमध्ये एकही नाणं शिल्लक नसायचं. अशावेळी, माझी फार पंचायत व्हायची. आता, समोरच्या व्यक्तीला उरलेले पैसे परत करायचे कसे..?
त्यावेळी... बोळवण म्हणून, मी चाराने शिल्लक राहिले असतील. तर, एखादी बडीशेप ची पुडी द्यायचो. आठाणे शिल्लक असतील, तर कॉफी बाईट नावाचं एखादं चॉकलेट द्यायचो.
 
माझ्या ह्या कृतीवर... गिर्हाईक काही एक न बोलता. जे मिळेल ते घ्यायचे. आणि, निमूटपणे निघून जायचे. कालांतराने, हि बाब माझ्या लक्षात आली.

" कि, कोणीच, काहीच बोलत नाहीये...! "

तेंव्हापासून, मी माझ्या गल्ल्या मध्ये.. हि, किरकोळ नानी ठेवायचीच बंद केली. 
चाराने, आठाणे, रुपाया आला. कि, लगेच त्यांना वेगळीकडे एका प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून द्यायचो. आणि, गल्ल्याम्ध्ये.. 

" कृत्रिम नाणे 'टंचाई' निर्माण करायचो. "

तरी सुद्धा... काही 'खोडसाळ' गिर्हाईकं म्हणायचेच...

नको, नको... हे नको, पैसे द्या...!

अशा वेळी, मी त्यांना सरळ माझा गल्ला उघडा करून दाखवायचो.
आणि, सोज्वळपाने म्हणायचो...!

मला काय हौस आली आहे का, तुम्हाला बडीशेप आणि चॉकलेट द्यायला..?
सुट्या पैश्यांचे फार वांदे आहेत राव.. 

आता, रिकामा गल्ल्लाच पाहिल्यावर. समोरची व्यक्ती तरी काय म्हणणार आहे हो..!

तुम्हाला खोटं सांगत नाहीये...
त्याकाळी, महिन्याकाठी... चाराने, आठाणे, रुपाया, आणि पाच रुपये. अशी बाजूला टाकलेली चिल्लर नाणी जमा करून. मी, महिन्याला जवळ-जवळ पाच ते सहा हजार रुपये बाजूला टाकायचो...
बाकी... रोजचा नफा वेगळाच...

पैसे कमवायला... खरच अक्कल लागते हो. आज जर, मी त्या पानपट्टीवर असतो. तर खूप श्रीमंत माणूस झालो असतो. पण, नेमकी त्याच वेळी मला पुणे महापालिकेची नोकरी मिळाली. 
आणि, मी व्यवसाय करत असलेली ती जागा. आणि, ती भाड्याची पान टपरी सुद्धा काही कायमस्वरूपी नव्हती. म्हणून, मी तो मोह आवरता घेतला.

परंतु, अजून सुद्धा माझ्या मनात आहे बरं का...
जमल्यास.. भविष्यात मी एखादं फाईव्ह स्टार पानपट्टीचं दुकान टाकणार आहे. 
त्या.. नफेखोर चिल्लर करता नाही... 
तर... पान खाल्ल्यावर,

सगळ्या स्त्री पुरुषांच्या 'चोची' लाल झालेल्या पाहाताना मला खूप छान वाटतं.  

 
आज बऱ्याच दिवसांनी,
चिकनच्या दुकानात जाणं झालं. लोखंडी जाळीच्या पिंजर्यात, दाटीवाटीने बसलेल्या पांढऱ्या शुभ्र ब्रॉयलर कोंबड्यांची एकसारखी चिवचिवाट चालू होती.
एका सुद्धा कोंबडीला, दुसरी कोंबडी काय बोलतेय...! त्याची, अजिबात खबरबात नसेल.
इतका, भयंकर कालवा चालू होता.
पांढऱ्या रंगाला कधीच त्यागलेली... जाळीची टोपी घातलेला सय्यद. त्याच्या, दणकट बाहू आणि मनगटाच्या सहाय्याने. कळकटलेल्या, ओशट लाकडाच्या ओंडक्यावर. मन लाऊन, चिकनचे एकसारखे छोटे-छोटे तुकडे करत होता..
दुकानाबाहेर, तिरक्या नजरेने मला पाहताच.. माझ्याकडे, एक मंदस्मित मिश्रित कटाक्ष टाकत. एकाच दमात तो मला म्हणाला..
" क्या पंडित भाय, बहोत दिनो के बाद आणा हुवा...! हो गया... सब खतम हो गया क्या..?
" हो.... संपले एकदाचे सगळे धार्मिक कार्यक्रम.. आता, नेहेमीच यावं लागेल तुझ्याकडे.
" बोलो...!
" कर बाबा आपलं नेहेमीचंच...!
ए.... पंडित भायके लिये एक देड किलोकी जिंदा मुर्गी निकाल. और, कोल्ड्रड्रेस्ड बना जल्दीसे..!
हुकमाच्या ताबेदाराने, दीड किलो वजनी कोंबडीच्या मानेवर सर्रकन सुरी फिरवली. आणि, पांढरी शुभ्र कोंबडी लालभडक होऊन सय्यद समोर येऊन पडली.
" बोल... क्या करू..?
" बना ना... बिर्यानिके लिये बना...!
ठाक, ठाक, ठाक करत...सय्यदच्या सराईत हाताने. आख्या कोंबडीचे बिर्याणी साठीचे एकसारखे तुकडे केले गेले. कलेजी आणि पत्री एका वेगळ्या पिशवीत बांधली गेली.
पैश्यांची देवाणघेवाण उरकली.
आणि... ती काळी पिशवी, त्याने माझ्या ताब्यात दिली..
आता, पुढील काम माझी सौभाग्यवती उरकेलच...
अरे हो... आणि, ते सांगायचं राहिलंच कि..!
हाहाहाहा.... समजलं असेलच तुम्हाला. तुम्ही सुद्धा, आता फारच सराईत झाला आहात.
चांगभलं....!

Tuesday, 27 October 2015

माणूस 'मोकळा' आहे. 
आणि, 
स्त्री 'बांधील' आहे. 
दुर्दैवाने..


हि आपली, समाजव्यवस्था आहे.

दारू पिनारांसाठी, 
गटारी 'अमावास्या' असते..

त्याचप्रमाणे...

दुध पिनारांसाठी, 
कोजागिरी 'पौर्णिमा' असते.

Monday, 26 October 2015

घरामध्ये... घरकामाला एखादी बाहेरची बाई असावी...!

हि संकल्पना, मला कधीच पटली नाही. आणि, पटणार सुद्धा नाही. आपण, स्वतःहून जे काम करू. ते, बाहेरची कामाला असलेली बाई. तितकंच मन लाऊन, करू शकनार आहे का...?
याबाबत, माझ्या मनामध्ये बऱ्याच दुविधा आहेत. आणि, त्या रास्त सुद्धा आहेत...
( काही, सरकारी किंवा अन्य ठिकाणी कामाला असणाऱ्या महिलांना वगळून हा विषय आहे. ) 

परंतु, दुर्दैवाने... आज, माझ्या घरी सुद्धा एक कामवाली बाई आहेच.
काय करता..!
तसं पाहिलं तर.. हा, फार मोठा आणि गंभीर विषय आहे. आणि, हा प्रकार नेमका कशामुळे घडतो. त्याचं स्पष्टीकरण मी खाली देत सुद्धा आहे.
काही गोष्टींना पर्याय नसतोच. माझ्या बायकोचा फोटो तुम्ही पाहिला असेलच. ती वजनी गटात मोडत असल्यामुळे. हल्ली तिला, हि सोप्या पद्धतीची अवजड कामं करता येत नाही. 


( यामध्ये सुद्धा, काही गंभीर आजारपण असलेल्या महिलांना मी वगळत आहे.. )

तर... दहा एक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे..
माझ्या बायकोचा स्वभाव सुद्धा माझ्यासारखा मनमोकळा. आणि, तेंव्हा वजनाने सुद्धा ती अगदी हलकी फुलकी होती. असो... तो विषय निराळा आहे.

सवयी प्रमाणे, ती आल्यागेल्याची विचारपूस करणार. कोणाही महिलेशी थांबून दोन शब्द बोलणार. हि, तिची आवड. अगदी, मनमिळाऊ आहे माझी बायडी.
तर, त्याकाळी... ( साधारण, दहा वर्षांपूर्वी )

एक, धुणीभांडी करणारी महिला. माझ्या बायकोला म्हणाली.  
दीदी... तुमच्या घरी सुद्धा मला काहीतरी काम द्या कि हो.. 
तर, हि म्हणाली..
नको हो.. आमच्या ह्यांना ते आवडत नाही. घरातील कामं मी केली तरच यांना पटतात. 
नाहीतर, ते फार रागावतात.
नंतर बोलता-बोलता.. माझी बायको, त्या कामवाल्या बाईला म्हणाली. 
तुम्ही तर, दहा बारा घरची कामं करता. तीच दिवसभर तुम्हाला होत नाहीत. तर मग, अजून कशाला कामाचा जास्तीचा व्याप करून घेताय..?
तर, ती कामवाली बाई म्हणाली...
दीदी, मला कामं भरपूर आहेत हो..! पण हि लोकं, वेळेवर आमचे पैसे देत नाहीत ना.. 
म्हणून तर, हि सगळी उठाठेव करावी लागतेय...
हे बघा... आत्ताच मी 'त्या' घरातून काम करून आले. तीन महिने झाले, पण त्यांनी अजून मला पगार दिला नाही. आता, सांगता कोणाला..?
त्यावर...माझी बायको, भोळसरपने त्या कामवाल्या बाईला म्हणाली...
त्यांना काहीतरी 'अडचण' असेल हो.. देतील ते तुमचे पैसे, चुकवणार नाहीत. आणि, तशी वाईट लोकं पण नाहीयेत ती. 
तर, ती बाई म्हणाली.. कसली 'अडचण'..?
रोज सकाळी.. यांचं घर साफ करावं, 
तर... त्यांच्या खाटेखाली दारूची एक मोकळी बाटली पडलेली असतेच. तिच्या नवऱ्याला, रोज दारू ढोसायला पैसे आहेत. आणि, आम्हाला द्यायला नाहीत..!

खरोखर... हि वस्तूस्थिती आहे....
काही लोकं, मोठेपणा म्हणून घरात कामाला बाई ठेवतात. आणि, वेळेवर त्यांचे पगार करत नाहीत. त्यांची छळवणूक आणि पिळवणूक करतात..
याला, काहीच अर्थ नाहीये हो.. 

मी काही, फार मोठा जहागीरदार माणूस नाहीये. पण, आमच्या कामवाल्या मावशीला. आम्ही, त्यांची महिन्याची ठरलेली रक्कम तर अगदी वेळेवर देतोच. 
त्याउपर, त्या मावशी अधेमधे आमच्या हिला पाच पन्नास रुपये मागत असतातच. 
त्याचा मात्र, आम्ही कधीच हिशोब ठेवत नसतो.
काय करता... 
उद्या... माझ्या घरात, घर साफ करताना. त्या मावशीला, चुकून दारूची एखादी रिकामी बाटली सापडली. तर, काय करता..? आणि, कोणाला बोलता...!
खरं पाहिलं तर, तसं काहीच होऊन शकत नाहीये. 

कारण, त्या रिकाम्या बाटलीचा मी स्वतःच ताबडतोब बंदोबस्त करत असतो.

उगाच कशाला, आपल्या आब्रूचं खोबरं करून घ्या..?

साडी खरेदी..


आजपर्यंत, मी शंभर वेळा तरी ठरवलं असेल. कि, बायकोबरोबर साडी खरेदी करायला जायचंच नाही.
पण साला, काय होतं काय माहित नाही.
ती मला, काही तरी पट्टी पाडते. आणि, साडी खरेदीला घेऊनच जाते.
आणि, नेहेमीच्याच त्या पकाऊ कार्यक्रमाला सुरुवात होते.
भैय्या .... वो, साडी दिखावो... ! नही, वो वाली दिखावो...!
यांना, साडी तर एकच घ्यायची असते. परंतु, पाच-पन्नास साड्यांचा ढीग जोवर यांच्या समोर पडत नाही. तोपर्यंत, याचं समाधान काही होत नाही.
मला, खरी कमाल तर त्या सेल्समनचीच वाटते. बिचारे, खरच त्यांना 'बिचारेच' म्हणावं लागेल.....
काहीही कटकट न करता, ते त्या महिलांना साड्या दाखवत असतात.
कौन्सि.... ये.. ?
अस म्हणत, अक्षरशः ते त्यांचा हट्ट पुरवत असतात.
परंतु... आज तर, कोटीच झाली. आमच्या समोर, एक बाई साडी खरेदी करत होत्या. त्या बाईना, एक साडी खूप आवडली होती.
पण तरीही, त्या नाक मुरडायच्या. आणि, म्हनायच्या. !
" नको-नको, गोळ्याच येतील, टिकल्याच पडतील, हिचा रंगच जाईल....! "
तो, बिचारा सेल्समन म्हणायचा...
नही बहेनजी, कुछ नही होगा.. आप, बेफिक्र होके साडी ले जाव. मैं आपको गारंटी देता हुं...!
तरीही... त्या बाई त्यांच्या मतावर ठामच.
शेवटी, वैतागून तो सेल्समन त्या बाईना म्हणाला.
देखो बहेनजी, आपने अगर ये साडी नही ली, और, अगर ये साडी कल कही बिक गयी. तो, घर जाके आपको दो दिन तक खाना अच्छा नही लगेगा..
क्योंकी, ये आखरी पीस है....!
" हा.... लय शहाणा आहेस, घे ती साडी हिकडं..! " अस म्हणत, त्या बाई दुकानाच्या केश काउंटर कडे निघून गेल्या.
सेल्समन ची, 'मात्रा' पक्की लागू पडली होती.
अशा व्यवसायात, ह्या स्त्रियांना खूप पटवावं लागतं. त्यात, त्या सेल्समनचं सगळं कसब पणाला लागत असतं. त्यामुळे, मला त्यांच्याबद्धल मनामध्ये खूप आदर आहे...
तोपर्यंत, माझ्या बायकोने दोन साड्या पसंद केल्या होत्या. तरीही, एक तास वाया गेलाच.
माझ्या बायकोचं, वरील प्रकरणाकडे काहीच लक्ष नव्हतं. ती नवनवीन साड्या पाहण्यामध्ये अगदी गुंग झाली होती. आणि, मी इकडे...
आम्ही दोघे मिळून, बिल करण्याकरिता केश काउंटरवर गेलो.
त्या बाई सुद्धा, तिथेच उभ्या होत्या. अजूनही, मला त्या संभ्रमितच वाटत होत्या.
न राहून, शेवटी मी त्या बाईंना म्हणालोच...
" तुम्ही निवडलेली साडी खरोखरच खूप छान आहे हो... ! "
तेंव्हा कुठे, त्या बाईंचं समाधान झालं.. बाई, जाम खुश झाल्या होत्या. हे मी, त्यांच्या हसऱ्या आणि लाजर्या चेहेऱ्यावरून लगेच ताडलं. आणि, समोरील दृश्य पाहून...
इकडे... आमच्या "सौं "च्या कपाळावर आट्या पडल्या होत्या.

Sunday, 25 October 2015

कामावरून, मी शक्यतो कधीही सुट्ट्या घेत नसतो..

पण, फारच काही तातडीचं काम असेल. तर मात्र, माझा सुद्धा नाईलाज होतो. कधी, बाहेरगावी किंवा ट्रीपला वगैरे जायचं असेल. किंवा काही घरगुती काम असेल. तर, सुट्ट्या ह्या घ्याव्याच लागतात. 
तसं पाहायला गेलं तर... सुट्ट्या कोणाला नकोयेत..?
परंतु, मला सुट्ट्या घ्याव्याशा का वाटत नाही...? यापाठीमागे फार मोठं कारण आहे.

तर, माझी कामातली गाडी बरीच जुनी झाली आहे. गेली आठ वर्ष, ती माझ्याकडे एकहाती आहे. त्यामुळे, मी तिला अगदी माझ्या जीवाच्या वर जपत असतो. 
कारण, तिला त्रास तर मला त्रास. त्यामुळे मला, तिझं सगळं काही ठीकठाक ठेवावं लागतं. नाहीतरी, माझं सगळं जीवन तिच्यावर अवलंबून आहे. म्हणून, हे सगळं मला करावच लागतं. त्यात, मी नवीन असं काही करत नाहीये. 

हा... प्रत्येक ड्रायव्हरचा धर्मच असतो...! 

सुट्टी घेतली, 
कि.. गाडीवर कोणीतरी नवीन ड्रायव्हर येतो. त्याला, त्या गाडीशी काहीएक देणं घेणं नसतं. त्याला फक्त, त्याचे दिवस भरायचे असतात. त्यामुळे, तो गाडीची म्हणावी अशी निगा राखत नाही. आणि, ते स्वाभाविक सुद्धा आहे. त्यामुळे, नको ते उद्योग न वाढण्यासाठी. मी, शक्यतो कामावर सुट्टी घेणं टाळत असतो. 
हे झालं, त्यामागचं मुख्य कारण. पण, सुट्ट्या घेणं काही चुकत नाही.

मध्यंतरी.. मी पाच सहा दिवस सुट्टीवर गेलो होतो. सुट्ट्या संपवून, कामावर हजार झालो. तर, कामातील कर्मचार्यांनी, गेल्या पाच दिवसात घडलेला. सगळा कित्ता माझ्यासमोर गिरवायला सुरवात केली..
तुम्ही, सुट्टीवर जात जाऊ नका हो. परवा आलेला ड्रायव्हर काही बरोबर नव्हता. खूप जोरात गाडी पळवायचा. एकतर, आपली जुनी गाडी आहे. काही, कमी जास्ती झालं तर..? एक ना बऱ्याच कागाळ्या होत्या. मी मात्र, हे सगळं काही गपगुमान ऐकत होतो. 
तितक्यात, एक जन मला म्हणाला..
तो ड्रायव्हर, गाडी खूप जोरात पळवायचा. पण, एक गोष्ट काही माझ्या ध्यानात आली नाही. 
गाडी पळवता-पळवता, अचानक बस थांबा आला. कि तो, गाडी अगदी हळू करायचा. आणि, पुन्हा जोरात चालवायचा. तो, असं का करायचा..?  हे गणित मात्र, आम्हाला काही सुटलं नाही..

मी सुद्धा विचारात पडलो. 
तो ड्रायव्हर कोण असावा..? आणि, नेमकं असं का करत असावा..? 

कारण, माझ्या गाडीवर बदली म्हणून आलेला तो ड्रायव्हर काही माझ्या ओळखीतला नव्हता.

नंतर, चौकशी अंती मला समजलं. 
पुणे मनपाच्या सेवेसाठी, पीएमटी ( पीएमपीएमएल ) चे काही ड्रायव्हर. तात्पुरते, आमच्या खात्याने मागवून घेतले होते. 
तो.. रोजचा प्रवासी बस चालवणारा ड्रायव्हर. त्यामुळे, बस थांबा आला. कि सवयी प्रमाणे त्याच्या गाडीचा वेग आपसूकच कमी व्हायचा. 
घंटी वाजो, अथवा न वाजो. बस थांबा आला, कि गाडी थांबवायची. 

हे त्या, प्रवासी वाहतुकीच्या ड्रायव्हर लोकांच्या डोक्यात फिट बसलेलं असतं. त्यामुळे, माझ्या गाडीवर सुद्धा, तो बस चालवत असल्या प्रमाणेच वागायचा. 

हि गोष्ट, जेंव्हा आमच्या कर्मचार्यांना समजली. तेंव्हा, ते सुद्धा अगदी पोट धरून हसत सुटले.

Thursday, 22 October 2015

संधी..

दोन हजार चार सालची गोष्ट आहे..
मी, फक्त नावाला सरकारी नोकर. पगारच्या नावाने पक्की बोंब. अजूनही त्यात काही फारसा फरक पडलेला नाहीये. असो... पण, समाधानी आहे.
तर, त्यावेळी...

कोठून तरी, मला कुणकुण लागली. कि, पालिकेचे दिवाळी बोनस बँकेत जमा झाले आहेत. माझ्या खिशात, कायमचा खडखडाट ठरलेला असायचा. त्यामुळे, घाईघाईने मी एटीएम मध्ये गेलो. आणि, पहिले पाच हजार रुपये काढून घेतले.  आणि दुसऱ्या दिवशी, पुन्हा पाच हजार रुपये काढले. 

झालं... बोनस संपला. ज्या काही, महत्वाच्या खरेद्या होत्या त्या आटोपल्या. नाही म्हणता, खिशाचा गरम पणा ताबडतोब कमी झाला होता. पण, सगळ्या खरेद्या वेळेत आटोपल्या होत्या. त्याचं समाधान वाटत होतं.

आणि दुसऱ्या दिवशी, अचानक मला महाराष्ट्र बँकेतून फोन आला...

नमस्कार, कुंभार बोलताय का..!
हो बोलतोय,
मी, बँक ऑफ महाराष्ट्र मधून बँकेचा मेनेजर बोलतोय.
हो.. बोला ना साहेब.
तुम्ही, आज ताबडतोब बँकेत येऊन मला भेटा.
मी, हो साहेब म्हणालो.. 
आणि, विचारात पडलो. काय गडबड झाली असावी..? कशाला बोलावलं असावं..? नानाविध प्रश्नांनी मला भंडावून सोडलं.

कामावरून घरी आलो, दुपारच्या सत्रात तीन वाजता बँकेत पोहोचलो. घाबरत-घाबरत मेनेजर साहेबांच्या केबिन मध्ये गेलो. नमस्कार चमत्कार झाला.

मी :- साहेब.. मी कुंभार, तुम्ही मला बोलवलं होतं.
सा :- चार दिवसापूर्वी, तुमच्या खात्यावर किती पैसे जमा होते...?
मी :- काही, पाच सहाशे रुपये असतील साहेब..!
सा :- मग तुम्ही, एटीएम मधून दहा हजार रुपये कसे काय काढले..?
मी :- अहो साहेब, आमचा दिवाळीचा बोनस जमा झाला आहे ना. ते पैसे मी काढलेत.
सा :- नाही... तुमचा बोनस वगैरे अजून जमा झाला नाहीये..!
मी :- तर मग, एटीएम मशीन मधून मला पैसे कसे काय मिळाले..?
सा :- हो... चुकून ती प्रोसेस झाली आहे. तुम्ही ते पैसे ताबडतोब बँकेत जमा करून टाका..!
मी :- जमा कसे करणार..? ते सगळे पैसे तर माझ्याकडून केंव्हाच खर्च झाले आहेत..! 
एक काम होईल साहेब, माझ्या खात्यावर आमचा बोनस जमा झाला. कि, तुम्ही परस्पर ते पैसे तुमच्या बँकेत वळते करून घ्या.

संशयाच्या नजरेने, होकारार्थी मान हालवत. म्यानेजर साहेब माझ्याकडे पहात होते.
बरं... येऊ का साहेब...! 
अपराधी चेहेऱ्याने त्यांच्याकडे पाहात. मी खुर्चीतून उठलो. आणि, जिन्याच्या पायऱ्या मोजत बँकेतून खाली उतरू लागलो.
बँकेबाहेर, भिंतीशेजारी माझी सायकल उभी होती. तिच्यापाशी गेलो, सायकलचं कुलूप उघडलं. आणि, खाली जमिनीवर माझं लक्ष गेलं. 
कोरं करकरीत पांढरं कागदी पाकीट जमिनीवर पडलं होतं. मी ते पाकीट उचललं. पाकीट उघडून पाहिलं, तर त्यात एकूण तीन चार स्टेटमेंटचे पेपर होते. आणि, दर्शनी भागात...

" पाच लाख, आणि वरती काहीतरी रकमेचा क्रॉस चेक होता.. "

माझ्या कारकिर्दीत, त्यावेळी एवढी मोठी रक्कम मी आयुष्यात कधी पाहिली काय वाचली सुद्धा नव्हती. त्यामुळे, मला त्या रकमेचं खूप अप्रूप वाटत होतं. क्रॉस चेक असल्यामुळे, माझा काहीएक फायदा होणार नव्हता. पण, 

" गरिबी खूप वाईट हो." 

पैश्याने गांजलेलो होतो. त्यामुळे, सुरवातीला नको तसले विचार माझ्या मनात येणं स्वाभाविक होतं.. 
आता ह्या चेकचा वापर कसा करावा..? जेणेकरून मला काहीतरी फायदा होईल..! 

सुरवातीला, मी विचार केला. हा चेक ज्या कंपनीचा आहे. त्या कंपनीचा फोन नंबर यल्लो पेजेस मधून शोधून काढूयात. आणि, त्यांना फोन करून कळवूयात. कि, तुमचा पाच लाख रकमेचा चेक मला सापडला आहे. तो तुम्ही, अमुक ठिकाणी येवून घेऊन जावा. 
असं केल्याने, चेक घ्यायला येणारा व्यक्ती खुश होऊन मला दोन एक हजार रुपये नक्कीच देईल. कारण, हा चेक गहाळ झाला आहे. असं त्यांनी समोरच्या पार्टीला कळवलं. तर, त्या चेकचं पेमेंट स्टोप करून त्यांना नवीन चेक मिळू शकतो. पण त्या प्रोसेसिंग मध्ये, किमान महिना तरी गेलाच असता. त्यामुळे, माझ्या आशा खूप पल्लवित झाल्या होत्या.

पुन्हा माझ्या काय मनात आलं. ते, मलाच समजलं नाही. मी तडक मेनेजर साहेबांच्या केबिनमध्ये गेलो. आणि, ते पाकीट त्यांच्या हवाली केलं. 
प्रश्नार्थक मुद्रेने माझ्याकडे पाहत त्यांनी ते पाकीट उघडलं. आणि, त्यात असलेला चेक पाहून ते जागेवर उभेच राहिले. आणि, मला खुर्चीत बसायला सांगितलं.  
त्यांनी ताबडतोब त्या कंपनीमध्ये फोन लावला. आणि, घडलेला प्रकार त्यांना सांगितला. आणि फोनवरच त्यांना खूप झापलं. म्हणाले, आमच्या कस्टमरला तो चेक मिळाला. म्हणून त्यांनी तो इथे आणून दिला. दुसऱ्या कोणाला सापडला असता तर..?
त्या म्यानेजर साहेबांनी माझे आभार मानले. 
नंतर येऊन, तो व्यक्ती चेक घेऊन गेला असेल. मी सुद्धा, साहेबांना नमस्कार करून तेथून निघून गेलो. तीन चार दिवसांनी, बँकेत माझा बोनस जमा झाला. बँकेने, रीतसर माझ्या खात्यातून त्यांनी दहा हजार रुपये वळते करून घेतले. तिथून पुढे, असा प्रकार कधी घडला नाही.

पण, मी चुकून काही कामानिमित्ताने बँकेत गेलो. तर ते म्यानेजर साहेब मला चहा पाजल्या शिवाय सोडतच नव्हते. शिवाय, माझं स्वतःचं घर नाहीये हे सुद्धा त्यांना समजलं होतं. त्यामुळे, त्यांच्याकडे असणारे ( बँकेने ओढून आणलेले ) फ्ल्याट ते शिपाया मार्फत मला दाखवायचे. इतकंच काय, माझ्या पगारात बसत नसताना सुद्धा. त्यांनी, त्यांच्या जबाबदारीवर मला पाच लाखाचं लोन देऊ करण्याचं वचन दिलं होतं. परंतु, दुर्दैवाने मला त्या संधीचा लाभ घेता आला नाही.

परंतु, ह्या उदाहरणामुळे मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. प्रामाणिकपणा, कधीही चांगलाच. 
आणि, त्याचा आपल्याला उत्तम असा उपयोग कायमच होत राहतो. 


Sunday, 18 October 2015

आत्ताच थोड्या वेळापूर्वी, माझ्या एका बाल मित्राचा मला फोन आला होता.

तो मित्र, आता फार मोठा उद्योगपती झाला आहे. अरबो खरबो मध्ये खेळत असतो. पण, माझ्यासमोर तसलं काही चालत नसतं. तू जहागीरदार असशील, तर तुझ्या घरी. माझ्या घरी मी बादशाहा आहे.
मी, काहीसा अशा स्वभावाचा असल्यामुळे. माझे असे बरेच श्रीमंत मित्र सुद्धा माझ्याशी बोलताना अगदी जमिनीवरच असतात.
तर आज, बऱ्याच दिवसांनी त्या मित्राचा फोन आला होता. तो सतत कामात व्यस्त असतो. त्यामुळे, त्याला सारखं फोन करणं जमत नाही.
आणि, कोणाच्या मनात शंका कुशंका नको. म्हणून, अशा मित्रांना मी स्वतः होऊन कधी फोन करत नाही.
आहे... हे, असं आहे. माझा स्वभाव त्याला कारणीभूत आहे. आणि, मला ते योग्य सुद्धा वाटतं.
तर, आज तो मित्र फोनवर मला म्हणाला...
तीन चार दिवस झाले, व्यवस्थित झोपच येत नाहीये रे. कामाचा ताण खूप वाढलाय. नको म्हंटलं तरी मोह सुटत नाहीये. काय करू, खूप वैतागलोय राव..
मी त्याला गमतीने म्हणालो,
माझं बरं आहे बाबा.. अंथरुणावर पडल्या-पडल्या लगेच डोळा लागतो. आणि, सकाळी बायकोने आवाज दिल्याशिवाय जाग येत नाही..
तो मित्र... दुक्खी अंतकरणाने मला म्हणाला...
" तू खरा सुखी माणूस आहेस...! "
शेवटी काय आहे. ज्याचं दुक्ख त्याला माहित असतं. मी माझ्या ठिकाणी दुरुस्त आहे. आणि, तो त्याच्या ठिकाणी. बराच वेळ, मी त्याच्याशी बोललो. त्याला दोन चार कानमंत्र दिले. थोडा तणावमुक्त केला. नंतर थोड्यावेळाने बोलताना आनंदी आणि तणावमुक्त वाटत होता.
.
तो.. अधून मधून माझ्याकडून उपदेशाचे डोस अवश्य घेत असतो.
त्यात, त्याला स्वतःचा काहीच कमीपणा वाटत नाही. आणि, मलाही तो कधी अतिश्रीमंत वाटत नाही..
परंतु, मला सुद्धा कधी-कधी वाटतंच..
" अति श्रीमंती सुद्धा, काही कामाची नाही. आणि, गरिबी सुद्धा ! " 

Thursday, 15 October 2015

मजबूत व्हावं लागेल, ते ह्या खांद्यापासून. 
त्याकरिता, कष्ट तर हाताला पडणार आहेत. हाताने कष्ट करणे सोडून दिले. 
तर, खांद्याला सुद्धा मजबुती येणार नाही.
आणि... 
डोळ्यांनी पाहायचं सोडून दिलं तर, मेंदूला सुद्धा अर्थ उरणार नाही.

Wednesday, 14 October 2015

मस्ती..

तुम्ही, रेल्वेमध्ये किंवा अन्यत्र हिजड्यांचा उपद्रव पाहिला किंवा अनुभवला असेलच. 
परंतु... तुमच्यापैकी कोणी, त्यांची मस्ती जिरवलेली पाहिली आहे हा..? 
नसेल, तर सांगतो.. मी पाहिलीय..!

परवा आम्ही, रेल्वेने तीरुपतीवरून कोल्हापूरला निघालो होतो. पंचविशीतली काही टारगट मुलं सुद्धा आमच्याच बोगीमध्ये बसलेली होती. ती मुलं काही आमच्या ओळखीची नव्हती. पण, भलतीच व्रात्य मुलं होती. रात्री नऊ वाजता, हरिप्रिया एक्स्प्रेस कोल्हापूरकडे मार्गस्थ झाली. तशी, रात्रभर यांच्या मोबाईलवर नवनवीन गाणी वाजू लागली. 
सोबतच.. ओरडणं, शिव्या घालणं, किंचाळनं, हसणं, नाचणं आणि दंगामस्ती चालूच होती. 
वादाचं काम नको... 
म्हणून, आम्ही त्याकडे साफ दुर्लक्ष केलं. थोड्यावेळाने थकून भागून झोपी जातील. म्हणून, आम्ही त्यांचा विचार सोडून दिला. 
पण, ती दमणारी पोरं नव्हतीच. रात्रभर, त्यांचा दंगा चालूच होता.
सकाळ झाली.. कि ते, पुन्हा सुरु झाले... गाण्यावर गाणी,

शांताबाई, जपून दांडा धर, आदी तत्सम गीतांचा आमच्यावर भडीमार चालूच होता.

दुपारी बाराच्या सुमारास...
रेल्वेमध्ये ढोलकी वादन करून पोटाची खळगी भरणारी दोन तरुण मुलं आमच्या बोगीमध्ये चढले. बोगीमध्ये येताच... त्यांनी, ढोलकीच्या थापेची एक जबरदस्त सुरेल झलक दाखवली.
सगळी बोगी खुश...
झालं.. त्या मुलांना भलताच चेव चढला. आणि, ती मुलं त्यांना म्हणाले..

बजाव रे बजाव... मस्त अच्छा गाना बजाव...!

ढोलकीवर थाप मारून... त्यांच्या सुरेल चिरक्या आवाजात, तारीफ तेरी निकली है दिलसे, शिर्डीवाले साईबाबा हे गीत म्हणायला सुरवात केली. 
परंतु, असली देवाधर्माची गाणी त्यांना आवडणार होती का..! ते शक्यच नव्हतं.
ती मुलं, त्या ढोलकी वादकाला म्हणाले...
ए SSS शांताबाई बजा..!
ते बिचारे ढोलकीवादक हिंदी भाषिक होते. त्यांना, शांताबाई हा काय प्रकार आहे..?
तेच मुळात माहित नव्हतं. 
ते म्हणाले... " नाही यार, हमका ये सांताबाई मालूम नाही है..! "
झालं... ह्या मुलांनी लागलीच, त्या कलाकारांना त्यांच्या मोबाईवरील शांताबाई हे गीत चांगलं दोन चार वेळा ऐकवलं. ती मुलं सुद्धा, थोड्याच अवधीत ते गाणं वाजवण्यात पारंगत झाले.

आणि नेमकं त्याच वेळेत, त्या बोगीमध्ये.. दोन छक्क्यांनी एन्ट्री मारली...

छक्क्यांना पाहून, ती मुलं खूपच चेकाळली..
त्या हिजड्यांना, चारी बाजूंनी मुलांनी गराडा घातला. आणि, त्यांना शांताबाई गाण्यावर नाचायला लावलं. सुरवातीला, त्या हिजड्यांना सुद्धा खूप मजा वाटली. ती तरुण मुलं सुद्धा त्यांच्या सोबत ठुमका लावत होते..

चकरा, नखरा, चकरा, नखरा.. गीतावर, त्यांनी सुद्धा जोरदार ठुमके लगावले..

गानं संपलं, कि ती मुलं.. त्या हिजड्यांना आणि ढोलकी वादकाला एक ठराविक रक्कम द्यायचे. आणि पुन्हा एकदा, त्याच गीताची आणी नाचाची फर्माईश व्हायची..
असं दोन चार वेळा झालं.. 
शेवटी, ते छक्के सुद्धा वैतागले. आणि, तेथून जाऊ लागले. पण हि पोरं लैच अवली निघाली. 

कुठं चालला..?  नाSSSSच  
म्हणून, त्यांना जबरदस्ती करू लागले. 

इतर वेळी, रेल्वेतील प्रवाश्यांकडून जबरदस्तीने पैसे उकळणारे छक्के. त्या दिवशी मला खूपच दीनवाणे आणि असहाय्य वाटू लागले होते. ढोलकीवाला सुद्धा जागेवरून उठला, कि ते त्याला ताबडतोब खाली बसवायचे. 
आणि.. बजाSSSव चा आदेश द्यायचे.. 

हिकडं ढोलकी वाजली, कि तिकडे घाबरून ते छक्के नाचायला सुरवात करायचे..
आम्ही तर, हसून-हसून अगदी बेजार झालो होतो...
ह्या अघटीत प्रकारामुळे...तो ढोलकी वाला, आणि ते दोन छक्के पक्के परेशान झाले होते. 
कधी एकदा, आपण ह्या मुलांच्या तावडीतून सुटतोय. अगदी असं झालं होतं त्यांना. बिचारे, अगदी रडकुंडीला आले होते. 
शेवटी, हातापाया पडून कशीबशी त्या मुलांच्या तावडीतून त्यांनी आपली सुटका करून घेतली. आणि, ते रेल्वेच्या बाहेर पडले...
ह्या मुलांना, ते छक्के इतके भयंकर वैतागले होते. कि गाडीतून खाली उतरल्यावर ते अक्षरशः त्या मुलांना शिव्या शाप देत दगडी मारत सुटले होते. ढोलकी वाल्याने तर, त्या गाडीतूनच काढता पाय घेतला, आणि त्या गाडीतून कायमचा पोबारा केला. 

एकंदरीत, हसावं कि रडावं अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

त्या मुलांनी, हिजड्यांची चांगलीच जिरवली होती. पण त्या ढोलकी वाल्याचे हाल मला पाहवत नव्हते. शेवटी काय आहे. ते म्हणतात ना...

गव्हा सोबत, किडे सुद्धा रगडले जातातच.
  

Friday, 9 October 2015

पाच सहा वर्षांपूर्वी, आम्ही तिरुपती बालाजीला निघालो होतो...
पुण्यातील खडकी स्टेशन मध्ये, आम्ही रेल्वेमध्ये प्रवेशित झालो. आम्ही रेल्वेमध्ये चढतो न चढतो तोच, मला शंका आली.
कि, कोणीतरी आमच्या पाळतीवर आहे. आणि, माझी शंका खरी ठरली. अचानक, एक पाच सहा लोकं आमच्यासमोर आले. आणि, त्यांनी आम्हाला रेल्वे तिकीटाची मागणी केली.
ते सगळे जन, स्पेशल स्कोडचे सिविल ड्रेस मधील रेल्वे पोलीस होते.
आमचं आरक्षण, खडकी पासूनच होतं. त्यामुळे, आम्ही सुद्धा कोणतेही आढेवेढे न घेता. त्यांना तिकिटं दाखवली. सगळं काही ठीकठाक होतं...
पण,
आमच्यातील काही मुलांच्या मुखामध्ये माणिकचंद, गोवा नामक गुठ्क्याची गुळणी होती...
योगायोगाने...त्यावेळी सुद्धा, महाराष्ट्रात गुठ्का बंदी होती...!
झालं...
त्या पोलिसांना, एवढं एकच कारण पुरेसं होतं. त्यांनी, सगळ्या मुलांच्या ब्यागा तपासायला सुरवात केली. भरपूर 'माल' त्यांच्या हाती लागला होता. सगळा माल त्यांनी जप्त केला.
त्यातील एक जन म्हणाला.. यांच्याकडे तर पूर्ण पान टपरीच आहे राव..!
ए... घ्या रे ह्यांना पोलीस चौकीवर...!
त्यांच्या ह्या वाक्यासरशी, आमचे धाबे दणाणले. मीच त्यांना म्हणालो,
जाऊद्या साहेब, देवाला चाललोय. एक वेळ माफ करा...!
पण, त्यांनी सहानुभूती दाखवली नाही...!
आमची तारांबळ पाहून, त्यातील एक पोलीस म्हणाला..
ठीक आहे.. किती जनं आहात तुम्ही..?
आकरा जन आहोत..!
ठीक आहे... तुम्हाला, एक लाख दहा हजारची पावती करावी लागेल.
काय बोलायचं राव...
मी म्हणालो.. अहो साहेब, फक्त चार लोकं गुठ्का खाणारे आहेत. मग, आम्हा सगळ्यांना का वेठीस धरताय..?
तर म्हणाला.. हे बघा, तुम्ही दंड वगैरे काही भरू नका. आणि आमच्याशी वाद हि घालू नका. सरळ पोलीस चौकीत चला. तिथे काय निर्णय होईल ते पाहू. आणि, नंतर तुम्ही प्रवासाला निघा..
मी म्हणालो, अहो साहेब, पुणे स्टेशनवर जेमतेम अर्धा तास गाडी थांबते. ह्या वादामध्ये, आमची गाडी निघून जाईल.
पण, त्यांना ह्या गोष्टीचं काहीच सोयरसुतक नव्हतं.
काय करावं.. भला मोठा प्रश्न आमच्यासमोर होता. ह्या गुठ्क्याच्या नादामुळे आमची काही सुटका होणार नव्हती.
शेवटी, तो पोलीस म्हणाला... बरं ठीक आहे, पन्नास हजाराची पावती करा..!
मी म्हणालो.. अहो साहेब, आम्ही प्रत्येकी दोन चार हजार घेऊन प्रवासाला निघालोय. एवढी मोठी रक्कम आमच्याकडे कशी असेल हो..?
तेवढ्यात.. आमच्यातील एक घाबरलेला मित्र मधेच पचकला...
बरं ठीक आहे... अकरा हजाराची पावती करा.
आम्ही, एकूण अकरा जनं होतो. प्रत्येकी हजाराचा दंड बसणार होता.
पण, मी मधेच माझ्या मित्राला दरडावला... गप बस राव तू, विनाकारण काहीही बोलत असतोस..
शेवटी, त्या पोलिसाच्या काय मनात आलं काय माहिती..
म्हणाला.. चल अकराशे रुपये दे..!
आम्ही झटकन, अकराशे रुपये त्यांच्या हातात टेकवले.
त्याने सुद्धा, पटकन हजाराची पावती बनवली. आणि, चक्क शंभर रुपये मला परत केले.
आणि, हसत हसत तेथून निघून गेला.
हे प्रकरण, जवळ-जवळ पंधरा वीस मिनिटं चालू होतं. त्या पोलिसांच्या ग्रुपमधील एका व्यक्तीला, आमच्यातील एक जन ओळखत होता.
पण, त्याला नेमकं कुठे पाहिलंय. ते त्याला आठवत नव्हतं. तरी तो मित्र त्याला म्हणालाच..
साहेब.. तुम्हाला कुठेतरी पाहिलंय हो. पण मला नेमकं आठवेना झालंय.
परंतु.. तो पोलीस हि, त्याच्या प्रश्नाचं उत्तर न देताच तेथून निघून गेला.
त्यानंतर... पाच सहा महिन्यांनी, तोच पोलीस आम्हाला एका लग्नात दिसला. माझ्या मित्राने त्याला ताबडतोब ओळखलं. आणि, त्याला रेल्वेतील प्रसंग कथन केला..
त्यावर तो म्हणाला... नाही राव, अशा आयत्यावेळी आम्हाला ओळख दाखवता येत नाही.
त्यामुळे, इतर मित्र नाराज होतात. दंड फाटले जात नाहीत..!
त्याचा मुद्दाही रास्त होता.
हे सगळं आठवायचं कारण म्हणजे...
सालाबाद प्रमाणे, आज संध्याकाळी आम्ही अकरा जन पुन्हा एकदा तिरुपती बालाजीच्या दर्शनाला निघालो आहोत. आणि, आता सुद्धा गुठ्का बंदी आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा असा प्रसंग घडू नये. याची मनोमन प्रार्थना करतो.
आणि, तीर्थयात्रेला निघतो...!

Tuesday, 6 October 2015

आत्तापर्यंत मी फक्त ऐकून होतो. 
परंतु काल, ह्या काणांना त्याची अनुभूती सुद्धा मिळाली. रात्रीच्या किर्र अंधारामध्ये दूरवरून टाळ तबल्याचा आवाजाबरोबर सिनेमातील गाण्याच्या चालीवरील, काही भजनं सुद्धा ऐकू येत होती.
काही भजनी मंडळी, सिनेमातील गाण्यांच्या चालीवर भक्ती गीतं रचत असतात. 
ते का आणि कशाकरिता..? हे एक फार मोठं कोडं आहे..!
जुनी किंवा नवीन भक्तीगीतं खूपच सुरेख आणि मधुर चालीमध्ये रचलेली आहेत. हे, तुम्ही आणि मी सुद्धा जाणतो. तर मग, हि मंडळी सिनेमातील गीतातील चाली भजनांना का म्हणून देत असतील..?
ती विशिष्ट चालीची भक्तीगीतं..( ? ) ऐकताना. 
मला त्या ठराविक गीतामध्ये अभिनय करणारे सिने कलावंतच नजरेसमोर दिसू लागले.
मी तर म्हणतो...
त्या पेक्षा एक कामच करा ना. 
तुम्हाला ठराविक सिने कलावंतांची गीतं म्हणावीशी वाटत असतील. तर, दक्षिणे भारतात जशी अभिनेत्यांची मंदिरं बनवली आहेत. तशी, त्यांची मंदिरं बनवा. आणि, त्या सिने कलावंतांचीच पूजा करा ना. 
कशी वाटतेय कल्पना..?

विनाकारण, देवाला का वेठीस धरताय...?

Monday, 5 October 2015

हल्लीच गणेश उत्सवात...

माझ्या एका मित्राच्या मंडळामध्ये, एका विनोदी कार्यक्रमासाठी. कॉमेडी किंग 'भाऊ कदम' आणि त्यांच्या संपूर्ण ग्रुपला पाचारण करण्यात आलं होतं. 
सादर केलेला तो विनोदी कार्यक्रम, यथासांग पार पडला. 
भाऊंनी, सर्व प्रेक्षकांची हसून-हसून अगदी दमछाक केली होती. कार्यक्रम संपला. सर्व कलाकारांचं आदरतिथ्य झालं. त्यांचा, उचित पाहुणचार झाला. रात्री लगेच, त्यांना बारामतीला दुसऱ्या दिवशी असणाऱ्या शोसाठी निघायचं होतं. 
पण.. मधेच माशी शिंकली..
त्यांच्या प्रवासी बस मध्ये, अचानक काहीतरी मोठा बिघाड झाला..
रात्रीची वेळ, आता मेकेनिक कुठे शोधायचा..? 
मंडळातील काही कार्यकर्त्यांनी बरीच शोधाशोध केली. पण सगळीकडून नकारघंटा ऐकू येत होती.
शेवटी, भाऊ आणि त्यांच्या संपूर्ण टीमने तिथेच मुक्काम करायचा ठरवलं..

आता.. आयत्यावेळी लॉज कुठून मिळणार..?
पण हि समस्या चुटकीसरशी सुटली. मंडळाच्या अध्यक्षांनी, त्यांच्या एका मित्राच्या फ्ल्याट मध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था केली. बाकी कलाकार मंडळींना सुद्धा, दुसऱ्या एका फ्ल्याट मध्ये राहण्याची व्यवस्था केली.

भाऊ, मुक्कामी थांबणार... 

असं कळताच, मंडळातील कार्यकर्त्यांचा उत्साह आणखीनच द्विगुणीत झाला. भाऊंसोबत विनोदी गप्पांचा मस्तपैकी फड रंगला. जो तो कार्यकर्ता, भाऊ बरोबर फोटो सेशन करू पाहत होता. भाऊ सुद्धा त्यांची हौस पुरवत होते.

गमतीने, भाऊ त्यांना म्हणायचे... अरे, मी किती काळा आहे. माझ्यापेक्षा तुम्ही मुलं खूप सुंदर दिसताय. माझ्याबरोबर कशाला इतके फोटो काढताय...? 

त्यातील एक कार्यकर्ता तर भाऊंना म्हणाला, भाऊ तुम्ही खूप सुंदर दिसताय. खरं तर त्याला म्हणायचं होतं. तुमचा अभिनय खूप सुंदर आहे. अशा आयत्यावेळी अशी चूकभूल होतच असते नाही का.
शेवटी, फोटो सेशन करून भाऊ सुद्धा वैतागले. आणि मुलांना म्हणाले, 

मित्रांनो मला आता खूप थकवा आला आहे. मी जरा आराम करतो. मुलांनी सुद्धा त्यांना ताबडतोब अलविदा केला. 

रात्रीचे दोन वाजून गेले होते. तरुण मुलं, अजून उत्साहीतच होती. त्यांना, झोप काही येतच नव्हती.
तितक्यात, मंडळाच्या अध्यक्षांना भाऊंचा फोन आला...!

"अहो शेठ... कुठे आहात तुम्ही..?
"भाऊ.... आहे ना, मी खालीच उभा आहे.
"जरा वरती येता का..?

अध्यक्ष ताबडतोब वरती गेले. भाऊंना, ज्या फ्ल्याट मध्ये झोपायचं होतं. तिथे अगोदर पासूनच त्या रूम मध्ये बिल्डींगचे मालक बसले होते. 
वय वर्ष ऐंशीचे गृहस्थ..भाऊंकडे हट्ट धरून बसले होते. 

" मला एक गानं म्हणून दाखव."

भाऊ.. त्यांना खूप समजावून सांगत होते. अहो, मी विनोदी कलाकार आहे. गायक नाही..
पण, ते आजोबा काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
म्हणायचे.. " त्याला काय होतंय..? म्हण एक गानं."
ह्या वृध्द बाल हट्टापुढे, शेवटी भाऊंनी सुद्धा हात टेकले. आणि अध्यक्षांच्या विनंतीला मान देऊन. त्या आजोबांना भाऊंनी एक गानं म्हणून दाखवलं.

" जिना यहां मरणा यहां इसके सिवा जाणा कहां.. "

ह्या गाण्यात सुद्धा, एकप्रकारचा विनोदच होता. पण, तो कळेल त्यालाच. 
हे गीत ऐकल्यावर, त्या आजोबांना सुद्धा खूप समाधान वाटलं. त्यांची मनोकामना पूर्ण झाली होती. आणि, समाधानाने त्यांनी त्या रूममधून काढता पाय घेतला. 
आणि, भाऊंनी आपलं अंग पलंगावर टेकवलं.. 

Sunday, 4 October 2015


साधारण, एकोणीसशे सत्त्याऐंशी चा काळ असावा...
कृष्ण धवल टीव्हीचा तो जमाना. आणि, त्याकाळी तो टीव्ही सुद्धा काही मोजक्याच लोकांच्या घरी असायचा. 
त्यावेळी.. एक वेगळीच गंमत, 
आमच्याघरी टीव्ही तर होता. परंतु वीजजोड नव्हती, अशातला प्रकार होता. मोठ्या बंधूंच्या कंपनीमध्ये, हफ्त्यावर टीव्ही ची स्कीम आली होती. 
वीज जोड नंतर मिळेल. पण टीव्हीची स्कीम परत येईल कि नाही..? याची शास्वती नव्हती. त्यामुळे, त्याकाळी आमच्या घरच्यांनी टीव्ही खरेदीला प्रथम प्राधान्य दिलं होतं. 

टीव्ही पाहण्यासाठी..एखाद्या शनिवार, रविवारी समोरच्या चाळीतून. कोणाकडून तरी, आम्ही तात्पुरती वीजजोडणी करून घेत असू. 
मला चांगलं आठवतंय... 
एका रविवारी, टीव्हीवर खंडहर नावाचा एक क्लासिकल सिनेमा लागला होता. तो सिनेमा, इतका रटाळ आणि कंटाळवाणा होता. कि कोणी, फुकट पहा म्हंटलं तरी मी तो पाहिला नसता. पण तेंव्हा, एकतर घरामध्ये वीजजोड नव्हती.  आणि, काळ्या पांढऱ्या चित्रामध्ये काहीतरी पाहायला मिळतंय. म्हणून, तो कंटाळवाणा सिनेमा सुद्धा आमच्या कुटुंबीयांनी मन लाऊन पाहिला होता.

तर, त्यावेळी माझ्या मित्राच्या घरी घडलेला एक किस्सा तुम्हाला सांगतो.
आम्हा मित्रांपैकी, ह्या मित्राचं कुटुंब खूपच सुसंस्कृत असं होतं. त्याचे वडील, टेल्कोमध्ये मोठ्या हुद्द्यावर कामाला होते. त्यामुळे, बऱ्यापैकी सुखवस्तू असं हे कुटुंब होतं. त्याकाळी, त्यांच्याकडे सुद्धा एक कृष्ण धवल टीव्ही होता. तेंव्हा, दूरदर्शनवर शनिवारी मराठी आणि रविवारी हिंदी सिनेमे लागत असत.. 
एके शनिवारी,    
कोणता तरी, छानसा मराठी सिनेमा लागला होता. उन्हाळ्याचे दिवस, सायंकाळी पाच वाजता थकून भागून मित्राचे वडील कामावरून घरी आले. 
नेहेमीप्रमाणे कामावरून आल्यावर, त्यांनी स्वच्छ अशी अंघोळ केली. पायजमा घातला, हवेमध्ये कमालीचा उकाडा होता. गरम होत आहे म्हणून, त्यांनी अंगामध्ये बनियन वगैरे काही घातली नाही. त्यामुळे, त्यांच्या गोऱ्या कांतीवर पोटावर रुळलेलं जानवं अधिकच स्पष्ट उठून दिसत होतं. 
गोरा, गोमटा, गोल गरगरीत देह.. सर्वांगावर असणारी काळ्या कुरुळ्या केसांची लव, कपाळावर असणारं भलं मोठं शुभ्र टक्कल. आणि, सतत हसत मुख चेहरा असणारे काका. 
मांडी घालून, घर-घर करणाऱ्या पंख्याची हवा खात, टीव्ही वरील सिनेमा पाहात दिवाणावर विसावले.

त्यादिवशी, त्यांच्या घरामध्ये कामाला असणाऱ्या शेजारील वस्तीमधील कामवाल्या बाईबरोबर. एक महिला सुद्धा त्यांच्या घरी सिनेमा पाहायला आली होती.
काका जसे दिवाणवर येवून बसले. तसं, त्या महिलेचं त्यांच्याकडे लक्ष गेलं. 
टीव्ही पाहताना सुद्धा, आपली नजर चौकस आणि चौफेर धावत असते. अशात, एखादा उंदीर जरी एखाद्या कोपऱ्यातून पळाला. तरी सुद्धा, आपल्या नजरेला त्याचं ज्ञान होतं. तर टीव्ही पाहता-पाहता सहजच, त्या महिलेचं समोरच्या भिंतीवरील लावलेल्या फोटोवर लक्ष गेलं.

भिंतीवर.. श्री गोंदवलेकर महाराजांचा पद्मासनातला फोटो अडकवलेला  होता. त्या फोटोमध्ये, आणि काकांचा चेहरा आणि अंगकांती मध्ये बरचसं साधर्म्य होतं. 
भिंतीवरील तो फोटो पाहून त्या महिलेला वाटलं.. 

कि, ह्या व्यक्तीने हौसेखातर स्वतःचा असला उघडाबंब फोटो काढून भिंतीवर लावलाय कि काय..? 

त्यामुळे, ती महिला एकवार त्या फोटोकडे पाहायची. आणि, दुसऱ्या क्षणी काकांकडे पहायची. आणि, तोंडाला पदर लाऊन गालातल्या गालात खुदुखुदू हसायची...
घरातील सगळे जन, सिनेमा पाहायच्या मूडमध्ये होते. त्यामुळे, हा प्रकार लगेच कोणाच्या लक्षात आला नाही. पण... 
हा नेमका काय प्रकार चालू आहे..?  ते, काकांच्या चटकन लक्षात आलं.  
नाही म्हणता, त्यांना सुद्धा त्या बाईचा खूप राग आला होता. 
पण करता काय..?
एकुणात समोरील दृश्य अगदी हुबेहूब होतं..
नंतर, हे प्रकरण खुद्द काकांनी आम्हाला सांगितल्यावर. घरामध्ये, आम्हा सर्वांचा एकच हशा पिकला. आणि आश्चर्य म्हणजे, त्या धमाल मस्तीमधे खुद्द काका सुद्धा सहभागी होते.
हा प्रकार घडल्या नंतर मात्र, 
काकांनी, आमच्या काकूंची कानउघडनी केली. 
आणि, इथून पुढे आपल्या घरामध्ये बाहेरील कोणतीही व्यक्ती टीव्ही पाहायला आली नाही पाहिजे. अशी सक्त ताकीत केली.. 
त्यानंतर... त्यांच्या घरामध्ये,
शेजारील वस्तीमधील महिलांना/पुरुषांना सिनेमा पाहायला कायमचा मज्जाव केला गेला होता.


Friday, 2 October 2015


काही कामानिमित्त.. 
एकदा मी, मराठवाड्यातील जालना या गावी गेलो होतो. त्याठिकाणी, एका मिठाईच्या दुकानात भलतीच गर्दी उसळली होती. त्यामुळे, कुतूहल म्हणून मी सुद्धा त्या गर्दीमध्ये मिसळून गेलो. आणि, त्या गर्दीचा एक भाग झालो..

दुकानात... कढई मध्ये गरम-गरम भजी बनवण्याचं काम चालू होतं. त्याच्या बाजूलाच, एका परातीत जिलेबीचे गोल-गोल नारंगी वेटोळे पाक सोडत निपचित पहुडले होते. चोहीकडे, खमंग सुहास दरवळत होता.
भजी आणि जिलेबी... हे दोन्ही पदार्थ माझ्या अगदी जीवाभावाचे..
पण विषय असा झाला...
दोन्ही पदार्थांची एक-एक प्लेट घ्यावी. तर, ते मला एकट्याला सरणार नव्हतं.
त्यामुळे, मी भजीला प्राधान्य दिलं. आणि, मी त्याचा कुरकुरीत आस्वाद घेऊ लागलो. 
तितक्यात एक व्यक्ती, त्या मिठाई वाल्याला म्हणाला.. 

" अरे भाई, एक 'टक्कर' दे दो..! "

हे नवीन नाव ऐकून, मी तर अगदी चक्रावून गेलो. 
एकतर हे दोघेही, मनुष्य प्राणी आहेत. आता, नेमकी कोण कोणाला टक्कर देणार..? 
हा, मला पडलेला प्रश्न..
पण, त्याचं उत्तर मला ताबडतोड मिळालं..
त्या मिठाई वाल्याने... 
एका कागदा मध्ये, थोडे भजी आणि थोडी जिलेबी एकत्र करून त्या व्यक्तीच्या हातात दिले.

आणि.. अशारितीने, त्याने भजी आणि जिलेबीची संगम घडवून फर्मास टक्कर लाऊन दिली..

आहे कि नाही गंमत...!

Thursday, 1 October 2015


घरात गणपती बसवायला, तुम्हाला कोणी जबरदस्ती केली आहे का..?
( भाग :- १ )
आमची फार जुनी परंपरा आहे, आई वडील सांगून गेलेत यात खंड पाडू नकोस, नाही राव करायला लागतय...!

बस्स्स... हि कारणं ऐकून अगदी वैताग आला आहे.
करायचं असेल, तर अगदी मनापासून करा. नाहीतर कशाला उगाच स्वतःला हि त्रास आणि त्या देवाला दुशनं..
परवा गणपती विसर्जन करायला गेलो. आणि, त्याठिकाणी काही विचित्र प्रकार मला पाहायला मिळाले.
एक व्यक्ती, हातामध्ये गणपती घेऊन नदीच्या पुलावर आला. आणि, वरूनच त्याने गणपतीची मूर्ती पाण्यामध्ये टाकून दिली. आणि, आल्या पावली तसाच माघारी फिरला.
एक जाडजूड व्यक्ती, पायामध्ये चपला घालून गणपती विसर्जन करण्यासाठी आला होता. मूर्तीच्या खाली लाकडी पाट सुद्धा नव्हता. मूर्तीच्या चौरंगाला धरून तसाच घेऊन निघाला होता. चुकून तो मातीचा चौरंग तुटला असता तर..?
एक जोडपं, लाकडी पाटावर गणपती घेऊन आले. त्यांनी, विसर्जनाच्या अगोदरची आरती वगैरे काही सुद्धा केली नाही. हौदामध्ये गणपती विसर्जन केला. आणि, तिथे जवळच असणाऱ्या एका भिंतीवर बसून गुलुगुलू गप्पात ते दोघेही रममाण झाले.
तर काही व्यक्तींनी, आपल्या घरातील गणपतीची मूर्ती मोठ्या गणेश मंडळांच्या मांडवात आणून ठेवल्या होत्या.
तुमचा गणपती जेंव्हा विसर्जनाला नेणार आहात. तेंव्हा, त्याच्यासोबत आमचाही गणपती तुम्हीच विसर्जन करून टाका..!
अरे... हे काय आहे राव..?
तसं पाहायला गेलं तर, गणपती आपल्याकडे पाहुणा म्हणून आलेला असतो. दहा दिवस आपण त्याची अगदी व्यवस्थितपणे सरबराई करतो.
मग, शेवटच्या दिवशी हि अनास्था का..?
आपल्या घरी कोणी पाहुणा आला. तर जाते वेळी, आपण त्याला सोडवायला बस स्टेन्ड, एसटी स्टेन्ड किवा रेल्वेस्थानका पर्यंत जात असतो.
अरे... तर मग, हा तर चक्क आपला देव आहे. त्याची विदाई, आपण किती हौसेने थाटामाटात आणि धुमधडाक्यात केली पाहिजे.
हि गोष्ट, खरं तर मी इथे लिहिणार नव्हतो. पण, हे वाचून तरी काही लोकामंध्ये जनजागृती निर्माण होईल. अशी, भोळी अशा बाळगून मी इथे व्यक्त झालो आहे.
क्रमशः 

घरात गणपती बसवायला, तुम्हाला कोणी जबरदस्ती केली आहे का..?
( भाग :- २ )
अजून एक नवीन प्रकार.
धार्मिक परंपरा म्हणून, आपल्या घरामध्ये गणपती बसवायचा. आणि चुकून, त्या घरामध्ये कोणी महिला गर्भार असेल. तर मात्र, गणपती विसर्जन करायचा नाही.
का तर... म्हणे, गणपती विसर्जन केल्यावर घरात गणपती ( मुलगा ) जन्माला येणार नाही. श्रद्धा असावी, परंतु असली फालतू अंधश्रद्धा काय कामाची..?
त्या बाईच्या गर्भार पनाचा, आणि गणपती विसर्जनाचा काडीमात्र संबंध नसतो. उगाचच काहीतरी नवनवीन प्रथा सुरु करायच्या.
अशा कृत्याने, त्या महिलेच्या गर्भात जे मुल वाढत आहे. त्यात काही फरक पडणार असतो का..? कि, घरामध्ये असणारा गणपती विसर्जित केला नाही, तर अशी कोणती शक्ती तिथे निर्माण होते, कि गर्भामध्ये ताबडतोड लिंगबदल घडून येणार असतो..?
विनाकरण, देवाला आणि स्वतःला कोड्यात टाकायचं आणि त्या महिलेला वेठीस धरायचं हे काम आहे. याबाबत, काही लोकांची मला अगदी कीव करावीशी वाटते.
पूर्वी, अशा प्रकारची दोन चार उदाहरणं माझ्या पाहण्यात आली आहेत. त्यातील दोन कुटुंबात, मुली तर दोन कुटुंबात मुलगा जन्माला आलेला मी पाहिला आहे.
कसं सांगावं, आणि कसं समजवावं, हे सगळं विधिलिखित असतं हो..
परवा, पुन्हा एकदा हाच प्रकार घडला...
माझ्या एका मित्राच्या मुलाचं नुकतच लग्न झालं आहे. आणि आता, त्याची सून सुद्धा गर्भार आहे. मी जाणून होतोच, कि याबाबत हा मला काहीतरी विचारणा करणारच..!
आणि, माझी शंका खरी ठरील.
एकांतामध्ये, तो मित्र मला म्हणालाच.. अरे पंडित, घरी 'असा-असा' प्रकार आहे. त्यामुळे, यावर्षी आम्हाला गणपती काही विसर्जन करता येणार नाही.
मी त्याला लाख समजावलं. अरे मित्रा, असं काही नसतं. तुझ्या सुनबाईला जे काही मुल होणार आहे. ते अगोदरच ठरलं गेलं आहे. ते तिच्या गर्भात सुखरूप वाढतंय. तू हे नसते उद्योग का म्हणून करतोयेस..?
पण.. माझं ऐकेल तो मित्र कुठला..!
झालं.. मुर्खापुढे शहाणपण चालत नाही. मी हि त्याच्या हो मध्ये माझा होकार मिसळला. आता, मला त्याचा नवीन प्रश्न,
अरे पण, बाळंतपण झाल्यावर घरी देवाची पूजा अर्चा कोण करणार..? घरात तर सव्वा महिना विटाळ असणार ना..? मी त्याला म्हणालो, मला तू काही एक विचारू नकोस. ते सगळं तुझं तूच ठरव बाबा.
शेवटी, त्याच्या घराशेजारी असणाऱ्या एका गणेश मंडळाच्या मंदिरात ती गणेश मूर्ती ठेवायचा त्याने निर्णय घेतला. पण, हा एकतर्फी निर्णय होता. त्याने तेथील एका कार्यकर्त्याना अशी विचारणा सुद्धा केली. त्या कार्यकर्त्यांनी, याची मागणी साफ धुडकावून लावली.
काय तर म्हणे,
तुमच्या घरातील 'विटाळ' आमच्या मंदिरात कशाला..?
कशाला काय म्हणावं, आणि काय करावं, याचं कोणालाच काहीच भान उरलेलं नाहीये.
एक तर, तो मूर्ख मित्र. आणि, त्याचबरोबर तो बेअक्कल कार्यकर्ता..
आणि पुन्हा म्हणायचं,
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या...!
अशाने, तुमच्या घरी देव येणार आहे का...?